पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अहमदाबादमधील अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी येथे अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


गांधीनगर आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या नवीन वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी गांधीनगर स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला

एकविसाव्या शतकातील भारताच्या तसेच शहरी संपर्क वाढविण्याच्या आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा

एकविसाव्या शतकातील भारताला देशातल्या शहरांमधून नवी गती लाभेल

देशातील मेट्रोच्या इतिहासात पहिल्यांदाच 32 किमी लांबीचा मार्ग एकाच वेळी कार्यान्वित झाला आहे

एकविसाव्या शतकातील भारत हा वेग या घटकाला महत्व देऊन जलद विकासाची हमी देणारा देश

राष्ट्रीय गतिशक्ती बृहद आराखडा आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणामध्ये वेगाच्या आग्रहाचे प्रतिबिंब

गेल्या 8 वर्षांत आम्ही लोकांच्या आकांक्षांची सांगड पायाभूत सुविधांशी घातली आहे

Posted On: 30 SEP 2022 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022 

 

अहमदाबादमध्ये अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी येथे एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला आणि कालुपूर स्टेशन ते दूरदर्शन केंद्र मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास केला. गांधीनगर ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही पंतप्रधानांनी गांधीनगर स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला आणि तिथून त्यांनी कालुपूर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेमधून प्रवास केला.
एकविसाव्या शतकातील भारताच्या तसेच  शहरी संपर्क आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे, अशी भावना, पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. वंदे भारत रेल्वेगाडी आणि अहमदाबाद मेट्रोमध्ये केलेल्या प्रवासाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

वंदे भारत एक्स्प्रेसमधील साऊंड-प्रूफिंग तंत्राचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या गाडीमध्ये विमानाच्या तुलनेत शंभरपट कमी आवाज येतो. उपस्थित समुदायाला संबोधित करताना, या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या अहमदाबादमधील जनतेचे पंतप्रधानांनी मनापासून आभार मानले. 

अहमदाबादचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, आज अहमदाबादने माझे मन जिंकले आहे, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधानांनी काढले.

एकविसाव्या शतकातील भारताला देशातल्या शहरांमधून नवी गती मिळणार आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. बदलत्या काळानुसार आणि बदलत्या गरजांनुसार आपल्या शहरांचे सातत्याने आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. शहरातील वाहतूक व्यवस्था आधुनिक असली पाहिजे आणि वाहतुकीच्या वेगवेगळे पर्याय परस्परांना जोडणारा असले पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या अनुषंगाने शहरी पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये दोन डझनपेक्षा जास्त शहरांमध्ये एकतर मेट्रो सुरू झाली आहे किंवा मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. हवाई संपर्क आणि उडान योजनेच्या माध्यमातून डझनभर लहान शहरे जोडली गेली आहेत. तसेच रेल्वे स्थानकांचाही कायापालट होतो आहे. आज गांधीनगर रेल्वे स्थानक जगातल्या कोणत्याही विमानतळाच्या तोडीस तोड आहे, असे सांगत, अहमदाबाद रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाचाही उल्लेखही पंतप्रधानांनी केला.

अहमदाबाद-गांधीनगरच्या यशाचे उदाहरण देत पंतप्रधानांनी शहरद्वय विकास संकल्पनेच्या यशाबद्दल माहिती दिली. आणंद-नडियाद, भरुच-अंकलेश्वर, वलसाड आणि वापी, सुरत आणि नवसारी, वडोदरा - हलोळ कलोळ, मोरवी-वांकनेर आणि मेहसाणा-कडी ही शहरद्वये गुजरातचा ठसा खोलवर उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येत्या 25 वर्षात अहमदाबाद, सुरत, वडोदरा, भोपाळ, इंदूर, जयपूर अशा शहरांचा विकास सुनिश्चित करण्यासाठीची आपली भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. जुन्या शहरांमध्ये सुधारणा आणि त्यांचा विस्तार करण्यावर भर देण्याबरोबरच जागतिक उद्योगांच्या मागणीनुसार नवीन शहरे विकसित केली जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. GIFT शहरे हे देखील अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधांचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

देशातील मेट्रोच्या इतिहासात पहिल्यांदाच 32 किमी लांबीचा मार्ग एकाच वेळी कार्यान्वित झाला आहे, असे सांगत, रेल्वे मार्गांच्या वरून मेट्रोचे ट्रॅक बांधण्याचे आव्हान असतानाही हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात आला, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल बोलताना, या गाडीमुळे अहमदाबाद आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांदरम्यानचा प्रवास आरामात होईल आणि अंतरही कमी होईल, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अहमदाबाद ते मुंबई प्रवास पूर्ण करण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनला अंदाजे सात ते आठ तास लागतात, तर शताब्दी ट्रेनला साडेसहा ते सात तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस मात्र गांधीनगर ते मुंबई हा प्रवास जास्तीत जास्त साडेपाच तासात पूर्ण करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये इतर गाड्यांच्या तुलनेत जास्त प्रवासी बसू शकतात, असे ते म्हणाले. वंदे भारत गाडीच्या डब्यांची रचना करणारे तंत्रज्ञ आणि अभियंते यांच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला आणि त्यांचे कौतुक केले. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये जागा मिळवण्यासाठी काशी रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दीबद्दल आपल्याला कळविण्यात आले होते, त्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले की सामान कक्षाची वाढलेली जागा आणि कमी झालेली प्रवासाची वेळ, यामुळे मजूर आणि गरिबांसाठी ही ट्रेन उपयुक्त ठरेल. वंदे भारत ची हीच ताकत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दुहेरी इंजिन सरकारमुळे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी मेट्रो प्रकल्पांसाठी मंजुरी आणि इतर परवानग्या खूप लवकर मिळू शकल्या, असे त्यांनी नमूद केले. गरीब आणि गरजूंच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच कालुपूरला बहुपर्यायी हब मिळतो आहे,  असे पंतप्रधानांनी सांगितले.

शहरांतील गरीबांची आणि मध्यमवर्गीयांची, बसगाड्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरापासून सुटका व्हावी, यासाठी सरकारने इलेक्ट्रिक बस तयार करण्यासाठी आणि चालवण्यासाठी FAME योजना सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या योजनेंतर्गत आतापर्यंत देशभरात सात हजारपेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या इलेक्ट्रिक बसगाड्यांवर केंद्र सरकारने आतापर्यंत 3,500 कोटी रूपये खर्च केले आहेत. या योजनेअंतर्गत गुजरात राज्यात आत्तापर्यंत आठशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी शंभर बसगाड्या गुजरातच्या रस्त्यांवर धावत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

केंद्रातील यापूर्वीच्या सरकारांच्या काळात, शहरांमधली वाहतूक कोंडी दूर करण्याकडे त्यांनी केलेल्या अक्षम्य निष्काळजीपणाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. एकविसाव्या शतकातील भारत हा वेगाला महत्त्व देणारा असून वेगवान विकासाची हमी देतो, असे ते म्हणाले. वेगाचा हा आग्रह राष्ट्रीय गतिशक्ती बृहद आराखड्यात स्पष्टपणे प्रतिबिंबित होतो आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणातही दिसून येतो. याच धर्तीवर आपल्या रेल्वेचा वेग वाढवण्याची मोहिम कार्यरत आहे, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की पुढच्या वर्षी ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. ही गाडी अवघ्या 52 सेकंदात ताशी 100 किमी इतका वेग गाठते,  हे या गाडीचे वैशिष्ट्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

रेल्वे जाळ्यांच्या संदर्भातील बदलांची दखल घेताना, या जाळ्याचा मोठा भाग मानवरहित फाटकांपासून मुक्त करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका तयार झाल्यानंतर मालवाहू गाड्यांचा वेग वाढेल आणि त्यांच्यामुळे प्रवासी गाड्यांना होणारा विलंब देखील कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातील विचारप्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे सांगत, वेग हा या प्रक्रियेतील प्रमुख घटक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 8 वर्षांत आम्ही लोकांच्या आकांक्षांची सांगड पायाभूत सुविधांशी घातली आहे, असे सांगत, पंतप्रधान म्हणाले की एक काळ असा होता, जेव्हा निवडणुकीतला फायदा आणि तोटा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांबाबत घोषणा केल्या जात होत्या. निव्वळ राजकीय स्वार्थासाठी करदात्याचे उत्पन्न वापरले जात असे. दुहेरी इंजिन असणाऱ्या सरकारने ही विचारसरणी बदलली आहे. दूरदर्शी विचाराने उभारल्या जाणाऱ्या सक्षम पायाभूत सुविधा, हा भविष्यातील शाश्वत प्रगतीचा पाया आहे आणि हे वैशिष्ट्य आमच्या विचारसरणीशी सुसंगत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

भूमिगत तसेच भूगर्भीय मेट्रोच्या उभारणीअंतर्गत सुरू असलेले प्रचंड काम आणि त्यात होणार्‍या गुंतवणुकीबाबत शाळा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सजग राहावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर त्यांचा विश्वास वाढेल आणि या पायाभूत सुविधांबाबत स्वामित्वाची भावना निर्माण होईल. परिणामी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करणारी पिढी तयार होईल, कारण या सुविधा उभारण्यासाठीचे प्रयत्न, गुंतवणूक आणि स्वामित्व याची जाण त्यांना आलेली असेल, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

भाषणात सरतेशेवटी पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विकसित भारत निर्माण करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अधिक गती आणि शक्तीची गरज असल्याचे सांगितले. दुहेरी इंजिन असलेले सरकार यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे सांगत सर्वांच्या प्रयत्नांमधून हे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या समारंभाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री  हरदीप सिंग पुरी, खासदार सी आर पाटील, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री दर्शना विक्रम जरदोश आणि अहमदाबादचे महापौर किरीट परमार उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी उत्कृष्ट असून विमान प्रवासासारखा अनुभव देते. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज असणाऱ्या या गाडीत रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी कवच ही स्वदेशी विकसित यंत्रणा बसविण्यात आली आहे. सर्व वर्गांमध्ये आरामदायी आसने असून एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180 अंशात फिरणारी आसने, हे या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये 32 इंचाच्या पटलांवरून प्रवाशांची माहिती आणि तपशील प्रदर्शित केले जाणार आहेत.

अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अ‍ॅपेरल पार्क ते थलतेजपर्यंतचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर आणि मोटेरा ते ग्यासपूर दरम्यानच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरच्या सुमारे 32 किमी अंतराचा समावेश आहे. पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमधील थलतेज-वस्त्रल मार्गावर 17 स्थानके आहेत. या कॉरिडॉरमध्ये चार स्थानकांचा समावेश असणाऱ्या 6.6 किमी लांबीच्या भूमिगत मार्गाचाही समावेश आहे. ग्यासपूर ते मोटेरा स्टेडियमला जोडणाऱ्या 19 किमी उत्तर-दक्षिण कॉरिडॉरमध्ये 15 स्थानके आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 12,900 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. अहमदाबाद मेट्रो हा एक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प असून त्यात भूमिगत बोगदे, मार्ग आणि पूल, उंच आणि भूमिगत स्थानकांच्या इमारती, बॅलेस्टलेस रेल्वे रूळ आणि चालकरहित रेल्वे परिचालन सक्षम रोलिंग स्टॉक इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. मेट्रो ट्रेन ऊर्जा कार्यक्षम प्रणोदन प्रणालीने सुसज्ज असून त्यामुळे सुमारे 30-35% ऊर्जेची बचत अपेक्षित आहे. रेल्वेमध्ये अत्याधुनिक सस्पेन्शन यंत्रणा असून त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखद होतो. अहमदाबादच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे शहरातील लोकांना जागतिक दर्जाची प्रवास सुविधा उपलब्ध होईल. भारतीय रेल्वे आणि बस यंत्रणेसह (बीआरटीएस, जीएसआरटीसी आणि सिटी बस सेवा) बहुपर्यायी वाहतूक सुविधा प्रदान केली जात आहे. राणीप, वडज, एईसी स्टेशन अशा ठिकाणी बीआरटीएसद्वारे तर गांधीधाम, कालुपूर आणि साबरमती स्थानकावर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मेट्रो प्रवाशांना सोईस्कर ठरणारी वाहतुक सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे. कालुपूर येथे हा मेट्रो मार्ग, मुंबई आणि अहमदाबादला जोडणाऱ्या अतिवेगवान रेल्वे यंत्रणेशी जोडला जाईल.

या बहुविध विकास प्रकल्पांमधून, देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, शहरातील दळणवळणसंबंधी सुविधा वाढविण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता अधोरेखित होते. सर्वसामान्य माणसाचे राहणीमान सुधारण्यावर मोदी सरकारने सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1863785) Visitor Counter : 195