पंतप्रधान कार्यालय

गुजरातमध्ये लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल परिसराच्या कामाचा दूरदृश्य प्रणाली द्वारे आढावा घेताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 18 OCT 2022 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑक्‍टोबर 2022

 

नमस्कार,

आपण सर्वजण जागतिक वारसा असलेल्या लोथल इथं प्रत्यक्षात हजर आहात. मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरवरून दिल्लीमधून आपल्याशी जोडला गेलो आहे, पण मनोमन असं वाटत आहे की मी आपल्या सर्वांबरोबरच आहे. अत्ताच मी ड्रोनच्या माध्यमातून राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाशी निगडीत कामं पहिली आहेत, त्याच्या प्रगतीचा आढावाही घेतला आहे. मला आनंद वाटतो, की या प्रकल्पाशी संबंधित कामं वेगानं सुरु आहेत.

मित्रहो,

या वर्षी लाल किल्ल्यावरून पंच-प्रणां बद्दल बोलताना मी आपल्या वारशाचा अभिमानानं उल्लेख केला होता. आणि अत्ताच आपल्या भूपेंद्र भाईंनी पण त्याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. आपला सागरी वारसा हा आपल्या पूर्वजांनी आपल्याला सोपवलेला असाच एक महान वारसा आहे. कोणत्याही स्थळाचा अथवा काळाचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना प्रेरितही करतो आणि आपल्याला भविष्यासाठी सतर्क देखील करतो. आपल्या इतिहासातल्या अशा अनेक कथा आहेत, ज्या विसरल्या गेल्या. त्यांचं जतन करण्याचे आणि पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मार्ग शोधले गेले नाहीत. इतिहासातल्या अशा घटनांमधून आपण किती तरी शिकू शकतो.

भारताचा सागरी वारसाही असा विषय आहे, ज्याच्याबद्दल खूप कमी बोललं गेलं आहे. शतकांपूर्वी भारताच्या व्यापार-व्यवसायाचा जगातल्या मोठ्या भूप्रदेशात प्रसार झाला होता. आपलं नातं जगातल्या प्रत्येक संस्कृतीबरोबर राहिलं असेल, तर यामागे भारताच्या सागरी सामर्थ्याची खूप मोठी भूमिका होती. पण पारतंत्र्याच्या प्रदीर्घ काळानं भारताचं हे सामर्थ्य तर मोडून काढलंच पण काळाबरोबर आपण भारतीय, आपल्या या सामर्थ्याबाबत उदासीनही होत गेलो.

आपण विसरलो की आपल्याकडे लोथल आणि धोलावीरा सारखे महान वारसे आहेत, जे हजारो वर्षांपूर्वी देखील सागरी व्यापारासाठी प्रसिद्ध होते. आपल्या दक्षिणेकडेच्या प्रांतात चोल साम्राज्य, चेर राजवंश, पांड्य राजवंश देखील होता, ज्यांनी सागरी साधन संपत्तीचं सामर्थ्य ओळखलं आणि त्याला एक अभूतपूर्व प्रतिष्ठा दिली. त्यांनी केवळ आपल्या सागरी सामर्थ्याचा विस्तार केला नाही, तर त्याच्या मदतीने दूर-दूरच्या देशांपर्यंत व्यापार पोहोचवण्यात ते यशस्वी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एका समर्थ आरमाराची स्थापना केली होती आणि परदेशी आक्रमणकर्त्यांना आव्हान दिलं होतं.

हा सर्व भारताच्या इतिहासाचा असा गौरवास्पद अध्याय आहे, ज्याला दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. आपण कल्पना करू शकता, हजारो वर्षांपूर्वी कच्छमध्ये मोठ्या मोठ्या सागरी जहाजांच्या निर्मितीचा संपूर्ण उद्योग चालायचा. भारतात बनलेली मोठी-मोठी जहाजं जगभरात विकली जायची. वारशा प्रति असलेल्या या उदासीनतेने देशाचं मोठं नुकसान केलं. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही ठरवलं की धोलावीरा आणि लोथल, या भारताच्या गौरवशाली केंद्रांना आम्ही त्याच रुपात परत आणू, ज्यासाठी ती एके काळी प्रसिद्ध होती. आणि आज आपण त्या अभियानाचं काम वेगानं होताना पाहत आहोत.

मित्रहो,

आज मी जेव्हा लोथल बद्दल बोलत आहे, तेव्हा मला हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांचं देखील स्मरण होत आहे. आज गुजरातच्या अनेक भागांत सिकोतर मातेची उपासना केली जाते. तिला समुद्राची देवी म्हणून पूजलं जातं. हजारो वर्षांपूर्वीच्या लोथलवर संशोधन करणार्‍या जाणकारांचा असा विश्वास आहे की त्या वेळी देखील सिकोतर मातेला कोणत्या न कोणत्या रुपात पूजलं जात होतं. असं म्हणतात, समुद्रात जाण्यापूर्वी सिकोतर मातेची पूजा केली जायची, जेणेकरून ती प्रवासा दरम्यान त्यांचं रक्षण करेल. इतिहासकारांच्या मते सिकोतर मातेचा संबंध सोकोत्रा द्वीपाशी आहे, जे आज एडनच्या आखतात आहे. यावरून हे लक्षात येतं की आजपासून हजारो वर्षांपूर्वी देखील खंबातच्या आखातापासून दूरवर सागरी व्यापाराचे मार्ग खुले होते.

मित्रहो,

नुकतंच वडनगर जवळ उत्खनना दरम्यान सिकोतर मातेच्या मंदिरचे अवशेष मिळाले आहेत. काही असे पुरावे देखील मिळाले आहेत, ज्यावरून प्राचीन काळात या ठिकाणाहून सागरी व्यापार होत असल्याची माहिती मिळते. तसंच सुरेंद्रनगरच्या झिंझुवाडा गावात दीपगृह होतं, याचे पुरावे मिळाले आहेत. आपल्याला माहित आहे, की दीपगृह जहाजांना रात्रीच्या वेळी रस्ता दाखवण्यासाठी बांधली जात होती. आणि देशातल्या लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, झिंझुवाडा गावापासून समुद्र जवळ-जवळ शंभर किलोमीटर दूर आहे. पण या गावात असे अनेक दाखले मिळतात, की ते सांगतात की शतकांपूर्वी या गावात खूप व्यस्त बंदर होतं. यावरून या संपूर्ण क्षेत्रात प्राचीन काळापासूनच सागरी व्यापार भरभराटीला आला होता अशी माहिती मिळते.

मित्रहो,

लोथल केवळ सिंधू संस्कृतीचं एक मोठं व्यापार केंद्र नव्हतं, तर ते भारताचं सागरी सामर्थ्य आणि समृद्धीचं प्रतीक देखील होतं. हजारो वर्षांपूर्वी लोथलला ज्या प्रकारे एक बंदराचं शहर म्हणून विकसित केलं गेलं होतं, ते आजही मोठ-मोठ्या तज्ञांना अचंबित करतं. लोथलच्या उत्खननात मिळालेलं शहर, बाजार आणि बंदराचे अवशेष, त्या काळातलं नगर नियोजन आणि स्थापत्त्यशास्त्राचं अद्भुत दर्शन घडवतात. नैसर्गिक आव्हानांचा सामना करण्यासाठी इथे ज्या प्रकारची व्यवस्था होती, त्यावरून आजच्या नियोजनासाठी देखील खूप काही शिकता येईल.

मित्रहो,

एक प्रकारे या परिसराला देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती दोघींचा आशीर्वाद मिळाला होता. अनेक देशांबरोबरच्या व्यापारी नात्यामुळे या ठिकाणी अमाप संपत्ती देखील होती. असं म्हणतात की लोथलच्या बंदरावर त्या वेळी 84 देशांचे झेंडे फडकत असत. तसंच जवळच असलेल्या वल्लभी विद्यापीठात जगभरातल्या 80 पेक्षा जास्त देशांचे विद्यार्थी शिकायला येत होते.  

सातव्या शतकात या भागात आलेल्या चिनी तत्वज्ञांनी देखील असे लिहून ठेवले आहे की, त्या काळात वल्लभी विद्यापीठात 6 हजाराहून अधिक विद्यार्थी शिकत होते. म्हणजेच सरस्वती देवीची देखील या भागावर कृपा होती.

मित्रांनो,

लोथलमध्ये जे वारसा संकुल उभारले जात आहे, ते अशा प्रकारे निर्माण होत आहे की भारतातील सामान्याहून सामान्य व्यक्ती देखील हा इतिहास सहजपणे समजून, जाणून घेऊ शकेल. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तेच युग पुन्हा सजीव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हजारो वर्षांपूर्वीचे तेच वैभव, तेच सामर्थ्य या धरतीवर पुन्हा एकदा जिवंत केले जात आहे.

हे संकुल जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल असा माझा ठाम विश्वास आहे. एका दिवसात हजारो पर्यटकांचे स्वागत होऊ शकेल अशा पद्धतीने हे संकुल विकसित करण्यात येत आहे. ज्या प्रकारे एकता नगरमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा विक्रम होतो आहे तशाच प्रकारे, देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हे वारसा संकुल पाहण्यासाठी लोथल येथे येतील, तो दिवस आता लवकरच येईल. यामुळे येथे रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. हे ठिकाण अहमदाबाद शहरापासून फारसे दूर नाही या गोष्टीचा देखील लाभ होईल. भविष्यात अधिकाधिक लोक शहरांतून येथे येतील, येथील पर्यटनाला चालना देतील.

मित्रांनो,

या भागाने जो अडचणींनी भरलेला काळ बघितला आहे ते मी कधीच विसरू शकत नाही. एके काळी समुद्राचे पाणी येथपर्यंत येत असे. त्यामुळे येथील फार मोठ्या क्षेत्रावर कोणतेही पीक घेणे अशक्य होते. 20-25 वर्षांपूर्वी तर अशी परिस्थिती होती की एखाद्या गरजेच्या वेळी येथील शेकडो एकर जमिनीच्या बदल्यात देखील कोणी कर्ज देण्यास तयार होत नसे. कर्ज देणारा देखील म्हणत असे की या अशा जमिनीचे मी काय करणार, यातून मला काही फायदा होणार नाही. लोथल आणि या संपूर्ण परिसराला आम्ही त्या काळातून बाहेर घेऊन आलो आहोत.

आणि मित्रांनो,

लोथल आणि आजूबाजूच्या क्षेत्राला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी आमचे लक्ष केवळ वारसा संकुलावरच केंद्रित झालेले नाही. आज गुजरातच्या तटवर्ती भागांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अनेक प्रकल्पांचे काम सुरु आहे, किनारपट्टी भागात विविध उद्योगांची स्थापना होत आहे. या योजनांच्या कामासाठी लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

आता सेमीकंडक्टर तयार करण्याचा कारखाना देखील या भागाच्या गौरवात भर घालेल. हजारो वर्षांपूर्वी लोथल आणि आजूबाजूचा परिसर जेवढा विकसित होता तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी आपले सरकार संपूर्ण शक्तीनिशी काम करत आहे. लोथलच्या इतिहासामुळे आपल्याला त्याचा अभिमान वाटतो, आता तेच लोथल आता येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य देखील घडवेल.

मित्रांनो,

एखादे वस्तुसंग्रहालय म्हणजे केवळ काही वस्तू किंवा कागदपत्रे संग्रहित करण्याचे किंवा त्यांचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नसते. जेव्हा आपण आपल्या वारशाचे जतन करतो तेव्हा त्यासोबत त्याच्याशी जोडलेल्या भावना देखील सुरक्षित करत असतो. ज्या वेळी आपण देशभरात विविध ठिकाणी उभारल्या जात असलेल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयांकडे पाहतो तेव्हा, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या शूर आदिवासी नायक-नायिकांचे किती मोठे योगदान होते हे आपल्याला समजते. जेव्हा आपण राष्ट्रीय युध्द स्मारक आणि राष्ट्रीय पोलीस स्मारक पाहतो तेव्हा आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या देशातील धाडसी मुले-मुली स्वतःचे आयुष्य कशा प्रकारे उधळून टाकतात ही जाणीव आपल्याला होते. जेव्हा आपण पंतप्रधान संग्रहालयाला भेट देतो तेव्हा आपल्याला लोकशाहीच्या सामर्थ्याचा अंदाज येतो. आपल्या देशाच्या 75 वर्षांच्या प्रवासाची झलक पाहायला मिळते. केवडिया, एकता नगरमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला भारताची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी घेतलेल्या कष्टांची, केलेल्या प्रयत्नांची, ध्यास आणि तपस्यांची आठवण करून देतात.

आणि एका मोठ्या संशोधनाचे कार्य सुरु आहे हे तुम्हां सर्वांना माहित आहे का? आता केवडिया येथे जसा सरदार पटेल यांचा पुतळा उभारला गेला आहे, कारण त्यांनी अखंड भारतात राजे-महाराजे, संस्थानिक यांना एकत्र आणले. मात्र ज्या राजांनी, संस्थानिकांनी भारताची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आपापली राज्ये देऊन टाकली, त्यांची देखील माहिती देणारे एक वस्तुसंग्रहालय आम्ही उभारत आहोत. त्याच्या आरेखनाचे काम अजून सुरु आहे, संशोधनाचे काम सुरु आहे.पूर्वीचे राजे-महाराजे कसे होते, ते कोणकोणते कार्य करायचे, देश आणि समाजाच्या भल्यासाठी त्यांनी काय कार्य केले, आणि त्यांनी सरदार साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाच्या एकतेसाठी कशी राज्ये विलीन केली अशा प्रकारे माहितीचे एक वर्तुळ पूर्ण होईल. म्हणजे, एकता नगरमध्ये एखादी व्यक्ती गेली तर राजे-महाराजांपासून सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारताचे एकीकरण झाले तोपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्या भागात पाहायला मिळेल. यासंदर्भातील काम तेथे सुरु आहे, अनेक गोष्टींबाबत संशोधन केले जात आहे. लवकरच तेथे प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.

गेल्या 8 वर्षांच्या काळात आपण देशात ही जी वारसा स्थळे उभारली आहेत, त्यातूनही आपल्याला आपल्या वारशाचा विस्तार किती भव्य आहे हे दिसून येते. लोथल येथे उभारले जात असलेले राष्ट्रीय सागरी वस्तुसंग्रहालय देखील सर्व भारतीयांची मान आपल्या सागरी वारशाबद्दलच्या अभिमानाने उंचावेल असा माझा विश्वास आहे. लोथल त्याच्या गतवैभवासह पुन्हा एकदा जगासमोर येईल या विश्वासासह तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार! तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

आणि इथे लोथलमध्ये हे बंधू-भगिनी बसलेले आहेत, दिवाळीचा सण तोंडावर आला आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना येणाऱ्या दिवसांच्या, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. गुजरातमध्ये तर नवे वर्ष देखील येते आहे, तेव्हा तुम्हाला नववर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे खूप खूप आभार.

 

* * *

G.Chippalkatti/R.Agashe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869580) Visitor Counter : 92