पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमध्ये 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -मुख्यमंत्री अमृतम' आयुष्मान कार्ड वितरणाचा केला प्रारंभ
"जगातील अनेक देशांमध्ये आरोग्य विम्याबाबत चर्चा केली जाते परंतु भारत त्यापलीकडे जाऊन आरोग्य हमी सुनिश्चित करत आहे"
"आमच्या योजना आज थेट सामान्य नागरिकांच्या गरजांकडे लक्ष पुरवत आहेत "
"जेव्हा देशातील नागरिक सबल होतात, तेव्हा देश बलशाली होतो"
“आयुष्मान कार्ड हे 5 लाख रुपयांचे एटीएम असून त्याद्वारे दरवर्षी मोफत उपचाराचा लाभ मिळत राहील”
"30-40 वर्षांच्या कालावधीत, 1.5-2 कोटी किमतीच्या उपचारांची हमी"
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2022 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमध्ये पीएमजेएवाय -एमए अर्थात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम आयुष्मान कार्ड्सचे वितरण सुरू केले. पंतप्रधानांनी पीएमजेएवाय -एमए आयुष्मान कार्डच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला.
बनासकांठा येथील तुवर इथल्या पीयूषभाई यांच्याशी संवाद साधत पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या अलीकडील प्रकृतीची माहिती घेतली. आयुष्मान भारत योजनेने त्यांच्या जीवनात नवा अध्याय सुरू झाला, हे जाणून पंतप्रधानांना आनंद झाला. सरकार त्यांच्याप्रमाणेच सर्वांची काळजी घेईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
पंतप्रधानांनी महिसागर येथील दामोर लालाभाई सोमाभाई यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या कर्करोगावर योग्य उपचार झाले का याची चौकशी केली. दामोर यांच्यावर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार झाले आणि त्यांना एक पैसाही खर्च करावा लागला नाही याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी दामोर यांना तंबाखू सोडण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आणि या योजनेबाबत जनजागृती करण्यास सांगितले.
गांधीनगरमधील रमिलाबेन दार्जी यांनी पंतप्रधानांना सांगितले की, आयुष्मान कार्ड उपलब्ध नसते, तर त्यांना त्यांच्यावरील उपचारांसाठी कर्ज घ्यावे लागले असते आणि त्यामुळे कदाचित त्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली नसती. माता-भगिनी या योजनेचा लाभ घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला.
या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी धनत्रयोदशी आणि दिवाळी अगदी जवळ आली असताना सार्वजनिक आरोग्याबाबत असा मोठा कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. धनत्रयोदशी जवळ आली आहे आणि आयुर्वेदाचे प्रवर्तक मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांची त्यानिमित्ताने पूजा केली जाते हा योगायोग त्यांनी सांगितला. शास्त्रांमध्ये उल्लेख असलेल्या “आरोग्यम् परमम् भाग्यम्” विषयी पंतप्रधानांनी सांगितले आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या लाखो लोकांना आरोग्य धन देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘सर्वे सन्तु निरामयः ’ म्हणजेच सर्व जण आरोग्यसंपन्न असावेत या भावनेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, आयुष्मान योजनेचा उद्देश सर्वांसाठी आरोग्य हा आहे. राज्यातील लोकांना 50 लाख कार्ड वाटपाच्या मोहिमेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. यावरून गुजरात सरकारची संवेदनशीलता दिसून येते असे ते म्हणाले. ''आपण जगातील अनेक देशांमधल्या आरोग्य विम्याबद्दल ऐकतो , पण भारत त्यापलीकडे जाऊन आरोग्य हमी सुनिश्चित करत आहे."
राजकीय विचार करण्याची बदललेली पद्धत आणि कार्यसंस्कृतीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. पूर्वीच्या सरकारांमध्ये सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना ही केवळ औपचारिकता बनून राहिली होती. या योजनांवर जो पैसा खर्च झाला, तो विशिष्ट क्षेत्र आणि राजकीय हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला. “ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते आणि आम्ही या बदलासाठी पुढाकार घेतला. आज जेव्हा नियोजन केले जाते, तेव्हा आपण प्रथम सर्वसामान्य नागरिकांच्या स्थितीचा आणि त्यांच्या गरजांचा अभ्यास करतो,”असे ते म्हणाले. पंतप्रधान पुढे म्हणाले, “आजच्या आमच्या योजना थेट सामान्य नागरिकांच्या गरजांकडे लक्ष पुरवणाऱ्या आहेत.”
पंतप्रधान म्हणाले, “ज्यावेळी देशातील नागरिक सक्षम होतात, त्यावेळी देश शक्तिशाली बनत असतो. यासाठीच आम्ही सामान्य नागरिक, विशेषत: देशातील महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे.” याच दृष्टीकोनातून सरकारने मोफत स्वयंपाकाचा गॅस देणे , पक्की घरकुले , शौचालये, स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य, आणि नळाव्दारे पाणी याची उदाहरणे दिली. आरोग्यविषयक योजनेअंतर्गत देशातील आतापर्यंत सुमारे ४ कोटी गरीब रुग्णांनी आरोग्याचा लाभ घेतला असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ते पुढे म्हणाले की, यापैकी सुमारे 50 लाख गरीब रुग्ण गुजरातमधील आहेत. सरकारच्या वचनबद्धतेचा मुद्दा अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, या लाभार्थ्यांच्या उपचारासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. लाभार्थ्यांना या योजनेऐवजी बाहेरून उपचार करून घ्यावे लागले असते तर, त्यासाठी त्यांना खिशातून खर्च करावा लागला असता. आयुष्मान भारतचे निम्मे लाभार्थी माझ्या माता-भगिनी असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या माता-भगिनी कुटुंबाच्या हिताच्या विचार करून आपले आजार लपवत असत आणि त्रास सहन करावा लागत असे. औषधोपचाराच्या प्रचंड खर्चामुळे कर्जाचा डोंगर आपल्या कुटुंबावर निर्माण होवू शकतो, असा विचार गरीब महिला करीत होत्या. “आयुष्मान भारत योजनेने गरीब माता आणि भगिनींची या समस्येतून मुक्तता झाली आहे”, ते पुढे म्हणाले, “अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर आयुष्मान कार्ड म्हणजे 5 लाख रुपयांचे एटीएम आहे. हे एक एटीएम कार्ड आहे, जे दरवर्षी लाभ देत राहील”. या योजनेचे फायदे सांगताना पंतप्रधानांनी सांगितले की, जर एखादी व्यक्ती 30-40 वर्षे जगली तर त्या कालावधीत 1.5-2 कोटी रुपयांच्या उपचारांची हमी असेल. “ आजारामुळे निर्माण होणारी सर्वात मोठी समस्या सोडवणारे आयुष्मान कार्ड म्हणजे तुमचा खरा मित्र असणार आहे.”, असे ते पुढे म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘चिरंजीवी’, ‘बालभोग’ आणि ‘खिलखिलाट’ या योजना सुरू केल्या होत्या त्याची पंतप्रधान मोदी यांनी आठवण सांगितली. तसेच गुजरातमध्ये अनेक वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री अमृतम’ योजना सुरू झाल्याचे सांगितले. पीएमजेएवाय- एमए सुरू केल्यामुळे गुजरातच्या लोकांना आता गुजरातच्या बाहेरही मोफत उपचारांचा लाभ घेता येणार आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पार्श्वभूमी
वैद्यकीय उपचार आणि आजारामुळे निर्माण होणा-या आर्थिक संकटापासून गरीब नागरिकांचा बचाव करणे शक्य व्हावे, यासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने, पंतप्रधानांनी 2012 मध्ये ‘मुख्यमंत्री अमृतम (एमए)’ योजना सुरू केली होती. 2014 मध्ये, या योजनेचा विस्तार केला गेला. योजनेमध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न 4 लाख रूपये आहे, त्या कुटुंबांना समाविष्ट करण्यात आले. या योजनेचा नंतर इतर अनेक गटांमध्येही विस्तार करण्यात आला आणि नंतर ‘मुख्यमंत्री अमृतम वात्सल्य’ (एमएव्ही ) योजना म्हणून पुन्हा स्थापित करण्यात आली.
या योजनेला मिळालेल्या यशामुळे, त्या अनुभवातून, पंतप्रधानांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) 2018 मध्ये सुरू केली पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा कवच देणारी, जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. कुटुंबाचा आकार आणि वय यावर कोणतीही मर्यादा न ठेवता प्राथमिक, दुय्यम आणि तिस-या दक्षता रुग्णालयामध्ये दाखल करता येते. योजनेनुसार प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचार केले जातात. एबी-पीएमजेएवाय जाहीर केल्यावर, गुजरातने 2019 मध्ये एबी-पीएम-जेएवाय या योजनेसह एमए / एमएव्ही योजना ही पीएमजेएवाय –एमए योजना नावाने संयुक्त करण्यात आली. एमए / एमएव्ही आणि एबी-पीएमजेएवाय अंतर्गत लाभार्थी ‘सह-ब्रँडेड’ ‘पीएमजेएवाय-एमए कार्ड’साठी पात्र ठरले आहेत.
या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी या कार्डांच्या वितरणाला प्रारंभ केला. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या पॅनेलमधील एजन्सीद्वारे आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांचे ई-केवायसी केल्यानंतर संपूर्ण गुजरातमधील सर्व लाभार्थ्यांना 50 लाख रंगीत छपाई असलेली आयुष्मान कार्डे घरपोच देण्यात येणार आहेत.
* * *
S.Kane/S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1868600)
आगंतुक पटल : 330
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam