पंतप्रधान कार्यालय
स्वामी आत्मस्थानानंद यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
10 JUL 2022 6:04PM by PIB Mumbai
सात्विक चैतन्याने समृद्ध या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पूज्य संतगण, शारदा मठाच्या सर्व साध्वी माता, विशेष अतिथीगण आणि सर्व भक्तगण, तुम्हा सर्वांना नमस्कार!
आज पूज्य संतांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी आत्मस्थानानंदजी यांचा जन्म शताब्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या आयोजनाच्या निमित्ताने वैयक्तिकरित्या अनेक भावना आणि आठवणी जोडलेल्या आहेत. अनेक गोष्टी निगडित आहेत. स्वामीजींनी त्यांच्या शतायु जीवनाच्या अगदी जवळ असताना देह ठेवला होता. मला नेहमीच त्यांचा आशीर्वाद लाभला. त्यांच्यासोबत राहण्याची मला संधी मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या संपर्कात राहिलो हे माझे भाग्य आहे. जसा लहान बाळावर प्रेमाचा वर्षाव होतो तसाच ते माझ्यावर स्नेहाचा वर्षाव करत राहिले.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहिला आणि मी हे अनुभवतो आहे की स्वामीजी महाराज त्यांच्या चेतन रुपात आजही आपल्याला आशीर्वाद देत आहेत. मला याचा आनंद आहे की त्यांचे जीवन आणि ध्येय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज दोन स्मृती आवृत्त्या, एक चित्ररुपी चरित्र आणि एक माहितीपटही प्रकाशित होत आहे. या कार्यासाठी मी रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष पूज्य स्वामी स्मरणानंद जी महाराजजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
स्वामी आत्मस्थानानन्द जी यांना श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य पूज्य स्वामी विजनानंदजी यांच्याकडून दीक्षा मिळाली होती. स्वामी रामकृष्ण परमहंसांसारख्या संताचा बोध, ती आध्यात्मिक ऊर्जा त्यांच्यात स्पष्टपणे दिसत होती. आपणा सर्वांना चांगलेच माहीत आहे की आपल्या देशात संन्यासाची मोठी परंपरा आहे . संन्यासाचीही अनेक रूपे आहेत. वानप्रस्थ आश्रम हे देखील संन्यासाच्या दिशेने एक पाऊल मानले जाते.
आपल्या स्वत्त्वाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य करणे आणि समाजासाठी जीवन जगणे हा संन्यासाचा अर्थ आहे . समाजापर्यंत स्वत्वाचा विस्तार करावा लागतो.संन्याशासाठी सर्व प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा असते. सर्व जीवांमध्ये शिवाची अनुभूती होणे म्हणजे परमोच्च अनुभूती आहे. स्वामी विवेकानंद यांनी संन्यस्थाच्या महान परंपरेला आधुनिक स्वरुपात साकारले. स्वामी आत्मस्थानानन्द जी देखील याच स्वरुपात जीवन जगले आणि आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेलूर मठ आणि श्री रामकृष्ण मिशनने केवळ भारतातच नव्हे, तर नेपाळ आणि बांग्लादेश सारख्या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात मदत आणि बचाव कार्याचे अद्भुत अभियान राबवले.
त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या कल्याणासाठी काम केले, त्यासाठी संस्था स्थापन केल्या. आज या संस्था गरीबांना रोजगार आणि उपजीविकेसाठी लोकांना मदत करत आहेत. स्वामीजींनी गरीबांची सेवा, ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार त्याच्याशी संबंधित कार्याला उपासना मानली. यासाठी मोहीम स्वरूपात काम करणे , नव्या संस्थांची निर्मिती करणे , संस्था मजबूत करणे हे त्यांच्यासाठी रामकृष्ण मिशनचे आदर्श होते.जसे आपल्याकडे म्हटले जाते की जिथे दैवी भावना आहे तेच तीर्थ आहे. त्याच धर्तीवर जिथे असे संत आहेत, तिथे मानवता, सेवा या सर्व गोष्टी केंद्रस्थानीच असतात. स्वामीजींनी आपल्या संन्यस्त जीवनातून हे सिध्द करून दाखवले.
मित्रांनो,
शेकडो वर्षांपूर्वीचे आदी शंकराचार्य असोत, की आधुनिक काळातील स्वामी विवेकानंद, भारतीय संत परंपरेने नेहमीच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा जयजयकार केला.रामकृष्ण मिशनची स्थापना देखील ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेशी निगडीत आहे . स्वामी विवेकानंद हा संकल्प अभियान स्वरूपात जगले होते. त्यांचा जन्म बंगाल मध्ये झाला होता. तुम्ही देशाच्या कुठल्याही भागात जा, तुम्हाला क्वचितच अशी एखादी जागा सापडेल जिथे विवेकानंद जी गेले नाहीत किंवा त्यांचा प्रभाव जाणवला नाही. गुलामगिरीच्या काळात त्यांनी केलेल्या प्रवासामुळे देशाला आपल्या प्राचीन राष्ट्रीय चेतनेची जाणीव झाली , त्यात नवा आत्मविश्वास निर्माण केला.
रामकृष्ण मिशनची ही परंपरा स्वामी आत्मस्थानानंदजी यांनी जीवनभर पुढे नेली.त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये आपले आयुष्य व्यतीत केले. अनेक कामे केली आणि जिथे-जिथे ते राहिले , तिथे पूर्णपणे एकरूप झाले. गुजरात मध्ये राहून ते उत्तम गुजराती बोलायचे आणि माझे तर हे सौभाग्य आहे की आयुष्याच्या अखेरपर्यंत जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलणे व्हायचे, ते गुजराती भाषेतच व्हायचे. मला देखील त्यांचे गुजराती ऐकणे खूप आवडायचे. आज मी स्मरण करू इच्छितो की जेव्हा कच्छ मध्ये भूकंप आला होता तेव्हा तर एक क्षणही त्यांनी दवडला नाही, आणि त्याच वेळी, तेव्हा तर मी राजकारणात कुठल्याही पदावर नव्हतो, एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो.त्यावेळी त्यांनी माझ्याशी संपूर्ण परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली, रामकृष्ण मिशन कच्छमध्ये काय काम करू शकते याबद्दल ते बोलले. अगदी विस्ताराने आणि त्या वेळी पूर्ण वेळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली कच्छमधील भूकंपग्रस्तांना मदत देण्यासाठी अनेक कामे झाली. म्हणूनच रामकृष्ण मिशनच्या संतांना देशातील राष्ट्रीय एकतेचे वाहक म्हणून सर्वजण ओळखतात. जेव्हा ते परदेशात जातात तेव्हा ते तिथे भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करतात.
मित्रांनो,
रामकृष्ण मिशनची ही जागृत परंपरा रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या दैवी विभूतींच्या साधनेतून प्रकट झाली आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस एक असे संत होते ज्यांना काली मातेचा स्पष्ट साक्षात्कार झाला होता, ज्यांनी काली मातेच्या पायाशी आपले सर्वस्व अर्पण केले होते.
ते म्हणायचे, हे संपूर्ण जग हे चराचर, सर्व काही मातेच्या चेतनेने व्यापलेले आहे. हीच चेतना बंगालच्या काली पूजेमध्ये दिसून येते. हीच चेतना बंगाल आणि संपूर्ण भारताच्या श्रद्धेमध्ये दिसते. याच चेतनेची आणि शक्तीची एक शलाका स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या युगपुरुषांच्या रुपात स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी प्रदीप्त केली होते. स्वामी विवेकानंद यांना काली मातेची जी अनुभूती झाली, तिचे जे आध्यात्मिक दर्शन झाले त्यामुळे त्यांच्या अंतरात्म्यात असामान्य उर्जा आणि सामर्थ्याचा संचार झाला होता. स्वामी विवेकानंद यांच्यासारखे ओजस्वी व्यक्तिमत्व, इतके विराट चरित्र जगन्माता कालीच्या आठवणीत, त्यांच्या भक्तीमध्ये मात्र, एखाद्या लहान बालकाप्रमाणे व्याकुळ होऊन जायचे. भक्तीची अशीच निश्चलता आणि शक्ती साधनेचे असेच सामर्थ्य स्वामी आत्मस्थानानंद जी यांच्यात देखील पाहायला मिळायचे. त्यांच्या बोलण्यातही काली मातेची चर्चा होत असे आणि मला असे आठवते की ज्यावेळी बेल्लूर मठात जायचे असेल, गंगेच्या काठावर बसलेले असू आणि दूर काली मातेचे मंदिर दिसत असेल तर अगदी स्वाभाविक आहे, एक ओढ निर्माण होते. ज्यावेळी श्रद्धा इतकी पवित्र असेल तर साक्षात शक्ती आपल्याला मार्ग दाखवत राहते. म्हणूनच काली मातेचा तो अमर्याद- असीम आशीर्वाद नेहमीच भारताच्या सोबत आहे. हीच आध्यात्मिक उर्जा घेऊन भारत आज विश्व कल्याणाच्या भावनेने पुढे जात आहे.
मित्रांनो,
आपल्या संतांनी आपल्याला हे दाखवून दिले आहे की ज्यावेळी आपल्या विचारांमध्ये व्यापकता असते त्यावेळी आपल्या प्रयत्नांमध्ये आपण कधी एकटे पडत नाही. तुम्ही भारतवर्षाच्या या भूमीवर अशा कित्येक संतांचा जीवनप्रवास पाहाल ज्यांनी शून्य संसाधनांसह उत्तुंग शिखरांसारखे संकल्प पूर्ण केले. हाच विश्वास, हेच समर्पण मी पूज्य आत्मस्थानानंदजींच्या जीवनात देखील पाहिले होते. गुरु या नात्याने देखील त्यांच्याशी माझा संबंध होता. मी त्यांच्या सारख्या संतांकडून निष्काम भावनेने शंभर टक्के समर्पणासह स्वतःचे आयुष्य खर्ची घालण्याची शिकवण घेतली आहे. म्हणूनच मी हे सांगतो की ज्यावेळी भारतामधील एक व्यक्ती, एक ऋषी इतके काही करू शकतात तर मग आपल्यासारख्या 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक संकल्पाने असे कोणते लक्ष्य आहे जे पूर्ण होऊ शकणार नाही? संकल्पाची हीच शक्ती आपल्याला स्वच्छ भारत मिशनमध्येही पाहायला मिळते. भारतामध्ये अशा प्रकारची मोहीम यशस्वी होऊ शकते यावर लोकांचा विश्वास नव्हता. पण देशवासियांनी संकल्प केला आणि त्याचा परिणाम जग पाहात आहे. डिजिटल इंडियाचे उदाहरण देखील आपल्या समोर आहे. डिजिटल पेमेंट्सच्या सुरुवातीच्या काळापासून असे म्हटले जात होते की हे तंत्रज्ञान भारतासारख्या देशासाठी नाही. पण आज तोच भारत डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून उदयाला आला आहे. अशाच प्रकारे कोरोना महामारीच्या विरोधात लसीकरणाचे सर्वात ताजे उदाहरण आपल्या समोर आहे. दोन वर्षांपूर्वी अनेक लोक आकडेमोड करत बसले होते की भारतामध्ये सर्वांना लसी मिळण्यामध्ये किती काळ लागू शकेल. कोणी म्हणायचे 5 वर्षे, कोणी म्हणत होते 10 वर्षे, कोणी म्हणत होते 15 वर्षे! आज दीड वर्षाच्या आत आपण लसींच्या 200 कोटी मात्रांच्या जवळ पोहोचलो आहोत. ज्यावेळी संकल्प शुद्ध असेल त्यावेळी उद्दिष्ट पूर्ण होण्यामध्ये कोणताही विलंब होत नाही, अडचणींमधूनही मार्ग निघत जातात, याचे प्रतीक असलेली ही उदाहरणे आहेत.
आपल्या संतांचे आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा देशाला अशाच प्रकारे मिळत राहील, असा विश्वास मला वाटत आहे. येणाऱ्या काळात आपण तितक्याच भव्य भारताची निर्मिती करणार आहोत ज्याचा आत्मविश्वास आपल्याला स्वामी विवेकानंद यांनी दिला होता आणि स्वामी आत्मस्थानानंद यांच्यासारख्या संतांनी प्रयत्न केले होते. मी आज तुम्हा सर्व पूज्य संत मंडळींच्या समोर आलो आहे, जणू काही माझ्या कुटुंबात आलो आहे, या भावनेने बोलत आहे, तुम्ही नेहमीच मला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. या अमृत महोत्सवात प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे बनवण्याचा संकल्प आहे. तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणी काम करत असाल, तिथे देखील लोकांना प्रेरित करा, तुम्ही सुद्धा यात सहभागी व्हा आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये मानव सेवेच्या एका उत्तम कामात तुमचा सक्रिय सहभाग खूप मोठे परिवर्तन घडवू शकतो. तुम्ही नेहमीच समाजाच्या सुख दुःखात साथ दिली आहे. शताब्दी वर्ष नवी उर्जा, नव्या प्रेरणेचे वर्ष बनून रहावे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशात कर्तव्य भावना जागवण्यामध्ये यश मिळावे यासाठी या सर्वांमध्ये आपले सामूहिक योगदान एक खूप मोठे परिवर्तन आणू शकते. याच भावनेने तुम्हा सर्व संतांना माझा पुन्हा एकदा प्रणाम.
खूप खूप धन्यवाद!
***
N.Chitale/S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840592)
Visitor Counter : 258
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam