पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भावनगरमध्ये 5200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे केले उद्‌घाटन आणि पायाभरणी


पंतप्रधानांनी जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनलची केली पायाभरणी

पंतप्रधानांनी भावनगरमधील प्रादेशिक विज्ञान केंद्राचेही केले उद्‌घाटन

सौनी योजना लिंक 2 च्या पॅकेज 7, 25 मेगावॅट पालिताना सौरउर्जा पीव्ही प्रकल्प, एपीपीएल कंटेनर प्रकल्पासह इतर विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

सौनी योजना लिंक 2 च्या पॅकेज 9, चोरवडला विभाग पाणीपुरवठा प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी

"भावनगरने 300 वर्षांच्या प्रवासात सातत्याने प्रगती करत सौराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपला ठसा उमटवला"

"गुजरातच्या किनारपट्टीस भारताच्या समृद्धीचे प्रवेशद्वार बनवण्यासाठी गेल्या दोन दशकांमध्ये झाले प्रामाणिक प्रयत्न"

"भावनगर बंदर आधारित विकासाचे झळाळते उदाहरण म्हणून उदयास येत आहे"

"लोथल हे जगातील सर्वात जुने बंदर असून लोथल सागरी संग्रहालयाच्या बांधकामामुळे या ठिकाणाची एक नवीन ओळख निर्माण होईल"

"शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या धर्तीवर, मच्छिमारांना जारी केले क्रेडिट कार्ड"

"मागे राहिलेल्यांना पाठबळ देण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारच वचनबद्ध"

"गरिबांची स्वप्ने आणि आकांक्षा मला सतत काम करण्याची ऊर्जा देतात"

Posted On: 29 SEP 2022 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भावनगरमध्ये 5200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.  पंतप्रधानांनी भावनगर येथे जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनल आणि ब्राउनफिल्ड बंदराची पायाभरणी केली. 20 एकरांवर पसरलेल्या आणि सुमारे 100 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या प्रादेशिक विज्ञान केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.  कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी सौनी योजना लिंक 2 च्या पॅकेज 7, 25 मेगावॅट पालीताना सौरउर्जा पीव्ही प्रकल्प, एपीपीएल कंटेनर (आवाडकृपा प्लास्टोमेक प्रायव्हेट लिमिटेड) प्रकल्पासह इतर विविध प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले. यासोबतच सौनी योजना लिंक 2 चे पॅकेज 9, चोरवडला विभाग पाणी पुरवठा प्रकल्प यासह इतर प्रकल्पांची पायाभरणी केली.

वातावरणात उष्मा असूनही एवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला आल्याबद्दल पंतप्रधानांनी जनतेचे आभार मानले. एकीकडे देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना भावनगरच्या स्थापनेला 300 वर्षे पूर्ण झाली आहेत. 300 वर्षांच्या या प्रवासात भावनगरने सातत्यपूर्ण प्रगती करत सौराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपला ठसा उमटवला आहे. आज सुरू होणाऱ्या आणि नियोजित प्रकल्पांमधून भावनगरच्या या विकास प्रवासाला नवी गती मिळणार आहे. राजकोट-जामनगर-भावनगर भागात लवकरच सूरत-वडोदरा-अहमदाबादसारखीच विकासाची झळाळी असेल, असा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले की.  भावनगरमध्ये उद्योग, शेती आणि व्यवसायात प्रचंड क्षमता आहे.  दुहेरी इंजिन सरकारने या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे आजचा कार्यक्रम जिवंत उदाहरण आहे असे त्यांनी सांगितले.

भावनगर हा जिल्हा हा समुद्र किनाऱ्यावर वसलेला आहे आणि गुजरातला देशात सर्वात लांब किनारपट्टी मिळाली आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या दशकांत किनारपट्टीच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने, ही विशाल किनारपट्टी लोकांसाठी एकप्रकारे समस्या ठरली होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. डबल इंजिन सरकारने केलेली कामे अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या दोन दशकांत, सरकारने गुजरातची किनारपट्टी देशाच्या भरभराटीचे महाद्वार बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आम्ही गुजरातमध्ये अनेक बंदरे विकसित केली आहेत. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की एलएनजी टर्मिनल सुरु करणारे गुजरत हे देशातील पहिले राज्य होते आणि आज गुजरातमध्ये तीन एलएनजी टर्मिनल आहेत.

किनारपट्टी व्यवस्थेचे महत्व विशद करताना, पंतप्रधान म्हणाले किनारी उद्योग विकसित करण्यात आणि त्यांच्यासाठी वीजपुरवठ्याचे जाळे निर्माण करण्यात सरकारने महत्वाची भूमिका बजावली आहे. कोळी समाजाला लाभ मिळावा म्हणून मासेमारी बंदरे बांधण्यात आली आणि मत्स्य प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात आली. या भागात कांदळवन जंगले देखील विकसित करण्यात आली आहेत. मोदी असंही म्हणाले की, तेव्हाच्या केंद्र सरकारने असे म्हटले होते की किनारी भागाचा विकास कसा करावा याविषयी गुजरात कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मत्स्य संवर्धनाला चालना देण्यासाठी सरकारने महत्वाची पावलं उचलली आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

गुजरातच्या किनारपट्टी बद्दल बोलतांना, पंतप्रधान म्हणाले की, की आज ही किनारपट्टी लाखो लोकांच्या रोजगाराचे साधन बनली आहे. तसेच, देशाच्या आयात-निर्यातीत देखील महत्वाची भूमिका पार पाडत आहे. आज इथे होत असलेले अक्षय ऊर्जा उत्पादन आणि हायड्रोजन व्यवस्थेमुळे, गुजरातची किनारपट्टीची, ऊर्जानिर्मिती केंद्र अशी ओळख निर्माण झाली आहे. असे सांगत, आम्ही सौराष्ट्राला ऊर्जा केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न केले. आज, देशाची कोणतीही ऊर्जेची गरज असो, हा प्रदेश ती पुरवण्यासाठीचे महत्वाचे केंद्र झाला आहे. असे मोदी म्हणाले.

आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यात भावनगरचे बंदर महत्वाची भूमिका बजावेल, हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, यातून गुजरातमध्ये  गुंतवणुकीच्या अनेक संधी देखील उपलब्ध होतील. या बंदारांमुळे, इथे मालाची साठवणूक, वाहतूक आणि लॉजिस्टिक शी संबंधित व्यावसायिक विस्तार होईल. असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

अलंग इथल्या, जहाज मोडणी यार्डचा संदर्भ देत, पंतप्रधान म्हणाले की वाहने भंगारात काढण्याच्या सरकारच्या धोरणाचा सर्वाधिक लाभ, भावनगरला झाला आहे. मोडीत काढलेल्या लोहापासून, कंटेनर निर्मितीच्या व्यवसायासाठी देखील इथे संधी निर्माण झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

लोथल हे भारताचे महत्वाचे वारसास्थळ आहे, असे सांगत, पंतप्रधान म्हणाले की हे जगातील सर्वात प्राचीन बंदर आहे आणि इथे लोथल सागरी संग्रहालयाच्या  प्रस्तावित बांधकामामुळे या स्थळाची एक विशेष ओळख निर्माण होईल.

या जागेला जगाच्या पर्यटन नकाशावर स्थान देण्यासाठी वेगाने काम केले जात आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  लोथालसह, वेलावदार राष्ट्रीय उद्यानामधील इको-पर्यटन देखील भावनगरसाठी विशेषतः छोट्या उद्योगांसाठी फायद्याचं ठरेल, असे  पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी जुन्या काळातील आठवण करून दिली , जेव्हा या भागातील मच्छीमारांना जागरूकतेच्या अभावी जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळाची आठवण करून देताना ते म्हणाले की, अनेक बटणे असलेली एक खास लाल टोपली मच्छीमारांना देण्यात आली होती. आपत्कालीन प्रसंगी, तटरक्षक दलाच्या कार्यालयाकडून मदत मागण्यासाठी मच्छीमार बटण दाबायचे. पंतप्रधान पुढे म्हणाले की मच्छीमारांना त्यांच्या बोटीची डागडुजी करण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या धर्तीवर, मच्छीमारांना क्रेडिट कार्ड वितरीत करण्यात आली आहेत, असे मोदी म्हणाले. 

राजकोट येथे सुरु करण्यात आलेल्या सौनी योजनेच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या बदलांबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. सुरुवातीला टीकेचा सामना करावा लागूनही योजनेत सातत्त्याने होत असलेल्या प्रगतीवर भर देत पंतप्रधान म्हणाले आज सौनी योजना नर्मदा नदीला अशा सर्व ठिकाणी नेत आहे, जिथे तिने उल्केच्या वेगाने जायला हवे. पंतप्रधानांनी हे अधोरेखित केले की आज उद्घाटन झालेले प्रकल्प नर्मदेचे पाणी भावनगर आणि अमरेलीच्या विविध जिल्ह्यांमध्ये घेऊन जाईल. मोदींनी निदर्शनास आणले की, अमरेली जिल्ह्यातील राजुला आणि खांभा तालुक्यांसह भावनगरमधील गरियाधर, जेसर आणि महुवा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. गीर सोमनाथ, अमरेली, बोताड, जुनागड, राजकोट आणि पोरबंदर सह भावनगरमधील शेकडो गावे डझनावारी शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी काम सुरु झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.   

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की मागे राहिलेल्यांना आधार देणे, ही डबल इंजिन सरकारची वचनबद्धता आहे. गरीबातल्या गरीबाला जेव्हा साधनसामुग्री आणि प्रतिष्ठा मिळते, तेव्हा ते कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर गरिबीवर मात करतात. पंतप्रधानांनी नमूद केले, गुजरातमध्ये आपण  नेहमी गरीब कल्याण मेळे आयोजित करतो. अशाच एका मेळ्यात, मी भावनगरमधील एका भगिनीला तिचाकी दिली. तेव्हा ती भगिनी मला म्हणाली की मी तिचाकी कधीच चालवली नाही. म्हणून मला केवळ विजेची तिचाकी द्या. गरीबांचा हा विश्वास आणि स्वप्नंच आजही माझे सामर्थ्य आहे. गरिबांची ही स्वप्नं, आकांक्षा मला सतत काम करण्याची ऊर्जा देतात. 

 पंतप्रधानांनी भावनगरसोबतच्या त्यांच्या दीर्घ संबंधांचे  स्मरण केले आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांची आठवण जागवल्या. आजचे प्रकल्प भावनगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावतील, असे ते म्हणाले. लोकांच्या सतत वाढत असलेल्या स्नेहाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, खासदार सी आर पाटील, डॉ भारतीबेन शियाल आणि नरनभाई कच्छाडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनगरमध्ये 5200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी भावनगर येथे जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनल आणि ब्राउनफिल्ड बंदराची पायाभरणी केली. हे बंदर 4000 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केले जाईल. हे जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनलसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा पूरवणारे जगातील चौथ्या क्रमांकाचे लॉक गेट सिस्टीम असलेले बंदर ठरेल. सीएनजी टर्मिनल व्यतिरिक्त, हे बंदर या भागातील भविष्यातील गरजा आणि विविध आगामी प्रकल्पांच्या मागणीची पूर्तता करेल. या बंदरात अत्याधुनिक कंटेनर टर्मिनल, बहुउद्देशीय टर्मिनल आणि लिक्विड टर्मिनल असेल ज्यामध्ये सध्याच्या रस्ते आणि रेल्वे नेटवर्कशी थेट डोअर-स्टेप कनेक्टिव्हिटी असेल. यामुळे मालवाहतूक करताना खर्चात बचत होऊन आर्थिक फायदा तर होईलच शिवाय प्रदेशातील लोकांसाठी रोजगारही निर्माण होईल. तसेच, सीएनजी आयात टर्मिनल स्वच्छ ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ऊर्जेचा अतिरिक्त पर्यायी स्रोत देखील प्रदान करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनगरमधील प्रादेशिक विज्ञान केंद्राचे उद्घाटनही केले. हे विज्ञान केंद्र 20 एकरांवर पसरलेले असून सुमारे 100 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. या केंद्रामध्ये मरीन एक्वाटिक गॅलरी, ऑटोमोबाईल गॅलरी, नोबेल पारितोषिक गॅलरी - फिजियोलॉजी आणि मेडिसिन, इलेक्ट्रो-मेकॅनिक्स गॅलरी आणि जीवशास्त्र विज्ञान गॅलरी यासह विविध संकल्पनांवर आधारित कक्ष आहेत. हे केंद्र ॲनिमॅट्रॉनिक डायनासोर, विज्ञान संकल्पना आधारित ट्रेन, निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी सहलमोशन सिम्युलेटर, फिरती सौर वेधशाळाच्या माध्यमातून मुलांसाठी नव्या गोष्टी पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी  एक सर्जनशील व्यासपीठ देखील प्रदान करेल.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी सौनी योजना लिंक 2 च्या पॅकेज 7, 25 मेगावॅट पालीताना सोलर पीव्ही प्रकल्प, एपीपीएल कंटेनर (आवादकृपा प्लास्टोमेक प्रायव्हेट लिमिटेड) प्रकल्पासह इतर विविध प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले; तसेच सौनी योजना लिंक 2 चे पॅकेज 9, चोरवडला झोन पाणी पुरवठा प्रकल्प यासह इतर प्रकल्पांची पायाभरणी केली.

या विस्तृत विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मधून  जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, शहरी गतिशीलता वाढविण्यासाठी आणि मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतिबिंबित होते. सामान्य माणसाच्या राहणीमानात सुधारणा करण्यावर त्यांचे सरकार सदैव भर देत असल्याचे यातून स्पष्ट होते.

 

S.Kane /Vinayak/Radhika/Rajashree/Shraddha/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1863443) Visitor Counter : 215