युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बांगलादेशातील युवा शिष्टमंडळाशी संवाद साधला
Posted On:
20 OCT 2022 9:02AM by PIB Mumbai
युवा व्यवहार विभागातर्फे 12 ते 19 ऑक्टोबर 2022 या कालावधीत बांगलादेशातील 100 सदस्यीय युवा शिष्टमंडळाला भारतात आमंत्रित करण्यात आले. या उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत या युवा शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान बांगलादेशच्या शिष्टमंडळाने या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले. या शिष्टमंडळाने बांगलादेशातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरणही केले. भारतीय कलाकारांनीही यावेळी आपल्या कलेचे सादरीकरण केले.

या प्रतिनिधींशी संवाद साधताना अनुराग सिंह ठाकूर यांनी, त्यांच्या भारतातील आठवडाभराच्या मुक्कामातील अनुभवही ऐकले. दोन्ही देशांमधील वैचारिक देवाण -घेवाणीबरोबरच सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक संबंध सक्षम होण्याच्या दृष्टीने तसेच प्रादेशिक सहकार्य आणि जागतिक शांततेच्या दृष्टीनेही ही भेट उपयुक्त ठरली.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना प्रदीर्घ आणि समान असा सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय इतिहास आहे. बांगलादेशात बोलली जाणारी बांग्ला ही भाषा बोलणारी मोठी लोकसंख्या भारतात आहे. दोन्ही देश सामायिक सीमारेषेने परस्परांशी जोडलेले आहेत. या दोन्ही देशांचे परस्परांशी जुने, दृढ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि हितसंबंधही समान आहेत.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, बांग्लादेशमधील या युवा शिष्टमंडळाने 14 ऑक्टोबर 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. आग्रा येथील ताजमहाल, बेंगळुरू येथील भारतीय व्यवस्थापन संस्था आणि म्हैसूर येथील इन्फोसिस अशा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक स्थळांनाही या शिष्टमंडळाने भेट दिली तसेच तेथील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. या शिष्टमंडळामध्ये विद्यार्थी, तरुण पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर अशी वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असणाऱ्या युवांचा समावेश आहे. आपल्या शेजारी देशांशी सौहार्दपूर्ण संबंध वाढवण्याबरोबरच सद्भावना आणि सकारात्मक भावनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे कार्यक्रम उपयुक्त ठरतात.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाने युवांशी संबंधित विविध समस्यांबाबत इतर देशांच्या तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने युवकांमध्ये आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन निर्माण करणे अपेक्षित आहे. शांतता आणि समंजसपणाला प्रोत्साहन देण्याच्या कामी युवा वर्गाला सहभागी करून घेण्यासाठी विभागाने, युवा प्रतिनिधी मंडळांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण या उपक्रमाचा एक प्रभावी साधन म्हणून अवलंब केला आहे. विविध देशांतील तरुणांमध्ये विचार, मूल्ये आणि संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी आणि आंतरराष्ट्रीय समज विकसित व्हावी, यासाठी मित्र देशांतर्फे परस्परांच्या युवा शिष्टमंडळांची देवाणघेवाण केली जाते. हा विभाग 2006 सालापासून चीन आणि दक्षिण कोरिया या देशांसोबत युवा शिष्टमंडळांची नियमितपणे देवाणघेवाण करत आहे.
बांगलादेशमधील 100 सदस्यीय युवा शिष्टमंडळाला भारतात आमंत्रित करण्याची तसेच त्यांना ऐतिहासिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि औद्योगिक स्वारस्याची ठिकाणे दाखवण्यासाठी त्यांचा भारत दौरा आयोजित करण्याची विनंती, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी 2012 साली भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला केली होती. त्यानुसार 2012 साली पहिल्यांदाच बांगलादेशच्या 100 सदस्यीय युवा शिष्टमंडळाने 6 ते 13 ऑक्टोबर, 2012 या अवधीत भारताला भेट दिली होती. अशा प्रकारे भारताला भेट देणारे यंदाचे बांगलादेशचे आठवे शिष्टमंडळ आहे.
***
Gopal C/Madhuri/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1869435)