पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 18 ऑक्टोबर रोजी लोथल येथील ‘राष्ट्रीय सागरी वारसा संकुल’च्या कामाच्या प्रगतीचा घेणार आढावा
एनएमएचसी भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा अभिमानाने करणार प्रदर्शित
आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून एनएमएचसी प्रकल्प विकसित केला जाणार
प्रकल्पाच्या विकासासाठी सुमारे 3500 कोटी रूपये खर्च
Posted On:
17 OCT 2022 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 ऑक्टोबर 2022 रोजी, सायंकाळी 5 च्या सुमारास गुजरातमधील लोथल येथील ‘राष्ट्रीय सागरी वारसा संकुल’ च्या कामाच्या प्रगतीचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतील. याप्रसंगी त्यांचे भाषण होणार आहे.
लोथल हे हडप्पा संस्कृतीतील प्रमुख शहरांपैकी एक होते आणि सर्वात जुन्या मानवनिर्मित गोदी- बंदराचा शोध येथे लागल्यामुळे त्यासाठीही ओळखले जाते. लोथलमधील ‘ सागरी वारसा संकुल’ हे या शहराच्या ऐतिहासिक वारशाला एकाअर्थी योग्य आदरांजली असणार आहे.
लोथल येथील नॅशनल मेरिटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स (एनएमएचसी) म्हणजेच ‘राष्ट्रीय सागरी वारसा संकुल’ केवळ भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करण्यासाठीच आहे असे नाही, तर लोथलला जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून उदयास येण्यासाठी मदत करणारा एक महत्वाचा प्रकल्प म्हणून विकसित केला जात आहे. या प्रकल्पाद्वारे पर्यटनाला चालना मिळाल्याने या क्षेत्राच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल.
मार्च 2022 मध्ये या संकुलाचे काम सुरू झाले आहे. यासाठी सुमारे 3500 कोटी रुपये खर्च केले जात आहे. यामध्ये हडप्पा वास्तुकला आणि जीवनशैली पुन्हा निर्माण करण्यासाठी लोथल ‘मिनी रिक्रिएशन’ यासारखी अनेक नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय वैशिष्ट्ये असतील; चार विशिष्ट संकल्पनांवर आधारित उद्याने असणार आहेत. यामध्ये स्मृती उद्यान , सागरी आणि नौदल संकल्पनेवर उद्यान, हवामान संकल्पनेवर एक उद्यान आणि साहसी आणि मनोरंजनाच्या संकल्पनेवर उद्यान असणार आहे. जगातील सर्वात उंच दीपगृह संग्रहालय येथे तयार करण्यात येणार आहे. हडप्पा काळापासून आतापर्यंत भारताच्या सागरी वारशावर प्रकाश टाकणारी चौदा दालने असतील. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करणारी किनारपट्टीवरील राज्यांची दालने आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश या संकुलामध्ये असणार आहे.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868617)
Visitor Counter : 211
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam