पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अयोध्येत श्रीराम कथा पार्क इथे प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद

Posted On: 23 OCT 2022 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर  2022

जय सिया राम।

जय जय सिया राम॥

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उत्तरप्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, इथले लोकप्रिय कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, सर्व पूज्यनीय संत महंत,उपस्थित इतर सर्व ज्ञानी समुदाय, श्रद्धाळू भक्त, बंधू आणि भगिनींनो,

श्री रामलला चे दर्शन आणि त्यानंतर राजा रामाचा अभिषेक, हे सौभाग्य प्रभू रामांच्या कृपेनेच मिळत असते. जेव्हा श्रीरामावर अभिषेक केला जातो, त्यावेळी आपल्या अंत:करणात प्रभू श्रीरामाचे आदर्श आणि मूल्य अधिक दृढ होत जातात. रामाच्या अभिषेकासोबतच, त्यांनी आपल्याला दाखवलेला मार्ग अधिकच उजळून जातो, स्पष्ट होतो. अयोध्येच्या तर कणाकणात, त्यांचे दर्शन,त्यांचे अस्तित्व सामावलेले आहे. आज अयोध्येतील रामलीलांच्या माध्यमातून, शरयू आरतीच्या माध्यमातून, दीपोत्सवातून आणि रामायण पथाविषयीचे संशोधन आणि अध्ययनाच्या माध्यमातून आता हे दर्शन संपूर्ण जगाला होत आहे. मला अतिशय आनंद आहे की अयोध्येतील लोक, उत्तर प्रदेशातील आणि देशातील लोक ह्या प्रवाहाचा भाग बनले आहेत. देशात लोककल्याणाचा प्रवाह अधिकच गतिमान झाला आहे. आज या प्रसंगी मी आपल्या सर्वांना, देशबांधवांना आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभू श्रीरामांच्या या पवित्र जन्मभूमी वरून आज मी सर्व देशबांधवांना नरकचतुर्दशी आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

यावर्षी दिवाळी अशा वेळी आली आहे , जेव्हा आपण काही काळापूर्वीच स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत आणि आपण यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. स्वातंत्र्याच्या ह्या अमृतकाळात प्रभू श्री रामासारखी संकल्पशक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. प्रभू श्रीरामांनी आपल्या वचनातून, आपल्या विचारातून आपल्या शासनातून आपल्या कारभारातून जी मूल्ये प्रस्थापित केलीत, ती मूल्येच सबका साथ-सबका विकास ची प्रेरणा आहेत. आणि सबका विश्वास-सबका प्रयासचा आधारही आहेत.  येत्या 25 वर्षात विकसित भारताची आकांक्षा मनात घेऊन पुढे वाटचाल करणाऱ्या आम्हा भारतवासियांसाठी श्रीरामाचे आदर्श, एखाद्या अशा दीपस्तंभासारखे आहेत, जे आपल्याला कितीही अवघड लक्ष्य असले तरी ते पूर्ण करण्याची हिंमत देतील.

मित्रांनो,

यावर्षी लाल किल्ल्यावरुनही मी सर्व देशबांधवांना पंच प्रण म्हणजे पाच संकल्पाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ह्या पंच प्रणांची ऊर्जा ज्या एका तत्वाशी जोडलेली आहे, ते तत्व म्हणजे भारतातील नागरिकांचे कर्तव्य. आज अयोध्या नगरीत, दीपोत्सवाच्या ह्या पवित्र प्रसंगी आपल्याला या संकल्पाचा पुनरुच्चार करायचा आहे. श्रीरामाकडून जेवढे काही शिकत येईल, ते शिकायचे आहे.

प्रभू श्रीराम ' मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून ओळखले जातात. मर्यादा, आपल्याला मान राखायलाही  शिकवते आणि मान द्यायलाही शिकवते. आणि मर्यादा जो 'बोध' देण्यासाठी आग्रही असते. तो बोध म्हणजेच कर्तव्य आहे. आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे-- "रामो विग्रहवान् धर्म:"

म्हणजेच राम साक्षात धर्म म्हणजे कर्तव्याचे मूर्तिमंत रूप आहेत. प्रभू श्रीराम जेव्हाही ज्या ज्या भूमिकेत होते, तेव्हा त्यांनी आपल्या कर्तव्यांवर सर्वाधिक भर दिला. जेव्हा ते राजकुमार होते, तेव्हा त्यांनी ऋषीमुनी, त्यांचे आश्रम आणि गुरुकुल यांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडले. 

राज्याभिषेकाच्या वेळी श्रीरामांनी एका आज्ञाधारक मुलाचे  कर्तव्य पार पाडले. त्यांनी आपले पिता आणि कुटुंबाच्या वचनांना प्राधान्य देत राज्याचा त्याग करत, वनवासात जाण्याचे कर्तव्य पार पाडले. वनवासात असतांना त्यांनी आदिवासींना पोटाशी धरलं. आश्रमात गेले तेव्हा माता शबरीचे आशीर्वाद घेतले. त्यांनी सर्वांची सोबत घेऊन लंकेवर विजय मिळवला, आणि जेव्हा सिंहासनावर बसले तेव्हा वनातले त्यांचे तेच सोबती त्यांच्यासोबत उभे राहिले. कारण प्रभू श्रीरामांनी कधीही कोणाला मागे सोडून दिले नाही. रामांनी कधीच आपल्या कर्तव्यापासून पाठ फिरवली नाही. म्हणूनच, राम त्या भावनेचे प्रतीक आहेत, जी भावना असं मानणारी आहे की आपले अधिकार कर्तव्यांना जोडूनच येतात. कर्तव्ये केली तर आपले अधिकार आपल्याला मिळतात. म्हणूनच आपल्याला कर्तव्यांप्रति समर्पित होण्याची गरज आहे. आणि योगायोग बघा, आपल्या संविधानाच्या मूळ प्रतिवर प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण यांचे चित्र रेखाटलेले आहे, संविधानाच्या त्याच पानावर आपल्या मूलभूत अधिकारांविषयी लिहिलेले आहे.  म्हणजे एकीकडे आपल्या संवैधानिक अधिकारांची हमी, तर दुसरीकडे त्यासोबतच, प्रभू रामाच्या रूपाने कर्तव्यांची  शाश्वत सांस्कृतिक जाणीव! म्हणूनच, आपली कर्तव्ये करण्याचा संकल्प जेवढा दृढ असेल, तेवढीच रामराज्याची कल्पना साकार होत जाईल.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देशाने आपल्या वारशाविषयी अभिमान बाळगावा आणि गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवावी असं आवाहनही केलं आहे.

ही प्रेरणा देखील आपल्याला प्रभू श्रीरामांपासूनच मिळते. त्यांनी म्हटले होते-- जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।

म्हणजे सोन्याची लंका बघूनही ज्यांच्या मनात त्याबद्दल मोह निर्माण झाला नाही, उलट त्यांनी सांगितले की माता आणि मातृभूमी माझ्यासाठी स्वर्गापेक्षाही प्रिय आहे. याच आत्मविश्वासाने ते जेव्हा अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्येचं वर्णन केले जाते--

नव ग्रह निकर अनीक बनाई।

जनु घेरी अमरावति आई

म्हणजे अयोध्येची तुलना स्वर्गाशी केली जाते. म्हणूनच, बंधू आणि भगिनींनो, जेव्हा राष्ट्र निर्मितीचा संकल्प केला जातो, नागरिकांसाठी देशात सेवा भाव असतो तेव्हाच राष्ट्राचा विकास असीम उंचीवर पोहोचतो.

एक काळ असा होता जेव्हा रामाबद्दल, आपली संस्कृती आणि परंपरेबद्दल बोलणं देखील टाळलं जात असे. याच देशात रामाच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण केली जात होती. त्याचा परिणाम काय झाला? आपली धार्मिक, सांस्कृतिक स्थळं आणि शहरं मागे पडत गेली. अयोध्येच्या रामघाटावर आल्यावर त्याची दुर्दशा बघून मनाला क्लेश व्हायचे. काशीचा बकालपणा, ती घाण आणि त्या गल्ल्या बघून त्रास व्हायचा. ज्या स्थळांना आम्ही आमची ओळख, आमच्या अस्तित्वाचं प्रतीक मानत होतो, त्यांची अवस्था वाईट असताना, देशाच्या उत्थानाचं मनोबल आपोआप गळून पडायचं.

मित्रांनो,

गेल्या आठ वर्षांत देशाने हीन भावनेच्या या बेड्या तोडल्या आहेत. आम्ही भारतातल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा सर्वांगीण दृष्टिकोन समोर ठेवला आहे. राममंदिर आणि काशी विश्वनाथ धाम ते केदारनाथ आणि महाकाल-महालोकपर्यंतच्या, घोर उपेक्षेचे बळी ठरलेल्या आमच्या श्रद्धास्थानांचं वैभव आम्ही पुनरुज्जीवित केलं आहे. एक सर्वसमावेशक प्रयत्न सर्वसमावेशक विकासाचं माध्यम कसं ठरतं, याचा आज देश साक्षीदार आहे. अयोध्येच्या विकासासाठी आज हजारो कोटी रुपयांच्या नवीन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. रस्त्यांचा विकास होत आहे. चौकांचं आणि घाटांचं सुशोभीकरण होत आहे. नवीन पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. म्हणजेच अयोध्येचा विकास नवीन आयाम प्रस्थापित करत आहे. अयोध्या रेल्वे स्थानकाबरोबरच जागतिक दर्जाचं विमानतळही बांधलं जाणार आहे. जेणेकरून संपर्कक्षमता आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा लाभ या संपूर्ण परिसराला मिळेल. अयोध्येच्या विकासाबरोबरच रामायण सर्किटच्या विकासावरही काम सुरु आहे. म्हणजे, अयोध्येपासून सुरु झालेल्या विकासाच्या अभियानाचा विस्तार आसपासच्या संपूर्ण परिसरात होईल.   

मित्रांनो,

या सांस्कृतिक विकासाचे अनेक सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय आयाम देखील आहेत. श्रुंगवेरपूर धाम इथं निषादराज पार्क बांधलं जात आहे. या ठिकाणी भगवान राम आणि निषादराज यांची 51 फुट उंचीची कांस्य प्रतिमा बनवली जात आहे. ही प्रतिमा रामायणामधला तो सर्वसमावेशक संदेश देखील जन-मानसापर्यंत पोहोचवेल, जो आपल्याला समानता आणि समरसतेसाठी वचनबद्ध करतो. त्याचप्रमाणे अयोध्येत क्वीन-हो मेमोरियल पार्क बांधण्यात आलं आहे. हे उद्यान भारत आणि दक्षिण कोरियाचे आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी, दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याचं एक माध्यम ठरेल. या विकासामुळे, पर्यटनाच्या एवढ्या शक्यतांमुळे युवकांसाठी रोजगाराच्या किती संधी उपलब्ध होतील, याची आपण कल्पना करू शकता. सरकारने सुरु केलेली रामायण एक्स्प्रेस धार्मिक पर्यटनाच्या दिशेने एक चांगली सुरुवात आहे. आज देशात चारधाम प्रकल्प असो, बुद्धिस्ट सर्किट असो, किंवा प्रसाद योजने अंतर्गत सुरु असलेली विकास कामं असोत, आपला हा सांस्कृतिक उत्कर्ष, नवीन भारताच्या समग्र उत्थानाचा श्रीगणेशा आहे.      

मित्रांनो,

आज अयोध्या नगरीमधून माझ्या संपूर्ण देशाच्या लोकांना एक विनंती देखील आहे, एक नम्र निवेदनही आहे. अयोध्या हे भारताच्या महान सांस्कृतिक वारशाचं प्रतिबिंब आहे. राम, अयोध्येचे राजपुत्र होते, पण ते संपूर्ण देशासाठी आराध्य आहेत. त्यांची प्रेरणा, त्यांचं तप-तपस्या, त्यांनी दाखवलेला मार्ग, प्रत्येक देशवासीयासाठी आहे. भगवान रामांच्या आदर्शांचं अनुकरण करणं आपलं, सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे. त्यांचे आदर्श आपल्याला सतत जगायचे आहेत, जीवनभर आचरणात आणायचे आहेत. आणि या आदर्शांच्या मार्गावर चालत असताना अयोध्यावासीयांवर दुहेरी जबाबदारी आहे. अयोध्येच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुमची दुहेरी जबाबदारी आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा जगभरातून इथे येणार्‍यांची संख्या अनेक पट वाढेल. ज्या ठिकाणी कणा-कणात राम असेल, तिथली माणसं कशी असतील, तिथल्या लोकांचं मन कसं असेल, हेही तितकंचं महत्वाचं आहे. जसं रामाने सर्वांना आपलेपण दिलं, तसंच अयोध्यावासियांनी इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपलेपणाने स्वागत करायचं आहे. अयोध्येची ओळख, एक कर्तव्य नगरी म्हणून देखील व्हायला हवी. अयोध्या सर्वात स्वच्छ शहर असावं, इथले रस्ते रुंद असावेत, इथली सुंदरता अप्रतिम असावी, यासाठी योगी सरकार दूरदृष्टीने अनेक प्रकल्पांना पुढे नेत आहे, प्रयत्न करत आहे. पण या प्रयत्नांमध्ये अयोध्यावासीयांचा सहभाग आणखी वाढला, तर अयोध्या नगरीची दिव्यता आणखी खुलेल. जेव्हा जेव्हा नागरी मर्यादांची चर्चा होईल, नागरी शिस्तीची चर्चा होईल, अयोध्येच्या लोकांचं नांव सर्वात पुढे असलं पाहिजे.  मी अयोध्येच्या पावन भूमीमध्ये प्रभू श्री राम यांच्याकडे हीच कामना  करतो की, देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याच्या शक्तीमुळे भारताचं सामर्थ्य शिखरावर पोहोचेल. नवीन भारताचं आमचं स्वप्नं मानवतेच्या कल्याणाचं माध्यम बनेल. याच इच्छेसह मी माझं भाषण संपवतो. पुन्हा एकदा सर्व देशवासीयांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद!

बोला-सियावर रामचंद्र की जय!

सियावर रामचंद्र की जय!

सियावर रामचंद्र की जय!

धन्यवाद!

 

 

 

 

S.Patil/Radhika/Rajashree/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1870616) Visitor Counter : 276