पंतप्रधान कार्यालय
सूरत तिरंगा यात्रेला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
Posted On:
10 AUG 2022 7:23PM by PIB Mumbai
आपल्या सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजपासून थोड्याच दिवसांनी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणार आहे, आणि आपण सर्व जण या ऐतिहासिक स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारीही करत आहोत. हिंदुस्तानच्या प्रत्येक कोपर्यात तिरंगाच तिरंगा फडकताना दिसत आहेत . गुजरातचा असा एकही कोपरा नाही, जो उत्साहाने भरलेला नाही. आणि सूरतने तर त्यात आणखी भर टाकली आहे. आज संपूर्ण देशाचं लक्ष सूरतकडे आहे. सूरतच्या तिरंगा यात्रेमधून एक प्रकारे छोट्या भारताचं दर्शन होत आहे, किंवा कदाचित हिंदुस्तानचा असा कुठलाही कोपरा नसेल, जिथले लोक सूरतमध्ये वास्तव्याला नसतील आणि आज एक प्रकारे संपूर्ण हिंदुस्तान सूरतच्या भूमीवर तिरंगा यात्रेत सहभागी झाला आहे. आणि ही देखील आनंदाची गोष्ट आहे, की समाजाचा प्रत्येक वर्ग यात सहभागी आहे. तिरंगा ध्वजामध्ये जोडण्याची किती ताकत आहे, हे आज आपण सूरतमध्ये पाहत आहोत. सूरतने आपला व्यापार-व्यवसाय, आपले उद्योग-धंदे यामधून जगात आपली वेगळी ओळख बनवली आहे. आज सूरतमध्ये होत असलेली तिरंगा यात्रा देखील जगभरात आकर्षणाचं केंद्र ठरेल.
मित्रांनो,
तुम्ही तिरंगा यात्रेत भारत मातेची झलक आणि त्याच बरोबर देशाची संस्कृती आणि ओळख याच्याशी निगडीत झलक देखील समाविष्ट केली आहे. विशेषतः, मुलींचं शौर्य प्रदर्शन आणि त्यामधील युवकांचा सहभाग, हे खरोखरच अद्भुत आहे. सूरतच्या लोकांनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या भावनेला तिरंगा यात्रेत जिवंत केलं आहे. कोणी कापड विक्रेता आहे, दुकानदार आहे, कोणी यंत्रमाग कारागीर आहे, कोणी शिंपी तर कोणी भरतकाम कारागीर आहे, कोणी वाहतूक व्यवसायाशी जोडलेला आहे, कोणी हिरे-जवाहीर याच्याशी जोडलेला आहे. सूरतचा संपूर्ण कापड उद्योग, सूरतच्या लोकांनी हा कार्यक्रम अतिशय भव्य केला आहे. हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियानातल्या या जन-सहभागासाठी, आणि या खास तिरंगा यात्रेसाठी मी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. विशेषतः सांवर प्रसाद बुधिया जी, आणि ‘साकेत-सेवा ही लक्ष्य’ या समूहाशी संबंधित सर्व स्वयंसेवकांचं कौतुक करतो, ज्यांनी हा उपक्रम सुरु केला. संसदेतले माझे सहकारी सी आर पाटील जी याचं सहकार्य या उपक्रमाला आणखी बळ देत आहे.
मित्रांनो.
आपला राष्ट्रध्वज हाच देशाचा कापड उद्योग, देशाची खादी आणि आपल्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. या क्षेत्रात सूरतने नेहमीच आत्मनिर्भर भारताचा पाया रचला आहे. सूरतच्या कपडा उद्योगाने भारताच्या उद्योग भावना, भारताचं कौशल्य आणि भारताच्या समृद्धीचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे, ही तिरंगा यात्रा आपल्याबरोबर तो अभिमान आणि प्रेरणा देखील घेऊन आली आहे.
मित्रांनो,
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात गुजरातने आपल्या गौरवशाली योगदानाचा एक वेगळाच सोनेरी अध्याय लिहिला आहे. गुजरातने बापूंच्या रूपात स्वातंत्र्याच्या लढाईला नेतृत्व दिलं. गुजरातने लोह पुरुष सरदार पटेल जी यांच्यासारखे नेते दिले, ज्यांनी स्वातंत्र्या नंतर एका श्रेष्ठ-भारताचा पाया रचला. बारडोली आंदोलन आणि दांडी यात्रेमधून मिळालेल्या संदेशाने संपूर्ण देशाला एकत्र आणलं. गुजरातच्या याच गौरवशाली इतिहासाचा एक अविभाज्य भाग आपला सूरत आहे आणि त्याचा वारसा आहे.
मित्रांनो,
भारताच्या तिरंगा ध्वजामध्ये केवळ तीन रंग नसतात. आपला तिरंगा ध्वज, आपल्या इतिहासाच्या गौरवाचं, आपल्या वर्तमानाच्या कर्तव्यनिष्ठेचं, आणि भविष्याच्या स्वप्नांचं देखील एक प्रतिबिंब आहे. आपला तिरंगा ध्वज भारताच्या अखंडतेचं आणि भारताच्या विविधतेचं देखील एक प्रतीक आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी तिरंग्यामध्ये देशाचं भविष्य बघितलं, देशाची स्वप्नं बघितली, आणि त्याला कधीही झुकू दिलं नाही. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर जेव्हा आपण नव्या भारताचा प्रवास सुरु करत आहोत, तेव्हा तिरंगा पुन्हा एकदा भारताची एकात्मता आणि चैतन्याचं प्रतिनिधित्व करत आहे. देशभरात होत असलेल्या तिरंगा यात्रांमधून, हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियानामधून देशाची ती शक्ती आणि भक्ती एकत्र झळकत आहेत. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात भारतातल्या प्रत्येक घरात असेल तिरंगा ध्वज, भारताच्या प्रत्येक घरावर फडकेल तिरंगा ध्वज. समाजाचा प्रत्येक वर्ग, प्रत्येक जाती-मत-पंथाचे लोक, स्वयंस्फूर्तीने, एकात्मतेच्या भावनेने, नवीन स्वप्नं आणि संकल्पांसह संपूर्ण देशाबरोबर जोडले जात आहेत. हीच ओळख आहे-भारताच्या कर्तव्य निष्ठ नागरिकाची. ही ओळख आहे-भारत मातेच्या मुलाची, महिला-पुरुष, युवा, ज्येष्ठ, जो ज्या भूमिकेत आहे, या अभियानात आपलं योगदान देत आहे, आपलं कर्तव्य निभावत आहेत. मला आनंद आहे की हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियानामुळे किती तरी गरीब, विणकर, वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्या संकल्पांना एक नवीन ऊर्जा देईल. जन-सहभागाचं हे अभियान नव्या भारताचा पाया मजबूत करेल. याच विश्वासाने, आपल्या सर्वांना, गुजरातला, संपूर्ण देशाला आणि विशेषतः माझ्या सूरतच्या लोकांना खूप-खूप शुभेच्छा, आणि सूरत, एखादा निश्चय केल्यावर कधीच मागे हटत नाही, हेच सूरतचं वैशिष्ट्य आहे. सूरत ज्या प्रकारे पुढे जात आहे, ज्या प्रकारे प्रगतीची नवी उंची गाठत आहे, त्याच्या मुळाशी हे माझे सूरतचे लोक आहेत, हे माझे सूरतचे बंधू-भगिनी आहेत, आज तिरंगा यात्रेचं हे अद्भुत दृश्य देशासाठी देखील प्रेरणादायी ठरेल.
आपल्या सर्वांना मी खूप-खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद!
*****
Jaydevi PS/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850793)
Visitor Counter : 276
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam