पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील मोढेरा येथे पायाभरणी आणि विकासकामांच्या लोकार्पणावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
09 OCT 2022 11:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2022
आज मोढेराकरता, मेहसाणाकरता आणि संपूर्ण उत्तर गुजरातकरता विकासाच्या नवऊर्जेचा संचार झाला आहे. वीज-पाण्यापासून रस्ते-रेल्वे पर्यंत, डेयरीपासून कौशल्य विकास आणि आरोग्या संबंधित अनेक प्रकल्पांचे आज लोकार्पण आणि शिलान्यास झाला आहे. हजारो कोटी रुपयांपेक्षा अधिकचे हे प्रकल्प, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करतील, शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यात मदत करतील आणि या संपूर्ण क्षेत्रात वारसा पर्यटनासंबंधित सुविधांची व्याप्तीही यामुळे वाढेल. तुम्हा सर्वांना या विकास प्रकल्पांसाठी खूप-खूप शुभेच्छा. ये मेहसाणा वालों ने राम-राम।
मित्रांनो,
आज जेव्हा आपण भगवान सूर्याचे धाम असलेल्या मोढेरा येथे आहोत, विशेष म्हणजे आज शरद पौर्णिमा देखील आहे हा सुखद योगायोग आहे. तसेच, आज महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीदिनाचाही पवित्र दिन आहे. म्हणजे एक प्रकारे त्रिवेणी संगम झाला आहे. महर्षी वाल्मिकींनी आपल्याला भगवान रामाच्या समग्र जीवनाचे दर्शन घडवले, समतेचा संदेश दिला. तुम्हा सर्वांना, संपूर्ण देशाला शरद पौर्णिमा आणि वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
बंधू आणि भगीनींनो,
गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सातत्यानं पाहत असाल, दूरचित्रवाणीवर, वर्तमानपत्रात, समाजमाध्यमांत सूर्यग्रामबद्दल, मोढेराविषयी, देशभरात चर्चा सुरू झाल्या आहेत. कोणी म्हणते की डोळ्यासमोर स्वप्न साकार होऊ शकते असे कधीच वाटले नव्हते, आज आपण स्वप्न पूर्ण होताना पाहतोय. काहीजण म्हणत आहेत आमची चिर-पुरातन आस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा जणू काही नवीन संगम दिसतोय. काही जण याला भविष्यातील स्मार्ट गुजरात, स्मार्ट भारताची झलक असल्याचे सांगत आहेत. हा आज आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण मेहसाणा, संपूर्ण गुजरातसाठी अभिमानाचा क्षण घेऊन आला आहे. मी मोढेरेवाल्यांना विचारतो, चाणस्माच्या लोकांना, मेहसाणाच्या लोकांनो, तुम्ही मला सांगा याने तुमचा ऊर अभिमानाने भरुन आला की नाही, गर्वाने मान उंचावली की नाही झाले नाही, जीवनात तुम्हाला तुमच्या समोर हे सारे घडते आहे याचा आनंद मिळाला की नाही. पूर्वी सूर्यमंदिरामुळे मोढेरा हे जगाला माहीत होते, पण आता मोढेराही मोढेराच्या सूर्यमंदिरापासून प्रेरणा घेऊन सूर्यग्राम बनू शकेल, या दोघांचीही जगात ओळख होईल आणि पर्यावरणवाद्यांसाठी मोढेरा जगाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण करेल.
मित्रांनो,
हेच, गुजरातचे हेच सामर्थ्य आहे, जे आज मोढेरामध्ये दिसत आहे, ते गुजरातच्या कानाकोपऱ्यात आहे. हे कोण विसरु शकेल की मोढेराचे सूर्यमंदिर उध्वस्त करण्यासाठी, मातीत मिसळण्यासाठी आक्रमकांनी काय केले नाही. हे मोढेरा, ज्यावर विविध प्रकारचे अत्याचार झाले होते, ते आता आपल्या पौराणिक आणि आधुनिकतेसाठी जगासमोर आदर्श उदाहरण बनत आहे.
भविष्यात जेव्हा जेव्हा सौरऊर्जेबद्दल चर्चा होईल, जगात जेव्हा जेव्हा सौरऊर्जेची चर्चा होईल तेव्हा मोढेराचं नाव पहिले घेतले जाईल. कारण इथे सर्व सौरऊर्जेवर सौरशक्तीवर चालते, मग घरातील दिवे असोत, शेतीसाठी उर्जा असो, अगदी वाहने, बसेसही सौरऊर्जेवर चालवण्याचा प्रयत्न केला जाईल. 21व्या शतकातील आत्मनिर्भर भारतासाठी आपल्याला आपल्या ऊर्जा गरजांशी संबंधित असे प्रयत्न वाढवायचे आहेत.
मित्रांनो,
गुजरातला, देशाला, आपल्या येणार्या पिढीला, तुमच्या मुलांना सुरक्षितता मिळावी यासाठी मी अहोरात्र काम करून देशाला त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो दिवस दूर नसेल जसे, मोढेरा मी आत्ताच टीव्हीवर पाहिले, सगळे म्हणायचे की आता आमच्या घराच्या वरती वीज निर्माण होते, आणि आम्हाला सरकारकडून पैसेही मिळतात. वीज फक्त मोफत नाही तर विजेचे पैसेही मिळतात. इथे वीज कारखान्याचा मालकही तोच घराचा मालक, कारखान्याचा मालकही तोच शेतकरी आणि तो वापरणारा ग्राहकही तोच. तुम्हाला आवश्यक असलेली वीज वापरा आणि अतिरिक्त वीज सरकारला विका. आणि यामुळे वीज बिलातूनही सुटका होईल, एवढेच नाही तर आता वीज विकून कमाईही करा.
दोन्ही हातात लाडू आहेत की नाही, समाजावर लोकांचा भार नाही, ओझ्याशिवाय आपण लोकांचे भले करू शकतो, त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु आपण कठोर परिश्रम करण्यासाठी तर आपले सृजन झाले आहे. आणि तुम्ही दिलेले संस्कार, जे तुम्ही माझ्यावर सिंचन केलेत, आणि आमचा मेहसाणा जिल्हा हा असा संकटात सापडलेला जिल्हा होता, आणि त्यात ज्यांचे सिंचन झाले, त्यांनी कष्ट करण्यात कधीच मागे हटले नाहीत, कधी मागे हटले नाही?
मित्रांनो,
आजवर असे असायचे की सरकार वीज निर्माण करायचे आणि जनता ती विकत घ्यायची. पण त्या मार्गावर जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे, देशाला त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे, मला पुढचा मार्ग दिसतो आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार सतत प्रयत्न करत आहे की आता लोक त्यांच्या घरात सौर पॅनेल लावतील, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वीज निर्माण करावी, सौर पंप वापरावा. आणि तुम्हीच मला सांगा, की पूर्वी आम्हाला अश्वशक्तीसाठी आंदोलन करावे लागे, शेताभोवती तारा लावून 2-2 मीटर जमीन वाया घालवता त्या ऐवजी आता तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर सोलर पॅनेल लावले तर त्याच सौर पॅनेलने पंपही चालेल, शेतीलाही पाणी मिळेल, आणि अतिरिक्त वीज सरकार विकत घेईल, तुम्हीच सांगा,आम्ही सारे चक्र बदलले आहे ना? यासाठी सरकार सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याकरीता आर्थिक मदत देत आहे, लाखों सौर पंप वितरित करत आहे.
शेतातून पाणी काढण्यासाठी, ते उपयोगात यावे याकरता कार्य करत आहेत. इथे सध्या मला खूप तरुण दिसत आहेत पण जे 20-22 वर्षांचे आहेत त्यांना फार काही कळणार नाही. आपल्या मेहसाणा जिल्ह्याची अवस्था कशी होती भावांनो, वीज नव्हती, वीज कधी जाते, वीज आली की नाही, त्याच्या बातम्या यायच्या. पाणी, पाण्यासाठी आपल्या बहिणी-मुलींना डोक्यावर हंडे घेऊन 3-4 किलोमीटर जावे लागे. असे दिवस माझ्या उत्तर गुजरातच्या माता-भगिनी, माझ्या उत्तर गुजरातच्या तरुण मित्रांनी पाहिले आहेत, आज 20-22 वर्षांच्या मुला-मुलींना अशा त्रासांची कल्पनाही नाही. येथील शाळा-महाविद्यालयात जाणारे तरुण हे सर्व ऐकून आश्चर्यचकित होतील की, अशी काही स्थिती होती.
मित्रांनो,
आम्ही कोणत्या परिस्थितीत राहिलो, हे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील जाणत्यांशी बोलाल तेव्हा ते तुम्हाला सांगतील. अनेक प्रकारच्या समस्यांमधून जावे लागले. विजेअभावी अभ्यास करणे तर मुलांसाठी खूपच कठीण असे, आमच्यासाठी घरात टीव्ही किंवा पंख्याचे युगच नव्हते. सिंचनाचा विषय असो, अभ्यासाचा असो की औषधोपचाराचा, प्रत्येकावर संकटांचा डोंगर. आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम आमच्या मुलींच्या शिक्षणावर झाला. आपल्या मेहसाणा जिल्ह्यातील लोक नैसर्गिकरित्या गणित आणि विज्ञानात पुढे. अमेरिकेत गेल्यास उत्तर गुजरातचा चमत्कार तिथे गणित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात पाहायला मिळेल. संपूर्ण कच्छमध्ये तुम्हाला मेहसाणा जिल्ह्यातील शिक्षक दिसतील. कारण आपल्याकडे असलेली ही निसर्गाची ताकद, पण योग असे होते की, पाणी, वीज यांच्या (अछत) अभावात जगावे लागे ज्या उंचीवर जाण्याची संधी त्या पिढीला मिळायला हवी होती ती मिळाली नव्हती.
आजच्या पिढीला मी सांगू इच्छितो की तुमच्यात धमक हवी, आभाळाएवढ्या संधी तुमच्याकडे आहेत, मित्रांनो , एवढेच नाही, इथे आपल्याकडे कायदा-सुव्यवस्था कशी होती, घरातून बाहेर पडायचे असेल, इथून अहमदाबादला जायचे असेल, तर फोन करून विचारावे लागत होते की अहमदाबादमध्ये शांतता आहे ना , आम्हाला तिथे खरेदीसाठी यायचे आहे, मुलीचे लग्न आहे. असे दिवस होते, होते की नव्हते ? असे होते की नाही ? दररोज हुल्लडबाजी होत होती की नाही , अहो, इथे तर अशी स्थिती होती की बाळ जन्मल्यानंतर जेव्हा ते बोलू लागायचे तेव्हा त्याला त्याच्या काका-मामाची नावे म्हणता येत नव्हती, मात्र त्याला पोलिसांची नावे पाठ होती, कारण ते घराबाहेरच उभे असायचे , कर्फ्यू शब्द त्याने बालपणापासून ऐकला होता. आज 20-22 वर्षांच्या युवकांनी कर्फ्यू शब्द ऐकलेला नाही, हे कायदा सुव्यवस्थेचे काम आम्ही, गुजरातने करून दाखवले आहे. विकासाला विरोधाचे वातावरण , मात्र गेल्या दोन दशकात तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळे, आज देश, भारतातील प्रमुख राज्यात आपले पाय रोवून उभा आहे. मित्रांनो , हा आहे गुजरातचा जयजयकार,आणि त्यासाठी मी गुजरातच्या कोट्यवधी गुजराती बांधवांना , त्यांच्या साहसाला नतमस्तक होऊन वंदन करतो.
मित्रांनो,
तुमच्या पुरुषार्थामुळे , सरकार आणि जनतेने एकत्रितपणे एक नवा इतिहास रचला आहे. आणि हे सगळे तुमच्या ठाम विश्वासामुळे शक्य झाले आहे , तुम्ही कधीही माझी जात पाहिली नाही, कधीही माझे राजकीय जीवन पाहिले नाही, तुम्ही डोळे बंद ठेवून मला आशीर्वाद दिला आहे, अगदी मायेने भरभरून प्रेम दिले आहे, आणि तुमचा निकष एकच होता, माझे काम तुम्ही पाहिले, आणि माझ्या कामाला तुमची पसंती मिळत गेली, आणि केवळ मलाच नाही , माझ्या सहकाऱ्यांना देखील तुम्ही आशीर्वाद दिले आहेत आणि जसजसे तुमचे आशीर्वाद वाढत जातात, तसतसे माझी काम करण्याची इच्छा देखील वाढत जाते आणि माझी काम करण्याची ताकद देखील वाढते.
मित्रांनो ,
कुठलाही बदल असाच घडत नाही, त्यासाठी दूरदृष्टी असायला हवी. मेहसाणा येथील तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात,आपण पाच शक्तीच्या आधारावर, संपूर्ण गुजरातच्या विकासाच्या आधारावर पाच स्तंभ उभारले होते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा अन्य राज्यांबरोबर चर्चा व्हायची , तेव्हा सांगायचो, की आमचा बराचसा खर्च पाण्यासाठी करावा लागतो, आम्ही पाण्याशिवाय खूपच खडतर जीवन जगत आहोत, 10 वर्षातील 7 वर्ष दुष्काळ असायचा. आमच्या अर्थसंकल्पातील एवढा मोठा वाटा , भारतातील अन्य राज्यांच्या ते लक्षातच येत नव्हते, एवढा मोठा खर्च करावा लागेल, एवढी मेहनत करावी लागेल. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही पंचामृत योजना आणली, तेव्हा सर्वाधिक लक्ष गुजरातसाठी केंद्रित करण्यात आले, जर पाणी नसेल, जर गुजरातकडे वीज नसेल, तर हा गुजरात उध्वस्त होईल.
दुसरी गरज होती, मला भावी पिढीची चिंता होती, आणि त्यासाठी शिक्षण, वृद्धांसाठी आरोग्य, तंदुरुस्ती साठी संपूर्ण ताकद लावली आणि तिसरी गोष्ट, गुजरात भलेही व्यापाऱ्यांना माल देवो किंवा आणो, मात्र शेतीत तो पिछाडीवर होता. भारतात शेतीत सर्वात खालच्या क्रमांकावर होता. माझे गाव शेतीत पुढे गेले, तर माझे गाव समृद्ध होईल आणि माझे गाव समृद्धझाले तर माझा गुजरात कधीही मागे राहणार नाही आणि त्यासाठी आम्ही शेतीकडे लक्ष दिले. जर गुजरातला वेगाने पुढे न्यायचे असेल, तर उत्तम दर्जाचे रस्ते हवेत, उत्तम प्रकारची रेल्वेसेवा हवी, उत्तम दर्जाचे विमानतळ हवेत, कनेक्टिविटी हवी, तेव्हाच विकासाची फळे चाखण्यासाठी आपल्याकडे संधी उपलब्ध असतील. विकास थांबणार नाही. वाढतच राहील. आणि यासाठी आवश्यक हे सर्व म्हणजे, उद्योग येतील, पर्यटन वाढेल, विकास होईल आणि आज गुजरातमध्ये ते दिसत आहे.
तुम्ही बघा, स्टॅच्यू ऑफ यूनिटी, अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायला लोक जातात, मात्र त्याहून अधिक लोक आपल्या सरदार साहेबांच्या चरणी वंदन करायला येतात. हे मोढेरा पाहता पाहता पर्यटन केंद्र बनेल, मित्रांनो, तुम्ही फक्त तयारी करा की इथे येणारा कुणीही पर्यटक निराश होऊन जाणार नाही, दुःखी होऊन जाणार नाही, हे जेव्हा गाव मनावर घेईल , तेव्हा इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक यायला सुरुवात होईल.
मित्रांनो,
अशा प्रकारे गावागावांत वीज पोहचवण्याची आणि 24 तास वीज पोहचवण्याची योजना मी सर्वप्रथम ऊँझा इथे सुरु केली होती. ऊँझा मध्ये ज्योतिग्राम योजना आखली होती, आपले नारायण काका इथे बसले आहेत, त्यांना माहित होते, सगळे गुजराती त्याचे साक्षीदार आहेत, आम्ही ठरवले की मला 24 तास घरोघरी वीजपुरवठा करायचा आहे, त्यानुसार असे अभियान आखले की 1000 दिवसात आपल्याला ते काम करून दाखवायचे आहे. आणि तुमच्याकडे मी हे शिकलो होतो, आणि दिल्लीला गेलो तेव्हा पाहिले की 18000 गावे अशी होती जिथे वीज पोहचलीच नव्हती. तिथेही मी सांगितले की मला 1000 दिवसात वीज हवी. आणि तुम्हा सर्वांना आनंद होईल की तुमच्या गुजरातच्या या सुपुत्राने 18000 गावे विजेच्या झगमगाटाने प्रकाशमय केली.
मला आठवतंय, 2007मध्ये पाण्याच्या एका प्रकल्पाच्या उदघाटनासाठी, लोकार्पणासाठी इथे डेडियासण मध्ये आलो होतो आणि तेव्हा मी म्हटले होते, की ज्या लोकांना गुजरातमध्ये पाण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची किंमत नाही, पाण्याच्या महत्वाची ज्यांना जाण नाही , त्यांना 15 वर्षांनंतर समजेल. टीव्हीवर पाहिले तेव्हा त्यांना समजले की पाण्यासाठी गेली 15 वर्षे जी तपश्चर्या केली, ती आपल्या गुजरातला केवळ सुजलाम सुफलाम करत नाही, तर माझ्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद देखील आणत आहे. ही पाण्याची ताकद आहे. बघा, सुजलाम सुफलाम योजना आणि सुजलाम सुफलाम कालवा बनवला. मी गुजरातच्या शेतकऱ्यांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. कारण सुजलाम सुफलाम कालव्यासाठी, कोर्ट कचेरीच्या कायद्याच्या बंधनाशिवाय लोकांनी मला जी जमीन हवी होती ती दिली. पाहता-पाहता सुजलाम सुफलाम कालवा तयार झाला आणि जे पाणी दरीत जात होते ते पाणी आज उत्तर गुजरातच्या शेतांमध्ये पोहचत आहे. आणि माझे उत्तर गुजरात जल समृद्ध झाले आहे.
आज पाण्याशी संबंधित योजनेचे उद्घाटन-पायाभरणी करण्याची संधी मला मिळाली. विसनगर, माझे गाव वडनगर, आमचा खेरालु तालुका यांना याचा मोठा लाभ होणार आहे, लोकांना यामुळे पाण्याची सुविधा मिळेल, आणि पाणी आले तर त्याचा थेट लाभ कुटुंबाच्या तंदुरुस्तीला होईल, माता-भगिनींच्या शक्तीचा सदुपयोग होईल, पशुपालन वाढेल, शेतीला तर सर्वच प्रकारे लाभ होईल आणि म्हणूनच पशुपालन आमच्या मेहसाणा जिल्ह्याची ओळख आहे. आणि आताच मला अशोक भाई सांगत होते की आपण 1960 नंतर दूधव्यवसायात विक्रमी नफा मिळवला आहे. माझ्या उत्तर गुजरातच्या पशुपालकांचे मी अभिनंदन करतो,, त्यांनी पशुपालन डेयरी क्षेत्र अशा लोकांच्या हाती सोपवले,जी चोरी व्हायची ती बंद झाली आणि तुम्हाला नफ्यात भागीदार बनवले.
मित्रांनो,
तुम्ही तर ते दिवस पाहिले आहेत, पाणी नव्हते, चारा नव्हता, दुष्काळ होता, आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेद्वारे चारा आणावा लागत होता, पाण्याच्या अभावी गुरांचे हाल व्हायचे, आणि वृत्तपत्रात पानभर बातम्या छापून यायच्या. आज त्या सर्व संकटांपासून आपण मुक्त झालो आहोत, म्हणूनच 20-22 वर्षांच्या युवकांना माहीतच नाही, कशा प्रकारच्या संकटांतून आपण गुजरातला बाहेर काढले आहे. आणि आता मोठी झेप घेऊन पुढे जायचे आहे, एवढ्यावरच समाधान मानायचे नाही, हे जे साध्य झाले आहे त्यापेक्षा कित्येक पट अधिक साध्य करण्याची माझी इच्छा आहे.
वीज पोहचली, पाणी पोहचले तर औद्योगिक विकास होतो, कृषि उत्पादनात वाढ होते, दूध उत्पादन वाढते आणि आता तर फूड पार्कचे काम देखील वाढत आहे, एफपीओ उभे राहत आहेत, त्याचेही काम वाढत आहे , आपला मेहसाणा औषधनिर्मिती , प्लास्टिक, सीमेंट, इंजीनियरिंग या सर्व उद्योगांसाठी एक प्रमुख ऊर्जा केंद्र बनत आहे कारण त्याचा खप वाढला आहे.
आपले मांडल, बेचराजी विशेष गुंतवणूक विभाग यांच्या विकासानंतर जपान सारख्या देशातील तज्ञ येथे वाहन उद्योग उभारतील, इथे चारचाकी गाड्यांची निर्मिती करतील आणि या गाड्या जपानमध्ये आयात करण्यात येतील यापेक्षा मोठी कामगिरी कोणती असेल? जपानचे लोक येथे येतात, येथील उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात, गाड्यांची निर्मिती करतात, त्यासाठी गुजरातमधील युवकांची बुद्धीमत्ता आणि श्रम यांचा उत्तम वापर होतो आणि आता या उद्योगातून निर्मित गाड्या जपानमधील जनतेला हव्या असतील तेव्हा ते भारतातून गाड्यांची आयात करतील, हे चित्र किती उत्तम आहे. आज या भागात तीन विविध एककांमधून लाखो गाड्या तयार होत आहेत. मित्रांनो, एकेकाळी या भागात सायकलचे उत्पादन करणे ही देखील अशक्यप्राय गोष्ट होती तेथेच आता चारचाकी गाड्यांची निर्मिती होऊ लागली आहे. माझे हे शब्द लिहून घ्या मित्रांनो, ज्या गुजरातमध्ये सायकल सुद्धा तयार होऊ शकत नव्हती तेथे आता चारचाकी गाड्या तयार होत आहेत, मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे उत्पादन होऊ लागले आहे आहेत, तुमच्या डोक्यावरून जाणारी विमाने तुम्ही पाहता, ती देखील गुजरातच्या भूमीवर बनविण्यास सुरुवात होईल तो दिवस आता फार दूर नाही.
येथे सुझुकी कंपनीला सामग्री पुरविणारे लहान लहान पुरवठादार आहेत, त्यांची संख्या शंभराहून जास्त असेल, हे पुरवठादार वाहनांचे लहान लहान सुटे भाग तयार करतात. जग वेगाने बदलत चालले आहे याचा तुम्ही सर्वांनी विचार करायला हवा. आपल्याला विजेवर चालणाऱ्या वाहनांचा स्वीकार करावाच लागेल आणि त्यासंदर्भात देशातील सर्वात मोठे कार्य आपल्या बेचराजी मातेच्या चरणांपाशी होते आहे. हांसलपूरमध्ये आपला लिथियम आयर्न तयार करण्याचा कारखाना सुरु आहे.मला हांसलपूरच्या शेतकऱ्यांचे आभार मानायचे आहेत.तुमच्या कोणाच्या लक्षात आहे की नाही, मला माहित नाही. पण मला या ठिकाणी एका प्रसंगाची आठवण होते आहे. विनाशकारी विचार करणारे सगळे लोक बोलत राहतात, काहीबाही लिहितात आणि आंदोलन करत राहतात. आपण जेव्हा सुझुकी कंपनीचा कारखाना येथे सुरु करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हांसलपूरच्या संपूर्ण पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. खरेतर या भागातील जमीन इतकी नापीक होती की येथे बाजरीचे पीक देखील उगवत नव्हते. संपूर्ण भाग उजाड, रखरखीत होता. तर या भागातील सर्वांनी आंदोलन केले आणि ते गांधीनगर येथे आले. तेव्हा मी मुख्यमंत्रीपदी होतो. तेथे आल्यानंतर सर्व आंदोलकांनी जिंदाबाद-मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, माझे पुतळे जाळले जात होते.
मी म्हटले, असे चालणार नाही दादा, सर्वांना आत बोलवा. मी सर्व आंदोलकांना कार्यालयात बोलावून सर्वांची भेट घेतली. त्यांना विचारले की, मंडळी तुमच्या काय तक्रारी आहेत? ते म्हणाले की आम्हाला हा प्रकल्प नको आहे, आम्ही आमची जमीन या प्रकल्पासाठी देऊ इच्छित नाही. मी त्यांना म्हणालो, जशी तुमची इच्छा, आम्ही हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी सुरु करू. तेव्हा या सर्व आंदोलकांमधील पाच सात शहाणेसुरते लोक होते ते उभे राहिले, ते म्हणाले की, साहेब असे करु नका, हा प्रकल्प आमच्याच भागात सुरु करा. त्यानंतर त्या सर्व आंदोलकांनी योग्य विचार केला, आंदोलने थांबविली आणि आज पहा,औद्योगिक क्षेत्रात या संपूर्ण पट्ट्याचे नाव तेजाने झळकते आहे. आता संपूर्ण मेहसाणा भागाचा विकास होणार आहे.
बंधुंनो,
तुम्हीच विचार करा, हा पश्चिमी फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली – मुंबई फ्रेट कॉरिडॉर या प्रकल्पांचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. एका प्रकारे, या भागाची उत्पादनविषयक हब म्हणून विशिष्ट ओळख निर्माण होऊ लागली आहे. एवढेच नव्हे तर, लॉजिस्टिक भांडाराच्या क्षेत्रात देखील अनेक शक्यतांच्या संधी वाढत आहेत, रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
गेल्या दोन दशकांमध्ये आपण अधिकाधिक भाग एकमेकांशी जोडले जाण्यावर भर दिला, आणि आता नरेंद्र आणि भूपेंद्र यांची दोन इंजिने एकत्र होऊन दुहेरी इंजिनचे सरकार झाले आहे ना, म्हणूनच प्रगतीचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे.तुम्ही इंग्रजांच्या काळातील कागदपत्रे पाहिलीत तर तुम्हाला हे समजून दुःख होईल की आजपासून सुमारे नव्वद-पंचाण्णव वर्षांपूर्वी, वर्ष 1930 मध्ये इंग्रजांनी या भागाच्या विकासाची योजना तयार केली होती, त्याची संपूर्ण कागदपत्रे आपल्याला बघता येतात, त्यात या योजनेचा संपूर्ण आराखडा आहे. मेहसाणा-अंबाजी-तारंगा-अबू रोड रेल्वे मार्गाचे नियोजन केलेले त्यात दिसून येते. पण त्यानंतर जे सरकार सत्तेवर आले, त्यांना गुजरातविषयी आस्था नव्हती, त्यामुळे हे सर्व काम होऊ शकले नाही. नंतरच्या काळात आम्ही सर्व शोधले,सर्व योजना तयार केल्या. इतक्यातच मी गुजरातला भेट देऊन गेलो, त्यावेळी या रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथील देखावा कसा असेल, आर्थिक पातळीवर हा प्रकल्प या भागाची किती भरभराट करेल याची कल्पना करून पहा.
मित्रांनो,
बहुचराजी, मोढेरा, चाणस्मा हा रस्ता पूर्वी एक पदरी होता. आम्ही जेव्हा येथे यायचो तेव्हा प्रवासाची अत्यंत वाईट परीस्थिती होती. एक बस जात असताना समोरून दुसरी बस आली तर मार्ग कसा काढायचा अशी पंचाईत होत असे. लक्षात आहे ना तुमच्या, की विसरले सर्वजण? आज हा रस्ता चौपदरी करण्याची बाब चर्चेत आहे. मित्रांनो, विकास करावयाचा असेल तर शिक्षण, कौशल्य,आरोग्य या क्षेत्रांमधील कार्याशिवाय ते शक्य नाही. आणि म्हणूनच आम्ही गुजरातमध्ये, मेहसाणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी सरदार पटेल साहेबांच्या स्मरणार्थ एक संस्था स्थापन होत आहे, या संस्थेद्वारे येथील तरुण वर्गाला प्रगती करण्याची संधी मिळेल.
मी गुजरात सरकारचे अभिनंदन करू इच्छितो, त्यांचे कौतुक करतो की त्यांनी हा इतका महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि महत्वपूर्ण योगदान देण्याचा निश्चय केला आहे. वडनगरमधील एखाद्या विद्यार्थ्याने 11 वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर पुढे काय करावे कुठे जावे असा प्रश्न त्याला पडत असे, त्याच गावात आता वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. गुजरातच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांची तरतूद करण्यासाठी हे दुहेरी इंजिनचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
मित्रांनो,
सामान्य जनतेला किफायतशीर दरात औषधे उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान जन औषधी केंद्रांची सुरुवात केल्याबद्दल मला फार समाधान वाटते आहे. या केंद्रात मिळणारी औषधे अजिबात बनावट नसतात, ही सर्व जेनेरिक औषधे आहेत.ज्या लोकांच्या घरात वृध्द सदस्य आहेत किंवा एखादा आजार असलेली व्यक्ती आहे अशांसाठी घरात नियमितपणे औषधे आणावी लागतात, त्याचे बिल जर एक हजार रुपये होत असेल तर आम्ही सुरु केलेल्या या जन औषधी केंद्रांमध्ये त्याच औषधांचे बिल शंभर-दोनशे रुपये इतके कमी येईल. तुमचे आठशे रुपये वाचविण्यासाठी तुमचा हा मुलगा काम करत आहे, त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या पर्यटन क्षेत्राची देखील येथे वाढ होत आहे. वडनगर येथे झालेल्या खोदकामात हजारो वर्ष जुन्या वस्तू सापडल्या आहेत. ज्या प्रकारे काशी क्षेत्राला अविनाशी म्हटले जाते कारण तेथे कधी कशाचा अंत झालेला नाही, त्याच प्रकारे वडनगर हे भारतातील दुसरे असे शहर आहे की जेथे गेल्या 3000 वर्षांमध्ये जीवनसृष्टीचा नाश झालेला नाही, येथे नेहमीच कोणत्या न कोणत्या प्रकारच्या संस्कृतीची मानवी वस्ती टिकून होती याचे पुरावे खोदकामात मिळाले आहेत. मित्रांनो, येथील सूर्यमंदिरासह आपले बहुचराजी तीर्थस्थळ, उमिया माता मंदिर,आपले सतरेलिंग तलाव, राणी की वाव,आपली तारंगा टेकडी, रुद्र महालय, वडनगरचे तोरण, इत्यादी अनेक गोष्टी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतील. या संपूर्ण पट्ट्यात, पर्यटक एकदा एखादी बस घेऊन निघाले की दोन दिवस या भागातील पर्यटनस्थळे बघता बघता दमून जातील इतक्या गोष्टी येथे पाहण्यालायक आहेत. आपल्याला या गोष्टींचा प्रसार केला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
मित्रांनो,
गेली दोन दशके आपली मंदिरे,शक्तीपीठे, अध्यात्म आणि त्याची दिव्यता, भव्यता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आम्ही मनापासून मेहनत केली आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.बारकाईने पहिले तर तुमच्या लक्षात येईल, आता सोमनाथ, चोटीला, पावागड या ठिकाणांची स्थिती सुधारलेली आहे. पावागड येथे तर गेल्या पाचशे वर्षांमध्ये ध्वज देखील फडकू शकला नव्हता, बंधुंनो, अलीकडेच मी तेथे गेलो आणि पाचशे वर्षांनंतर तेथे पवित्र ध्वज फडकाविला.अंबाजी तीर्थस्थळ सुद्धा पहा कसे उजळून गेले आहे. मला सांगण्यात आले आहे की,आता संध्याकाळी अंबाजी मंदिरात आरती आहे आणि शरद पौर्णिमेनिमित्त हजारो लोक तेथे एकाचवेळी आरती करणार आहेत.
बंधुंनो,
गिरनार असो, पालीताणा असो किंवा बहुचराजी असो, अशा सर्व तीर्थक्षेत्रांच्या परिसरात व्यापक पातळीवर काम सुरु आहे. या कामामुळे भारतातील पर्यटकांना येथे येण्यासाठी आकर्षित करण्याची शक्ती निर्माण होत आहे. आणि मित्रांनो, पर्यटकांच्या येण्यामुळे सर्वांचेच भले होत असते. आणि सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा तर आपण आपला गुरुमंत्र केला आहे हेच दुहेरी इंजिनाचे सरकार आहे. जसा सूर्य कोणताही भेदभाव न करता जिथे जिथे किरणे पडतील तिथे त्याचा प्रकाश पसरवितो, त्याच प्रकारे विकासाचा प्रकाश देखील घराघरात पोहोचावा, गरिबांपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा यासाठी तुम्हां सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. आमच्या टीमला तुमचे आशीर्वाद द्या, भरभरून आशीर्वाद द्या बंधुंनो की गुजरातच्या विकासावर आम्ही अधिकाधिक भर देत राहू. तुम्हां सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
जरा जोरदार आवाज येऊ द्या, आपला मेहसाणा इतरांच्या मागे पडता कामा नये.
जरा हात उंचावून म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय
धन्यवाद.
G.Chippalkatti/Vinayak/Sushama/Sanjana/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866795)
Visitor Counter : 299
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam