पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशात अयोध्या इथं भगवान श्रीरामांच्या प्रतीक स्वरुपाचा राज्याभिषेक आणि पूजा
“प्रभू श्रीरामांसारखा दृढनिश्चय या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपल्याला देशाला नव्या ऊंचीवर नेईल”
“प्रभू श्रीरामांचे शब्द आणि विचारातून, आपल्याला सबका साथ, सबका विकासची प्रेरणा आणि सबका विश्वास तसेच सबका प्रयासच्या सिद्धांताचे दर्शन घडते”
“श्रीराम कधीही कोणाला मागे ठेवत नाहीत, राम कधीही आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवत नाहीत.”
“आपल्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये, मूलभूत अधिकारांच्या पानावर श्रीरामांचे चित्र, आपल्याला कायम आपल्या कर्तव्यांची कायम जाणीव राहावी, हेच सूचित करणारे आहे.”
“गेल्या आठ वर्षांत, देशाने न्यूनगंडाच्या शृंखला तोडून टाकत, भारताच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवत, सर्वंकष विकासाचा मार्ग अनुसरला आहे”
“अयोध्या भारताच्या महान सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे.”
“अयोध्येची “कर्तव्य नगरी” अशी ओळख निर्माण करायला हवी”
Posted On:
23 OCT 2022 7:41PM by PIB Mumbai
दिवाळीच्या पूर्वसंध्येला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात अयोध्या इथे, श्रीरामांच्या प्रतीक स्वरूपाचा राज्याभिषेक केला. त्यानंतर शरयू नदीवरच्या नव्या घाटावर त्यांनी आरतीही केली. या ठिकाणी, त्यांनी संत-महतांशी चर्चाही केली.
यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवादही साधला. प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद असल्यामुळेच, रामलल्लाचे दर्शन आणि राज्याभिषेक करण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान, राम यांच्या अभिषेकामुळे, त्यांची मूल्ये आणि आदर्श अधिकच मजबूत झाले आहेत. अभिषेकामुळे, प्रभू रामचंद्रानी दाखवलेला मार्ग अधिकच स्वच्छपणे दिसू लागला आहे. अयोध्येच्या प्रत्येक कणाकणात आपल्याला श्रीरामांचे तत्वज्ञान जाणवते.” असे पंतप्रधान म्हणाले. “अयोध्येतील रामलीला, शरयू आरती, दीपोत्सव आणि संशोधन आणि रामायणाच्या अध्ययनातून हे तत्वज्ञान आज जगभर पोहोचवले जात आहे.” असे मोदी पुढे म्हणाले.
ही दिवाळी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारताने आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत आणि आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रभू श्रीरामाच्या संकल्पशक्तीपासून प्रेरणा घेत, आपण देशाला नव्या उंचीवर घेऊन जाऊ. प्रभू रामाचे शब्द आणि विचारांमधून आपल्याला, सबका साथ, सबका विकासाची प्रेरणा मिळते. तसेच त्यांचा राज्यकारभार आणि प्रशासनप्रणालीतून, सबका विश्वास आणि सबका प्रयासची तत्वे प्रतिबिंबित होतात, असे मोदी म्हणाले. “प्रत्येक भारतीयांसाठी, प्रभू श्रीरामाची तत्वे, विकसित भारताची प्रेरणा देणारी आहेत. त्यांचे विचार, अत्यंत कठीण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारे ‘दीपस्तंभ’ठरले आहेत” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, पंच प्रण’ म्हणून सांगितलेल्या संकल्पांना त्यांनी उजाळा दिला. “या पंचप्रणांची ऊर्जा नागरिकांच्या कर्तव्य भावनेशी जोडलेली आहे. आज, अयोध्येच्या या पवित्र नगरीत, या मंगल प्रसंगी, आम्ही पुन्हा एकदा या संकल्पासाठी आणि रामाची शिकवण आचरणात आणण्यासाठी पुन्हा एकदा समर्पित वृत्तीने निर्धार करतो आहोत.” मर्यादा पुरुषोत्तम रामाचे स्मरण करत, पंतप्रधान म्हणाले, की त्यांची मर्यादा आपल्या वागण्याची शिस्त शिकवते तसेच ही ‘मर्यादा’ आपल्याला कर्तव्यपथावर जाण्यासही प्रेरणा देते.
पंतप्रधान म्हणाले की कर्तव्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. प्रत्येक भूमिकेत श्रीरामाने कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. “राम कधीच कोणाचा हात सोडत नाही, राम कर्तव्याकडे कधीच पाठ फिरवत नाही. म्हणूनच कर्तव्यपालानातून आपले अधिकार प्राप्त होतात या भारतीय मान्यतेचे प्रतीक म्हणजे श्रीराम,” पंतप्रधान म्हणाले. भारतीय राज्य घटनेच्या मूळ प्रतीवर प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची चित्रे आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आणि घटनेच्या याच पानावर मुलभूत अधिकारांचे विवेचन केले आहे. म्हणजे, एकीकडे राज्य घटना मूलभूत अधिकारांची हमी देते, आत त्याच वेळी श्रीरामाकडून शाश्वत सांस्कृतिक कर्तव्याची जाणीव देखील करून दिली जाते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या ‘पंच प्रणाचा उल्लेख करत, आपल्या वारशाविषयी अभिमान बाळगणे आणि गुलामीची मानसिकता दूर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. माता आणि मातृभूमी आपल्यासाठी स्वर्गापेक्षाही उच्च स्थानी आहे, यांची शिकवण आपल्याला प्रभू श्रीरामांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितलं. राम मंदिर, काशी विश्वनाथ, केदारनाथ आणि महाकाल लोक या सगळ्यांची उदाहरणे देत, पंतप्रधान म्हणाले, की देशाला अभिमान वाटणाऱ्या सर्व धर्मस्थळांचे आम्ही पुनरुज्जीवन करत आहोत.
पंतप्रधानांनी त्या काळाची आठवण करून दिली ज्यावेळी लोक भगवान श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आणि त्याबद्दल बोलायला कचरायचे. “आम्ही न्यूनगंडाची भावना मोडून काढली आहे आणि गेल्या आठ वर्षांत भारतातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा सर्वांगीण दृष्टिकोन समोर ठेवला आहे. अयोध्येत हजारो कोटी रुपये मूल्याचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. रस्त्यांच्या विकासापासून ते घाट आणि चौकांच्या सुशोभीकरणापर्यंत, नवीन रेल्वे स्टेशन आणि जागतिक दर्जाच्या विमानतळासारख्या पायाभूत सुधारणांपर्यंत, वाढीव संपर्क सुविधा आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन या सारख्या सुविधांचा संपूर्ण प्रदेशाला मोठा फायदा होईल, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. रामायण सर्किटच्या विकासाचे काम सुरू असल्याची माहिती देखील पंतप्रधानांनी दिली.
पंतप्रधानांनी सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पैलूंवर प्रकाश टाकला. श्रिंगवरपूर धाममध्ये निषाद राज पार्क विकसित केला जात असून या पार्कमध्ये भगवान श्री राम आणि निषाद राज यांची 51 फूट उंच कांस्य मूर्ती उभारण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. हा पुतळा आपल्याला समानता आणि समरसतेच्या संकल्पाशी जोडणारा रामायणाचा सर्वसमावेशकतेचा संदेश साऱ्या जगाला देईल, असे पंतप्रधान म्हणाले. अयोध्येतील ‘क्वीन हिओ मेमोरियल पार्क’च्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हे पार्क भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना बळकटी देण्याचे माध्यम म्हणून काम करेल. रामायण एक्सप्रेस ट्रेन हे अध्यात्मिक पर्यटनाच्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. “चारधाम प्रकल्प असो किंवा मग बुद्ध सर्किट असो किंवा प्रसाद योजनेतील विकास प्रकल्प असो, हे सांस्कृतिक पुनरुज्जीवन म्हणजे नव्या भारताच्या सर्वांगीण विकासाचा श्रीगणेश आहे.” असे पंतप्रधान म्हणाले
अयोध्या हे भारताच्या महान सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. श्री राम हे अयोध्येचे राजपुत्र असले तरी त्यांची आराधना संपूर्ण देश करतो, असे ते म्हणाले. त्यांची प्रेरणा, त्यांची तपश्चर्या, त्यांचा मार्ग प्रत्येक देशवासीयासाठी आहे. भगवान रामाच्या आदर्शांचे पालन करणे हे आपणा सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. आपण सतत त्यांचे आदर्श जगले पाहिजेत आणि सोबतच ते आदर्श जीवनातही लागू केले पाहिजेत, असे ते म्हणाले. अयोध्येतील लोकांना या पवित्र शहरात सर्वांचे स्वागत करणे आणि ते स्वच्छ ठेवणे या त्यांच्या दुहेरी कर्तव्याची आठवण करून देऊन पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. ‘कर्तव्य नगरी’ म्हणून अयोध्येची ओळख निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी भगवान श्री रामलला विराजमान यांचे दर्शन घेतले आणि पूजा केली तसेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या जागेची पाहणी केली.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्य गोपालदासजी महाराज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
***
S.Patil/R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870547)
Visitor Counter : 211
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam