पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी केला प्रगती मैदान एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्प राष्ट्राला समर्पित


प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा अविभाज्य भाग म्हणून मुख्य बोगदा आणि पाच भुयारी मार्गांचे समर्पण

"हा एक नवीन भारत आहे जो समस्या सोडवतो, नवीन प्रतिज्ञा घेतो आणि त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करतो"

“हा प्रकल्प प्रगती मैदानाचा 21 व्या शतकातील गरजांनुसार कायापालट करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे”

"देशाच्या राजधानीत जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रदर्शन हॉल यासाठी भारत सरकार निरंतर कार्यरत"

“केंद्र सरकारने विकसित केलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा दिल्लीचे रूप पालटून ती आधुनिक बनवत आहेत. स्वरूपातील हा बदल भाग्य बदलण्याचे माध्यम आहे”

"पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर असलेले लक्ष्य सामान्य लोकांच्या राहणीमानात वाढ करण्यावर आधारित"

"दिल्ली जगातील सर्वोत्तम जोडणी असलेल्या राजधानींपैकी एक म्हणून उदयास येत आहे"

"गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन हे सबका विश्वास आणि सबका प्रयासचे माध्यम आहे"

“पहिल्यांदाच एखाद्या सरकारचे शहरी लोकसंख्येला महत्त्व”

Posted On: 19 JUN 2022 1:13PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती मैदान एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्पाचा मुख्य बोगदा आणि पाच भुयारी मार्ग राष्ट्राला समर्पित केले. एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्प हा प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, सोम प्रकाश, अनुप्रिया पटेल आणि कौशल किशोर यावेळी उपस्थित होते.

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले कि हा प्रकल्प म्हणजे केंद्र सरकारकडून दिल्लीतील जनतेसाठी मोठी भेट आहे. वाहतूक कोंडी आणि महामारीमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात किती मोठे आव्हान होते, याचे त्यांनी स्मरण केले. प्रकल्प पूर्ण करण्याचे श्रेय त्यांनी नवीन भारताच्या नवीन कार्यसंस्कृतीला आणि कामगार आणि अभियंत्यांना दिले. हा एक नवीन भारत आहे जो समस्या सोडवतो, नवीन प्रतिज्ञा घेतो आणि त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करतो, पंतप्रधान म्हणाले.

हा बोगदा 21 व्या शतकातील गरजांनुसार प्रगती मैदानाचा कायापालट करण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत बदलूनही, भारताचे प्रदर्शन करण्यासाठी तयार केलेले प्रगती मैदान पुढाकारांच्या अभावामुळे आणि राजकारणामुळे मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दुर्दैवाने प्रगती मैदानाची फारशी प्रगतीझाली नाही, ते म्हणाले. यापूर्वी खूप गाजावाजा करून आणि प्रसिद्धी करूनही हे झाले नाही.  द्वारका येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर यांसारख्या आस्थापनांबद्दल आणि प्रगती मैदानावरील पुनर्विकास प्रकल्पाबद्दल माहिती देताना ते पुढे म्हणाले, देशाच्या राजधानीत जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रदर्शन हॉल यासाठी भारत सरकार निरंतर कार्यरत आहे. केंद्र सरकारने विकसित केलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा दिल्लीचे रूप पालटून ते आधुनिक बनवत आहेत. स्वरूपातील हा बदल हे भाग्य बदलण्याचे एक माध्यम आहे, ते म्हणाले. पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणावर असलेले लक्ष्य सामान्य लोकांच्या राहणीमानात वाढ करण्यावर आधारित आहे. पर्यावरण संवेदनशील आणि हवामानाबाबत जागरूक पायाभूत सुविधांच्या विकासाच्या गरजेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. प्रदीर्घ प्रलंबित समस्यांना सक्रियपणे हाताळण्याची वृत्ती, पर्यावरणपूरक बांधकाम आणि देशासाठी काम करणाऱ्यांची काळजी यासाठी पंतप्रधानांनी आफ्रिका अव्हेन्यू आणि कस्तुरबा गांधी रोड येथील नवीन संरक्षण कार्यालय संकुलाचे उदाहरण दिले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची वाटचाल झपाट्याने होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून येत्या काळात भारताची राजधानी जागतिक स्तरावर चर्चेचा आणि भारतीयांसाठी अभिमानाचा विषय ठरणार असल्याचे सांगितले.

वेळेची आणि इंधनाची बचत करण्याच्या दृष्टीने, एका अंदाजानुसार 55 लाख लिटरची इंधन बचत, तसेच वाहतुकीची कोंडी कमी करून 5 लाख झाडे लावल्यावर प्राप्त होईल इतका पर्यावरणीय लाभांश यासारखे मोठे फायदे जे या  एकात्मिक  मार्गिकेच्या  माध्यमातून मिळणार आहेत त्याबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. जीवनमान सुलभ करण्यासाठी यासारखे कायमस्वरूपी उपाय ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.  गेल्या 8 वर्षांत आम्ही दिल्ली-एनसीआरच्या समस्या सोडवण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलली आहेत. गेल्या 8 वर्षांत दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवेचा विस्तार 193 किमीवरून 400 किमीपर्यंत म्हणजे दुपटीहून अधिक वाढला आहे'', असे पंतप्रधानांनी सांगितले.  लोकांनी  मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्याची सवय लावावी अशी सूचना त्यांनी नागरिकांना दिली. त्याचप्रमाणे पूर्व आणि पश्चिम परिघीय द्रुतगती मार्ग (पेरिफेरल एक्स्प्रेस वे,) दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गामुळे  दिल्लीतील नागरिकांना मोठी सुविधा निर्माण झाली आहे. काशी रेल्वे स्थानकावर नागरिक आणि इतर संबंधितांशी त्यांनी केलेल्या संभाषणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, सामान्य माणसाच्या मानसिकतेत मोठा बदल झाला असून त्या बदलानुसार काम करत राहण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, दिल्ली-देहराडून द्रुतगती मार्ग, दिल्ली-अमृतसर द्रुतगती मार्ग, दिल्ली-चंदीगढ द्रुतगती मार्ग आणि दिल्ली-जयपूर द्रुतगती मार्ग हे दिल्लीला जगातील सर्वोत्तम संपर्क जोडणी सुविधा असलेली  राजधानी बनवत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाची राजधानी म्हणून दिल्लीची ओळख बळकट करणाऱ्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून स्वदेशी तंत्रज्ञानाने  दिल्ली मेरठ जलद रेल्वे प्रणाली तयार करण्यात आली असून याचा फायदा व्यावसायिक, सामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक, शाळेत जाणारे आणि कार्यालयात जाणारे, टॅक्सी-ऑटो चालक आणि उद्योग समुदायाला होईल, याबद्दलही त्यांनी यावेळी सांगितले.

पीएम  गतीशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा  दृष्टीकोनाद्वारे  देश मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी निर्माण करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा हा  सबका विश्वास आणि सबका प्रयासचे माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. धर्मशाला येथे नुकत्याच झालेल्या मुख्य सचिवांच्या परिषदेत त्यांना माहिती देण्यात आल्याप्रमाणे, राज्यांनी गतिशक्तीचा अवलंब केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. अमृत कालदरम्यान, देशातील मेट्रो शहरांची व्याप्ती वाढवणे आणि श्रेणी -2, श्रेणी -3 शहरांमध्ये चांगल्या नियोजनासह काम करणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. येत्या 25 वर्षात भारताच्या जलद विकासासाठी आपल्याला शहरे हरित, स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही बनवण्याची गरज आहे.  "आपण शहरीकरणाला आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून स्वीकारले, तर ते देशाच्या विकासाला अनेक पटींनी  हातभार लागेल.", असे पंतप्रधान म्हणाले.

प्रथमचकोणतेही सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरी नियोजनाला महत्त्व देत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. शहरी गरिबांपासून शहरी मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांना चांगल्या सुविधा देण्याचे काम केले जात आहे.गेल्या 8 वर्षात 1 कोटी 70 लाख शहरी गरिबांना पक्की घरे सुनिश्चित करण्यात आली आहेत.लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी सहाय्यही करण्यात आले आहे. शहरांमध्ये आधुनिक सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित केल्यास सीएनजी आधारित वाहतूक  आणि इलेक्ट्रिक वाहतुकीच्या  पायाभूत सुविधांनाही प्राधान्य दिले जात आहे. केंद्र सरकारची फेम (FAME )योजना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असेही पंतप्रधानांनी  सांगितले.

यावेळी पंतप्रधान वाहनातून उतरून भुयारी मार्गावरून चालले. त्यावेळी ते म्हणाले की, बोगद्यातील कलाकृतींनी नियोजित कामाच्या पलीकडे जाऊन मूल्यवर्धन दर्शवले आहे आणि ते एक भारत श्रेष्ठ भारतचे उत्तम अभ्यास केंद्र आहे.  कदाचित हे  जगातील सर्वात लांब कलादालनांपैकी एक असेल, असे पंतप्रधान म्हणाले. रविवारी काही तासांसाठी हा बोगदा केवळ शाळकरी मुलांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी ठेवला जावा, जेणेकरून कलाकृती आणि त्यामध्ये मूर्त स्वरूपात  असलेल्या भावनांचा त्यांना आनंद लुटता येईल यादृष्टीने शोध घ्यावा  अशी सूचना त्यांनी केली

प्रगती मैदान एकात्मिक वाहतूक मार्गिका प्रकल्प 920 कोटींहून अधिक खर्च करून संपूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून बांधण्यात आला आहे. प्रगती मैदानावर विकसित होत असलेल्या नवीन जागतिक दर्जाच्या प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रामध्ये वीना अडथळा आणि सुलभ प्रवेश प्रदान करणे हे या मार्गाचे  उद्दिष्ट आहे,त्यामुळे प्रगती मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रदर्शक आणि अभ्यागतांना सहज सहभाग घेता येईल.

या मार्गिकेमुळे  वाहनांची विनाअडथळा वाहतूक  सुनिश्चित होईल, त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचण्यास मदत होईल, त्यामुळे या प्रकल्पाचा परिणाम   प्रगती मैदानापर्यंतच मर्यादित नाही तर त्या  पलीकडेही  असणार आहे. शहरी पायाभूत सुविधांमध्ये कायापालट करून लोकांसाठी जीवन सुलभता सुनिश्चित करणे हा सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग आहे.

मुख्य भूयारी मार्ग प्रगती मैदानातून जाणाऱ्या पुराण किला रोडने रिंग रोडला इंडिया गेटशी जोडतो. प्रगती मैदानाच्या भव्य तळघर वाहनतळामधील प्रवेशासह सहा पदरी  मार्गिका भुयारी मार्ग बहुद्देशीय आहे. या भुयारी मार्गाचा एक अनोखा घटक म्हणजे वाहनतळाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुख्य बोगद्याच्या रस्त्याच्या खाली दोन एकमेकांना छेद देणारे भुयारी मार्ग  बांधण्यात आले आहेत.वाहतूक सुरळीत चालण्याच्या दृष्टीने, स्मार्ट फायर मॅनेजमेंट, आधुनिक वायुवीजन आणि स्वयंचलित नि:सरण व्यवस्था , डिजिटली नियंत्रित सीसीटीव्ही आणि भुयारी मार्गाच्या आत सार्वजनिक घोषणा प्रणाली यांसारख्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधांनी ही मार्गिका सुसज्ज आहे. हा बहुप्रतिक्षित भुयारी मार्ग भैरों मार्गासाठी पर्यायी मार्ग म्हणून काम करेल, या भुयारी मार्गिकेची क्षमता भैरों मार्गा वाहतूक क्षमतेच्या पलीकडे  आहे आणि भैरों मार्गावरील निम्म्याहून अधिक वाहतूकीचा  भार या मार्गिकेमुळे कमी होईल अशी अपेक्षा आहे.

या भुयारी मार्गासोबतच मथुरा रस्त्यावर चार, भैरो मार्गावर एक आणि रिंगरोड आणि भैरो मार्गाच्या छेदनबिंदूवर एक असे सहा भुयारी मार्ग असतील.

***

S.Thakur/V.Joshi/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835299) Visitor Counter : 280