पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून गुजरातमधील अंबाजी येथे 7200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 45,000 हून अधिक घरांचे पंतप्रधानांकडून लोकार्पण आणि पायाभरणी

पंतप्रधानांच्या हस्ते तरंगा टेकडी – अंबाजी – अबू रोड या नवीन ब्रॉडगेज मार्गाची पायाभरणी

'प्रसाद' योजनेअंतर्गत अंबाजी मंदिरात तीर्थक्षेत्र सुविधांच्या विकासासाठी पंतप्रधानांनी केली पायाभरणी

मालवाहतुकीला समर्पित पश्चिम कॉरिडॉरच्या 62 किमी लांबीच्या न्यू पालनपूर-न्यू महेसाणा खंडाचे आणि 13 किमी लांबीच्या न्यू पालनपूर-न्यू चातोदार खंडाचे पंतप्रधानांनी केले लोकार्पण

"माँ अंबेच्या आशीर्वादाने सर्व संकल्प पूर्ण करण्याचे बळ मिळेल"

"आम्ही आपल्या भारत देशाला मातेच्या रूपात पाहतो आणि स्वतःला भारत मातेची मुले मानतो"

"देशातील 80 कोटींहून अधिक लोकांपर्यंत मोफत रेशन योजना पोहोचवण्यासाठी सरकार सुमारे 4 लाख कोटी रुपये खर्च करत आहे"

“भगिनी आणि मातांना सणासुदीच्या काळात स्वयंपाकघर चालवताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ ”

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी आम्ही हा रेल्वे मार्ग अंबा मातेच्या चरणी समर्पित करत आहोत हे आमचे भाग्य आहे"

Posted On: 30 SEP 2022 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022  

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंबाजी येथे  7200 कोटी रुपयांहून  अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांनी, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  45,000  हून अधिक घरांचे लोकार्पण  आणि पायाभरणी केली. तरंगा हिल(टेकडी) – अंबाजी – अबू रोड नवीन ब्रॉडगेज मार्गाची  पायाभरणी पंतप्रधानांनी केली  आणि प्रसाद योजनेंतर्गत अंबाजी मंदिरातील तीर्थक्षेत्र सुविधांच्या विकासाची पायाभरणीही  पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी  मालवाहतुकीसाठी समर्पित पश्चिम कॉरिडॉरचा 62 किलोमीटर लांबीचा न्यू पालनपूर-न्यू महेसाणा खंड  आणि 13 किलोमीटर लांबीचा न्यू पालनपूर-नवी चातोदार खंड  (पालनपूर बायपास लाइन)यांचे लोकार्पण केले. मिठा-थराड-दीसा रस्त्याच्या रुंदीकरणासह विविध रस्ते प्रकल्पही पंतप्रधानांनी समर्पित केले.

पंतप्रधानांनी विविध गृहनिर्माण योजनांच्या सात लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द केल्या.  तसेच त्यांनी मुख्यमंत्री गौमाता पोषण योजनेचा प्रारंभ केला  आणि गोशाळांना धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधानांनी काही गृहनिर्माण लाभार्थ्यांशी व्हिडिओ लिंकद्वारे संवादही साधला.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी, नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अंबामातेचे  दर्शन घेण्याची संधी मिळाल्याबद्दल  आनंद व्यक्त केला. देशाने विकसित भारताचा मोठा  संकल्प घेतला असताना आपण अंबाजी येथे  आलो आहोत, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. “माँ अंबेच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या सर्व संकल्पांच्या पूर्ततेसाठी बळ मिळेल”, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी गृहनिर्माण योजनांच्या 61,000 लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाची  दिवाळी येत असल्याचे नमूद केले. भारतातील महिलांच्या सन्मानाच्या संस्कृतीकडे  पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, “जेव्हा आपण महिलांच्या सन्मानाबद्दल बोलतो तेव्हा ते आपल्यासाठी स्वाभाविकपणे  येते. पण जेव्हा आपण याचा गांभीर्याने विचार करतो तेव्हा आपल्या संस्कारात स्त्रियांचा किती आदर आहे हे लक्षात येते.” इतर देशांप्रमाणेच, आपल्या संस्कृतीत शक्तीचा संबंध स्त्रीशी जोडलेला  आहे आणि शूर योद्धांसोबत आईचे नाव जोडण्याची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी अर्जुन, श्रीकृष्ण आणि हनुमान यांची  उदाहरणे दिली. “हे आपले  संस्कार आहेत”, असे ते म्हणाले.  आम्ही आमच्या भारत देशाला मातेच्या रूपात पाहतो आणि स्वतःला भारतमातेची मुले समजतो. असे असूनही महिलांना आर्थिक बाबतीत केवळ मर्यादित अधिकार आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. यात  विविध गृहनिर्माण योजनांतर्गत बहुतांश करून  घरे एकतर घरातील महिलांच्या मालकीची किंवा सह-मालकीची आहेत याची सुनिश्चिती करून सुधारणा  करण्यात आली  आहे. देशातील गरीब कुटुंबांना 3 कोटींहून अधिक घरे सुपूर्द करण्यात आली आहेत.

या सणासुदीच्या काळात,  केंद्र सरकार मोफत रेशन योजनेचा विस्तार करण्यासाठी सुमारे 4 लाख कोटी रुपये खर्च करत आहे, ज्यामुळे देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना दिलासा मिळत असल्याचे  पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.  गरीब कुटुंबातील भगिनी आणि मातांना अडचणीच्या काळात स्वयंपाकघर चालवताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.   गेल्या दोन दशकांपासून आपल्या माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि बनासकांठा इथल्या  बदलत्या परिस्थितीचा साक्षीदार असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.  परिसरातील महिलांना त्यांनी केलेल्या विनंतीची आठवण  पंतप्रधानांनी करून दिली आणि  त्यांच्या विनंतीचा आदर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.  नर्मदेच्या पाण्यामुळे या प्रदेशात सुख आल्याचे  आणि मुली मोठ्या उत्साहाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जात असल्याचे नमूद केले. कुपोषणाविरुद्धच्या लढाईत त्यांनी केलेल्या सहकार्याचीही त्यांनी नोंद घेतली. पंतप्रधान म्हणाले की, 2014 नंतर भारतातील महिलांच्या जीवनातील प्रत्येक पैलूची काळजी घेतली जात आहे आणि त्या भारताच्या विकासाच्या प्रवासाच्या चालक बनत आहेत. केंद्र सरकारच्या प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी देशातील महिला शक्ती असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  शौचालय, गॅस जोडणी, हर घर जल, जन धन खाते किंवा मुद्रा योजनेअंतर्गत  हमीशिवाय कर्ज या बाबतीत केलेल्या कामांचा उल्लेख त्यांनी  केला.  जेव्हा आई आनंदी असते तेव्हा कुटुंब आनंदी असते, जेव्हा कुटुंब आनंदी असते तेव्हा समाज आनंदी असतो आणि जेव्हा समाज आनंदी असतो तेव्हा राष्ट्र आनंदी असते. हा योग्य दिशेचा विकास आहे ज्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत'', असे पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधानांनी खुलासा केला की तरंगा टेकडी-अंबाजी-अबू रोड मार्गाची कल्पना 1930 साली ब्रिटीश राजवटीच्या काळात पुढे आली होती. ही गरज 100 वर्षां पूर्वीच ओळखण्यात आली होती, पण दुर्दैवानं इतक्या दीर्घ कालावधीत हे काम झाले नाही. “कदाचित हे काम माझ्याकडून व्हावं अशी माता अंबेची इच्छा होती. हे आपले भाग्य आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात माता अंबेच्या चरणी हे काम अर्पण करण्याची आपल्याला संधी मिळत आहे”, पंतप्रधान म्हणाले. त्यांनी माहिती दिली की हा रेल्वे मार्ग आणि बाय-पास मुळे वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळेल आणि संगमरवर उद्योगाला देखील मदत मिळेल. एक समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करेल, असे ते म्हणाले. किसान रेल आता इथून सुटणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, ते म्हणाले. गब्बर तीर्थच्या  विकासासाठी त्यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली.            

पंतप्रधान म्हणाले की, मंदिराच्या परिसरात इतकी आकर्षणे निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे की लोकांना या सर्व ठिकाणी भेट देण्यासाठी 2-3 दिवसांचा कार्यक्रम ठरवावा लागेल. एकीकडे अंबाजी हे श्रद्धा आणि पूजेचे माहेरघर आहे, तर दुसरीकडे आपल्या भारताची सीमा आहे, ज्या ठिकाणी आपले जवान तैनात आहेत, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. केंद्र सरकारने अलीकडेच सुईगाम तालुक्यात सीमा दर्शन प्रकल्प सुरू केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.  भारतातील लोकांना सीमा सुरक्षा दलातील जवानांच्या जीवनशैलीबद्दल शिक्षित करण्याचा आणि त्याच वेळी पर्यटनाचा अनुभव देण्याचा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, हा प्रकल्प पंच प्रणांपैकी (पाच व्रते) एक असलेल्या राष्ट्रीय एकतेला बळ देईल, तसेच या प्रदेशातील पर्यटनावर सकारात्मक प्रभाव पाडेल.

भारतीय वायुदलाच्या दीसा तळावर बांधली जात असलेली धावपट्टी आणि इतर विकास कामांमुळे  वायुदलाच्या संरक्षण सिद्धतेने या प्रदेशातील पकड मजबूत होईल, असेही मोदींनी सांगितले. “यामुळे या प्रदेशातील आर्थिक घडामोडींसाठी आवश्यक असलेली चालना मिळेल”, ते म्हणाले.  

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की दोन दशकांमध्ये सरकारच्या प्रयत्नांमुळे बनसकंथाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे. तळागाळापर्यंतच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याचे श्रेय्य पंतप्रधानांनी बनसकंथाच्या महिलांना दिले. "परिस्थिती बदलण्यात नर्मदेचे पाणी, सुजलाम-सुफलाम् आणि ठिबक सिंचनाने मोठी भूमिका बजावली आहे", असेही ते म्हणाले. आज सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पांचा सर्वात जास्त फायदा  शेतकरी, महिला आणि युवा वर्गाला होणार आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री दर्शना विक्रम जरदोश,  संसद सदस्य सी आर पाटील, प्रभातभाई पटेल, भारासिंह धाबी आणि दिनेशभाई अन्वादिया आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

 

पार्श्वभूमी:

पंतप्रधानांनी अंबाजी येथे ₹ 7200 कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची   पायाभरणी केली आणि ते राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या 45,000  पेक्षा जास्त घरांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले. पंतप्रधानांनी ‘प्रसाद’ (PRASAD) योजने अंतर्गत अंबाजी मंदिर तीर्थक्षेत्र येथील सुविधा प्रकल्पांच्या, तरंगा टेकडी विकास प्रकल्पाची पायाभरणी केली. अंबाजी-अबू रोड नवीन ब्रॉडगेज मार्ग आणि नवीन रेल्वे मार्ग, 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाजी, या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सोयीचा ठरेल आणि या सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना उपासनेचा समृद्ध अनुभव देईल.  पायाभरणी केल्या जाणाऱ्या अन्य प्रकल्पांमध्ये वायुदलाच्या दीसा तळावरील धावपट्टीचे बांधकाम आणि संबंधित बांधकाम तसेच अंबाजी बायपास मार्ग आणि अन्य कामांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी पश्चिम मालवाहतूक समर्पित कॉरिडॉरचा 62 किलोमीटर लांबीचा न्यू पालनपूर-न्यू महेसाणा विभाग आणि 13 किलोमीटर लांबीचा न्यू पालनपूर-न्यू चाटोदर विभाग  (पालनपूर बायपास लाइन) समर्पित केला. हा प्रकल्प पिपावाव, दीनदयाल बंदर प्राधिकरण (कांडला), मुंद्रा आणि गुजरातच्या इतर बंदरांशी संपर्क वाढवेल. हे विभाग खुले झाल्यावर, समर्पित पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉर कार्यान्वित होईल. हा मार्ग सुरू झाल्याने गुजरातमधील मेहसाणा-पालनपूर, राजस्थानमधील स्वरूपगंज, केशवगंज, किशनगड; हरियाणातील रेवाडी-मानेसर आणि नारनौल येथील उद्योगांना फायदा होईल. पंतप्रधानांनी अनेक मार्गांच्या रुंदीकरण प्रकल्पांचे देखील लोकार्पण केले, ज्यामध्ये मिठा-थराड-डीसा आणि अन्य मार्गांचा समावेश आहे.  

या विस्तृत विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी हे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, शहरी गतिशीलता वाढवण्यासाठी आणि मल्टी-मोडल संपर्क-सज्जता सुधारण्यासाठीची पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करण्याचा त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा सातत्त्यपूर्ण प्रयत्न देखील यामधून दिसून येतो.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/R.Agashe/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863958) Visitor Counter : 246