माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित ऑनलाइन शैक्षणिक गेम्सची मालिका ‘आजादी क्वेस्ट’ केली जारी
खेळणी आणि गेम्स यांच्या माध्यमातून लोकांना ‘गुंतवत त्यांचे मनोरंजन करणे आणि त्यांना शिक्षण देणे’ असे आदरणीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनातून प्रेरणा घेवून या उपक्रमाचा प्रारंभ
मोबाइलव्दारे गेमच्या या मालिकेच्या माध्यमातून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी वर्षभराच्या भागीदारीसाठी प्रकाशन विभाग आणि झिंगा इंडिया यांनी सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
ऑनलाइन गेम्सच्या मोठ्या बाजारपेठेचा उपयोग करण्याचा आणि त्याबरोबरच लोकांना शिक्षित करण्याचा गेम्स द्वारे प्रयत्न - अनुराग ठाकूर
या गेम्समध्ये स्वातंत्र्य संग्रामवरील अधिकृत माहितीचे भंडार सहजतेने उपलब्ध होणार - अनुराग ठाकूर
भारतामध्ये अॅंड्रॉईड आणि आयओएस उपकरणांसाठी इंग्लिश आणि हिंदी भाषेमधील गेम्स जारी; सप्टेंबर 2022 मध्ये हे गेम्स जागतिक स्तरावर होणार उपलब्ध
Posted On:
24 AUG 2022 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याची गाथा नवीन पिढीसमोर आणण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज ‘आझादी क्वेस्ट’ ही ऑनलाइन शैक्षणिक मोबाइल गेम्सची मालिका जारी केली. ‘झिंगा इंडिया’च्या सहकार्याने ही मालिका विकसित करण्यात आली आहे. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि झिंगा इंडियाचे देशातले प्रमुख किशोर किचली उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्य लढ्यातल्या आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी आणि अनाम वीरांनी दिलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी सरकारच्या प्रयत्नापैकी एक म्हणजे ही मालिका आहे. ’’
‘‘ऑनलाइन खेळांची खूप प्रचंड मोठी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेचा उपयोग करण्या बरोबरच लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी देशाच्या कानाकोप-यातून ज्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अद्यापही समोर आलेले नाही, अशा सेनानींची माहिती गोळा केली आहे. ‘आजादी क्वेस्ट’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा शोध’ ही गेम्सची मालिका ज्ञान देणारी आणि संवादात्मक करण्याचा प्रयत्न आहे.’’असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. हे गेम्स सर्व वयोगटातील लोकांना आवडतील आणि त्यांना घराघरांमध्ये लवकरच पसंती मिळेल , असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतामध्ये वाढत्या ‘एव्हीजीसी’ म्हणजेच अॅनिमेशन, व्हिज्युएल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्राविषयी बोलताना ठाकूर म्हणाले, भारतामध्ये एव्हीजीसी क्षेत्राची जोपासना व्हावी यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय सातत्याने प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत गेमिंग क्षेत्रात अव्वल पाच देशांमध्ये आहे. 2021 या एकाच वर्षात गेमिंग क्षेत्रामध्ये 28 टक्के वाढ झाली आहे. 2020 ते 2021 या काळात ऑनलाइन गेमर्सची संख्या 8 टक्क्यांनी वाढली आहे. आणि 2023 पर्यंत त्यांची संख्या 45 कोटींवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे, असेही ठाकूर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, असे अॅप्स आपल्या एव्हीजीसी क्षेत्राच्या क्षमतेला बळ देतील आणि त्याचवेळी आपला गौरवशाली इतिहास जगाच्या कानाकोप-यामध्ये घेवून जातील. या अॅप्समधील माहिती प्रकाशन विभाग आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेकडून तपासून घेण्यात आली आहे आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्यासंबंधीच्या अधिकृत माहितीचे भंडार आता सहज उपलब्ध होवू शकणार आहे.
सर्व वयोगटातल्या लोकांनी हे अॅप्स डाउनलोड करून घ्यावेत असे आवाहन मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी केले आणि हे अॅप आपल्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती जाणून घेण्यासाठी एक महत्वाचे शैक्षणिक साधन बनेल, असे सांगितले. हे अॅप वापरकर्त्याचे मनोरंजन तर करणार आहेच,त्यांना गुंतवून ठेवणार आहे, त्याचवेळी त्यांना शिक्षित करण्याचे कामही करणार आहे, असे ठाकूर म्हणाले.
स्वातंत्र्याचा मार्ग भारताच्या इतिहासातील एक परिवर्तनात्मक मैलाचा दगड आहे आणि भारताच्या भूतकाळाचा गौरव करण्याच्या या महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रयत्नाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. येथे लोकांना गेमद्वारे जोडणे हे झिंगा इंडिया कंपनीचे ध्येय आहे, असे झिंगा इंडियाचे भारतातील प्रमुख किशोर किचली यांनी यावेळी सांगितले.
लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना शिक्षित करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कथा आणि महान स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्य यांचे दर्शन घडवणारे खेळ आणि खेळणी विकसित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेमिंग आणि खेळणी उद्योगातील कंपन्यांना केलेल्या आवाहनातून अशा प्रकारचा उपक्रम प्रेरित आहे. ‘आझादी क्वेस्ट’ या मालिकेतील पहिले दोन गेम भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची गाथा सांगतात. हे गेम या गाथेतले महत्त्वाचे टप्पे आणि नायकांवर प्रकाश टाकतात. हे गेम मनोरंजनात्मक गेमप्लेने विणलेले आहेत. गेमचा मजकूर सोपा परंतु सर्वसमावेशक आहे, विशेषत: प्रकाशन विभागाने तो तयार केला आहे आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या तज्ञांनी तपासला आहे.
आझादी क्वेस्ट बद्दल:
सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सवांतर्गत गेम्सची मालिका विकसित करण्यासाठी प्रकाशन विभागाने आज झिंगा इंडियासोबत सामंजस्य करार केला. आझादी क्वेस्ट गेम भारतातील लोकांसाठी इंग्रजी आणि हिंदीमध्ये अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइसेससाठी उपलब्ध आहेत आणि सप्टेंबर 2022 पासून जगभरात उपलब्ध होतील. ऑनलाइन गेमिंग कंपनी झिंगा इंडियाची स्थापना 2010 मध्ये बेंगळुरूमध्ये झाली आणि तिने काही सर्वात लोकप्रिय गेम फ्रेंचायझी मोबाइल आणि वेबवर विकसित केले आहेत.
‘गेमिफिकेशन ऑफ एज्युकेशन’ अर्थात हसत खेळत शिक्षण या संकल्पनेवर आधारित अनोखी गेम सिरीज देशातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. गेम-आधारित शिक्षण हे शालेय वर्ग आणि वय यापलीकडे शिकण्याच्या प्रक्रियेचा विस्तार करून एक समान आणि आजीवन शिक्षण प्रदान करते. आझादी क्वेस्ट मालिका भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल आणि देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांबद्दल माहिती आणि ज्ञान देईल. त्यामुळे गेम खेळणाऱ्यांमध्ये अभिमानाची आणि कर्तव्याची भावना निर्माण होईल. 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'अमृत कालचे पंचप्रण' सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वसाहतवादी मानसिकतेच्या भावनेचा उल्लेख केला ती भावना दूर करण्यात या शिक्षणामुळे मदत होईल.
मालिकेतील पहिला गेम म्हणजे आझादी क्वेस्ट: मॅच 3 पझल. एक साधा आणि खेळण्यास सोपा गेम ज्यात 1857 ते 1947 पर्यंतच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रवास सादर केला आहे. या गेममध्ये 495 स्तर (लेव्हल्स) आहेत. खेळात पुढे गेल्यावर 75 ट्रिव्हिया कार्डे गोळा करता येतील. प्रत्येक कार्ड इतिहासातील प्रमुख क्षण दर्शविते. लीडरबोर्डवर स्पर्धा करा आणि सोशल मीडियावर गेममधील बक्षिसे आणि गेमची प्रगती शेअर करा.
दुसरीकडे, आझादी क्वेस्ट: हिरोज ऑफ भारत हा एक क्विझ गेम म्हणून डिझाइन केला आहे. यात 75 स्तरांमध्ये पसरलेल्या 750 प्रश्नांद्वारे भारताच्या स्वातंत्र्याच्या नायकांबद्दल खेळाडूंच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाते आणि 75 आझादी वीर कार्डांद्वारे त्यांना अनाम नायकांबद्दल देखील सांगितले जाते. याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जाऊ शकते
पब्लिकेशन डिव्हिजन आणि झिंगा इंडिया यांच्यातील वर्षभर चालणारी भागीदारी अशा प्रकारचे आणखी गेम प्रदान करेल आणि लोकांमध्ये विशेषतः विद्यार्थी आणि तरूणामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासह भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विविध पैलूंबद्दल माहिती देणारे मजकूर आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत सध्याच्या गेमचा विस्तार करेल. आझादी क्वेस्ट पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रासह आकर्षक बक्षिसेही दर महिन्याला दिली जातील.
‘आझादी क्वेस्ट’ ब्रोशर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा: http://davp.nic.in/ebook/goi_print/index.html
गेम्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा:
* * *
N.Chitale/Suvarna/Prajna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854225)
Visitor Counter : 259
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada