पंतप्रधान कार्यालय

अहमदाबाद इथे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 29 SEP 2022 9:58PM by PIB Mumbai

भारत माता की जय,

भारत माता की जय,

या भव्य कार्यक्रमात  उपस्थित गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, माझे सहकारी खासदार सी आर पाटील, केन्द्र सरकारमधील मंत्री अनुराग जी, राज्यमंत्री हर्ष संघवी जी, महापौर किरीट भाई, क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी आणि देशभरातून जमलेले

माझे युवा खेळाडू मित्र. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे, नमस्कार. हे दृश्य, हे चित्र, हे वातावरण शब्दांच्या पलीकडचे आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम, जगातील इतका तरुण देश आणि देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव! जेव्हा आयोजन इतके अद्भुत आणि अद्वितीय असेल तेव्हा त्याची ऊर्जाही अशीच विलक्षण असणार. देशातील 36 राज्यांतील 7 हजारांहून अधिक खेळाडू,15 हजारांहून अधिक स्पर्धक, 35 हजारांहून अधिक महाविद्यालये, विद्यापीठे आणि शाळांचा सहभाग आणि 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय खेळांशी थेट संबंध, हे अद्भुत आहे. अभूतपूर्व आहे .

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गीत ‘जुड़ेगा इंडिया, जीतेगा इंडिया. मी म्हणेन जुड़ेगा इंडिया, तुम्ही बोलायचे आहे, जीतेगा इंडिया. ‘जुड़ेगा इंडिया, जीतेगा इंडिया, ‘जुड़ेगा इंडिया, जीतेगा इंडिया, ‘जुड़ेगा इंडिया, जीतेगा इंडिया, हे शब्द, हे भाव आज आसमंतात निनादत आहेत. तुमचा उत्साह आज तुमच्या चेहऱ्यावर झळाळतो आहे. ही तेजस्वी चमकेेेचीच द्वाही आहे, क्रीडा जगतात येऊ घातलेल्या सोनेरी भविष्याची. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा हा मंच तुम्हा सगळ्यांसाठी संधींचे प्रवेशद्वार ठरणार आहे. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो.  

मित्रांनो,

मी आज गुजरातच्या लोकांचेही कौतुक करतो, ज्यांनी या भव्य सोहळ्यासाठी अतिशय कमी वेळात सर्व व्यवस्था केली. ही गुजरातची ताकद आहे, इथल्या लोकांची ताकद आहे. पण मित्रांनो, तुम्हाला जर काही कमतरता जाणवली असेल, काही गैरसोय वाटली असेल, तर एक गुजराती म्हणून मी तुम्हा सर्वांची आधीच माफी मागतो. अहमदाबादमध्ये काल झालेल्या नेत्रदीपक, भव्य ड्रोन शो पाहून प्रत्येकजण अचंभित आहे. अभिमानाने त्याचा ऊर भरुन आला आहे. तंत्रज्ञानाचा एवढा अचूक वापर, ड्रोनप्रमाणे, गुजरातला, भारताला नवीन उंचीवर नेईल. येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या यशाचीही जोरदार चर्चा होत आहे. या सर्व प्रयत्नांसाठी मी मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि त्यांच्या संपूर्ण संघाचे मनापासून कौतुक करतो. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय खेळ 'सावज'चे अधिकृत शुभंकरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. गीरच्या सिंहांचे दर्शन घडवणारा हा शुभंकर सावज भारतातील तरुणांचे भावविश्व प्रतिबिंबित करतो, निर्भयपणे मैदानात उतरण्याची धमक दाखवतो. जागतिक क्षेत्रात वेगाने उदयास येण्याच्या भारताच्या क्षमतेचेही ते प्रतीक आहे.

मित्रांनो,

आज तुम्ही ज्या स्टेडियममध्ये आहात, ज्या क्रीडा संकुलात त्याची विशालता आणि आधुनिकता देखील एक वेगळीच प्रेरणा देणारी आहे. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहेच, तसेच हे सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह आणि कॉम्प्लेक्स देखील अनेक अर्थांनी सर्वात अद्वितीय आहे. सहसा अशा क्रीडा संकुलांमध्ये एक किंवा दोन किंवा तीन खेळांवर लक्ष केंद्रित केले जाते. पण सरदार पटेल क्रीडा संकुलात एकाच वेळी फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग आणि लॉन टेनिस अशा अनेक खेळांच्या सुविधा आहेत. एक प्रकारे हे संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. कारण, पायाभूत सुविधा जेव्हा या दर्जाच्या असतात, तेव्हा खेळाडूंचे मनोबलही नव्या उंचीवर पोहोचते. मला विश्वास आहे की आपले सर्व खेळाडू या संकुलातील सुविधांचा, अनुभवांचा नक्कीच आनंद घेतील.

माझ्या नवतरुण मित्रांनो,

सौभाग्य म्हणजे नवरात्रीचा पवित्र काळही यावेळी सुरू आहे. माता दुर्गेच्या पूजेपासून ते गरब्यापर्यंत गुजरातमध्ये स्वतःची वेगळी ओळख आहे. इतर राज्यांतून आलेल्या खेळाडूंना मी सांगेन की खेळासोबतच नवरात्रीच्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच घ्या. गुजरातचे लोक तुमच्या आदरातिथ्यामध्ये, तुमचे स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. काल आपले नीरज चोप्रा गरब्याचा कसा आनंद घेत होते ते मी पाहिले आहे. उत्सवाचा हा आनंद, आम्हा भारतीयांना एकत्र बांधून ठेवतो, एकमेकांना आधार देण्याची प्रेरणा देतो. या निमित्ताने मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना, गुजरातच्या जनतेला आणि देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो.

माझ्या युवा मित्रांनो,

कोणत्याही देशाची प्रगती आणि जगात त्याच्याबद्दलचा आदर याचा थेट संबंध क्रीडा क्षेत्रातील यशाशी असतो. देशाला नेतृत्व देशाच्या तरुणांनी दिलेले असते आणि खेळ हे त्या तरुणाईच्या उर्जेचे मुख्य स्त्रोत असतात, त्याचे जीवन घडवतात. आजही तुम्ही पहाल की, जगात विकास आणि अर्थव्यवस्थेत अव्वल असलेले बहुतेक देश पदकांच्या यादीतही अव्वल आहेत. त्यामुळे खेळाच्या मैदानात खेळाडूंनी मिळवलेले विजय, त्यांची दमदार कामगिरी यामुळे इतर क्षेत्रातही देशाच्या विजयाचा मार्ग मोकळा होतो. खेळाची सॉफ्ट पॉवर, देशाची ओळख, देशाची प्रतिमा अनेक पटींनी उंचावते.

मित्रांनो,

मी खेळासंबंधीत सोबत्यांना नेहमी सांगतो - यशाची सुरुवात कृतीने होते! म्हणजेच ज्या क्षणी तुम्ही सुरुवात केली, त्याच क्षणी यशाचीही सुरूवात झाली.

तुम्हाला कदाचित लढावे लागेल, तुम्हाला गोष्टी हाताळाव्या लागतील. तुम्ही अडखळू शकता, पडू शकता, पण जर तुम्ही धावण्याचा ध्यास सोडला नाहीत, तुम्ही पुढे जात राहिलात, तर विजय स्वतःच तुमच्या दिशेने पाऊल टाकत आहे, असे समजा. स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाने नव्या भारताच्या उभारणीला याच आवेशाने सुरुवात केली आहे.

एक काळ असा होता, जेव्हा ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी जग वेडे व्हायचे, पण आमच्या ठिकाणी वर्षानुवर्षे या खेळांकडे केवळ एक सामान्य ज्ञानाचा विषय म्हणून पाहिले गेले. आता मन :स्थिती बदलली आहे. मनाचा कल बदलला आहे, तो नवा आहे. वातावरण नवीन आहे. 2014 पासून देशात सुरू झालेल्या 'फर्स्ट अँड बेस्ट'ची प्रक्रिया आपल्या तरुणांनी खेळातही कायम ठेवली आहे.

आठ वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील खेळाडू शंभरहून कमी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत असत. आता भारतातील खेळाडू तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतात. आठ वर्षांपूर्वी भारताचे खेळाडू फक्त 20-25 खेळ खेळत असत. आता भारतातील खेळाडू सुमारे विविध 40 खेळांमध्ये भाग घेतात. आता भारताच्या पदकांची संख्याही वाढत आहे आणि भारताची क्षमताही वाढत आहे.

कोरोनाच्या कठीण काळातही देशाने आपल्या खेळाडूंचे मनोबल खचू दिले नाही. आम्ही आमच्या तरुणांना आवश्यक ती सर्व साधने दिली, त्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवले. आम्ही क्रीडा भावनेने खेळांसाठी काम केले. टार्गेट ऑलिम्पिक पोडिअम स्कीम (टॉप्स) सारख्या योजनांद्वारे वर्षानुवर्षे मिशन मोडमध्ये तयरी केली. आज दिग्गज खेळाडूंच्या यशापासून ते भविष्यातील नवीन खेळाडू तयार करण्यात टॉप्स मोठी भूमिका बजावत आहे.

आज आपले तरुण प्रत्येक खेळात नवनवीन विक्रम करत आहेत आणि स्वतःचे विक्रमही मोडत आहेत. यावेळी टोकियोमध्ये भारताने ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच तरुणांनी देशाच्या नावावर इतक्या पदकांची कमाई केली. त्यानंतर थॉमस कपमध्ये आपण आपल्या बॅडमिंटन संघाचा विजय साजरा केला. युगांडात आपल्या पॅरा-बॅडमिंटन संघानेही 47 पदके जिंकून देशाचा गौरव उंचावला. आमच्या मुलीही या यशाच्या समान भागीदार आहेत, हा या यशाचा सर्वात प्रबळ पैलू आहे. आज आपल्या मुली आघाडीवर राहून तिरंग्याचा अभिमान उंचावत आहेत.

मित्रांनो,

क्रीडाविश्वात ही निपुणतता दाखवण्याची क्षमता यापूर्वीही भारताकडे होती. हा विजयी प्रवास यापूर्वीही सुरू झाला असता, पण खेळात व्यावसायिकतेची जागा कुटुंबवाद आणि भ्रष्टाचाराने घेतली होती. आम्ही ही यंत्रणा स्वच्छ केली आणि तरुणांमध्ये त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण केला. देश आता केवळ योजनाच बनवत नाही, तर तरुणांच्या सोबतीने पाऊल टाकून पुढे जात आहे.

त्यामुळेच आज फिट इंडिया आणि खेलो इंडिया सारखे प्रयत्न जनआंदोलन बनले आहेत. आज खेळाडूंना अधिकाधिक संसाधने दिली जात आहेत आणि अधिकाधिक संधीही दिल्या जात आहेत. गेल्या 8 वर्षांत देशत क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद जवळपास 70 टक्क्यांनी वाढली आहे. आज देशात क्रीडा विद्यापीठे उभारली जात आहेत, प्रत्येक कानाकोपऱ्यात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. एवढेच नाही तर निवृत्तीनंतरही खेळाडूंना कोणतीही अडचण येऊ नये यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. निवृत्त होणाऱ्या खेळाडूंच्या अनुभवांचा फायदा नव्या पिढीला मिळावा, या दिशेनेही काम सुरू आहे.

मित्रांनो,

खेळ हे हजारो वर्षांपासून भारताच्या सभ्यतेचा आणि संस्कृतीचा भाग आहेत. खेळ हा आपल्या वारशाचा आणि वाढीच्या प्रवासाचा एक भाग आहे. स्वातंत्र्याच्या अमृत कालामध्ये देश आपल्या परंपरेचा अभिमान बाळगून त्याचे पुनरुज्जीवन करत आहे. आता देशाचे प्रयत्न आणि उत्साह केवळ एका खेळापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर 'कलारीपयट्टू' आणि योगासन यांसारख्या भारतीय खेळांनाही महत्त्व प्राप्त होत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये या खेळांचा समावेश झाल्याचा मला आनंद आहे. येथे या खेळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मला एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते. एकीकडे तुम्ही हजारो वर्षांची परंपरा पुढे नेत आहात, त्याचवेळी क्रीडा जगताच्या भविष्यालाही तुम्ही नेतृत्व देत आहात. येणाऱ्या काळात जेव्हा या खेळांना जागतिक मान्यता मिळेल, तेव्हा या क्षेत्रात तुमचे नाव दंतकथा म्हणून घेतले जाईल.

मित्रांनो,

शेवटी मला तुम्हा सर्व खेळाडूंना आणखी एक मंत्र द्यायचा आहे. तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल, तर तुम्हाला वचनबद्धता आणि सातत्य ठेवून जगायला शिकले पाहिजे. खेळातील पराभव आणि विजयाला आपण कधीही शेवटचे मानू नये. ही क्रीडा भावना तुमच्या जीवनाचा एक भाग बनली पाहिजे, तरच भारतातील तरुण आणि भारतासारखा तरुण देश, यांची स्वप्ने तुम्ही पूर्ण कराल, अमर्याद शक्यतांची जाणीव करून द्याल. आणि लक्षात ठेवा, जिथे गती आहे तिथे प्रगती आहे. त्यामुळे तुम्हाला ही गती मैदानाबाहेरही राखावी लागेल. ही गती तुमच्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. मला खात्री आहे की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील तुमचा विजय देशाला आनंद साजरा करण्याची संधी देईल आणि भविष्यात नवीन आत्मविश्वास देखील देईल. या विश्वासाने मी छत्तिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभाची घोषणा करतो.

***

GopalC/VG/PJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863678) Visitor Counter : 237