पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील करहल मधील महिला बचत गटांच्या परिषदेला केले संबोधित


प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत चार विशेषत: वंचित आदिवासी गट कौशल्य केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

‘भारताच्या कन्या आणि माता या माझ्या ‘रक्षा कवच’ (संरक्षणात्मक कवच)

“पंचायत भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत फडकत आहे आजच्या नव्या भारतातील नारी शक्तीचा झेंडा”

"मला विश्वास आहे की तुम्ही सर्व संकटांना तोंड द्याल पण चित्त्याला कोणतीही हानी पोहोचू देणार नाही"

"गेल्या शतकातील भारत आणि या शतकातील नवा भारत यात नारी शक्ती हा अंतर स्पष्ट करणारा घटक "

"काळाच्या ओघात 'स्वयंसहायता गटांचे ' 'राष्ट्रीय मदत गट' मध्ये परिवर्तन"

"ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकारचे निरंतर कार्य"

“परदेशी मान्यवरांच्या भेटीदरम्यान अल्पोपहारात नेहमी भरड धान्यापासून बनवलेले काही पदार्थ असतील”

"देशभरातील पोलिस दलातील महिलांची संख्या 1 लाखांवरून दुपटीने वाढून 2 लाखांहून अधिक"

Posted On: 17 SEP 2022 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील करहल मधील श्योपूर येथे आयोजित बचत गट मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी, पंतप्रधानांनी पीएम कौशल विकास योजनेंतर्गत चार विशेषत: वंचित  आदिवासी गट (पीव्हीटीजी) कौशल केंद्रांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांनी बचत गटातील सदस्यांना बँक कर्ज मंजुरीची पत्रे सुपूर्द केली आणि जल जीवन मिशन अंतर्गत किट देखील त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या सुमारे एक लाख महिला सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होत्या आणि सुमारे 43 लाख महिला विविध केंद्रांवरून आभासी माध्यमातून कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या होत्या.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, अवधी मिळाला तर ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आईकडून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतात.  आज आईला भेटायला जाऊ शकलो नसलो तरी लाखो आदिवासी मातांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असल्याचा आनंद आईला असेल असे ते म्हणाले. ते म्हणाले, भारताच्या कन्या  आणि माता या माझ्या ‘रक्षा कवच’ (संरक्षणात्मक कवच) आहेत. विश्वकर्मा जयंतीनिमित्त बचतगटांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन ही विशेष बाब असल्याचे सांगून त्यांनी विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

पंचाहत्तर वर्षांनंतर चित्ता भारतात परतल्याबद्दल पंतप्रधानांनी सार्थ अभिमान आणि आनंद व्यक्त केला. त्यांनी संगितले, "इथे येण्यापूर्वी मला कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्ते सोडण्याचा बहुमान मिळाला." चित्ता ज्यांचा उल्लेख त्यांनी सन्माननीय अतिथी म्हणून केला आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांच्या विनंतीवरून उभे राहून टाळ्यांनी स्वागत केले. “तुमच्यावर विश्वास असल्यामुळे चित्ते तुमच्या स्वाधीन केले आहेत. मला खात्री आहे की तुम्ही सर्व संकटांना तोंड द्याल पण चित्त्याला कोणतीही हानी पोहोचू देणार नाही. म्हणूनच आज मी या आठ चित्यांची जबाबदारी तुमच्यावर सोपवायला आलो आहे.”, असे त्यांनी तेथील जनतेला सांगितले. बचत गटांद्वारे आज करण्यात आलेल्या 10 लाख रोपांच्या लागवडीची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की यामुळे भारताच्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळेल.

भारतातील महिलांच्या वाढत्या प्रतिनिधित्वावर प्रकाश टाकत, महिला शक्ती ही गेल्या शतकातील भारत आणि या शतकातील नवीन भारत यांच्यातील अंतर स्पष्ट करणारा घटक बनली आहे असे पंतप्रधान म्हणाले. “आजच्या नव्या भारतात महिला शक्तीचा झेंडा पंचायत भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत फडकत आहे”, असेही मोदी म्हणाले.  नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत 17 हजार महिला, पंचायतींमधे निवडून आल्याचे त्यांनी नमूद करत  हे मोठ्या बदलाचे लक्षण आहे, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या सुरक्षेत महिलांनी दिलेल्या  योगदानाचे स्मरण  पंतप्रधानांनी केले.  नुकत्याच झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेतील महिला आणि बचत गटांच्या भूमिकेचे आणि कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. बचतगट अर्थात ‘स्वयं सहाय्यता गट’ हे कालांतराने ‘राष्ट्रीय मदत गट’ बनले असे ते म्हणाले. कोणत्याही क्षेत्रातील यशाचा थेट संबंध महिलांचे प्रतिनिधीत्व किती वाढले आहे याच्याशी असतो, असे  पंतप्रधान म्हणाले . या प्रारुपाचे उत्तम उदाहरण म्हणजे महिलांनी नेतृत्व केलेल्या स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाचे यश. त्याचप्रमाणे, गेल्या तीन वर्षांत भारतात 7 कोटी कुटुंबांना नळ जोडणी मिळाली असून त्यापैकी 40 लाख कुटुंबे मध्य प्रदेशातील आहेत. या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी भारतातील महिलांना दिले. 

गेल्या 8 वर्षांत सरकारने बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “आज देशभरातील 8 कोटींहून अधिक भगिनी या मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील किमान एका भगिनीने या मोहिमेत सहभागी व्हावे, हे आमचे ध्येय आहे,” अशी टिप्पणी मोदींनी केली.

'एक जिल्हा, एक उत्पादन' उपक्रमावर प्रकाश टाकत, प्रत्येक जिल्ह्यातून स्थानिक उत्पादने मोठ्या बाजारपेठेत नेण्याचा हा प्रयत्न आहे असे पंतप्रधान म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. बचत गटांनी, खास  त्यांच्या उत्पादनांसाठी तयार केलेल्या बाजारपेठांमध्ये 500 कोटी रुपयांची उत्पादने विकली आहेत. पीएम वन धन योजना आणि पीएम कौशल विकास योजनेचे लाभ महिलांपर्यंत पोहोचत आहेत असे त्यांनी सांगितले. जीईएम पोर्टलवर बचतगटांच्या उत्पादनासाठी ‘सरस’ बाबतचीही माहिती पंतप्रधानांनी दिली.

भारताने संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत त्याद्वारे 2023 हे वर्ष भरड धान्यांचे वर्ष म्हणून घोषित झाले आहे. हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे केले जाणार आहे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. सप्टेंबर महिना हा देशात पोषण महिना म्हणून साजरा केला जात असल्याची आठवणही पंतप्रधानांनी करुन दिली. परदेशी मान्यवरांच्या भेटीदरम्यानच्या अल्पोपहारात भरड धान्याने तयार केलेला किमान एक पदार्थ असावा याची खातरजमा करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 

2014 पासून सरकार करत असलेल्या प्रयत्नांची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, देशाने महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन  जीवनातील आव्हाने सोडवण्यासाठी सातत्याने काम केले आहे.  

स्वच्छतागृहांचा अभाव आणि स्वयंपाकघरात लाकडामुळे होणाऱ्या धुराचा त्रास, यामुळे महिलांना कशाप्रकारे अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत होता, याची मोदींनी आठवण करुन दिली.  देशात 11 कोटींहून अधिक शौचालये बांधून, 9 कोटींहून अधिक कुटुंबांना गॅस जोडणी देऊन आणि भारताच्या दुर्गम भागांतील कोट्यवधी कुटुंबांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे जीवन सुकर झाले आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.  मातृ वंदना योजनेंतर्गत 11000 कोटी रुपये गरोदर मातांच्या खात्यात थेट जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मध्य प्रदेशातील मातांनाही या योजनेंतर्गत 1300 कोटी रुपये मिळाले. घरांच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांच्या वाढत्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.

जन धन बँक खात्यांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जन धन खाती देशातील महिला सक्षमीकरणाचे मोठे माध्यम बनले आहे. कोरोना काळात, जनधन बँक खात्यांमुळेच सरकार महिलांच्या बँक खात्यांमध्ये सुरक्षितपणे आणि थेट पैसे जमा करू शकले, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. “आज पीएम आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांच्या मालकी हक्कात महिलांच्या नावांचा समावेश केला जात आहे. आमच्या सरकारने देशातील 2 कोटींहून अधिक महिलांना घरमालक बनण्यास सक्षम केले आहे. मुद्रा योजनेंतर्गत, देशभरातील लघु उद्योग आणि व्यवसायांना आतापर्यंत 19 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यातील सुमारे 70 टक्के रक्कम महिला उद्योजकांना मिळाली आहे. सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे आज घरातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे याचा मला आनंद आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

"महिलांचे आर्थिक सक्षमीकरण त्यांना समाजात पुरुषांइतकेच सक्षम बनवते," अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. भारतातील मुली आता मोठ्या संख्येने सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत, पोलीस, कमांडो बनत आहेत आणि लष्करातही सामील होत आहेत, याचे सर्व श्रेय महिलांसाठी संधीची बंद दारे उघडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करणाऱ्या सरकारचे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशात गेल्या 8 वर्षात प्रत्येक क्षेत्रात झालेल्या लक्षणीय बदलांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत, देशभरातील पोलीस दलात महिलांची संख्या 1 लाखावरून वाढून 2 लाखांहून अधिक झाली आहे याबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला. देशातील 35 हजारांहून अधिक मुली आता केंद्रीय दलाचा भाग बनल्या असून त्या देशाच्या शत्रूंविरुद्ध लढत आहेत असेही पंतप्रधान म्हणाले. “8 वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान पुढे म्हणाले, “मला आपल्या सामर्थ्यावर संपूर्ण विश्वास आहे. सबका ‍प्रयासचे अनुसरण करत मजबूत राष्ट्र आणि विकसित समाजाच्या निर्मितीत आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‍‍‍‍‍

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, ज्योतिरादित्य सिंधिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार तसेच केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल हे याप्रसंगी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत सुरु झालेल्या हजारो महिला बचत गटाच्या (SHG) सदस्य / सामुदायिक रिसोर्स पर्सन या संमेलनाला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत चार विशेषत्वाने वंचित  असलेल्या आदिवासी गटांच्या (PVTG) कौशल्य केंद्रांचे उद्घाटन केले.

दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे (DAY-NRLM) मुख्य उद्दिष्ट ग्रामीण गरीब कुटुंबांना टप्प्याटप्प्याने बचत गटात (SHGs) एकत्रित करणे आणि उपजीविका साधनात वैविध्य आणत  त्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना दीर्घकालीन मदत प्रदान करणे हे आहे. कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे शिक्षण आणि लिंगाधारित भेदभाव, पोषण, स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयांवर जागरूकता निर्माण आणि वर्तन बदल संवादाद्वारे महिला बचतगट (SHG) सदस्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/Vasanti/Vinayak/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860160) Visitor Counter : 179