पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमध्ये राजकोट येथे पंतप्रधानांनी केली 5860 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण


दीपगृह प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 1100 पेक्षा जास्त घरांचे लोकार्पण

इंडिया अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव 2022 चे केले उद्घाटन

“विकसित भारतासाठी विकसित गुजरातच्या मंत्रासह आम्ही वाटचाल करत आहोत”

“राजकोट मला शिकवत राहिले आणि मी शिकत राहिलो. राजकोट ही माझी पहिली शाळा होती”

“मूलभूत सुविधा आणि सन्मानाचे जीवन नसेल, तर गरिबीतून बाहेर पडणे अशक्य होईल”

“दशकांपूर्वी देण्यात आलेल्या ‘गरिबी हटाव, रोटी-कपडा-मकान’ यांसारख्या घोषणा फक्त घोषणाच राहिल्या”

“यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांसाठी घरे बांधली पण ती स्वतःची जबाबदारी म्हणून नव्हे तर गरिबांवर उपकार म्हणून. गरिबांची घरे अधिकाधिक चांगली करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

“गेल्या दोन दशकात, राजकोटमधून अभियांत्रिकीशी संबंधित वस्तूंची निर्यात 5 हजार कोटी रुपयांच्या वर गेली आहे”

“जगातील 13 टक्क्यांपेक्षा जास्त सिरॅमिकचे उत्पादन एकट्या मोरबीमध्ये होते.”

Posted On: 19 OCT 2022 10:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये राजकोट येथे सुमारे 5860 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी इंडिया अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव 2022 चे देखील उद्घाटन केले. दीपगृह प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 1100 पेक्षा जास्त घरांचे पंतप्रधानांनी लोकार्पण केले. पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये एक पाणीपुरवठा प्रकल्प, ब्राह्मणी-2 धरणापासून नर्मदा कालवा पंपिग स्टेशनपर्यंत जाणाऱ्या जलवाहिनीचा मोरबी-बल्क पाईपलाईन प्रकल्प, एक प्रादेशिक विज्ञान केंद्र, उड्डाण पूल आणि रस्ते जोडणीशी संबंधित इतर प्रकल्पांचा समावेश होता. 

गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 वरील राजकोट-गोंडल-जेतपूर सेक्शनमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या चार मार्गिकांचे सहा मार्गिकांमध्ये रुपांतरण करण्याच्या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. मोरबी, राजकोट, बोताड, जामनगर आणि कच्छ अशा विविध ठिकाणी सुमारे 2950 कोटी रुपयांच्या जीआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेटची त्यांनी पायाभरणी केली. पायाभरणी करण्यात आलेल्या इतर प्रकल्पांमध्ये गढका येथील अमूल फेड डेरी प्लांट, राजकोटमध्ये एका इनडोअर क्रीडा संकुलाची उभारणी, दोन पाणीपुरवठा प्रकल्प आणि रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातील इतर प्रकल्पांचा समावेश आहे. 

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की या वर्षातील हा काळ तो काळ आहे ज्यावेळी नवे संकल्प आणि नवी सुरुवात केली जाते. राजकोटसह काठियावाडच्या विकासाशी संबंधित काही प्रकल्प आज पूर्ण झाले आहेत आणि काही नवे प्रकल्प सुरू झाले आहेत. हे प्रकल्प कनेक्टिविटी, उद्योग, पाणी आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित आहेत ज्यामुळे येथील जीवन सुकर होणार आहे. 

देशातील दीपगृह प्रकल्पाच्या सहा ठिकाणांपैकी राजकोट हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेल्या 1144 घरांचे आज लोकार्पण करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेल्या या उत्तम दर्जाच्या घरांचा ताबा शेकडो गरीब कुटुंबाना दिवाळीपूर्वी देण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असे त्यांनी सांगितले. “ या घरांच्या मालक बनलेल्या भगिनींचे मी विशेषत्वाने अभिनंदन करेन आणि या दिवाळीत तुमच्या नव्या घरामध्ये लक्ष्मीचा वावर असू दे अशा शुभेच्छा मी देत आहे” अशी त्यांनी कामना केली. 

गेल्या 21 वर्षात आपण एकत्रितपणे स्वप्ने पाहिली आहेत, अनेक पावले उचलली आहेत आणि अनेक प्रकारचे यश मिळवले आहे. “राजकोट मला शिकवत राहिले आणि मी शिकत राहिलो. राजकोट ही माझी पहिली शाळा होती”, असे पंतप्रधान म्हणाले. महात्मा गांधीदेखील राजकोट येथे शिक्षणासाठी आले होते याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. मी तुमचे ऋण कधीही चुकते करू शकणार नाही अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. आपल्या यशाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आज शाळा महाविद्यालयांमध्ये शिकत असलेली नवी पिढी किंवा आपल्या करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेला वर्ग  आहे, असे त्यांनी सांगितले. 

राजकोटमधील आणि एकंदर राज्यामधील सुधारलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत पंतप्रधानांनी आपले विचार व्यक्त केले. “ ज्यावेळी मी तुम्हा तरुण मित्रांना कोणत्याही भीतीविना रात्री उशिरापर्यंत आपल्या आयुष्यातील महत्त्वाची कामे करण्यासाठी फिरताना पाहतो त्यावेळी मला खूपच समाधान मिळते. आम्ही दिवस रात्र गुन्हेगारांचे, माफियांचे, दंगेखोरांचे, दहशतवाद्यांचे आणि गुंड टोळ्यांचे उच्चाटन करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि आमचे प्रयत्न वाया गेले नाहीत ही वस्तुस्थिती समाधान देणारी आहे. येथील प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय शांततेत आणि तादात्म्याने कष्ट करत असल्याचे पाहणे अतिशय आनंददायी आहे, असे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान पुढे म्हणाले, “गेल्या दशकांमध्ये, प्रत्येक गुजराती शक्य तितका-  जास्तीत जास्‍त  समर्थ  आणि सक्षम बनावा असा आमचा निरंतर  प्रयत्न आहे. त्यासाठी जे काही वातावरण हवे आहे, जिथे जिथे प्रोत्साहन द्यायचे आहे, ते सरकार करत आहे. ‘विकसित भारतासाठी विकसित गुजरात’ हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. एकीकडे आम्ही व्हायब्रंट –   गुजरात मोहिमेद्वारे उद्योगांना आणि गुंतवणुकीला चालना दिली, तर दुसरीकडे कृषी महोत्सव आणि  गरीब कल्याण मेळाव्याच्या माध्यमातून गावांना आणि गरिबांना सक्षम करण्यासाठी  आम्ही पुढाकार घेतला, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी  दिली. आणि आपण पाहिले  आहे की, ज्यावेळी  गरिबांना सशक्त केले जाते, त्यावेळी  तेसुद्धा  गरीबीतून बाहेर पडण्याचा वेगाने मार्ग काढायला लागतात.”

मुलभूत सुविधा आणि सन्मान दिल्याशिवाय गरीबीतून बाहेर पडणे अशक्य असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की शौचालय, वीज, नळाव्दारे  पाणी, स्वयंपाकाचा गॅस आणि इंटरनेटसाठी संपर्क यंत्रणा,  सुसज्ज घर, असे सर्व काही  गरीबांना मिळेल, याची सरकारकडून खात्री केली जात आहे. त्याचप्रमाणे,  कुटुंबांमधील सदस्यांना येणारे आजारपण, त्‍या संपूर्ण परिवाराला गरीबीत ढकलण्यासाठी पुरेसे असते, हे लक्षात घेऊन  गरीब कुटुंबांना मोफत दर्जेदार उपचार मिळावेत,  यासाठी आयुष्मान भारत आणि पीएमजेएवाय-एमए सारख्या योजना आणल्या गेल्या. पंतप्रधान म्हणाले, “आधीच्या सरकारांना गरीबांची ही स्थिती आणि गरीबांच्या भावना समजल्याच  नाहीत. यामुळेच दशकांपूर्वी दिलेला गरीबी हटाओ, रोटी-कपडा-मकान या घोषणा केवळ घोषणाच राहिली. घोषणाबाजी करून मते मिळवली गेली आणि स्वार्थ साधला गेला,” असे ते म्हणाले.

गेल्या 8 वर्षांमध्‍ये  देशातील खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये गरीबांना 3 कोटींहून अधिक पक्की घरकुले  देण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या दरम्यान गुजरातमधील शहरांमध्ये गरीबांसाठी 10 लाख पक्की घरे मंजूर करण्यात आली असून 7 लाख पूर्ण झाली आहेत. “भूपेंद्रभाई आणि त्यांची टीम गरीबांसाठी घरे बांधण्याचे कौतुकास्पद काम करत आहेत. केवळ गरीबच नाही तर मध्यमवर्गीयांचे स्वतःच्या घरकुलाचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पहिले पाऊल उचलले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने गुजरातमधील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या घरासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपये दिले आहेत. इतकेच नाही तर जे कामगार बंधू शहरात कामासाठी येतात त्यांना कामाच्या ठिकाणी कमी भाड्यामध्‍ये  चांगली घरे मिळायला हवीत. या योजनेवर वेगाने काम सुरू आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

‘’या आधीच्या सरकारांनी, गरीबांची आपल्यावर  जबाबदारी आहे, म्हणून नाही  तर त्यांच्यावर उपकार म्हणून घरे बांधली. मात्र आम्ही मार्ग बदलले,” असे पंतप्रधान  मोदी म्हणाले. घरामध्‍ये जे वास्तव्य करणार आहेत, त्यांना त्यांचे स्वतःचे घर बांधण्याचे आणि त्यांना हवे तसे सजि‍वण्यावर पूर्ण हक्क  आणि स्वातंत्र्य देण्यात आले आहे, अशी  माहिती पंतप्रधानांनी दिली. “गरीबांचे घर चांगले बनवण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो”, असेही मोदी म्हणाले. राजकोटचा ‘दीपगृह  प्रकल्प’  हा असाच एक प्रयत्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पाला मिळालेल्या  यशावर भाष्य करताना, पंतप्रधान मोदी यांनी  निदर्शनास आणून दिले की, राजकोटमधील  हे मॉडेल पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून बरेच लोक आले आहेत. “आज गुजरातला आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली अकराशेपेक्षा जास्त   घरेच मिळाली असे  नाही, तर भविष्यात ज्या लाखो गरीब कुटुंबांना पक्की घरकुले  मिळणार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि खूप आशेची बातमी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. या प्रकल्पाच्या फायद्यांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, राजकोटमधील ही आधुनिक घरे देशात वेगाने परवडणारी घरे बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. "हे कार्य  गृहनिर्माण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे". पंतप्रधान पुढे म्हणाले की, हजारो तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि देशातील नवीन स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्‍यासाठी, त्यांची मदत घेण्यात आली आहे. यामुळे या प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

रस्ते, बाजार, मॉल्स आणि प्लाझा यांच्या पलीकडे देखील नागरी जीवनाची आणखी जबाबदारी असते याकडे पंतप्रधानांनी निर्देश केला. “आपल्या सरकारने पहिल्यांदाच फिरत्या विक्रेत्यांची जबाबदारी समजून घेतली आहे. प्रथमच, आपण त्यांना बँकेशी जोडून घेतले आहे. या सहकाऱ्यांना देखील आज स्वनिधी योजनेतून सोप्या रीतीने कर्जे मिळत आहेत आणि हे विक्रेते त्यांच्या व्यापाराचा विस्तार करण्याचा विचार करू शकत आहेत. आज तुम्ही पहा, हे फिरते विक्रेते देखील डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून डिजिटल भारत उपक्रमाला मजबूत करत आहेत,” ते म्हणाले.

राजकोटमधील एमएसएमई उद्योगांची संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, औद्योगिक शहर म्हणून आणि एमएसएमई उद्योगांचे केंद्र म्हणून या शहराचा मोठा नावलौकिक आहे. ते पुढे म्हणाले देशाचा क्वचितच एखादा भाग असा असेल की जेथे राजकोटमध्ये तयार झालेले पंप, यंत्रे किंवा साधने वापरली जात नसतील.फाल्कन पंप, फिल्डमार्शल, एंजेल पंप, फ्लोटेक इंजिनियरिंग, जलगंगा पंप,  रोटेक पंप, सिद्धी इंजिनियर्स, गुजरात फोर्जिंग आणि टॉपलँड यांची उदाहरणे देऊन पंतप्रधान म्हणाले की राजकोट येथील ही उत्पादने देशभरात आणि जगात आपला ठसा उमटवीत आहेत.

ते म्हणाले, “गेल्या दोन दशकांमध्ये राजकोट येथून होणाऱ्या अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित वस्तूंच्या निर्यातीने 5 हजार कोटीच्या पुढचा टप्पा गाठला आहे.” येथील कारखान्यांची संख्या दुपटीहून जास्त वाढली असून येथे काम करणाऱ्या कामगारांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. येथील संपूर्ण परिसंस्थेमुळे, हजारो इतर लोकांना देखील येथे रोजगार मिळाला आहे. त्याचप्रमाणे, मोरबीने देखील उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. मोरबी येथे तयार होणाऱ्या टाईल्स जगभरात प्रसिध्द आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “जगातील एकूण सिरामिक उत्पादनांपैकी 13 टक्के वस्तू मोरबी येथे तयार होतात,” ते म्हणाले. मोरबी शहराला निर्यातीसाठी उत्कृष्टता असलेले नगर देखील म्हणतात अशी माहिती मोदी यांनी दिली. “भिंती, जमीन, न्हाणीघर असो की शौचालय, हे सर्व मोरबीच्या उत्पादनांशिवाय अपूर्णच आहेत.” मोरबी येथे 15 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सिरामिक पार्क उभारण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली. गुजरात राज्य सरकारच्या प्रगतीशील औद्योगिक धोरणाबद्दल पंतप्रधानांनी सरकारची प्रशंसा केली.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर, गुजरातचे माजी राज्यपाल वजुभाई वाला, माजी मुख्यमंत्री विजय रूपानी तसेच संसद सदस्य मोहनभाई कुंदरीया आणि रमाभाई कोमारीया यांच्यासह इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राजकोट येथे 5860 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आणि  लोकार्पण केले. त्यांनी इंडिया अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह  2022 चे उद्घाटन देखील केले. या बैठकीत नियोजन, संरेखन, धोरणे, नियम, अंमलबजावणी, अधिक शाश्वतता आणि समावेशकता निर्माण करण्यासह भारतातील गृह निर्माण क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चेचा समावेश  आहे. या सार्वजनिक कार्यक्रमानंतर, पंतप्रधानांनी नवोन्मेषी बांधकाम प्रक्रियांवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले.

सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लाईट हाउस प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या 1100 घरांचे लोकार्पण केले.या घरांच्या चाव्या देखील लाभार्थ्यांना देण्यात आल्या. पंतप्रधानांनी यावेळी ब्राह्मणी-2 धरण नर्मदा कालवा पंपिंग स्टेशनला जोडणाऱ्या मोरबी-बल्क पाईपलाईन या पाणीपुरवठा प्रकल्पाचे देखील लोकार्पण केले. त्यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आलेल्या इतर प्रकल्पांमध्ये प्रादेशिक विज्ञान केंद्र, उड्डाणपूल आणि रस्ते विभागाशी संबंधित इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांनी गुजरात मधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 वरील राजकोट-गोंडाल-जेतपूर या टप्प्यातील सध्याच्या चार पदरी रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याच्या कामाची कोनशीला ठेवली. तसेच त्यांनी मोरबी, राजकोट,बोताड,जामनगर आणि कच्छ येथील विविध ठिकाणच्या 2950 कोटी रुपये खर्चाच्या जीआयडीसी औद्योगिक मालमत्ता कामाची कोनशीला देखील रचली. यावेळी ज्या इतर प्रकल्पांची कोनशीला रचली जाणार आहे त्यामध्ये गधका येथील अमूल-फेड  डेरी प्रकल्प, राजकोट येथील अंतर्गत क्रीडा संकुलाचे बांधकाम, दोन पाणीपुरवठा प्रकल्प तसेच रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातील इतर काही प्रकल्प यांचा समावेश आहे.

 

 

* * *

S.Kakade/S.Patil/S.Bedekar/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1869354) Visitor Counter : 231