पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेशातल्या श्योपूर इथे महिला बचत गटांना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 17 SEP 2022 5:47PM by PIB Mumbai

भारत माता की - जय,

भारत माता की - जय,

भारत माता की - जय,

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह जी चौहान, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, मध्य प्रदेश सरकारचा  मंत्री वर्ग, खासदार आणि आमदार, मोठ्या संख्येने उपस्थित इतर मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या केंद्रबिंदू, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, अशा प्रचंड संख्येने उपस्थित स्वयं सहाय्यता गटाच्या माता-भगिनींना नमस्कार !  

आपणा सर्वांचे बचत गटांच्या संमेलनात खूप-खूप स्वागत. आताच आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या नरेंद्र सिंह तोमर यांनी माझ्या वाढदिवसाचा उल्लेख केला. मला जास्त आठवत नाही मात्र जर वेळ असेल, कार्यकम नसतील तर माझ्या आईची भेट घेण्याचा, तिचा आशीर्वाद घेण्याचा माझा प्रयत्न  असतो. आज आईची भेट घेणे जमले नाही. मात्र मध्यप्रदेशच्या आदिवासी भागातल्या, इतर समाजातल्या गावा-गावामध्ये कष्ट करणाऱ्या या लाखो माता आज मला आशीर्वाद देत आहेत. हे पाहिले तर माझ्या आईला नक्कीच आनंद वाटेल की आज माझा मुलगा मला भेटला नाही तरी लाखो मातांनी मला आशीर्वाद दिला आहे. माझ्या आईला आज जास्त आनंद होईल. इतक्या मोठ्या संख्येने माता- भगिनी, कन्या आपणा सर्वांचा आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी एक मोठे बळ आहे. मोठी उर्जा आहे, प्रोत्साहन आहे. माझ्यासाठी तर देशाच्या माता-भगिनी, देशाच्या कन्या या माझे सर्वात मोठे संरक्षण कवच आहे. शक्तीचा स्त्रोत आहेत, माझी प्रेरणा आहेत.

इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या बंधू-भगिनीनो, आजच्या दिवसाचे आणखी एक महत्व आहे. आज विश्वकर्मा पूजा होत आहे. विश्वकर्मा जयंतीला बचत गटांचे इतके मोठे संमेलन, ही विशेष बाब म्हणून मी याकडे पाहतो. आपणा सर्वाना, देशवासियांना विश्वकर्मा पूजेनिमित्त मी खूप- खूप शुभेच्छा देतो. भारताच्या भूमीवर आज 75 वर्षानंतर चित्ता परत आला आहे याचा मला आनंद आहे. काही वेळा पूर्वी कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते सोडण्याचे भाग्य मला लाभले. मी आपल्याला आग्रहाने सांगू इच्छितो,सांगू का ? आग्रह करू ? सर्वाना आग्रह करू ? मंचावर उपस्थित सर्वाना आग्रह करू ? सर्वांचे म्हणणे आहे मी सांगावे.या मैदानावरून आम्ही अवघ्या जगाला संदेश देऊ इच्छितो. आज आठ चित्ते साधारणपणे 75 वर्षांनी देशाच्या भूमीवर परतले आहेत. दूर आफ्रिकेहून आले आहेत. लांबचा प्रवास करून आले आहेत. आपले फार मोठे पाहुणे आहेत ते. या पाहुण्यांचा सन्मान म्हणून मी एक काम सांगतो, कराल ना? या पाहुण्यांच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहून दोन्ही हात उंचावून टाळ्यांनी या आपल्या पाहुण्यांचे स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि ज्यांनी आपल्याला हे चित्ते दिले त्या देशवासीयांचे आभार मानूया. ज्यांनी दीर्घ काळापासूनची आपली मनीषा पूर्ण केली आहे. टाळ्यांचा कडकडाट करा मित्रहो. या चित्त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवा. आपणा सर्वांचे खूप- खूप आभार.

देशातल्या जनतेला, मध्य प्रदेशातल्या लोकांना  या ऐतिहासिक प्रसंगी मी  खूप-खूप शुभेच्छा देतो. मात्र त्यापेक्षाही जास्त मी आपण सर्वाना, या भागातल्या नागरिकांना  विशेष शुभेच्छा देतो. हिंदुस्तान तर विशाल आहे. जंगले खूप आहेत. अनेक ठिकाणी वन्य पशु आहेत. मात्र हे चित्ते आपल्या इथे आणण्याचा निर्णय भारत सरकारने का घेतला? आपण कधी विचार केला आहे का ? हीच तर मोठी गोष्ट आहे. हे चित्ते तुमच्याकडे सुपूर्द केले कारण तुमच्यावर आमचा विश्वास आहे. तुम्ही संकटाना तोंड द्याल मात्र चित्त्यांवर संकट येऊ देणार नाही, असा मला विश्वास आहे. म्हणूनच आज या आठ चित्त्यांची जबाबदारी आपणाकडे सोपवण्यासाठी आलो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या देशातल्या लोकांनी माझा विश्वास नेहमीच सार्थ ठरवला आहे. मध्य प्रदेशाच्या लोकांनी माझा विश्वास नेहमीच सार्थ ठरवला आहे. श्योपूर भागातल्या लोकांवर माझा पूर्ण  विश्वास आहे की माझ्या विश्वासाला ते तडा जाऊ देणार नाहीत. आज मध्य प्रदेशात बचत गटांद्वारे राज्यामध्ये 10 लाख झाडे लावण्यात येत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आपणा सर्वांचे हे संघटीत प्रयत्न, पर्यावरणाप्रती भारताचे हे प्रेम, वृक्षातही ईश्वराचे रूप पाहणारा माझा देश, आज आपणा सर्वांच्या या प्रयत्नातून भारताला नवी उर्जा प्राप्त होणार आहे.

मित्रहो,

मागच्या शताब्दी मधला भारत आणि या शताब्दीचा नव भारत यांच्यातल्या नारी शक्तीच्या प्रतिनिधित्वामध्ये खूप फरक आहे. आजच्या नव भारतात पंचायत भवनापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत स्त्री शक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकत आहे. श्योपूर जिल्ह्यात माझी एक आदिवासी भगिनी, जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून काम करत आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत सुमारे 17 हजार भगिनी लोक प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या आहेत. हे मोठ्या परिवर्तनाचे संकेत आहेत.

मित्रहो,

स्वातंत्र्याच्या लढ्यात सशस्त्र संघर्षापासून सत्याग्रहापर्यंत, देशाच्या कन्या मागे राहिल्या नाहीत. आज भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे तेव्हा आपण पाहिले प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकत होता, यामध्ये आपणा सर्व भगिनींनी, महिला बचत गटांनी फार मोठे काम केले आहे. आपण तयार करून दिलेल्या या तिरंगा ध्वजांनी राष्ट्रीय अभिमानाच्या या क्षणाची शोभा अधिकच वृद्धिगत झाली. कोरोना काळात, संकटाच्या वेळी, मानव जातीची सेवा करण्याच्या उद्देशाने आपण मोठ्या प्रमाणात मास्क, पीपीई कीट तयार   करण्यापासून ते लाखो तिरंगा ध्वज तयार करणे म्हणजे एका पाठोपाठ एक प्रत्येक कामात देशाच्या स्त्री शक्तीने, प्रत्येक वेळी, प्रत्येक आव्हानाच्या वेळी आपल्या उद्योजकतेने देशात नवा विश्वास निर्माण केला आणि नारीशक्तीचे दर्शन घडवले. म्हणूनच आज अतिशय जबाबदारीपूर्वक मी सांगू इच्छितो, गेल्या 20-22 वर्षांच्या शासकीय व्यवस्थेच्या अनुभवावरून सांगू इच्छितो. आपल्या बचत गटाची जेव्हा निर्मिती होते, 10-12 भगिनी एकत्र येऊन एखादे काम सुरु करतात, आपल्या कामाची सुरवात होते. तेव्हा आपण स्वयं सहाय्यता गट बनता.  आपल्या कामाची सुरवात होते, इथून तिथून पैशांची जमवाजमव सुरु होते, तोपर्यंत आपण स्वयं सहाय्यता गट असता मात्र आपल्या कार्याने, आपल्या संकल्पाने बघता-बघता  हा स्वयं सहाय्यता गट, राष्ट्र सहाय्यता गट होतो. म्हणूनच आधी आपण स्वयं सहाय्यता गट होतात मात्र आज आपण राष्ट्र सहाय्यता गट झाल्या आहात. राष्ट्राला सहाय्य करत आहात. महिला बचत गटांचे हे सामर्थ्य, स्वातंत्र्याच्या अमृत काळात विकसित भारत, आत्मनिर्भर भारत घडवण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावण्यासाठी  आज कटीबद्ध आहे.

मित्रहो,

माझा हा अनुभव आहे की ज्या क्षेत्रामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे,त्या क्षेत्रात, त्या कार्यात  यशाची  आपोआप खात्री होते. स्वच्छ भारत अभियान याचे उत्तम उदाहरण आहे, ज्याला महिलांनी नेतृत्व दिले. आज गावांमध्ये शेती असो, पशुपालन असो, डिजिटल सेवा असोत, शिक्षण असो, बँकिंग सेवा असोत, विमा संबंधित सेवा असोत, विपणन असो, साठवणूक असो, पोषण असो, जास्तीत जास्त क्षेत्रांमध्ये भगिनी-कन्या वर्गाला व्यवस्थापनाशी जोडले जात आहे. यामध्ये दीन दयाल अंत्योदय योजना महत्वाची भूमिका बजावत आहे याचा मला आनंद  आहे. आजच्या आपल्या भगिनी वर्गाचे काम पहा, किती विविध आघाड्या सांभाळत आहेत. काही जणी पशु सखी म्हणून, कोणी कृषी सखी म्हणून, कोणी बँक सखी म्हणून तर कोणी पोषण सखी म्हणून अशा अनेक सेवांचे प्रशिक्षण घेऊन त्या अतिशय उत्तम काम करत आहेत. आपले यशस्वी नेतृत्व, यशस्वी भागीदारीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जल जीवन मिशन हेही आहे. आताच एका भगिनीशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याच्या या अभियानात केवळ तीन वर्षात 7 कोटी नव्या नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशात 40 लाख कुटुंबाना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे आणि जिथे-जिथे नळाद्वारे पाणी पोहोचवण्यात आले आहे तिथल्या माता- भगिनी दुहेरी इंजिन सरकारला अनेक आशीर्वाद देत आहेत. या यशस्वी अभियानाचे सर्वात जास्त श्रेय मी  देशाच्या माता-भगिनींना देतो. मध्य प्रदेशात 3 हजाराहून अधिक नळ पाणी पुरवठा प्रकल्पांचे व्यवस्थापन आज स्वयं सहाय्यता गटांकडे आहे. हे गट आज राष्ट्र सहाय्यता गट बनले आहेत. पाणी समित्यांमध्ये भगिनींची भागीदारी असो, पाईपलाईनची देखभाल असो पाण्याशी संबंधित टेस्टिंग असो, भगिनी-कन्या प्रशंसनीय काम करत आहेत. आज जे संच देण्यात आले आहेत ते म्हणजे पाणी व्यवस्थापनात भगिनी-कन्या यांची भूमिका वाढवण्याचाच प्रयत्न आहे.

मित्रहो,

गेल्या आठ वर्षात स्वयं सहाय्यता गटांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही सर्वतोपरी सहाय्य केले आहे. आज संपूर्ण देशात 8 कोटीहून अधिक भगिनी या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. म्हणजेच एका प्रकारे आठ कोटी कुटुंबे या कामाशी जोडली गेली आहेत. ग्रामीण कुटुंबातली किमान एक महिला, एक भगिनी असो, एक मुलगी असो, माता असो या अभियानात सहभागी व्हावी असे आमचे उद्दिष्ट आहे. मध्य प्रदेशातल्या 40 लाखाहून अधिक भगिनी बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय उपजीविका अभियानात 2014 पूर्वी 5 वर्षात जितकी मदत देण्यात आली, त्यात गेल्या 7 वर्षात साधारणपणे 13 पट वाढ झाली आहे. प्रत्येक बचत गटाला पूर्वी जिथे 10 लाख रुपयांचे हमीवाचून कर्ज मिळत होते आता ही मर्यादा दुप्पट म्हणजे 10 लाखावरून वाढवून 20 लाख करण्यात आली आहे. अन्न प्रक्रियेशी संबंधित बचत गटांना नव्या युनिटसाठी 10 लाख रुपयांपासून 3 कोटी रुपयांपर्यंत मदत देण्यात येत आहे. माता-भगिनींवर, त्यांच्या सचोटीवर, त्यांच्या प्रयत्नांवर, त्यांच्या क्षमतेवर सरकारचा किती विश्वास आहे पहा, या बचत गटांना 3 कोटी रुपये देण्यासाठी सरकार तयार आहे.

मित्रांनो ,

ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी, त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्ह्याची स्थानिक उत्पादने मोठ्या बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. महिला बचत गटांनाही याचा मोठा फायदा होत आहे. थोड्या वेळापूर्वी मला येथे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मोहिमेशी संबंधित भगिनींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. काही उत्पादने पाहण्याची संधी मला मिळाली आणि काही उत्पादने त्यांनी मला भेटवस्तू म्हणू दिली. ग्रामीण भगिनींनी बनवलेले हे पदार्थ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अनमोल आहेत. मला आनंद आहे की आमच्या शिवराजजींचे मध्य प्रदेशातील सरकार अशा उत्पादनांना बाजारात नेण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. बचत गटातील भगिनींसाठी सरकारने अनेक ग्रामीण बाजारपेठा निर्माण केल्या आहेत. या बाजारपेठांमध्ये बचत गटांनी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची उत्पादने विकली आहेत, मला असे सांगण्यात आले आहे. 500 कोटी म्हणजेच हा सगळा पैसा तुमच्या मेहनतीने गावातील भगिनींपर्यंत पोहोचला आहे.

मित्रांनो,

आदिवासी भागातील नैसर्गिक वन उत्पादनांचे उत्कृष्ट उत्पादनात रूपांतर करण्याचे प्रशंसनीय कार्य आपल्या आदिवासी भगिनी करत आहेत. मध्य प्रदेशसह देशातील लाखो आदिवासी भगिनी प्रधानमंत्री वन धन योजनेचा लाभ घेत आहेत. मध्य प्रदेशातील आदिवासी भगिनींनी बनवलेल्या उत्कृष्ट उत्पादनांचेही खूप कौतुक झाले आहे. पीएम कौशल विकास योजनेंतर्गत, आदिवासी भागात नवीन कौशल्य केंद्रे अशा प्रयत्नांना आणखी चालना देतील.

माता भगिनींनो,

सध्या ऑनलाइन खरेदीकडे कल वाढत आहे. म्हणूनच तुमच्या उत्पादनांसाठी अर्थात सरकारच्या गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (जीईएम) पोर्टलवर 'सरस' नावाचं विशेष स्थळ ठेवलेलं आहे. याद्वारे तुम्ही तुमची उत्पादने थेट सरकार, सरकारी विभागांना विकू शकता. श्योपूर प्रमाणे इथे लाकडावर कोरीव काम केले जाते. त्याला देशात मोठी मागणी आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या जीईएम पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करा.

मित्रांनो,

सप्टेंबर हा महिना देशात पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. भारताच्या प्रयत्नांनी संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष भरड धान्यांचे वर्ष म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे करण्याचे घोषित केले आहे. या पौष्टिक भरड धान्याच्या बाबतीत मध्य प्रदेश हे देशातील अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. विशेषत: आपल्या आदिवासी भागात तिला समृद्ध परंपरा आहे. कोडो (कमी पावसात येणारी बाजरी), कुटकी, ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारख्या भरड धान्यांना आपले सरकार सातत्याने प्रोत्साहन देत आहे आणि मी ठरवले आहे की भारत सरकारमधील कोणत्याही परदेशी पाहुण्याला जेवण द्यायचे असेल तर त्यात कुठलं ना कुठलं भरड धान्य असणे आवश्यक आहे. म्हणजे माझा छोटा शेतकरी जे काम करतो ते त्या परदेशी पाहुण्यांच्या ताटातही वाढले पाहिजे. यामध्ये बचत गटांसाठी भरपूर संधी आहेत.

मित्रांनो ,

सप्टेंबर हा महिना देशात पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. भारताच्या प्रयत्नांनी संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष भरड धान्यांचे वर्ष म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे करण्याचे घोषित केले आहे. या पौष्टिक भरड धान्याच्या बाबतीत मध्य प्रदेश हे देशातील अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. विशेषत: आपल्या आदिवासी भागात तिला समृद्ध परंपरा आहे. कोडो (कमी पावसात येणारी बाजरी), कुटकी, ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारख्या भरड धान्यांना आपले सरकार सातत्याने प्रोत्साहन देत आहे आणि मी ठरवले आहे की भारत सरकारमधील कोणत्याही परदेशी पाहुण्याला जेवण द्यायचे असेल तर त्यात कुठलं ना कुठलं भरड धान्य असणे आवश्यक आहे. म्हणजे माझा छोटा शेतकरी जे काम करतो ते त्या परदेशी पाहुण्यांच्या ताटातही वाढले पाहिजे. यामध्ये बचत गटांसाठी भरपूर संधी आहेत.

मित्रांनो ,

एक काळ असा होता, जेव्हा माता-भगिनींना घरातील अनेक समस्या होत्या,  घरातील निर्णयांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत मर्यादित होती. अनेक घरे अशी असायची की जिथे वडील-मुलगा व्यवसाय, कामाविषयी बोलत असतील आणि आई स्वयंपाकघरातून बाहेर पडली तर मुलगा लगेच बोलायचा किंवा तिचा पती म्हणायचा-  तू स्वयंपाकघरात जाऊन काम कर, आम्हाला जरा चर्चा करू दे.

आज तसे नाही. आज माता-भगिनींचे विचार आणि सूचना, त्याचे महत्त्व कुटुंबातही वाढू लागले आहे. मात्र आमच्या सरकारने त्यामागे नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले आहेत. यापूर्वी असे जाणीवपूर्वक प्रयत्न होत नव्हते. 2014 पासून देश महिलांचा सन्मान वाढवण्यात, महिलांसमोरील आव्हाने सोडवण्यात व्यस्त आहे. शौचालयाअभावी भेडसावणाऱ्या समस्या होत्या, स्वयंपाकघरातील लाकडाच्या धुरामुळे त्रास व्हायचा, पाण्यासाठी दोन-दोन, चार-चार किलोमीटर पायपीट करावी लागायची. या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. देशात 11 कोटींहून अधिक शौचालये बांधून, 9 कोटींहून अधिक उज्ज्वला गॅस जोडणी देऊन आणि करोडो कुटुंबांना नळापासून पाणी पुरवून तुमचे जीवन सुकर केले आहे.

माता भगिनींनो,

गरोदरपणात किती समस्या येत होत्या हे तुम्हाला चांगले माहीत आहे. खाण्यापिण्याची सोय नीट नव्हती, तपासणीची सोयही नव्हती. म्हणूनच आम्ही मातृवंदना योजना सुरू केली. या अंतर्गत 11 हजार कोटींहून अधिक रुपये थेट गर्भवती महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले. याअंतर्गत मध्य प्रदेशातील भगिनींनाही अशा गर्भवती महिलांच्या खात्यात सुमारे 1300 कोटी रुपये मिळाले आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिल्याने गरीब कुटुंबातील भगिनींनाही मोठी मदत झाली आहे.

माता भगिनींनो,

बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचे चांगले परिणाम आज देश अनुभवत आहे. मुलींना व्यवस्थित अभ्यास करता यावा, त्यांना मध्येच शाळा सोडावी लागू नये, यासाठी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली, सॅनिटरी पॅडची व्यवस्था करण्यात आली. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुमारे 2.5 कोटी मुलींची खाती उघडण्यात आली आहेत.

मित्रांनो ,

आज जन धन बँक खाती हे देशातील महिला सक्षमीकरणाचे एक मोठे माध्यम बनले आहे. कोरोनाच्या काळात सरकार तुमच्या बहिणींच्या बँक खात्यात थेट पैसे हस्तांतरित करू शकले असेल, तर त्यामागे जनधन खात्याची ताकद आहे. आपल्याकडे मालमत्तेवर बहुतेक वेळा पुरुषांचेच नियंत्रण असते.

शेत असेल तर पुरूषाच्या नावावर, दुकान असेल तर पुरूषाच्या नावावर, घर असेल तर पुरूषाच्या नावावर, गाडी असेल तर पुरूषाच्या नावावर, स्कूटर असेल तीही पुरुषाच्या नावावर. स्त्रीच्या नावावर काही नाही आणि पतीचा मृत्यू झाला तर ही सगळी संपत्ती मुलाच्या नावावर केलं जाईल. ही प्रथा संपवून आम्ही माता-भगिनींना बळ दिले आहे. आज आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उपलब्ध घरे थेट महिलांच्या नावावर देतो. स्त्री त्याची मालकीण बनते. आपल्या सरकारने देशातील २ कोटींहून अधिक महिलांना घराची मालकीण बनवले आहे. माता-भगिनींनो  हे मोठे काम आहे. मुद्रा योजनेंतर्गत आत्तापर्यंत देशभरातील लहान उद्योग आणि व्यवसायांसाठी 19 लाख कोटी रुपयांचे विना हमीचे कर्ज देण्यात आले आहे. या पैशांपैकी सुमारे 70 टक्के रक्कम माझ्या माता-भगिनींना उद्योग सुरू करण्यासाठी मिळाले आहेत. मला आनंद आहे की सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे आज घरातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांची भूमिका वाढत आहे.

मित्रांनो ,

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण त्यांना समाजात तितकेच सक्षम बनवते. आमच्या सरकारने मुलींसाठी सर्व दरवाजे उघडले, सर्व दरवाजे बंद केले. आता मुलीही सैनिक शाळेत प्रवेश घेत आहेत, पोलीस कमांडो होऊन देशसेवा करत आहेत. एवढेच नाही तर सीमेवर सैन्यात जाऊन भारत मातेचे रक्षण करण्याचे काम भारतमातेच्या कन्या करत आहे. गेल्या 8 वर्षांत देशभरातील पोलीस दलातील महिलांची संख्या 1 लाखांवरून दुपटीने वाढून 2 लाखांहून अधिक झाली आहे. केंद्रीय दलांमध्येही विविध सुरक्षा दले आहेत. आज आपल्या 35 हजारांहून अधिक मुली देशाच्या शत्रूंशी, दहशतवाद्यांशी  लढत आहेत. त्या दहशतवाद्यांना धूळ चारत आहेत. 8 वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. म्हणजेच परिवर्तन होत आहे, प्रत्येक क्षेत्रात ते होत आहे. मला तुमच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. सर्वांच्या प्रयत्नाने, एक चांगला समाज आणि एक मजबूत राष्ट्र बनवण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. एवढ्या मोठ्या संख्येने येऊन तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिलात. तुमच्यासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा तुम्ही मला दिली आहे. तुम्ही मला शक्ती दिलीत. मी मनापासून तुमचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.

 

माझ्याबरोबर दोन्ही हात वर करा आणि मोठ्याने म्हणा,

भारत माता की - जय,

भारत माता की - जय,

भारत माता की - जय,

भारत माता की - जय,

खूप-खूप धन्यवाद!

***

S.Thakur/N.Chitale/P.Jambhekar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860373) Visitor Counter : 184