पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात जंगली चित्ते सोडल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला केले संबोधित


"आज चित्ता भारताच्या मातीत परतला"

"जेव्हा आपण आपल्या मुळांपासून दूर असतो तेव्हा आपण खूप काही गमावतो"

"मृतांनाही जिवंत करण्याची ताकद अमृतात आहे"

"आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात असून भारत या चित्त्यांचे संगोपन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे"

“वाढत्या पर्यावरणस्नेही पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी वाढतील”

"भारतासाठी, निसर्ग आणि पर्यावरण, त्यातील प्राणी आणि पक्षी, हे केवळ शाश्वतता आणि सुरक्षितता नसून भारताच्या संवेदनशीलतेचा आणि अध्यात्माचा आधार आहे"

"आज आपल्या जंगलात आणि जीवनातील एक मोठी पोकळी चित्त्यांद्वारे भरली जात आहे"

"एकीकडे, आपण जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट आहोत, त्याच वेळी देशातील वनक्षेत्र देखील वेगाने विस्तारत आहे"

"2014 पासून, देशात सुमारे 250 नवीन संरक्षित क्षेत्रे जोडली गेली आहेत"

"आपण निर्धारित वेळेपूर्वीच वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य गाठले आहे"

"गेल्या काही वर्षांत हत्तींची संख्याही 30 हजारांहून अधिक झाली आहे"

"आज देशातील 75 पाणथळ जागा रामसर स्थळे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, त्यापैकी गेल्या 4 वर्षात 26 स्थळांचा समावेश झाला आहे"

Posted On: 17 SEP 2022 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातून नामशेष झालेले जंगली चित्ते आज कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले.  हे चित्ते नामिबियातून आणले असून हा जगातील पहिला मोठा आंतरखंडीय वन्य मांसभक्षक स्थानांतरण प्रकल्प आहे. हे स्थानांतरण  प्रोजेक्ट चीता अंतर्गत भारतात केले जात आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात दोन ठिकाणी ह चित्ते पंतप्रधानांनी सोडले. कार्यक्रमस्थळी चित्ता मित्र, चित्ता पुनर्वसन व्यवस्थापन गट आणि विद्यार्थ्यांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.  या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केले.

पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना, मानवतेला भूतकाळातील चूका सुधारण्याची आणि नवीन भविष्य घडवण्याची संधी देणार्‍या निवडक संधींवर प्रकाश टाकून कृतज्ञता व्यक्त केली.  असाच एक क्षण आज आपल्यासमोर असल्याचे मोदींनी नमूद केले. अनेक दशकांपूर्वी जैवविविधतेचा जो जुना दुवा तुटला होता, नामशेष झाला होता, आज तो पुनर्संचयित करण्याची संधी आपल्याकडे आहे, "आज चित्ता भारताच्या मातीत परतला आहे असे ते म्हणाले.”  

या स्मरणीय प्रसंगामुळे भारताची निसर्गप्रेमी चेतना पूर्ण शक्तीने जागृत झाली आहे असे त्यांनी अधोरेखित केले .  नामिबिया आणि तिथल्या सरकारचा विशेष उल्लेख करत, या ऐतिहासिक प्रसंगी तमाम देशवासियांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. यांच्याच सहकार्याने अनेक दशकांनंतर चिते भारतीय भूमीत परतले आहेत असे ते म्हणाले.  “मला खात्री आहे की, हे चित्ते आपल्याला केवळ निसर्गाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतील असे नाही तर आपल्या मानवी मूल्यांची आणि परंपरांचीही जाणीव करून देतील,” असे पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ‘पंच प्राण’ची आठवण करुन दिली. ‘आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे’ आणि ‘गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती’ या महत्त्वाच्या वृत्तींचा त्यांनी उल्लेख केला.  "जेव्हा आपण आपल्या मुळांपासून दूर असतो, तेव्हा आपण बरेच काही गमावतो असे त्यांनी सांगितले."  गेल्या काही शतकांमध्ये निसर्गाचे शोषण हे शक्तीचे आणि आधुनिकतेचे प्रतीक मानले जात होते.  “1947 मध्ये, जेव्हा देशात फक्त शेवटचे तीन चित्ते उरले होते, तेव्हा त्यांचीही सालच्या जंगलात निर्दयीपणे आणि बेजबाबदारपणे शिकार करण्यात आली होती”, याची त्यांनी आठवण करून दिली.

1952 मध्ये भारतातून चित्ते नामशेष झाले असले तरी गेल्या सात दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न झाले नाहीत, अशी टीका पंतप्रधानांनी केली.  

स्वातंत्र्याच्या महोत्सवात देशाने नव्या उर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन करण्यास सुरुवात केली आहे, असा आनंद पंतप्रधानांनी व्यक्त केला. “अमृतामध्ये मृतांनाही जिवंत करण्याची ताकद आहे”, असे मोदी म्हणाले.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील कर्तव्य आणि विश्वासाचे हे अमृत केवळ आपल्या वारशाचे पुनरुज्जीवन करत नाही, तर आता चित्त्यांनीही भारताच्या मातीवर पाय ठेवला आहे असे त्यांनी सांगितले.

हे पुनर्वसन यशस्वी करण्यामागे मागील अनेक वर्षांच्या मेहनतीकडे सर्वांचे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, ज्या क्षेत्राला फारसे राजकीय महत्त्व दिले जात नाही अशा क्षेत्रासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावण्यात आली. आपल्या प्रतिभावान शास्त्रज्ञांनी दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाच्या तज्ञांसोबत काम करत विस्तृत संशोधन करत एक तपशीलवार चित्ता कृती योजना तयार केली असे त्यांनी नमूद केले.  चित्त्यांसाठी सर्वात योग्य क्षेत्र शोधण्यासाठी देशभरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यानंतर याच्या शुभारंभासाठी कुनो राष्ट्रीय उद्यानाची निवड करण्यात आली.  “आज आपल्या मेहनतीचे फळ सर्वांसमोर आहे”, असेही ते म्हणाले.

जेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा रक्षण केलं जातं तेव्हा भविष्यही सुरक्षित होतं आणि वाढ आणि समृद्धीसाठी अनेक मार्ग खुले होतात याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला.  ते पुढे म्हणाले की कुनो राष्ट्रीय उद्यानात जेव्हा चिते वावरतील ,  तेव्हा पर्यावरणासह गवताळ जमिन परिसंस्था  देखील पूर्ववत  होईल . जैवविविधतेत वाढ होईल. मोदी यांनी अधोरेखित केलं की वाढत्या इको पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि त्यामुळे विकासाच्या  नवीन शक्यता निर्माण होतील. 

कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या चित्यांबाबत  पंतप्रधानांनी सर्व देशवासीयांना संयम राखण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की त्यांना काही महिन्यांचा कालावधी दिला  गेला  पाहिजे. आज हे चित्ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि त्यांना  हे क्षेत्र परिचित नाही, यासाठीच  त्यांना कुनो  राष्ट्रीय उद्यान हा आपला अधिवास वाटावा यासाठी काही  महिन्यांचा कालावधी  दिला पाहिजे.  चित्त्यांना इथे स्थिरस्थावर होण्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलं जात असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. आज जेव्हा जग निसर्ग आणि पर्यावरणाकडे पाहत आहे तेव्हा शाश्वत विकासाबद्दल चर्चा होते.  भारतासाठी निसर्ग आणि पर्यावरण, इथले प्राणी आणि पक्षी हे फक्त शाश्वतता आणि सुरक्षा नसून देशाची संवेदनशीलता आणि आध्यात्मिकताही आहे असं त्यांनी सांगितल, आपल्या सभोवती असलेल्या अगदी लहानात लहान कीटकांचीही काळजी घ्यायला  आपल्याला शिकवलं गेले आहे असं मोदी यावेळी म्हणाले.  एखादा प्राणी आपल्यातून निघून गेला तर आपलं मन अपराधीपणाच्या भावनेने भरून जाणं हे आपल्या परंपरेतच आहे तर मग  प्राण्यांची अख्खी प्रजाती  निघून जाणं आपल्याला कसे  चालेल असा सवाल त्यांनी यावेळी केला.  

आज काही आफ्रिकन देश तसच इराणमध्ये  चित्ते दिसून येतात मात्र भारताचं  नाव त्या यादीतून अनेक वर्षांपूर्वी  हटवले  गेले. मात्र आगामी काळात मुलांना हे सहन करावे लागणार नाही, मला खात्री आहे, कुनो  राष्ट्रीय उद्यानात  चित्ते धावताना  मुलांना पाहायला मिळतील असं पंतप्रधान म्हणाले. आज अरण्यात  निर्माण झालेली पोकळी लवकरच चित्यांच्या उपस्थितीने  भरून निघेल असं ते म्हणाले.

21व्या शतकातला भारत संपूर्ण जगाला एक संदेश देत आहे की अर्थशास्त्र आणि परिसंस्था ही संघर्षाची  क्षेत्र नव्हेत, पर्यावरणाच्या संरक्षणाने आर्थिक  विकास घडवून आणता येतो याचं भारत हे जिवंत उदाहरण असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.  आज आपण एका बाजूला , जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत आणि त्याचवेळी आपल्या देशातलं वनक्षेत्र सुद्धा वेगाने वाढत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  

सरकारने केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते म्हणाले की 2014 मध्ये आपलं  सरकार स्थापन झाल्यावर देशात सुमारे अडीचशे संरक्षित क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे.  देशात  आशियाई सिंहाच्या संख्येत वाढ झाली असून गुजरात हे  देशातल्या आशियाई  सिंहाच्या  वाढीचं  मोठं क्षेत्र  म्हणून उभारून वर येत असल्याचं त्यांनी सांगितलं.  गेल्या दशकभरातले कठोर परिश्रम, संशोधनाधारित धोरण आणि लोक सहभाग याचा यामध्ये फार मोठा वाटा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गुजरात मध्ये घेतलेली प्रतिज्ञा आपल्याला आठवत असल्याचे  मोदी यावेळी म्हणाले. आम्ही वन्य प्राण्यांबद्दलचा आदर वाढवून त्यांच्या विरोधातला संघर्ष कमी करू अशी ती प्रतिज्ञा होती अशी त्यांनी आठवण करून दिली आणि याचे परिणाम आता समोर दिसत आहेत  असं ते म्हणाले. वाघांच्या संख्येचं  उद्दिष्ट गाठण्यात आपण नियत  वेळेआधीच यश मिळवलं  आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. आसाम मध्ये एक शिंगी गेंड्याचा  अधिवास धोक्यात आला होता , मात्र आज त्यांची संख्या वाढल्याची  आठवण त्यांनी करून दिली.

गेल्या काही वर्षात हत्तींची संख्या सुद्धा तीस हजाराहून जास्त वाढली आहे. पाणथळ क्षेत्रात वाढलेल्या प्राणी आणि वनस्पती सृष्टीच्या संवर्धनासाठी झालेल्या कामाचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. जगभरातील कोट्यवधी लोकांच्या गरजा आणि जीवन हे पाणथळ म्हणजेच दलदलीच्या क्षेत्राच्या परिसंस्थेवर अवलंबून आहे असं ते म्हणाले. आज देशातल्या 75 पाणथळ जागा रामसरक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, यापैकी 26 क्षेत्रं गेल्या चार वर्षात समाविष्ट करण्यात आली आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं. या शतकातल्या या सर्व प्रयत्नांचा परिणाम येत्या अनेक शतकांमध्ये पाहायला तसच अनुभवायला मिळेल, आणि त्यामुळे प्रगतीचे नवे मार्ग निर्माण होतील असं ते म्हणाले. भारत सध्या जागतिक पटलावर मांडत असलेल्या जागतिक मुद्द्यांकडे सुद्धा पंतप्रधानांनी यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं. जागतिक समस्या, त्यावरचे उपाय आणि आपल्या सर्वांची जीवनपद्धती या सर्वांचं समग्र विश्लेषण करण्याच्या गरजेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. LIFE ( लाईफस्टाईल फॉर द एन्व्हायरन्मेंट फॉर द वर्ल्ड अँड एफर्ट्स ऑफ इंटरनॅशनल सोलर अलायन्स) म्हणजेच जागतिक पर्यावरणसुरक्षेला पूरक अशी जीवन पद्धती आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी केले जाणारे प्रयत्न, या मंत्राचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की भारत यासाठी संपूर्ण जगाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे; या प्रयत्नांना मिळणारं यश जगाला मार्गदर्शन करुन जगाचं भवितव्य ठरवेल. 

जागतिक आव्हानांचं मूल्यमापन, ही आव्हानं आपल्या सर्वांची स्वतःची वैयक्तिक आव्हानं आहेत असं समजून करण्याची वेळ आली आहे आणि आपण आपल्या जीवनशैलीत केलेला एखादा छोटासा बदल सुद्धा वसुंधरेच्या भविष्यातल्या सुरक्षिततेसाठी पाया ठरू शकतो यावर त्यांनी जोर दिला. मला खात्री आहे की भारताचे यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि भारतीय परंपरा, संपूर्ण जगभरातल्या मानवजातीला या दिशेनं मार्गदर्शन करतील आणि उत्तम जगताचं स्वप्न साकार करण्यासाठी पुरेसं बळ देईल असं म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

पार्श्वभूमी

मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधानांच्या हस्ते चित्ते सोडण्याचा हा उपक्रम म्हणजे, भारतीय वन्य प्राणी जीवन आणि त्यांचा अधिवास  पुनरुज्जीवीत करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. भारतात 1952 साली चित्ता हा प्राणी नामशेष म्हणून घोषित करण्यात आला होता. भारत आणि नामीबिया यांच्यामध्ये यावर्षी सुरुवातीला झालेल्या सामंजस्य करारा अन्वये हे चित्ते नामीबियातून मागवण्यात आले आहेत. प्रोजेक्ट चित्ता म्हणजेच चित्ता प्रकल्प, या जगातल्या पहिल्या मोठ्या आंतरखंडीय मांसभक्षक  प्राण्यांच्या इतर देशांमध्ये स्थानांतर करणाऱ्या प्रकल्पाअंतर्गत, भारतात पुन्हा एकदा चित्त्यांचा अधिवास निर्माण केला जात आहे. भारतात गवताळ प्रदेश परिसंस्था आणि अभयारण्य तसंच खुले जंगल क्षेत्र वाढवायला, या चित्त्यांमुळे मदत होईल. समाजाला मोठ्या प्रमाणावर लाभदायक ठरणाऱ्या,जलसुरक्षा,  कार्बनचं प्रमाण घटवणं आणि जमिनीच्या जलधारण क्षमतेचं संवर्धन यासारख्या, पर्यावरण परिसंस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधा आणि जैवविविधता यांचं संवर्धन करणं, यामुळे सुलभ होणार आहे. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धना प्रति पंतप्रधानांनी व्यक्त केलेली वचनबद्धता जपण्याच्या दृष्टीनं हे प्रयत्न होत असून, त्यामुळे या क्षेत्रांमध्ये स्थानिकांना, परिसंस्था विकास आणि वन्य पर्यटनाच्या माध्यमातून उपजीविकेच्या जास्तीत जास्त संधी मिळू शकतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/V.Ghode/S.Naik/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1860135) Visitor Counter : 332