पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधल्या गांधीनगर इथे आज गांधीनगर ते मुंबई दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून केला प्रवास.
Posted On:
30 SEP 2022 11:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधल्या गांधीनगर इथे गांधीनगर ते मुंबई दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि या रेल्वेगाडीतून कालूपुर स्थानकापर्यंत प्रवास केला.
गांधीनगर स्थानकात पंतप्रधानांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या समवेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी होते. पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस 2.0 च्या डब्यांचे निरीक्षण केले आणि गाडीत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस 2.0 च्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या नियंत्रण केंद्राचीही पाहणी केली.
त्यानंतर पंतप्रधानांनी गांधीनगर ते मुंबई दरम्यान सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आणि या रेल्वेगाडीतून कालूपुर स्थानकापर्यंत प्रवास केला. पंतप्रधानांनी गाडीतील सहप्रवाश्यांशी संवाद साधला, यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, महिला उद्योजक, संशोधक आणि युवकांचा समावेश होता. वंदे भारत रेल्वेगाडीच्या निर्मितीच्या रूपाने झळाळते यश मिळवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कामगार, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
गांधीनगर ते मुंबई दरम्यान सुरु झालेली वंदे भारत एक्सप्रेस 2.0 रेल्वेगाडी एक नवीन बदल आणणारी गाडी ठरणार असून यामुळे भारतातील दोन महत्वाच्या उद्योग संकुलांमधील संपर्क अधिक वाढेल. यामुळे गुजरातमधील उद्योजकांना मुंबईला जाणे सुखकर होईल आणि त्याचप्रमाणे मुंबईच्या उद्योजकांना देखील लाभ होईल, विमानाच्या अधिक दरांच्या तिकिटांपेक्षा कमी दरात विमानात उपलब्ध असलेल्या सर्व सुखसोई प्रवाशांना मिळू शकतील. गांधीनगर ते मुंबई अशा वंदे भारत एक्सप्रेस 2.0 च्या एकवेळच्या प्रवासाचा कालावधी अंदाजे 6-7 तासांचा आहे.
वंदे भारत एक्सप्रेस 2.0 मधील प्रवास अतिशय उत्कृष्ट अशा विमान प्रवासासारखा अनुभव देते. ही गाडी प्रगत अशा अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज असून यात स्वदेशात विकसित केलेल्या दोन ट्रेन मधील संभाव्य टक्कर टाळण्याची प्रणाली - कवच (KAVACH) अंतर्भूत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस 2.0 मध्ये अत्यंत अत्याधुनिक आणि प्रगत सुविधांचा अंतर्भाव केला जाणार आहे, उदारहरणार्थ 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 52 सेकंदात गाठू शकेल , तर कमाल वेग 180 किलोमीटर प्रति तास पर्यंत असेल. सुधारित वंदे भारत एक्सप्रेसचे वजन 392 टन असेल, त्या तुलनेत आधीच्या रेल्वेगाडीचे वजन 430 टन होते. यात प्रवाशांच्या मागणीनुसार वाय-फाय सुविधाही असेल. प्रत्येक कोचमध्ये 32” इंची स्क्रीन आहे गाडीच्या मागील आवृत्तीत 24 इंची स्क्रीन होती, याद्वारे प्रवाशांना माहिती आणि मनोरंजन दोन्हींचा लाभ मिळू शकेल. ट्रॅक्शन मोटरच्या धूळ-विरहित स्वच्छ हवा कूलिंगमुळे , प्रवास अधिक आरामदायी होईल. साइड रिक्लायनर सीटची सुविधा जी पूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांना दिली जात होती ती आता सर्व वर्गांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180-डिग्री अंशात फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवेच्या शुद्धीकरणासाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट (RMPU) अंतर्गत फोटो-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली बसवण्यात आली आहे.
चंदीगडच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्था (CSIO), च्या शिफारसीनुसार, ताजी हवा आणि उत्सर्जित हवेतले जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादीपासून संरक्षणासाठी हवा गाळून (filter) स्वच्छ करण्यासाठी ही प्रणाली RMPU च्या दोन्ही बाजूंवर विकसित करण्यात आली आहे.
पंतप्रधान @narendramodi गांधीनगर ते अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस मधून प्रवास करत आहेत. या प्रवासात रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय , महिला उद्योजक आणि तरुणांसह विविध क्षेत्रातील लोक पंतप्रधानांचे सहप्रवासी आहेत.
***
GopalC/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863673)
Visitor Counter : 252
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam