पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर


ईशान्येकडील दळणवळणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकत, इटानगर येथे ‘डोनी पोलो विमानतळ या अरुणाचल प्रदेशातील पहिल्या हरितक्षेत्र विमानतळाचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन

अरुणाचल प्रदेशातील सूर्य ('डोनी') आणि चंद्र ('पोलो') याचा प्राचीन स्वदेशी संदर्भ विमानतळाच्या नावातून दिसतो

विमानतळाच्या विकासासाठी 640 कोटींहून अधिक खर्च आला असून यामुळे हवाई दळणवळण सुधारेल आणि या प्रदेशातील व्यापार आणि पर्यटन वाढीसाठी तो उत्प्रेरक म्हणून काम करेल

8450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेल्या 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्रही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील

या प्रकल्पामुळे अरुणाचल प्रदेश अतिरिक्त वीज धारण करणारे राज्य बनणार

पंतप्रधान, वाराणसीमध्ये आयोजित महिनाभर चालणाऱ्या ‘काशी तमिळ संगमम् ’या कार्यक्रमाचे करणार उद्‌घाटन

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे या कार्यक्रमातून दर्शन

तामिळनाडू आणि काशी यांच्यातील जुन्या संबंधाचा जागर करणे, त्याची पुष्टी करणे आणि पुन्हा नव्याने शोध घेणे हे त्याचे उद्दिष्ट

Posted On: 17 NOV 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्‌घाटन करतील.

अरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान

ईशान्येकडील दळणवळणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकत, इटानगर येथे ‘डोनी पोलो विमानतळ या अरुणाचल प्रदेशातील पहिल्या हरितक्षेत्र विमानतळाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. विमानतळाचे नाव अरुणाचल प्रदेशातील परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे निदर्शक आहे.  अरुणाचल प्रदेशातील सूर्य ('डोनी') आणि चंद्र ('पोलो') याचा प्राचीन स्वदेशी संदर्भही विमानतळाच्या नावातून दिसतो.

अरुणाचल प्रदेशातील हे पहिले हरितक्षेत्र  विमानतळ 640 कोटी रुपये खर्चून, 690 एकर क्षेत्रफळात विकसित केले गेले आहे. 2300 मीटरच्या धावपट्टीसह, विमानतळ कोणत्याही हवामानामध्‍ये   कामकाजासाठी योग्य असणार आहे. विमानतळ टर्मिनल ही एक आधुनिक इमारत असून, ऊर्जा कार्यक्षमता, अक्षय ऊर्जा आणि संसाधनांच्या पुनर्वापराला ती प्रोत्साहन देते.

इटानगरमध्ये  नवीन विमानतळ विकसित झाल्यामुळे या प्रदेशातील संपर्क  तर सुधारेलच पण व्यापार आणि पर्यटनाच्या वाढीलाही गती  मिळून  या क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केंद्र  राष्ट्राला समर्पित करतील. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात 80 किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात पसरलेला, 8450 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च  करून विकसित केलेला  हा प्रकल्प अरुणाचल प्रदेशला वीज अधिशेष राज्य बनवेल, तसेच ग्रीड स्थैर्य आणि एकात्मिकता  दृष्टीने राष्ट्रीय ग्रीडसाठी लाभदायक ठरेल.  हरित ऊर्जेचा किंवा पर्यावरण पूरक ऊर्जेचा  अवलंब वाढविण्याच्या देशाच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प मोठे योगदान देईल.

वाराणसीमध्ये पंतप्रधान

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून  प्रेरित, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कल्पनेचा प्रचार हा सरकारच्या प्रमुख लक्ष्यीत  क्षेत्रांपैकी एक आहे.  याचे प्रतिबिंब असणारा  आणखी एक उपक्रम, 'काशी तमिळ संगम' हा महिनाभर चालणारा कार्यक्रम काशी (वाराणसी) येथे आयोजित केला जात आहे आणि त्याचे उद्घाटन 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे , देशातील सर्वात महत्त्वाची  आणि प्राचीन  अध्ययन पीठ असलेल्या तामिळनाडू आणि काशी या दोन ठिकाणांमधले जुने दुवे पुन्हा शोधणे, पुष्टी करणे आणि त्याचा आनंद घेणे हा आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट दोन प्रांतातील विद्वान, विद्यार्थी, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार इत्यादी सर्व स्तरातील लोकांना एकत्र येण्याची, त्यांचे ज्ञान, संस्कृती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक  करण्याची आणि एकमेकांच्या अनुभवातून  शिकण्याची संधी प्रदान करणे हा आहे. तामिळनाडूतील 2500 हून अधिक प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. ते समान व्यापार, व्यवसाय आणि स्वारस्य असलेल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्रे, स्थलदर्शन  इत्यादींमध्ये सहभागी होतील. हातमाग, हस्तकला, ओडीओपी (एक जिल्हा एक उत्पादन ) उत्पादने, पुस्तके, माहितीपट, पाककृती, कला प्रकार, इतिहास, पर्यटन स्थळे इत्यादींचे महिनाभर चालणारे प्रदर्शनही काशीमध्ये भरवले जाणार आहे. भारतीय ज्ञान प्रणालीच्या संपत्तीला आधुनिक ज्ञान प्रणालींसोबत जोडण्यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये जो  भर देण्यात आला आहे, त्या अनुरूप हा प्रयत्न आहे. आयआयटी मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ हा कार्यक्रम कार्यान्वित करणाऱ्या दोन संस्था आहेत.  

 

 

 

 

S.Bedekar/Vinayak/Sonali/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1876813) Visitor Counter : 197