पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते सुरत येथे 3400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


सुरत शहर हे लोकांची एकी आणि लोकसहभागाचे अप्रतिम उदाहरण

"चार पी अर्थात people - लोक, public - सार्वजनिक, private – खाजगी, partnership भागीदारी, यामुळे सुरत विशेष आहे"

दुहेरी इंजिन असलेल्या सरकारमध्ये विकास कामांच्या मंजुरीला आणि अंमलबजावणीला अभूतपूर्व गती मिळाली आहे

नव्या राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाचा सुरतला मोठा फायदा होईल

सूरत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठीही ओळखले जाई

विश्वास वाढतो, तेव्हा प्रयत्न वाढतात. सर्वांच्या प्रयासांमुळे देशाच्या विकासाचा वेगही वाढतो

Posted On: 29 SEP 2022 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरतमध्ये 3400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. रस्तेसंबंधी पायाभूत सुविधांच्या कामांच्या पहिल्या टप्प्याचे तसेच डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल – ड्रीम सिटीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. डॉ हेडगेवार पूल ते भीमरड -बमरोली पुलापर्यंतच्या 87 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांधल्या जाणाऱ्या जैवविविधता उद्यानाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली, तसेच सुरत येथील विज्ञान केंद्रातील खोज संग्रहालयाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.

उपस्थितांना संबोधित करताना, नवरात्रीच्या शुभ प्रसंगी सुरतमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची तसेच आगामी प्रकल्पांची पायाभरणी करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. आपले नवरात्रीचे उपवास सुरू असताना, अनेक उत्तम पाककृतींच्या या राज्यात यावे लागणे, आपल्यासाठी जरा कठीणच झाले, असे पंतप्रधानांनी खेळकरपणे, थट्टेच्या सूरात सांगितले. 75 अमृत सरोवरांचे काम वेगात सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आनंद व्यक्त केला. सुरत शहर हे लोकांची एकी आणि लोकसहभाग या दोन्हींचे अप्रतिम उदाहरण आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या शहराचे कौतुक केले. सुरतचे सर्वात मोठे वैशिष्ट्य अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की सुरत हे कामगारांचा आदर करणारे शहर आहे. भारतातील असा एकही प्रदेश नसेल जिथले लोक सुरतमध्ये राहत नाहीत, त्यामुळे सुरतला मिनी हिंदुस्थान म्हणता येईल, असेही त्यांनी सांगितले.

या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये जगात 3P अर्थात सार्वजनिक - खाजगी भागीदारीची चर्चा झाली, असे सांगत पंतप्रधानांनी, सूरत हे 4 P चे उदाहरण आहे, असे सांगितले. 4 P म्हणजे people, public, private partnership अर्थात लोक, सार्वजनिक, खाजगी भागीदारी. या मॉडेलमुळे सुरत विशेष ठरते, असे पंतप्रधान म्हणाले. कोणे एके काळी साथरोग आणि पुरामुळे हे शहर बदनाम झाले होते, आज जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये सुरतचा समावेश होतो, अशा शब्दात पंतप्रधानांनी सुरतचे कौतुक केले. सुरतच्या नागरिकांच्या दृष्टीने येथील जैवविविधता उद्यानाचे फायदेही त्यांनी विशद केले.

दुहेरी इंजिन असलेल्या सरकारच्या स्थापनेनंतरचे सकारात्मक परिणाम अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की सुरतमधल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घरे आणि इतर सुविधांच्या बांधकामात लक्षणीय वाढ झाली आहे. आयुष्मान भारत योजनेतून मिळालेल्या फायद्यांबाबत बोलताना, या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील सुमारे 40 दशलक्ष गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यात गुजरातमधील 32 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश असून सुमारे 1.25 लाख रूग्ण सुरतमधील आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

सूरतमधल्या कापड आणि हिरे व्यवसायाने देशभरातील अनेक कुटुंबांच्या जगण्याला आकार दिला आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. ड्रीम सिटी प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा सुरत हे शहर जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात सोयीस्कर हिरे व्यापार केंद्र म्हणून विकसित होईल, असे ते म्हणाले. शहरापासून विमानतळापर्यंतच्या रस्ते जोडणीतून सुरतची संस्कृती, समृद्धी आणि आधुनिकता अधोरेखित होते, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. शहरातील विमानतळाच्या गरजेकडे फारसे लक्ष न देणाऱ्या दिल्लीतील तत्कालीन सरकारवर त्यांनी टिका केली. आज बघा, इथून किती उड्डाणे होतात, दररोज किती लोक इथे उतरतात, असे पंतप्रधान म्हणाले. सुरत मेट्रोला मंजुरी आवश्यक असताना उद्भवलेल्या अशाच परिस्थितीचा उल्लेखही त्यांनी केला.

लॉजिस्टिक्सचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, सुरतच्या लोकांना प्रत्येक व्यवसायाचे मर्म ठाऊक असते. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाबाबत बोलताना, बहु पर्यायी जोडणीसंदर्भातील एका मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  हजीरा घोघा रोपॅक्स फेरी सेवेमुळे रोपॅक्स मार्गे 400 किमीचे अंतर 10-12 तासांवरून 3-4  तासांत कापणे शक्य झाले असून त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते आहे. सुरत ते काशी आणि उत्तर प्रदेशमधील पूर्व भागापर्यंतच्या जोडणीचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की सध्या या भागात ट्रकमार्फत मालाची वाहतूक केली जाते आणि आता रेल्वे आणि किनारपट्टी विभागांनी या वाहतुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी अनोखी नवकल्पना आणली आहे. रेल्वेने आपल्या डब्यांच्या रचनेत अशा प्रकारे बदल केला आहे की त्यामुळे त्यात कार्गो सहज बसू शकेल. यासाठी एक टनाचे विशेष कंटेनरही तयार करण्यात आले आहेत. हे कंटेनर सहजपणे चढवता आणि उतरवता येतात. सुरुवातीच्या यशानंतर आता सुरत ते काशी अशी नवी रेल्वेगाडी चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही गाडी सुरतहून काशी येथे माल घेऊन जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

डायमंड सिटी, ब्रिज सिटी आणि आता इलेक्ट्रिक व्हेइकल सिटी म्हणून सुरत ओळखले जाऊ लागले आहे, असे ते म्हणाले. शहरातील इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनावर भर देत पंतप्रधान म्हणाले की सुरत हे शहर लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी देखील ओळखले जाईल. इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी केंद्र सरकार देशभरातील सरकारांना मदत करत आहे आणि देशातील इतर शहरांच्या तुलनेत सुरत या बाबतीत एक पाऊल पुढे आहे, असे त्यांनी सांगितले. आज सुरत शहरात 25 चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन करण्यात आले आणि तेवढ्याच स्टेशन्सची पायाभरणी करण्यात आली. नजीकच्या भविष्यात सुरतमध्ये 500 चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी, सुरतमध्ये गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या वेगवान विकासाचा आवर्जून उल्लेख केला. येत्या काही वर्षांत विकासाचा हा वेग आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुहेरी इंजिन असलेल्या सरकारवरच्या विश्वासामुळे हा विकास साध्य होतो आहे, असे सांगत, विश्वास वाढतो तेव्हा प्रयत्न वाढतात आणि देशाच्या विकासाचा वेग सर्वांच्या प्रयासाने वाढतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह खासदार सी आर पाटील आणि प्रभुभाई वसाम, केंद्रीय राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोश आणि गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. यामध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, ड्रीम सिटी, जैवविविधता उद्यान आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा, वारसा स्थळांचा जीर्णोद्धार, शहर बस / बीआरटीएस पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विकास कामांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्तेसंबंधी पायाभूत सुविधांच्या कामांच्या पहिल्या टप्प्याचे तसेच डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल - ड्रीम सिटीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले. सुरतमधील हिरे व्यापार व्यवसायाच्या जलद वाढीला पूरक म्हणून, व्यावसायिक आणि निवासी जागेची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून हा ड्रीम सिटी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

पुलापर्यंतच्या 87 हेक्टर जागेत उभारल्या जाणाऱ्या जैवविविधता उद्यानाची पायाभरणीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. सुरत येथील विज्ञान केंद्रातील खोज या संग्रहालयाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. मुलांसाठी तयार केलेल्या या संग्रहालयात परस्परसंवादी प्रदर्शन, प्रश्नांवर आधारित उपक्रम आणि जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या उपक्रमांचा समावेश असेल.

या बहुविध विकास प्रकल्पांमधून, देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, शहरातील दळणवळणसंबंधी सुविधा वाढविण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता अधोरेखित होते. सर्वसामान्य माणसाचे राहणीमान सुधारण्यावर मोदी सरकारने सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.

 

 

 

 

 

G.Chippalkatti /M.Pange/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1863367) Visitor Counter : 259