पंतप्रधान कार्यालय

गुजरामध्ये भूज येथे अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 28 AUG 2022 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्‍ट 2022

 

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जी,  माझे संसदेतील सहकारी आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील जी, गुजरात सरकारमधील सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आणि इथे मोठ्या संख्येने आलेल्या कच्छच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो !

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? कच्छमध्ये चांगला पाऊस झाला आहे, त्याचा आनंद तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.

मित्रांनो,

आज माझ्या मनात अनेक भावनांनी गर्दी केली आहे. भुजियो डुंगर येथील स्मृतीवन स्मारक आणि अंजार येथील वीर बाल स्मारकाचे लोकार्पण हे कच्छच्या, गुजरातच्या, संपूर्ण देशाच्या सामायिक वेदनेचे ते प्रतीक आहे. ही स्मारके बांधताना केवळ घामच नाही तर अनेक कुटुंबांच्या अश्रूंनीही इथल्या दगड विटांचे शिंपण केले आहे.

मला आठवते की, अंजार येथे मुलांच्या कुटुंबीयांनी बाल स्मारक बांधण्याची कल्पना मांडली होती.तेव्हा आम्ही सर्वांनी ठरवले की, कारसेवा  करून हे स्मारक पूर्ण करू. आम्ही केलेला संकल्प आज पूर्ण झाला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, आपली मुले गमावली, आज मी हे स्मारक त्यांना जड अंतःकरणाने समर्पित करतो.

आज, कच्छच्या विकासाशी संबंधित 4,000 कोटींहून अधिक खर्चाच्या अन्य प्रकल्पांचीही पायाभरणी आणि लोकार्पण झाले.यामध्ये पाणी, वीज, रस्ते आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. यावरून गुजरातच्या कच्छच्या विकासासाठी दुहेरी इंजिन सरकारची वचनबद्धता  दिसून येते. आशापुरा मातेचे  दर्शन अधिक  सुलभ व्हावे यासाठी आज नवीन सुविधांची पायाभरणी करण्यात आली. मातानो मढ़च्या विकासासाठीच्या  या सुविधा जेव्हा तयार होतील, तेव्हा देशभरातून येणाऱ्या भाविकांना एक नवा अनुभव मिळेल. आपले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई यांच्या नेतृत्वाखाली कशाप्रकारे  कच्छची प्रगती  होत आहे, गुजरातची प्रगती होत आहे, याचेही हे गमक आहे. 

बंधू आणि भगिनींनो,

आज भुजच्या भूमीवर आलो आणि स्मृतीवनात  जात असताना, संपूर्ण रस्त्यावर कच्छच्या लोकांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला, जे आशीर्वाद दिले, मी या भूमीला वंदन करतो आणि इथल्या लोकांनाही अभिवादन करतो. मला इथे यायला थोडा उशीर झाला, खरंतर मी वेळेवर भूजला पोहोचलो होतो पण रोड-शो मध्ये ज्याप्रकारे स्वागत झाले आणि नंतर स्मृतीवन स्मारकस्थळी गेलो. तिथून निघण्याची इच्छाच होत नव्हती.

दोन दशकांपूर्वी कच्छने जे काही  भोगले आणि त्यानंतर कच्छने जे धैर्य दाखवले त्याची  प्रत्येक झलक या स्मृतिवनात आहे. ज्याप्रकारे जीवनासाठी जे म्ह्टले जाते,

वयम अमृतस्य: पुत्रा:

असे आपले विचार आहेत, चरैवती-चरैवती हा मंत्र आपली प्रेरणा आहे, त्याचप्रमाणे हे स्मारकही पुढे वाटचाल करण्याच्या  चिरंतन भावनेने प्रेरित आहे.

मित्रांनो,

जेव्हा मी स्मृतिवनाच्या विविध भागातून जात होतो अनेक जुन्या आठवणी मनात दाटून येत होत्या. मित्रांनो, अमेरिकेत 9/11 च्या खूप मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे एक स्मारक बांधण्यात आले आहे, "ग्राउंड झिरो",ते देखील मी पाहिले आहे. जपानमध्ये हिरोशिमाच्या शोकांतिकेनंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी  बांधलेले एक संग्रहालयही मी पाहिले आहे. आणि आज स्मृतीवन पाहिल्यानंतर मी देशवासियांना अत्यंत नम्रतेने सांगू इच्छितो, मी संपूर्ण देशातील जनतेला सांगतो सांगू इच्छितो की, जगातील सर्वोत्तम अशा स्मारकांच्या तुलनेत आपले स्मृतीवन एक पाऊलही मागे नाही.

येथे निसर्ग, पृथ्वी, जीवन, त्याचे शिक्षण आणि संस्कार यांची संपूर्ण व्यवस्था आहे. मी कच्छच्या लोकांना सांगेन की, आता तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर त्यांना स्मृतीवन बघण्यासाठी अवश्य न्यावे. आता तुमच्या या कच्छमधील शिक्षण विभागालाही मी सांगेन की, शाळकरी  मुलांना जेव्हा सहलीला नेले जाते  तेव्हा एक दिवस स्मृतीवनसाठी राखून ठेवला पाहिजे जेणेकरून त्यांना पृथ्वी आणि निसर्गाचे वर्तन काय असते हे त्यांना समजेल.  

मित्रांनो,

मला आठवते की , 26  जानेवारीला भूकंप झाला त्या दिवशी मी दिल्लीत होतो. दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले. आणि काही तासातच मी दिल्लीहून अहमदाबादला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी मी कच्छला पोहोचलो. तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, एका साधा राजकारणी भारतीय जनता पक्षाचा छोटा कार्यकर्ता होतो. मला माहित नव्हते की मी कशाप्रकारे  आणि किती लोकांना मदत करू शकेन पण मी ठरवले की,  या दु:खाच्या वेळी मी तुम्हा सर्वांच्या सोबत राहीन आणि शक्य होईल त्या मार्गाने मी तुमचे दुःख कमी करण्याचा  प्रयत्न करेन.

मला माहितही नव्हते, अचानक मला मुख्यमंत्री व्हावे लागले आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा, भूकंप कार्याच्या वेळी आलेला सेवाकार्याचा अनुभव मला खूप उपयोगी पडला. त्यावेळची अजून एक गोष्ट मला आठवते. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी तेव्हा परदेशातूनही अनेक लोक येथे आले होते. इथे कशाप्रकारे स्वयंसेवक  निस्वार्थ भावनेने सेवाकार्यात गुंतलेले आहेत, त्यांच्या धार्मिक, सामाजिक संस्था मदत आणि बचाव कार्य करत आहेत, या गोष्टींचे त्यांना आश्चर्य वाटायचे. ते मला सांगत असत  की, ते जगात अनेक ठिकाणी जातात पण त्यांनी कदाचित अशी सेवा यापूर्वी कधीही पाहिलेली नाही.सामूहिकतेच्या याच सामर्थ्याने कच्छला, गुजरातला सावरले आहे.

आज मी कच्छच्या भूमीत आलो आहे. माझे तुमच्याशी खूप जुने नाते आहे, माझे खूप दृढ नाते आहे.असंख्य नावांच्या स्मृती माझ्या मनामध्ये जाग्या होतात, मला अनेक लोकांची नावे आठवतात.आमचे धीरूभाई शहा, ताराचंद छेडा, अनंत भाई दवे, प्रताप सिंह जाड़ेज़ा, नरेंद्रभाई जाड़ेज़ा, हिरा लाल पारीख, भाऊ धनसुख ठक्कर, रसिक ठक्कर, गोपाळ भाई ,आपल्या अंजारचे चंपक लाल शाह असे असंख्य लोक ज्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे  भाग्य  लाभले होते, आज ते या जगात नाहीत.पण त्यांचा आत्मा जिथे कुठे असेल, कच्छच्या विकासासाठी त्यांना समाधानाची भावना असेल, ते आपल्याला आशीर्वाद देत असतील.

आणि आज, आजही जेव्हा मी माझ्या मित्रांना भेटतो, मग ते आमचे पुष्पदान भाई असोत, आमचे मंगलदादा धनजी भाई असोत, आमच्या जीवा सेठ सारखे व्यक्तिमत्त्व असो, आजही ते कच्छच्या विकासाला प्रेरणा देत असतात. कच्छची एक नेहमीच खासियत राहिली आहे, आणि मी नेहमी त्याबद्दल बोलतो.इथे रस्त्यावरून चाललेल्याही  कोणत्याही  माणसाने एखादे जरी स्वप्न पेरले तरी त्याला वटवृक्ष बनवण्यासाठी अख्खा कच्छ गुंततो. कच्छच्या याच  संस्कारांनी प्रत्येक शंका, प्रत्येक भीती चुकीची होती हे सिद्ध केले. आता कच्छ कधीच स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही, असे म्हणणारे अनेक होते मात्र आज कच्छच्या लोकांनी इथले चित्र पूर्णपणे बदलले आहे.

मित्रांनो,

मुख्यमंत्री म्हणून माझी पहिली दिवाळी आणि भूकंपानंतर कच्छच्या जनतेची पहिली दिवाळी, मी ती दिवाळी साजरी केली नाही.माझ्या सरकारमधील एकाही मंत्र्याने दिवाळी साजरी केली नव्हती. आणि भूकंपानंतरची पहिली दिवाळी, प्रियजनांची आठवण येणे ही आपल्या सगळ्यांची एक स्वाभाविक स्थिती होती,  तेव्हा मी तुमच्यामध्ये  येऊन राहिलो आणि तुम्हाला माहीत आहे की, वर्षानुवर्षे मी दिवाळी सीमेवर जाऊन, सीमेवर जाऊन देशाच्या जवानांसोबत साजरी केली आहे. पण त्या वर्षी मी ती परंपरा सोडून भूकंपग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी  त्यांच्यासोबत  राहायला आलो होतो.

मला आठवते मी दिवसभर चौबारीमध्ये राहिलो होतो आणि संध्याकाळी त्रम्बो या गावी पोचलो होतो. माझ्यासह माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, गुजरातमध्ये जिथे जिथे भूकंपाचे संकट कोसळले होते, दिवाळीच्या दिवशी तिथे जाऊन लोकांच्या दु:खात सहभागी झालो होतो.  

मला आठवते, त्या कठीण काळात मी म्हणालो होतो आणि आत्मविश्वासाने म्हणालो होतो की आपण संकटाचे संधीमध्ये रुपांतर करु. मी हे देखील म्हणालो होतो की तुम्हाला जे रण दिसत आहे, त्या रणात मला भारताचे तोरण दिसते आहे. आणि आज मी जेव्हा हे म्हणतो, लाल किल्ल्यावरून म्हणतो, 15 ऑगस्ट रोजी म्हणतो की 2047 मध्ये भारत विकसित राष्ट्र बनलेले असेल. ज्यांनी माझे बोलणे कच्छमध्ये ऐकले आहे, मला कच्छमध्ये पाहिले आहे, 2001 - 2002 या भूकंपाच्या कठीण काळात आणि विपरित परिस्थितीत मी जे म्हणालो होतो, ते आज तुमच्या समक्ष सत्यात उतरले आहे. म्हणूनच म्हणतो की आजचा हिंदुस्तान , ज्यामध्ये तुम्हाला अनेक उणिवा दिसत असतील, 2047 मध्ये, मित्रांनो मी आज स्वप्न पाहत आहे की जसे 2001 - 2002 आपले कच्छ मृत्यूच्या सावटाखाली असताना पाहिलेली स्वप्ने आज प्रत्यक्षात उतरली आहेत, त्याचप्रमाणे 2047 मध्ये देखील हिंदुस्तान स्वप्ने साकार करुन दाखवेल. 

आणि कच्छच्या लोकांनी, भुजमधल्या लोकांच्या भुजांनी या संपूर्ण क्षेत्राचा कायापालट करून दाखवला आहे. कच्छचा कायापालट हा केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगातील मोठ्या शिक्षण संस्था तसेच संशोधन केंद्रांसाठी संशोधनाचा मुद्दा आहे. 2001 मध्ये उद्ध्वस्त झालेल्या कच्छमध्ये झालेले काम अकल्पनीय आहे. 

कच्छमध्ये 2003 साली क्रांती गुरू शामजी कृष्ण वर्मा विद्यापीठ स्थापित झाले आणि 35 हून अधिक नवी महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, इतक्या कमी कालावधीत 1000 हून अधिक उच्च दर्जाची विद्यालये सुरू करण्यात आली.  

भूकंपात कच्छचे जिल्हा रुग्णालय पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. आज कच्छमध्ये भूकंप - रोधी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक रुग्णालय आहे, 200 हून अधिक नवी चिकित्सा केंद्रे देखील कार्यरत आहेत. ज्या कच्छमध्ये नेहमी दुष्काळ पडलेला असतो, जिथे पाणी हे आयुष्यातले सर्वात मोठे आव्हान आहे, तिथे आज कच्छ जिल्ह्यातील प्रत्येक घरात नर्मदेचे पाणी पोचत आहे. 

आपण आस्थेने आणि श्रद्धा भावाने गंगास्नान करतो, यमुना, शरयु आणि नर्मदा नदीतही स्नान करतो सोबतच असेही मानतो की नर्मदा नदी तर इतकी पवित्र आहे की तिच्या नामस्मरणाने देखील पुण्य लाभ होतो. ज्या नर्मदेचे दर्शन घेण्यासाठी लोक तिर्थयात्रा करत असत आज ती नर्मदा माता कच्छच्या धरतीवर अवतरली आहे. 

कोणी कल्पनाही करू शकत नव्हता की कधी टप्पर, फतेहगड आणि सुवाई या बंधाऱ्यात नर्मदा नदीचे पाणी पोहोचु शकते. मात्र हे स्वप्न कच्छमधल्या लोकांनी साकार करुन दाखवले आहे. ज्या कच्छमध्ये सिंचन प्रकल्प उभे करण्याबाबत कोणी विचार करू शकत नव्हते तिथे आज हजारो बंधारे बांधून, सुजलाम सुफलाम जल अभियान चालवून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे.

बंधु आणि भगिनींनो,

मागच्या महिन्यात जेंव्हा रायण गावात नर्मदा मातेचे पाणी पोचले तेंव्हा लोकांनी ज्या प्रकारे उत्सव साजरा केला ते पाहून जगातील अनेकांना आश्चर्य वाटले. हे आश्चर्य यामुळे होते कारण त्यांना कच्छसाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे माहितच नाही. एक काळ असा होता की जेंव्हा मुले जन्माला आल्यानंतर चार चार वर्षांची होईपर्यंत त्यांनी पाऊसच पाहीलेला नसायचा. असा कठीण काळ माझ्या कच्छने पाहिला आहे, असे खडतर आयुष्य व्यतीत केले आहे. कच्छमध्ये कधी कालवे असतील, ठीबक सिंचनाची सुविधा असेल याविषयी दोन दशकांपूर्वी कोणी बोलले तर त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे प्रमाण फार थोडे होते. 

माझ्या लक्षात आहे, जेंव्हा 2002 मध्ये मी गुजरात गौरव यात्रेच्या निमित्ताने मांडवी येथे आलो होतो, तेंव्हा मी कच्छवासियांचे आशीर्वाद मागितले होते. आशीर्वाद यासाठी मागितले होते की, मी कच्छच्या जास्तीत जास्त भागाला नर्मदा मातेचे पाणी उपलब्ध करून देऊ शकेन. तुमच्या आशिर्वादाने जी शक्ती मिळाली त्याचाच परिणाम म्हणून आज आपण या साऱ्या शुभ प्रसंगात सहभागी होत आहोत. आज कच्छ - भुज कालव्याचे लोकार्पण झाले आहे. याचा लाभ शेकडो गावातील हजारो शेतकरी कुटुंबांना होणार आहे. 

बंधु आणि भगिनींनो,

कच्छमधल्या लोकांच्या भाषेत इतका गोडवा आहे की जो एकदा इथे येतो तो कच्छला कधीच विसरू शकत नाही. आणि मला तर हजारो वेळा कच्छला भेट देण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. येथील दाबेली, भेळपुरी, आपल्या कच्छचे पातळ ताक, कच्छचे खारे, केशराचा स्वाद हे सगळेच अवर्णनीय आहे. जुनी म्हण आहे की, मेहनतीचे फळ गोड असते. कच्छने या म्हणीला प्रत्यक्षात साकार करून दाखवले आहे. 

मला आनंद वाटतो की फळ उत्पादनात कच्छ जिल्हा आज संपूर्ण गुजरातमध्ये अव्वल स्थानावर आहे. इथले कच्चे खजूर, केशरी अंबा, डाळिंबे आणि कमलम अशी अनेक फळे केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आपला गोडवा पसरवत आहेत.  

मित्रांनो,

मी ते दिवस कधीच विसरू शकत नाही जेंव्हा कच्छमध्ये राहणारे लोक इच्छा नसतानाही कधी आपली जनावरे घेऊन कैक मैल दूर जात होते तर कधी कधी त्यांना जनावरे सोडून जाणे देखील भाग होते. साधने नसल्याच्या कारणाने, संसाधने नसल्याच्या कारणाने पशुधनाचा त्याग हा या संपूर्ण क्षेत्राचा एकमेव पर्याय बनला होता. ज्या क्षेत्राचे, मागच्या अनेक वर्षांपासून पशुपालन हे आजीविकेचे मुख्य साधन आहे त्या क्षेत्राची अशी स्थिती चिंताजनक होती. मात्र आता कच्छमध्ये शेतकऱ्यांनी आपले पशुधन वाढवायला सुरुवात केली आहे. गेल्या वीस वर्षांत कच्छमध्ये दूध उत्पादनात तिपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 

जेंव्हा मी इथे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होतो तेंव्हा 2009 साली सरहद डेअरी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या डेअरीमध्ये एका दिवसात 1400 लिटर पेक्षाही कमी दुध संकलित होत असे. जेंव्हा या डेअरीची सुरुवात झाली तेंव्हा 1400 लिटरपेक्षाही कमी. पण आज ही सरहद डेअरी शेतकऱ्यांकडून दररोज 5 लाख लिटर पर्यंत दुध संकलित करते. आज या डेअरीमुळे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सुमारे 800 कोटी रुपयांची मिळकत होत आहे, मित्रांनो, माझ्या कच्छमधील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे. आज अंजार तालुक्यातील चंद्राणी गावात सरहद डेअरीच्या नव्या आधुनिक प्रकल्पाचे लोकार्पण झाले, त्यापासूनही शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुधाचे विविध पदार्थ बनवले जातील ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायला मदत होईल. 

बंधु आणि भगिनींनो,

कच्छने केवळ स्वतःचा विकास केला आहे असे नाही तर संपूर्ण गुजरातच्या विकासाला नवी गति दिली आहे. एक काळ होता जेंव्हा गुजरातवर एकामागून एक संकटे येत होती. नैसर्गिक संकटाशी गुजरात झुंज देतच होता अशातच कट कारस्थाने सुरू झाली. देशात आणि जगात गुजरातला बदनाम करण्यासाठी, इथे होणारी गुंतवणूक रोखण्यासाठी एकामागून एक अनेक कट रचण्यात आले. अशा परिस्थितीतही एका प्रकारे गुजरात नैसर्गिक आपदा व्यवस्थापन कायदा अमलात आणणारे देशातले पहिले राज्य बनले. याच कायद्यापासून प्रेरित असा कायदा संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला. कोरोनाच्या संकटकाळात याच कायद्याने सरकार आणि प्रशासनाला मोठी मदत केली.

मित्रांनो,

प्रत्येक वादग्रस्त विषय मागे टाकून गुजरातने नवे औद्योगिक धोरण आणून औद्योगिक विकासाचा नवा मार्ग निवडला. या उपक्रमाचा कच्छला खूप फायदा झाला.  कच्छला भरपूर गुंतवणूक मिळू लागली.  कच्छमधील औद्योगिक विकासासाठी लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. कच्छमध्ये आज जगातील सर्वात मोठे सिमेंट प्रकल्प आहेत.  वेल्डिंग पाईप निर्मितीच्या बाबतीत कच्छचा जगात दुसरा क्रमांक लागतो. संपूर्ण जगातील दुसरा सर्वात मोठा कापड कारखाना कच्छमध्ये आहे. आशियातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र कच्छमध्ये तयार करण्यात आले.  कांडला आणि मुंद्रा बंदर देशाच्या 30 टक्के मालाची हाताळणी करतात. कच्छ हे असे क्षेत्र आहे जिथून भारतातील 30 टक्क्यांहून अधिक मीठ तयार होते. 30 पेक्षा जास्त मीठ शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या कच्छचे मीठ खाल्ले नाही असा एकही भारतीय नाही.

बंधू आणि भगिनींनो,

एक काळ असा होता जेव्हा कच्छमध्ये कोणीही सौरऊर्जा किंवा पवन ऊर्जेचा विचारही करू शकत नव्हता.  आज कच्छमध्ये सौर आणि पवन ऊर्जेपासून सुमारे 2500 मेगावॅट वीज तयार केली जाते.  कच्छमधील खवडा येथे आज सर्वात मोठे सौर-पवन हायब्रीड पार्क उभारले जात आहे. देशात आज सुरू असलेल्या हरित हायड्रोजन मोहिमेत गुजरातचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा गुजरात जगाची हरित हायड्रोजन राजधानी म्हणून आपला ठसा उमटवेल, तेव्हा त्यात कच्छचे मोठे योगदान असेल.

मित्रांनो,

कच्छने केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासमोर आदर्श ठेवला आहे.  जगात अशी काही ठिकाणे आहेत, जी कृषी आणि पशुसंवर्धन, औद्योगिक विकास, पर्यटन तसेच कला आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांत पुढे आहेत. कच्छ बहुतेक क्षेत्रांच्या बाबतीत पुढे आहे. कच्छ आणि गुजरातनेही आपला वारसा अभिमानाने अंगिकारण्याच्या आणि स्वीकारण्याच्या बाबतीत देशासमोर आदर्श ठेवला आहे.

यावेळी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून मी देशाला आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. गेल्या 7-8 वर्षात आपल्या वारशाबद्दल अभिमानाची भावना अधिक दृढ झाली आहे. ती आज भारताची ताकद बनत आहे. भारत आज आपल्या वारशाबद्दल आधी बोलल्या जाणाऱ्या न्यूनगंडाच्या मनस्थितीतून बाहेर आला आहे. 

कच्छमध्ये कोणत्या गोष्टीचा अभाव आहे? इथे काय नाही? शहराची उभारणी करताना आम्ही वापरलेले कौशल्य या धोलावीरामध्ये दिसते. धोलावीराची प्रत्येक वीट म्हणजे आपल्या पूर्वजांकडे असलेले कौशल्य, ज्ञान आणि त्यांच्याकडे असलेला वैज्ञानिक विचार दर्शविते. ज्या काळामध्ये जगात अनेक संस्कृती प्रारंभीच्या स्तरावर होत्या. त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी धोलावीरासारखी नगरे वसवली आणि विकसित केली होती. अगदी याचप्रमाणे मांडवी हे जहाज बांधणीमध्ये अग्रेसर होते. आपला इतिहास, वारसा आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी उदासीनता होती. याचे उदाहरण म्हणजे आपल्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचे देता येईल. स्वातंत्र्यानंतरही त्यांचा अस्थिकलश अनेक दशके परदेशातच ठेवण्यात आला होता. त्यांच्या अस्थि परत मातृभूमीला आणण्याची संधी मुख्यमंत्री असताना मला मिळाली. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, अशा वेळी मांडवी येथे उभारण्यात आलेल्या क्रांतीतीर्थावर गुजरातमधील नागरिक आणि देशवासीय त्यांना आदरांजली वाहू शकतात.

सरदार साहेबांनी आपले संपूर्ण जीवन ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या चैतन्यासाठी आणि शेतकरी बांधव तसेच पशुपालकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी समर्पित केले होते. आज त्यांचा सर्वांत उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ देशाचा अभिमान बनला आहे. या स्थानी हजारो पर्यटक दररोज भेट देत आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेवून या स्थानापासून प्रेरणा घेत आहेत.

मित्रांनो, 

कच्छ आणि गुजरातचा हा वारसा जतन करण्यासाठी आणि त्याला जगासमोर आणण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून अथक, निरंतर प्रयत्न केले जात आहेत. कच्छचे रण, धोरडो तंबू नगर आणि मांडवी सागरी किनारा आज देशामध्ये प्रमुख आकर्षण असलेली पर्यटन स्थळे बनत आहेत. इथल्या कारागिरांनी, हस्तकलाकारांनी बनविलेल्या वस्तू, उत्पादने आता जगभर पोहोचत आहेत. निरोणा, भूजोडी, अजरकपूर यासारख्या गावांतल्या हस्तकला आज देशात आणि जगामध्ये आपली ओळख निर्माण करीत एक ठसा उमटवत आहेत. जगभरातले लोक रोगन कला, मड आर्ट, बांधणी आणि अजरक छपाई यांच्याविषयी चर्चा करीत आहेत. कच्छी शाल, आणि कच्छी भरतकाम यांना ‘जीआय-टॅग’ मिळाल्यानंतर त्यांच्या मागणीमध्ये आणखी जास्त वाढ झाली आहे.

म्हणूनच आज फक्त गुजरात किंवा देशातच नाही तर जगभरात लोक म्हणत आहेत की ज्याने कच्छ बघितले नाही त्याने काहीच पाहिले नाही. याचा फायदा कच्छ, गुजरातच्या पर्यटनाला आणि माझ्या तरुण पिढीला होत आहे. आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 41च्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. याचा पर्यटकांना फायदा तर होईलच पण सीमावर्ती भागाच्या दृष्टीकोनातूनही ते खूप महत्वाचे आहे.

मित्रांनो,

भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी येथील माता-भगिनी-मुलींच्या पराक्रमाचे वर्णन आजही उत्कृष्ट शौर्यगाथांमधून केले जाते. कच्छचा विकास हे सर्वांच्या प्रयत्नाने अर्थपूर्ण बदलाचे उत्तम उदाहरण आहे. कच्छ हे केवळ एक ठिकाण नाही; तो फक्त जमिनीचा एक भाग नाही. कच्छ म्हणजे चैतन्य, आश्वासक भावना आणि खळाळता उत्साह. हीच भावना आपल्याला ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या’ विराट संकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग दाखवते.

कच्छच्या बंधू आणि भगिनींनो, मी पुन्हा सांगू इच्छितो की तुमचा स्नेह आणि आशीर्वाद केवळ कच्छच्या कल्याणासाठीच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काहीतरी करण्याच्या प्रेरणेचा स्रोत आहे. हे तुमच्या बळावरच आहे मित्रांनो! म्हणूनच मी म्हणायचो, “कच्छ का ‘क’ आणि खमीर का ‘ख’. उसका नाम मेरा कच्छी बारह माह”.

तुम्ही ज्या प्रकारे माझे स्वागत केले त्यासाठी, तसेच तुम्ही दाखवलेला स्नेह आणि आदराबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. मात्र हे स्मृतीवन जगासाठी आकर्षणाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. ते हाताळण्याची जबाबदारी कच्छकडे म्हणजेच माझ्या बंधू-भगिनींवर आहे. घनदाट जंगलाशिवाय एकही कोपरा नसावा. हा भुजियो डुंगर हिरवागार  करायचा आहे.

मित्रांनो,

हे स्मृतीवन कच्छच्या रणोत्सवापेक्षाही अधिक सामर्थ्यवान आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ही संधी सोडू नका बंधूंनो! या कामाविषयी मी खूप स्वप्न पाहिली आहेत. हे मी मोठ्या जिद्दीने केले आहे आणि त्यात तुमचाही उत्स्फूर्त सहभाग हवा आहे. सातत्यपूर्ण सहकार्याची गरज आहे. भुजियो डुंगरचे नाव जगभर दुमदुमावे यासाठी मला तुमची साथ हवी आहे.

सर्व विकास प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो! आज खूप दिवसांनी आलोय, या माझ्यासोबत म्हणा -

मी नर्मदे म्हणेन - तुम्ही सर्वदे म्हणाल -

नर्मदे - सर्वदे !

नर्मदे - सर्वदे !

नर्मदे - सर्वदे !

खूप खूप धन्यवाद !

 

* * *

R.Aghor/S.Kane/Shraddha/Sonal/Vinayak/Vasanti/Suvarna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856108) Visitor Counter : 274