भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवावर्गाला अधिक संधी


नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी उपलब्ध, एक जानेवारी या पात्रता तारखेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.

17+वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा

Posted On: 28 JUL 2022 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2022

 

17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 1 जानेवारी  रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.  मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे   मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील  निर्देश दिले आहेत. युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे  अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना  एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने  तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक  उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

यापुढे दर तिमाहीत मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र  युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे.नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल. 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक  एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.

भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने  मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल करून विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या   तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये,आगामी वर्षाच्या एक जानेवारी या पात्रता तारखेच्या संदर्भात मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण किंवा  पुनरीक्षण प्रत्येक वर्षाच्या उत्तरार्धात (साधारणपणे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत) केले जात होते. जेणेकरून मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन येणाऱ्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात केले जात असे.

आयोगाने आता मतदार नोंदणी अर्ज अधिक सोपा आणि सुलभ केला आहे.  हा नवीन सुधारित अर्ज 1 ऑगस्ट  2022 पासून लागू होईल, 1 ऑगस्ट 2022 पूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या स्वरूपातील सर्व अर्ज (दावे आणि हरकती) प्रक्रिया करून त्यांचा निपटारा केला जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही.

 

मतदार केंद्र सुसूत्रीकरण

वार्षिक आढावा सराव पद्धतीनुसार, दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि मतदान केंद्रावरील मॅन्युअल, 2020 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे  1500 पेक्षाजा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रात  प्रारूप  मतदार याद्यांच्या प्रकाशनापूर्वी सुधारणा केली जाईल.

 

इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र – आधार जोडणी

मतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात  मतदारांच्या  आधार कार्डाचे  तपशील नमूद करण्यासाठी माहिती विचारण्यात आली आहे.  तसेच सध्याच्या  मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने  6बी हा  एक नवीन अर्ज  देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत किंवा आधार क्रमांकाअभावी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा  कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही.

अचूक मतदार याद्यांसाठी क्षेत्र पडताळणी आणि अधिक काळजीपूर्वक तपासणी

अचूक आणि अद्ययावत मतदारयादी तयार करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून  मतदार क्षेत्र पडताळणी करण्यावर भर दिला आहे.

 

* * *

R.Aghor/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845788) Visitor Counter : 8494