पंतप्रधान कार्यालय
इंडिया मोबाईल कॉँग्रेस आणि 5-जी सेवेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2022 5:30PM by PIB Mumbai
या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, देशातील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, इतर मान्यवर, महोदय आणि महोदया,
ही शिखर परिषद जागतिक आहे पण आवाज स्थानिक आहे. इतकेच नाही तर सुरुवातही स्थानिक आहे. 21व्या शतकातील विकसनशील भारताचे सामर्थ्य , हे सामर्थ्य पाहण्यासाठी, ते दाखवण्यासाठी आज विशेष दिवस आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या ऐतिहासिक काळात 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख इतिहासात नोंदवली जाणार आहे. दुसरे म्हणजे नवरात्रोत्सव सुरु आहे. शक्तीच्या उपासनेचा हा उत्सव असतो आणि 21 व्या शतकातील जी सर्वात मोठी शक्ती आहे ,त्या शक्तीला नव्या उंचीवर नेण्याचा आज आरंभही होत आहे. आज देशाच्या वतीने, देशातील दूरसंचार उद्योगाकडून, 130 कोटी भारतीयांना 5जी च्या रूपाने एक अनोखी भेट मिळत आहे. 5जी ने देशात नव्या युगाची नांदी केली आहे. 5जी ही अमर्याद संधींचे अवकाश उपलब्ध करून देण्याची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
या अभिमानाच्या क्षणांसोबतच मला आनंद आहे की, 5जी सुरू करण्यात आमच्या सोबत ग्रामीण भागातील शाळांमधली मुलेही सहभागी आहेत, गावेही सहभागी आहेत, मजूर -गरीबही सहभागी आहेत.आता मी 5जी होलोग्राम तंत्रज्ञानाद्वारे उत्तरप्रदेशमधील मधील एका ग्रामीण शाळेतील मुलीचा परिचय करून घेत होतो. 2012च्या निवडणुकीत जेव्हा मी होलोग्राम वापरून प्रचार करत होतो, तेव्हा ते जगासाठी आश्चर्यकारक होते.आज तो घरोघरी पोहोचत आहे. मला जाणवले आहे की, नवीन तंत्रज्ञान त्यांच्यासाठी शिक्षणाचा अर्थ कसा बदलत आहे. यासोबतच , 5जी च्या माध्यमातून, गुजरात, महाराष्ट्र आणि ओदीशामधील खेड्यापाड्यातील अगदी दुर्गम शाळांपर्यंत मोठमोठ्या तज्ञांसोबत मुले वर्गात नवीन गोष्टी शिकत आहेत.त्यांच्यासोबत नव्या युगाच्या वर्गात सहभागी होणे हा खरोखरच रोमांचकारी अनुभव आहे.
मित्रांनो,
5जी साठी भारताच्या प्रयत्नांचा आणखी एक संदेश आहे.नवा भारत हा केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक म्हणून राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत भारत अतिशय सक्रिय भूमिका बजावेल.भविष्यातील वायरलेस तंत्रज्ञानाची रचना करताना, त्याच्याशी संबंधित उत्पादनात भारताची मोठी भूमिका असेल. 2जी , 3जी ,4जी च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता.पण 5जी सोबत भारताने एक नवा इतिहास रचला आहे.
5जी सह भारत प्रथमच दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये जागतिक मापदंड स्थापित करत आहे.भारत आघाडीवर आहे. आज इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट समजत आहे की, 5जी तंत्रज्ञान इंटरनेटची संपूर्ण रचना बदलून टाकेल. म्हणूनच भारतातील तरुणांसाठी आज 5जी तंत्रज्ञान खूप मोठी संधी घेऊन आले आहे. विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे जाणारा आपला देश जगातील इतर देशांच्या बरोबरीने कसा पावलावर पाऊल टाकून ज्या प्रकारे वाटचाल करत आहे याचा मला आनंद आहे. हे भारताचे मोठे यश आहे, डिजिटल इंडिया मोहिमेचे मोठे यश आहे.
मित्रांनो,
जेव्हा आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलतो तेव्हा काही लोकांना वाटते की, ही फक्त एक सरकारी योजना आहे. पण डिजिटल इंडिया हे केवळ नाव नाही, तर देशाच्या विकासाचा मोठा दृष्टीकोन आहे. या दृष्टीकोनाचा उद्देश आहे की,त्या तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, जे लोकांसाठी काम करेल आणि लोकांसोबत काम करेल. मला आठवते की , मोबाइल क्षेत्राशी संबंधित या दृष्टिकोनासाठी रणनीती तयार केली जात होती, तेव्हा मी म्हटले होते की आपला दृष्टिकोन तुकड्या तुकड्यांमध्ये असता कामा नये तर सर्वसमावेशक असला पाहिजे. डिजिटल इंडियाच्या यशासाठी या क्षेत्राची सर्व परिमाणे एकाच वेळी समाविष्ट करणे आवश्यक होते. म्हणून आम्ही एकाच वेळी 4 स्तंभांवर आणि चार दिशांवर लक्ष केंद्रित केले. पहिला - उपकरणाची किंमत, दुसरी - डिजिटल कनेक्टिव्हिटी, तिसरी - डेटाची किंमत, चौथा आणि सर्वात महत्त्वाचा - 'डिजिटल प्रथम' चा विचार.
मित्रांनो,
जेव्हा आपण पहिल्या स्तंभाबद्दल बोलतो, तेव्हा उपकरणाच्या किंमतीबद्दल, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. जेव्हा आपण आत्मनिर्भर असू तेव्हाच उपकरणाची किंमत कमी होऊ शकते,आणि तुम्हाला आठवत असेल की माझ्या आत्मनिर्भरतेसंदर्भात माझ्या संकल्पनेची अनेकांनी खिल्ली उडवली होती.2014 पर्यंत, आपण जवळपास 100 टक्के मोबाईल फोन परदेशातून आयात करत असू आणि म्हणूनच आम्ही या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे ठरवले.आम्ही मोबाईल उत्पादन युनिट वाढवले.2014 मध्ये जिथे देशात 8 वर्षांपूर्वी केवळ 2 मोबाईल उत्पादन युनिट होते, आता त्यांची संख्या 200 च्या वर आहे.भारतात मोबाईल फोनचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिले, खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले. आज तुम्ही या योजनेचा विस्तार पीएलआय योजनेतही पाहत आहात.या प्रयत्नांचे परिणाम खूप सकारात्मक होते.आज भारत मोबाईल फोन्सच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर कालपर्यंत आपण मोबाईल आयात करायचो. आज आपण मोबाईल निर्यात करत आहोत. जगाला पाठवत आहे.जरा कल्पना करा, 2014 मध्ये शून्य मोबाइल फोनची निर्यात करण्यापासून आज आपण हजारो कोटींचे मोबाईल निर्यात करणारा देश बनलो आहोत, निर्यात करणारा देश बनलो आहोत.साहजिकच या सर्व प्रयत्नांचा परिणाम उपकरणाच्या किंमतीवर झाला आहे. आता आपल्याला कमी किंमतीत अधिक सुविधा मिळू लागल्या आहेत.
मित्रांनो,
डिव्हाइसच्या किंमतीनंतर आम्ही ज्या दुसऱ्या स्तंभावर काम केले ते म्हणजे डिजिटल कनेक्टिव्हिटी. तुम्हाला हे देखील माहित आहे की दळणवळण क्षेत्राची खरी ताकद कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. जितके लोक जोडले जातील तितके क्षेत्रासाठी चांगले आहे. आपल्याला ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर 2014 मध्ये 6 कोटी वापरकर्ते होते. आज त्यांची संख्या 80 कोटींहून अधिक झाली आहे.जर आपल्याला इंटरनेट जोडणीच्या संख्येबद्दल बोलायचे झाले , तर 2014 मध्ये जिथे 25 कोटी इंटरनेट जोडण्या होत्या ,आज त्यांची संख्या सुमारे 85 कोटींवर पोहोचली आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, आज आपल्या ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरांमधील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येपेक्षा वेगाने वाढत आहे.आणि यामागे एक खास कारण आहे. 2014 मध्ये जिथे ऑप्टिकल फायबर देशातील 100 पेक्षा कमी पंचायतींपर्यंत पोहोचले होते, आज ऑप्टिकल फायबर एक लाख 70 हजार पंचायतींमध्ये पोहोचले आहे. आता कुठे 100, कुठे एक लाख 70 हजार. सरकारने जशी प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवण्याची मोहीम सुरू केली, जसे हर घर जल अभियानातून प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्याच्या अभियानावर काम केले, तसेच उज्ज्वला योजनेतून गरीबातील गरीब लोकांपर्यंत गॅस सिलिंडर पोहोचवले. ज्याप्रमाणे आम्ही कोट्यवधी लोक बँक खात्यांपासून वंचित राहिले होते, कोट्यवधी लोक जे बँकेशी जोडलेले नव्हते. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी भारतातील नागरिक जन धन खात्याच्या माध्यमातून बँकेशी जोडले गेले. त्याचप्रमाणे आमचे सरकार सर्वांसाठी इंटरनेट या ध्येयावर काम करत आहे.
मित्रांनो,
डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच डेटाची किंमतही तितकीच महत्त्वाची बनते. डिजिटल इंडिया हा तिसरा स्तंभ होता. ज्यावर आम्ही सर्व शक्तीनिशी काम केले. दूरसंचार क्षेत्राच्या मार्गात येणारे अनेक अडथळे आम्ही दूर केले आहेत.यापूर्वी दूरदृष्टीचा अभाव आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे दूरसंचार क्षेत्राला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. 4जी तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी आम्ही धोरणात्मक पाठबळ कशाप्रकारे दिले हे तुम्हाला माहीत आहे.यामुळे डेटाच्या किंमतीत मोठी घट झाली आणि देशात डेटा क्रांतीचा जन्म झाला.उपकरणाची किंमत, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि डेटाची किंमत या तीन गोष्टी पाहता त्याचा गुणात्मक प्रभाव सर्वत्र दिसू लागला.
मात्र मित्रांनो,
या सगळ्यांसोबत आणखी एक महत्वाचे काम झाले आहे. देशात 'डिजिटल फर्स्ट' चा विचार विकसित झाला आहे. एक काळ असा होता, जेव्हा मोठमोठे विद्वान, उच्चभ्रु, वर्गातले काही मूठभर लोक, सभागृहात काही लोकांनी दिलेली भाषणे ऐका. आपले नेते कशी भाषण करत असत. त्यांची थट्टा करत असत. त्यांना असे वाटत असे, त्यांना असे वाटत असे की गरीब लोकांची क्षमताच नाही. त्यांना डिजिटल वगैरे काही कळणार नाही. त्यांना गरिबांच्या क्षमतेविषयी शंका होती. मात्र, देशाच्या सर्वसामान्य माणसांची समज, त्यांची सद्सद्विवेकबुद्धी, त्यांचे जिज्ञासू मन याबद्दल मला कायमच विश्वास राहिलेला आहे. मी पाहिलं आहे की भारतातली गरीबातली गरीब व्यक्तीही नवं तंत्रज्ञान वापरण्यात कायम पुढे असते. आणि मी माझा आणखी एक छोटासा अनुभव सांगतो.
कदाचित तो 2007-08 चा कालखंड असेल किंवा 2009-10 चा, मला आठवत नाही. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, पण एक असा भाग होता जिथे मी कधीच गेलो नाही आणि खूपच आदिवासी भागात, खूपच मागास, आमच्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला एकदा तिथे कार्यक्रम करायचाच आहे, मला जावं लागेल असं सांगितलं. तर तो भाग असा आहे जिथे कुठलाच मोठा प्रकल्प होण्याची शक्यता नव्हती. जंगलाचा भाग होता, कुठलीच शक्यता नव्हती. तर शेवटी एक शीतगृह, दुधाचं शीतगृह, ते सुद्धा 25 लाख रुपयांचं. मी म्हटलं भलेही ते 25 लाखाचं का असेना, 25 हजाराचं असलं तरी मी स्वतः उद्घाटन करीन. आता लोकांना वाटतंच ना, की मुख्यमंत्र्यांनी याच्या खाली तर काही करायलाच नको. पण मला असं काही वाटत नाही. तर, मी त्या गावात गेलो आणि तिथे सभा घेण्यासाठी पण जागा नव्हती, म्हणून तिथून 4 किलोमीटर दूर एका शाळेचं लहानसं मैदान होतं. तिथे सभा आयोजित केली होती. पण जेव्हा त्या शीतगृहाच्या ठिकाणी गेलो, आदिवासी माता - भगिनी दुध घ्यायला रांग लावून उभ्या होत्या. तर जेव्हा आम्ही उद्घाटन करत होतो, तेव्हा आपलं दुधाचं भांडं खाली ठेवून मोबाईलवर आमचे फोटो घेत होत्या. मला आश्चर्य वाटलं इतक्या सुदूर क्षेत्रात मोबाईलवर फोटो घेत आहेत, म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो. मी म्हटलं हे फोटो घेऊन तुम्ही काय कराल? तर म्हणाल्या की डाऊनलोड करू. हा शब्द ऐकून मी खरोखर आश्चर्यचकित झालो. की, ही शक्ती आहे आपल्या देशांतल्या खेड्यांत. आदिवासी भागात गरीब माता - भगिनी ज्या दुध घ्यायला आल्या होत्या, त्या मोबाईल फोनवर आपला फोटो घेत होत्या आणि त्यांना माहित की यात तर नाही, आता डाऊनलोड करून घेऊ आणि डाऊनलोड हा शब्द त्यांच्या तोंडून येणं त्यांची बौद्धिक शक्ती आणि नव्या गोष्टींचा स्वीकार करण्याच्या स्वभावाचं द्योतक होतं. काल गुजरातमध्ये होतो तेव्हा मी अंबाजी तीर्थ क्षेत्राला जात होतो तेव्हा रस्त्यात लहान लहान खेडी होती. अर्ध्याहून जास्त लोक असे असतील जे मोबाईलवर व्हिडीओ घेत होते. अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे आपल्या देशाची ही जी शक्ती आहे, या शक्तीकडे पण दुर्लक्ष करू शकत नाही आणि देशाच्या केवळ उच्चभ्रू वर्गाच्या काही लोकांनाच आपल्या गरीब बंधू - भगिनींवर विश्वास नव्हता. शेवटी आपण ‘डिजिटल फर्स्ट’ हा दृष्टीकोन घेऊन पुढे जाण्यात यशस्वी झालो. सरकारने स्वतः पुढे येऊन डिजिटल पेमेंटचा मार्ग सुकर केला. सरकारने स्वतः ॲपच्या माध्यमातून नागरिक केंद्रित डिलिव्हरी सेवेला प्रोत्साहन दिलं. मग ते शेतकरी असोत की लहान दुकानदार, आम्ही त्यांना ॲपच्या माध्यमातून गरजा पूर्ण करण्याचा मार्ग दिला. याचा परिणाम आपण बघू शकता. आज तंत्रज्ञानाचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण झाले आहे. आपण देखील बघितलं आहे, की ‘डिजिटल फर्स्ट’ चा आमचा दृष्टीकोन कोरोना जागतिक महामारीच्या काळात देशातल्या लोकांची किती मदत केली. जगातले मोठमोठे विकसित देश जेव्हा आपल्या नागरिकांना मदत करायला संघर्ष करत होते. त्यांच्याकडे पैसा होता, डॉलर होते, पाउंड होते, सगळं होतं, युरो होते आणखी देण्याचाही निर्णय झाला होता. पण ते पोहोचवण्याचा मार्ग नव्हता. भारत एका क्लिकवर हजारो कोटी रुपये माझ्या देशबांधवांच्या खात्यात वळते करत होता. ही डिजटल इंडियाची ताकद होती, की जेव्हा जग थांबलं होतं, तेव्हा आपली मुलं ऑनलाईन शक्षण घेत होती, अभ्यास करत होती. रुग्णालयांच्या समोर अभूतपूर्व आव्हान होतं. पण डॉक्टर आपल्या रुग्णांचावर टेली - मेडिसिनच्या माध्यमातून देखील उपचार करत होते. कार्यालये बंद होती, मात्र ‘घरून काम’ सुरु होतं. आज आपले लहान व्यापारी असोत, छोटे उद्योगपती असोत, स्थानिक कलाकार असतो, कारागीर असोत, डिजिटल इंडियाने सगळ्यांना एक मंच उपलब्ध करून दिला आहे, बाजारपेठ दिली आहे. आज आपण कुठल्याही स्थानिक बाजारात, तुम्ही भाजी बाजारात जाऊन बघा, फेरीवाले, लहान दुकानदार देखील तुम्हाला म्हणतील, रोख पैसे नाहीत, ‘UPI’ करा. मी तर मध्यंतरी एक व्हिडीओ बघितला की कुणी एक भिक्षुक देखील डिजिटल व्यवहार करतो. पारदर्शकता बघा, हा बदल सांगतो की जेव्हा सोय उपलब्ध होते तेव्हा विचार कशा प्रकारे सशक्त होतात.
मित्रांनो,
आज टेलीकॉम क्षेत्रात जी क्रांती देश बघतो आहे, तो याचा पुरावा आहे की जर सरकारने प्रामाणिक हेतूने काम केले तर नागरिकांची विचारसरणी बदलायला वेळ लागत नाही. 2G चा हेतू आणि 5G चा हेतू, यात हाच फरक आहे. उशिरा का होईना, पण आलं. आज भारत जगातल्या त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे जिथे डेटा इतका स्वस्त आहे. पूर्वी 1GB डेटाची किंमत जिथे जवळपास 300 रुपये होती, तिथे आज 1GB डेटा केवळ 10 रुपयांत देखील मिळतो. आज भारतात महिन्याभरात एक व्यक्ती मोबाईलवर जवळजवळ 14GB डेटा वापरतो आहे. 2014 मध्ये या 14 GB डेटाची किंमत होती जवळपास 4,200 रुपये, दर महिना. आज इतकाच डेटा शंभर रुपये, किंवा जास्तीत जास्त दीडशे रुपये, सव्वाशे ते दीडशे रुपयांत मिळतो. म्हणजे आज गरिबांचे, मध्यम वर्गाचे मोबाईल डेटाच्या जवळ जवळ दर महिन्याला 4 हजार रुपयांची बचत होते आहे. हे पैसे त्यांच्या खिशात राहत आहेत. आमच्या सरकारने अनेक प्रयत्न करून भारतात डेटाची किंमत खूपच कमी ठेवली आहे. ही गोष्ट वेगळी, की दर महिन्याला 4,000 रुपयांची बचत करणे काही लहान गोष्ट नाही. पण जेव्हा मी सांगितलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं, कारण आम्ही याचा डांगोरा पिटला नाही, जाहिराती दिल्या नाही, खोटं खोटं काहीतरी पसरवलं नाही, आम्ही भर दिला, देशाच्या लोकांना सुविधा मिळाव्यात, त्या वाढाव्यात, जगण्याची सुलभता वाढावी, यावर.
मित्रांनो,
सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की भारत पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीचा फायदा घेऊ शकला नाही. पण मला खात्री आहे, भारत चौथ्या आयुद्योगिक क्रांतीचा नुसता लाभाच घेणार नाही, तर त्याचे नेतृत्व करेल आणि विद्वान लोक तर म्हणायला सुद्धा लागले आहेत, हे दशकच नव्हे तर हे शतक भारताचे आहे. हे दशक नाही तर हे शतक भारताचे आहे. ज्या प्रकारे 4G आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या जगात भारताने उत्तुंग झेप घेतली आहे, याचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. भारताच्या नागरिकांना जेव्हा तंत्रज्ञानाच्या समान संधी मिळतात, तेव्हा जगात कुणीही त्यांचा हात धरू शकत नाही. म्हणूनच आज जेव्हा भारतात 5G ची सुरवात होत आहे, तेव्हा माझ्या मनात खूप विश्वास आहे मित्रांनो. मी दूरचं बघू शकतो आहे. जी स्वप्न आपल्या डोक्यात आहेत. ती आपल्या डोळ्यासमोर साकार होताना बघू. आपल्या नंतरची पिढी हे बघेल असं होणार नाही. आपणच आपल्या डोळ्यांनी हे सगळं बघणार आहोत. हा एक सुखद योगायोग आहे की काही आठवड्यांपूर्वीच भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आणि म्हणून या प्रसंगी आपल्या तरुणांसाठी, जे 5G तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाचे लक्ष वेधून घेणारे नवोन्मेष करू शकतात. ही संधी आहे, आपल्या उद्योजकांसाठी जे 5G तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उद्योगाचा विस्तार करू शकतात.
भारतातील सामान्य माणसासाठी ही एक संधी आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य माणूस आपली कौशल्ये सुधारू शकतो, कौशल्ये वाढवू शकतो, अद्ययावत कौशल्ये शिकू शकतो, आपल्या कल्पना प्रत्यक्षात साकार करू शकतो.
मित्रहो,
आजचा हा ऐतिहासिक प्रसंग, आपल्यासाठी एक राष्ट्र म्हणून, भारतीय नागरिक म्हणून एक नवीन प्रेरणा घेऊन आला आहे. भारताच्या विकासाला अभूतपूर्व गती देण्यासाठी आपण या 5G तंत्रज्ञानाचा वापर का करू नये? आपल्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार करण्यासाठी आपण हे 5G तंत्रज्ञान का वापरू नये? या 5G तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादकतेत विक्रमी वाढ का करू नये?
मित्रहो,
या प्रश्नांमध्ये प्रत्येक भारतीयासाठी एक संधी आहे, एक आव्हान आहे, एक स्वप्न आहे आणि संकल्प सुद्धा आहे. मला माहिती आहे की आज 5G चा हा शुभारंभ सर्वात जास्त उत्साहाने पाहणारा वर्ग म्हणजे देशातील युवा आहेत, माझ्या देशाची तरुण पिढी आहे. आपल्या दूरसंचार उद्योगासाठी कितीतरी मोठ्या संधी सज्ज आहेत, रोजगाराच्या कितीतरी नवीन संधी निर्माण होणार आहेत. मला खात्री वाटते की आमचे उद्योग, आमच्या संस्था आणि आमचा युवा वर्ग या दिशेने सातत्याने काम करतील. आता हे प्रदर्शन पाहण्यात मी बराच वेळ घालवला आहे, आणि बऱ्याच गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी तंत्रज्ञानाचा विद्यार्थी नाही, पण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हे प्रदर्शन पाहून मला वाटते की मी सरकारला सूचना करणार आहे. त्यांना सांगणार आहे की आपल्या सरकारच्या सर्व विभागांनी, सर्व अधिकाऱ्यांनी या बाबींचा कुठे वापर करता येईल ते बघावे. सरकारच्या धोरणांमध्येही त्यांचा परिणाम दिसला पाहिजे. हे प्रदर्शन पाच दिवस चालणार आहे. देशातील विद्यार्थ्यांनीही हे प्रदर्शन पाहावे, अशी माझी इच्छा आहे. विशेषत: तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी इथे यावे, पहावे, समजून घ्यावे. जग कसे बदलते आहे, ते समजून घ्यावे. एकदा हे प्रदर्शन पाहिल्यावर अनेक नवीन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. तुम्ही त्यात भर घालू शकता. दूरसंचार क्षेत्रातील लोकांनाही मला काही सांगायचे आहे. या प्रदर्शनात मी ज्या-ज्या स्टॉलवर गेलो, तिथे प्रत्येकाने सांगितले की हे स्वदेशी आहे, स्वयंपूर्ण आहे, आम्ही स्वत: बनवले आहे. मोठ्या अभिमानाने सगळे हे सांगत होते. मला आनंद झाला, पण माझ्या मनात काही वेगळाच विचार आला. मी विचार करत होतो की अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा ब्रँड आहे. प्रत्येक गाडीचे वैशिष्ट्य आहे. पण या गाड्यांच्या सुट्या भागांचा पुरवठा करणारे सगळे एमएसएमई क्षेत्राशी संबंधित आहेत. एमएसएमईमधील एक कारखाना सहा प्रकारच्या वाहनांचे सुटे भाग बनवतो, आवश्यकतेनुसार त्यात काही किरकोळ सुधारणा केल्या जातात. तुमच्या बोलण्यावरून तुम्ही हार्डवेअरबद्दल बोलत आहात असे मला वाटले. या कामी लागणाऱ्या हार्डवेअरचे लहान भाग तयार करण्याचे काम एमएसएमई क्षेत्राला द्यावे का? एक मोठी यंत्रणा तयार करा. मी व्यापारी नाही. मला पैशांशी काही देणेघेणे नाही, पण यामुळे खर्च एकदम कमी होईल, इतके मला समजते. ही आपल्या एमएसएमई क्षेत्राची ताकद आहे. तुम्हाला तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे जोडूनच ती सेवा पुरवायची आहे आणि म्हणून मला वाटते की तुम्हा सर्वांना नव्याने आणि एकत्रितपणे काम करावे लागेल आणि तरच आपल्याला दर कमी करता येतील. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण एकत्रितपणे करतो. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांनाही मला सांगावेसे वाटते. स्टार्टअप्समध्ये काम करणाऱ्या मुलांना, तरुणांना मी पाहिले आहे. या क्षेत्रातील बहुतेक स्टार्टअप्सनी कालांतराने कौशल्य विकास साध्य केला आहे. स्टार्टअप क्षेत्रातील सहकाऱ्यांनाही मी सांगू इच्छितो. तुम्ही या क्षेत्रासाठी जास्तीत जास्त किती सेवा देऊ शकता? सहज वापरता येण्याजोगी प्रणाली तुम्ही विकसित करू शकता का ? हा यातील फायदा आहे. पण मला आणखी काही सांगावेसे वाटते. तुमची ही जी संघटना आहे, ती एकत्र येऊन लोकचळवळ उभारू शकते का? किमान भारतातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये हे 5G रोजच्या जगण्यात कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते, त्याबाबत लोकांना सजग करणारी प्रदर्शने उपयुक्त ठरू शकतात का? मी माझ्या अनुभवातले एक लहान उदाहरण सांगतो. 24 तास वीज पुरवठा असणे, हे आपल्या देशासाठी स्वप्न होते. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हा मी ज्योतिग्राम योजना आखली होती. गुजरातमधील प्रत्येक घरात चोवीस तास वीजपुरवठा करावा, हे माझे स्वप्न होते. हे शक्य होणार नाही, आपण हे करू शकणार नाही, असे माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर मी एक सोपा उपाय सुचवला. मी म्हणालो की आपण कृषी फीडर वेगळे करू या आणि घरगुती फीडर वेगळे करू या. आम्ही तसे केले आणि प्रत्येक जिल्ह्यात हे काम पूर्ण केले. हे एक काम पूर्ण झाले की त्या जिल्ह्यात मोठा उत्सव आयोजित केला जात असे. अडीच-तीन लाख लोक येत असत, कारण चोवीस तास वीज पुरवठा ही खूप आनंदाची बाब होती. तो 2003-04-05 चा काळ होता. पण त्यावेळी आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. देशभरात इलेक्ट्रिकल वर्क, इलेक्ट्रिक मशीन्सचे एक मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. देशभरात इलेक्ट्रिकल वर्क, इलेक्ट्रिक यंत्रांचे हे एक मोठे प्रदर्शन लावले होते. वीज आली म्हणजे रात्री जेवताना वीज असेल. वीज आली म्हणजे दूरचित्रवाणी बघता येईल, असे लोकांना वाटत असे. परंतु विजेचे आणखी अनेक उपयोग आहेत, त्याबाबत सजग करणेही गरजेचे होते. मी हे 2003-04-05 सालाबद्दल बोलत आहे. जेव्हा ते प्रदर्शन सुरू झाले, तेव्हा लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू लागले. मी स्वत:साठी इलेक्ट्रिक उपकरण घेईन. आपण इलेक्ट्रिक चाक विकत घेऊया, असा विचार कुंभारही करू लागला. माता-भगिनींनाही वाटू लागले की स्वयंपाकघरात आपण विजेच्या सहाय्याने अनेक गोष्टी करू शकतो. एक प्रचंड मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे आणि विजेची बहुपयुक्तता सिद्ध झाली आहे. सामान्य जीवनात 5G मुळे लोक म्हणू लागतील, अरे वा, हल्ली व्हिडिओ खूपच लवकर डाउनलोड होऊ लागले आहेत. रील बघण्यासाठी फार वेळ थांबून राहावे लागत नाही. फोन कट होत नाही. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून एक सुव्यवस्थित व्हिडिओ कॉन्फरन्स पूर्ण होऊ शकते. तुमचा फोन कॉल सुरळीत ऐकू येऊ शकतो. पण हे इतक्यापुरते मर्यादित नाही. 5 जी तंत्रज्ञान हे जीवन बदलणारी यंत्रणा म्हणून समोर येत आहे आणि म्हणूनच मी या उद्योग विश्वातील मित्रांच्या संघटनेला सांगू इच्छितो की तुम्ही शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि भारतातील प्रत्येक जिल्ह्यात जा, तिथे संबंधित पैलू समजून घ्या. स्थानिक लोक तुमच्या निरीक्षणात भर घालतील. त्यायोगे तुमच्या हातून सेवा सुद्धा घडेल. तंत्रज्ञानाचा वापर हा निव्वळ बोलणे किंवा व्हिडिओ पाहण्यापुरता मर्यादित राहू नये. क्रांती घडवून आणण्यासाठी त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. आपल्याला एकदा 130 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचे आहे, नंतर नवे तंत्रज्ञान स्वत:च तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही बघा, या कामी तुम्हाला वेळ लागणार नाही. मी नुकतेच ड्रोन संबंधी धोरण आणले होते. आज मी अनेक क्षेत्रे पाहतो आहे. ड्रोनचा वापर करून औषध फवारणीचे काम सुरू केले आहे, अनेक लोक ड्रोन चालवायला शिकले आहेत आणि म्हणूनच मला वाटते की आपण या तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे.
आणि मित्रहो,
आगामी काळात, आपला देश, भारतात निर्मिलेल्या आणि भारताला जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान बहाल करणाऱ्या तंत्रज्ञानाचे सतत नेतृत्व करेल. या विश्वासासह तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! शक्ती उपासनेच्या या पवित्र सणानिमित्त आणि 5G या शक्तीच्या एका मोठ्या माध्यमाच्या शुभारंभाबद्दल मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांचे मनापासून अभिनंदन करतो. अनेकानेक आभार!
***
Jaydevi PS/S.Chavan/R.Aghor/M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864412)
आगंतुक पटल : 488
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam