पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

14 व्या ब्रिक्स शिखर परिषद 2022 मध्ये पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

Posted On: 23 JUN 2022 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2022

 

महामहिम राष्ट्रपती शी

महामहिम राष्ट्रपती रामाफोसा,

महामहिम राष्ट्रपती बोल्सोनारो,

महामहिम राष्ट्रपती पुतिन,

सर्वप्रथम, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, सर्व ब्रिक्स देशांमध्ये झालेल्या शानदार  कार्यक्रमांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. तुमच्या टीमकडून  आम्हाला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी आभार  व्यक्त करतो.

महामहिम,

आज सलग तिसऱ्या वर्षी, आपण कोविड महामारीच्या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे भेटत आहोत.

जरी जागतिक स्तरावर महामारीचे प्रमाण  पूर्वीपेक्षा कमी झाले असले तरी, त्याचे अनेक दुष्परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर अजूनही दिसून येत आहेत.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या कारभाराबाबत आपला , ब्रिक्स सदस्य देशांचा  समान  दृष्टिकोन राहिला आहे.

आणि म्हणूनच  कोविड पश्चात जागतिक उभारीत आपले परस्पर सहकार्य  उपयुक्त योगदान देऊ शकते.

गेल्या काही वर्षांत, आपण ब्रिक्समध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे या संघटनेची परिणामकारकता वाढली आहे. आपल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची सभासद संख्याही वाढली आहे ही आनंदाची बाब आहे.

अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे आपल्या परस्पर सहकार्याचा थेट फायदा आपल्या नागरिकांच्या जीवनात  होत आहे.

उदाहरणार्थ, लस संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना, सीमाशुल्क विभागांमध्ये समन्वय, सामायिक उपग्रह तारामंडळाची स्थापना, फार्मा उत्पादनांना परस्पर मान्यता  इ. असे व्यावहारिक उपाय  ब्रिक्सला  एक विशिष्ट आंतरराष्ट्रीय संस्था बनवतात जी केवळ संवादापुरती  मर्यादित नाही.

ब्रिक्स युवा शिखर परिषद, ब्रिक्स खेळ आणि आपल्या नागरी समाज संस्था आणि विचारवंत यांच्यातली देवाणघेवाण वाढल्यामुळे आपल्या देशातील लोकांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत.

मला विश्वास आहे की आजच्या चर्चेतून आपले ब्रिक्स संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक सूचना पुढे येतील.

धन्यवाद.

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1836612) Visitor Counter : 314