पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते गांधीनगरमधील GIFT सिटी येथे IFSCA मुख्यालयाची पायाभरणी संपन्न


पंतप्रधानांनी GIFT सिटी येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सराफा विनिमय बाजार- IIBX चा केला प्रारंभ

"जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर यासारख्या देशांच्या यादीमध्ये भारताचा प्रवेश"

“देशातील सामान्य माणसाच्या आकांक्षा हा गिफ्ट सिटीच्या संकल्पनेचा भाग आहे”

"गिफ्ट सिटीमध्ये संपत्ती आणि शहाणपण दोन्हीचा सन्मानाने उत्सव होतो"

"आम्हाला अशा संस्थांची गरज आहे ज्या जागतिक अर्थव्यवस्थेत आपले वर्तमान सुरक्षित करुन भविष्यातील भूमिकाही सक्षमपणे पार पाडू शकतील"

“आज सर्वसामावेशकता हा आमचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा आहे. आम्ही जागतिक बाजारपेठ आणि जागतिक पुरवठा साखळीशी वेगाने जोडले जात आहोत”

“एकीकडे, आम्ही स्थानिक कल्याणासाठी जागतिक भांडवल आणत आहोत. तर दुसरीकडे, आम्ही जागतिक कल्याणासाठी स्थानिक उत्पादने देखील वापरत आहोत”


"जेव्हा तंत्रज्ञान, विज्ञान आणि सॉफ्टवेअरचा विचार केला जातो, तेव्हा या क्षेत्रात भारतात अनुकूल स्थिती आहे आणि अनुभवही "

"नियमांना अनुसरून नेतृत्व, कायद्यांतर्गत सुशासनासाठी उच्च मापदंड स्थापित करणे आणि जगाचे आवडते लवाद केंद्र म्हणून उदयास येणे हे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे"

Posted On: 29 JUL 2022 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर येथील गिफ्ट सिटीमध्ये, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या (IFSCA) मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी केली. GIFT-IFSC मधील भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय सराफा विनिमय बाजार केंद्र असून, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजचा (IIBX) प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्यांनी NSE IFSC-SGX Connect देखील लॉन्च केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय आणि राज्यमंत्री यांच्यासह अनेक राजनैतिक अधिकारी आणि व्यापारी नेते उपस्थित होते.

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, हा दिवस भारताच्या वाढत्या आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्यासाठी आणि भारताच्या पराक्रमावरील वाढत्या जागतिक आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचा आहे. “आज, GIFT सिटीमध्ये, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण - IFSCA मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. मला विश्वास आहे की, ही वास्तू जितकी भव्य आहे तितकीच ती भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या अमर्याद संधीही निर्माण करेल,” असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) नवोन्मेषाला चालना देईल तसेच विकासासाठी सक्षम उत्प्रेरक असेल. आज सुरू झालेल्या संस्था आणि व्यासपीठे, 130 कोटी भारतीयांना आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यात मदत करतील. "भारत आता जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या अमेरिका, इंग्लंड आणि सिंगापूर सारख्या देशांच्या यादीत प्रवेश करत आहे" असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

गिफ्ट-सिटीच्या मूळ संकल्पनेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गिफ्ट-सिटी केवळ व्यवसायासाठी नाही तर देशातील सर्वसामान्य माणसांच्या आकांक्षा हा गिफ्ट सिटीच्या संकल्पनेचा भाग आहे. भारताच्या भविष्याची संकल्पना गिफ्ट-सिटीबरोबर जोडलेली आहे. यासोबतच, भारताच्या सोनेरी भूतकाळाची स्वप्नेही याच्याशी जोडलेली आहेत.”

2008 साली, जेव्हा जग आर्थिक संकट आणि मंदीचा सामना करत होते, तेव्हा भारतातही धोरण लकव्याचे वातावरण होते, पण त्याच वेळी गुजरात, फिनटेकच्या क्षेत्रात नवीन आणि मोठी पावले टाकत होता, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. या संकल्पनेने आतापर्यंत इतकी  प्रगती केली आहे याचा आपल्याला आनंद आहे, असे ते म्हणाले.

वाणिज्य आणि तंत्रज्ञानाचे महत्वाचे केंद्र म्हणून गिफ्ट (GIFT) सिटी एक मजबूत ठसा उमटवत आहे . संपत्ती आणि ज्ञान याचा संगम गिफ्ट सिटीत आहे, हे पंतप्रधानांनी नमूद केले. गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारत जागतिक स्तरावर सेवा क्षेत्रात बळकट भागीदारी करत मार्गक्रमण करत आहे हे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.  गिफ्ट-सिटी हे एक असे  ठिकाण आहे जिथे संपत्ती निर्माण होत आहे आणि जगातील सर्वोत्तम ज्ञान इथे एकत्र येत आहे आणि नवे काहीतरी शिकत आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘एक प्रकारे हे आर्थिक क्षेत्रात आणि व्यवसायात भारताला गतवैभव प्राप्त करून देण्याचे  एक माध्यम आहे’, असे पंतप्रधान म्हणाले.

आपण हे लक्षात घ्यायला हवे की, ऊर्जावान फिनटेक क्षेत्र केवळ  व्यवसाय सुलभ वातावरण, सुधारणा आणि नियम एवढेच मर्यादित नाही तर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना चांगले जीवनमान आणि नवीन संधी देण्यासाठीचे हे एक माध्यम आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर, गुलामगिरीच्या प्रभावामुळे आणि कमकुवत  आत्मविश्वासामुळे  देश व्यापार आणि वित्त क्षेत्राच्या  गौरवशाली वारशापासून दूर गेला आणि जगाशीही  देशाचे  सांस्कृतिक, आर्थिक आणि इतर संबंध मर्यादित झाले. आता मात्र, ‘नवा भारत’ ही जुनी विचारसरणी बदलत आहे आणि आज सर्वसमावेशकता हा आपला सर्वात महत्त्वाचा अजेंडा झाला आहे, असे त्यांनी सांगितले. आपण जागतिक बाजारपेठ आणि जागतिक पुरवठा साखळीत झपाट्याने सामावले जात  आहोत”, असे ते म्हणाले. “गिफ्ट -सिटी हे भारताशी तसेच जागतिक संधींशी जोडले जाण्यासाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे.जेव्हा तुम्ही गिफ्ट-सिटीशी एकरूप  व्हाल, तेव्हा तुम्ही संपूर्ण जगाशी एकरूप व्हाल”, असे त्यांनी सांगितले.

आज भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे भविष्यात आपली अर्थव्यवस्था आजच्यापेक्षा मोठी होईल यादृष्टीने  त्यासाठी आतापासूनच सज्ज  राहावे लागेल.यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेत आपली वर्तमान आणि भविष्यातील भूमिका पार पाडू शकतील अशा संस्थांची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज – आयआयबीएक्स, हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करण्यात सोन्याच्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला. भारताची ओळख केवळ मोठ्या बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती ‘बाजार निर्माता’ अशी असायला हवी, असे ते म्हणाले.“एकीकडे, आपण स्थानिक हितासाठी जागतिक भांडवल आणत आहोत. तर दुसरीकडे, आपण जागतिक हितासाठी  स्थानिक उत्पादकता देखील उपयोगात आणत आहोत.” असे त्यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यापलीकडे  भारताची ताकद आहे.“ज्यावेळी जागतिक पुरवठा साखळी अनिश्चिततेने ग्रासलेली आहे आणि जग या अनिश्चिततेमुळे भयभीत  आहे, त्याचवेळी  भारत जगाला दर्जेदार उत्पादने आणि सेवांची खात्री देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “नव्या भारतातील नवीन संस्थांकडून, नवीन व्यवस्थांकडून  मला अनेक अपेक्षा आहेत आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.आज 21 व्या शतकात वित्त आणि तंत्रज्ञान एकमेकांशी संलग्न आहेत.आणि जेव्हा तंत्रज्ञान, विज्ञान आणि सॉफ्टवेअरचा विचार केला जातो, तेव्हा भारतालाही एक तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे आणि अनुभवही आहे.” असे पंतप्रधानांनी सांगितले. फिनटेकमधील भारताचे नेतृत्व अधोरेखित करत  पंतप्रधानांनी,गिफ्ट-सिटी हितसंबंधितांना  फिनटेकवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “तुम्ही सर्वांनी फिनटेकमधील नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करावे आणि गिफ्ट आयएफएससी  ही फिनटेकची जागतिक प्रयोगशाळा म्हणून उदयाला  यावी ” अशी माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

गिफ्ट आयएफएससी हे शाश्वत आणि हवामानविषयक प्रकल्पांसाठी जागतिक कर्ज आणि समभाग भांडवलाचे प्रवेशद्वार बनण्याची दुसरी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने  विमान भाड्याने देणे, जहाज वित्तपुरवठा, कार्बन ट्रेडिंग, डिजिटल चलन आणि गुंतवणूक व्यवस्थापनासाठी बौद्धिक संपदा अधिकारांमध्ये आर्थिक नवोन्मेषासाठी  काम केले पाहिजे ही आपली तिसरी अपेक्षा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

“आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने नियमन आणि कार्यान्वयन खर्च केवळ भारतातच नव्हे तर दुबई आणि सिंगापूर सारख्या देशांच्या तुलनेत स्पर्धात्मक बनवला पाहिजे. "नियमनात अग्रणी बनणे, कायद्याच्या शासनासाठी उच्च मापदंड स्थापित करणे आणि जगाचे आवडते लवाद केंद्र म्हणून उदयास येणे हे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे" असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या 8 वर्षांत देशाने आर्थिक समावेशनाची नवीन लाट पाहिली आहे. गरिबातील गरीबही आज औपचारिक वित्तीय संस्थांमध्ये सहभागी झाला आहे. आज, जेव्हा आपली मोठी लोकसंख्या आर्थिक क्षेत्रात सामील झाली आहे, तेव्हा सरकारी संस्था आणि खासगी संस्थांनी एकत्रितपणे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले. लोकांना विकासासाठी गुंतवणूक करायची आहे म्हणून मूलभूत बँकिंगच्या पलीकडे जात, आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

 

गिफ्ट सिटी, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण, भारतीय आंतरराष्ट्रीय सोने-चांदी विनिमय बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार आयएफएससी -एसजीएक्स कनेक्ट विषयी माहिती

गिफ्ट सिटी (गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी) ची संकल्पना केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी आर्थिक आणि तंत्रज्ञान सेवांसाठी एकात्मिक केंद्र म्हणून करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण हे भारतातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रातील (IFSCs) वित्तीय उत्पादने, वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्थांच्या विकास आणि नियमनासाठी एक संयुक्त नियामक आहे. ही इमारत एक वैशिष्ट्यपूर्ण संरचना म्हणून संकल्पित करण्यात आली असून त्या इमारतीच्या रचनेत, गिफ्ट -आयएफएससी चे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून जगभरात वाढत्या प्रभावाचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. 

आयआयबीएक्स अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय सोने-चांदी विनिमय बाजार भारतातील सोन्याच्या वित्तीयीकरणाला चालना देण्याबरोबरच जबाबदार स्रोत आणि गुणवत्तेच्या हमीसह परिणामकारक मूल्य निश्चितीची सुविधा देईल. हे भारताला जागतिक सराफा बाजारात आपले योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आणि जागतिक मूल्य साखळीला सचोटीने आणि गुणवत्तेसह सेवा देण्यास सक्षम करेल. भारताला जागतिक सोने-चांदी विनिमय बाजारात प्रमुख ग्राहक म्हणून स्थान मिळवण्यात सक्षम करण्याच्या भारत सरकारच्या कटिबध्दतेचा देखील हा पुनरुच्चार आहे. 

एनएसई आयएफएससी -एसजीएक्स कनेक्ट हा, राष्ट्रीय शेअर बाजाराची गिफ्ट आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) आणि सिंगापूर एक्सचेंज लिमिटेड (SGX) मधील उपकंपनी यांच्यातील उपक्रम आहे. कनेक्ट अंतर्गत, सिंगापूर एक्सचेंजच्या सदस्यांद्वारे निफ्टी डेरिव्हेटिव्ह्जवरील सर्व ऑर्डर एनएसई -आयएफएससीकडे वळवून त्याच्या व्यापारी मंचावर जुळविल्या जातील. कनेक्ट द्वारे डेरिव्हेटिव्हच्या व्यापारासाठी भारतातील आणि आंतरराष्ट्रीय अधिकारक्षेत्राच्या कक्षेतील दलाल-मध्यस्थ मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. याद्वारे जीआयएफटी -आयएफएससी मधील डेरिव्हेटिव्ह बाजारातील रोख भांडवलात वाढ होईल, अधिकाधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आकर्षित होतील, पर्यायाने जीआयएफटी -आयएफएससी मधील आर्थिक व्यवस्थेवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल. 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

R.Aghor/Shraddha/Sonal/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846372) Visitor Counter : 304