पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात पंतप्रधान सहभागी


21,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 1.4 लाखांहून अधिक घरांचे उद्घाटन आणि पायाभरणी

16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पांमुळे या प्रदेशातील रेल्वे जोडणीला  मोठी चालना मिळणार

800 कोटी रुपये खर्चासह ‘मुख्यमंत्री मातृशक्ती योजना’ केली सुरू

"21 व्या शतकातील भारताच्या जलद विकासासाठी महिलांचा जलद विकास आणि त्यांचे सक्षमीकरण हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे"

"महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन आज  भारत योजना आखत आहे आणि निर्णय घेत आहे"

“वडोदरा हे संस्कारांचे शहर आहे. हे शहर इथे येणाऱ्यांची सर्व प्रकारे काळजी घेते.

"गुजरातमध्ये प्रत्येक स्तरावर आम्ही महिलांना निर्णय घेण्याच्या बाबतीत अधिक संधी आणि  प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे"

Posted On: 18 JUN 2022 3:25PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी झाले. त्यांनी 21,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी लाभार्थी, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय आणि राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीलाच पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस त्यांच्यासाठी मातृ वंदना (मातृपूजन) दिवस आहे. आज 100 व्या वर्षात पदार्पण केलेल्या आईचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी पावागड टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या  श्री कालिका मातेच्या मंदिराचे उद्घाटन केले, आणि देशासाठी प्रार्थना केली तसेच देशसेवेसाठी आणि अमृत काळात  देशाचे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देवीकडे शक्ती मागितली. त्यानंतर त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या विशाल मातृशक्तीलावंदन केले.

आजच्या कार्यक्रमातील 21000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, हे प्रकल्प गुजरातच्या विकासाद्वारे भारताच्या विकासाच्या संकल्पनेला बळ देतील. मातांचे  आरोग्य, गरीबांसाठी घरे, कनेक्टिव्हिटी आणि उच्च शिक्षण या क्षेत्रांतील ही मोठी गुंतवणूक गुजरातच्या औद्योगिक विकासाला चालना देईल, असे ते म्हणाले. यातील अनेक प्रकल्प महिलांचे आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महिला सक्षमीकरणाला विकासाचा आधार बनवण्याच्या दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांना कालिका मातेच्या आशीर्वादाने  नवी गती मिळाली आहे. 21व्या शतकातील भारताच्या जलद विकासासाठी महिलांचा जलद विकास, त्यांचे सक्षमीकरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज भारत महिलांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन योजना आखत आहे आणि निर्णय घेत आहे, असे यावेळी उपस्थित अनेक परिचित चेहरे ओळखताना त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, महिलांसाठी सर्व क्षेत्रात संधी खुल्या झाल्या आहेत आणि सरकारने महिलांच्या जीवनचक्राचा  प्रत्येक टप्पा  लक्षात घेऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना आखल्या आहेत. वडोदरा हे मातृशक्ती उत्सवासाठी योग्य शहर आहे कारण मातेप्रमाणे संस्कार देणारे हे शहर आहे. वडोदरा हे संस्कारांचे शहर आहे. हे शहर येथे येणाऱ्यांची सर्व प्रकारे काळजी घेते, त्यांच्या सुख-दु:खात साथ देते आणि पुढे जाण्याची संधी देते. या शहराने स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, विनोबा भावे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांना प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या वैयक्तिक प्रवासात या शहराने बजावलेल्या भूमिकेचेही मोदींनी स्मरण केले. ते म्हणाले की 2014 मध्ये त्यांना वडोदरा  आणि काशी विश्वनाथ या दोन्ही ठिकाणी विजय मिळाला होता. माता  आणि महिलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे याचा त्यांनी  पुनरुच्चार केला. मातेचे आरोग्य केवळ तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी, विशेषतः तिच्या बाळासाठी महत्त्वाचे आहे. दोन दशकांपूर्वी जेव्हा गुजरातने मला सेवा करण्याची संधी दिली तेव्हा कुपोषण हे एक खूप मोठे आव्हान होते. तेव्हापासून आम्ही एकामागून एक या दिशेने काम करू लागलो, ज्याचे फलदायी परिणाम आज दिसत आहेत, असे ते म्हणाले. आदिवासी भागातील सिकलसेलच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की सप्टेंबर पोषण माह’-पोषण महिना म्हणून साजरा करण्याचा निर्णय गुजरातच्या महिलांना मदत करेल. पोषणाव्यतिरिक्त, स्वच्छ भारत आणि उज्ज्वला सारख्या योजनांच्या माध्यमातून  सरकारने महिलांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.

गुजरातमधील महिलांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठीनिर्णय घेण्यासाठी त्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांची व्यवस्थापन क्षमता समजून घेऊन गावाशी संबंधित अनेक प्रकल्पांमध्ये भगिनींना नेतृत्वाची भूमिका देण्यात आली आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात महिलांची मध्यवर्ती भूमिका सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचाही  पुनरुच्चार केला. जन धन खाते, मुद्रा योजना आणि स्वरोजगार योजना या उद्देशांसाठी  योगदान देत आहेत, असे  त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांही सांगितल्या. 7.5 लाख शहरी गरीब कुटुंबांना याआधीच घरे मिळाली आहेत. 4.5 लाख मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.  रास्त भाडे योजना आणि स्वानिधी योजना देखील ग्रामीण गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गाला मदत करत आहेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कल्याणकारी उपाययोजनांसोबतच राज्यातील औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही काम सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गुजरातमधील पर्यटन विकासाच्या उपाययोजनांमुळे वडोदऱ्याला  मोठा फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले. पावागड, केवडिया ही गावे पर्यटन केंद्रे  म्हणून विकसित झाली आहेत. वडोदऱ्यामध्ये  रेल्वे आणि विमान वाहतुकीच्या  पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय विद्यापीठ, रेल विद्यापीठ, बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ यामुळे  शैक्षणिक क्षेत्रात नवी ऊर्जा, चैतन्य येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

कार्यक्रमांचे तपशील:

पंतप्रधानांनी 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये  357 किमी लांबीची मालवाहतूक समर्पित मार्गिकेचा  न्यू पालनपूर मदार विभाग आहे. 166 किमी लांब अहमदाबाद-बोटाद  विभागाचे   गेजरूपांतरण; 81 किमी लांबीच्या पालनपूर - मिठा विभागाचे विद्युतीकरण या  कामाचा समावेश आहे.  सुरत, उधना, सोमनाथ आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी आणि रेल्वे क्षेत्रातील इतर उपक्रमांची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे लॉजिस्टिक’  खर्च कमी होण्यास आणि उद्योग आणि कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. तसेच  प्रदेशातील संपर्क व्यवस्‍थेमध्‍येही  सुधारणा होणार आहे; त्यामुळे प्रवाशांना मिळणा-या  सुविधा वाढणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, शहरी भागात सुमारे 1,800 कोटी रुपयांची घरे आणि ग्रामीण भागात 1,530 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरे यांच्यासह एकूण 1.38 लाख घरे पंतप्रधानांच्या हस्ते समर्पित करण्‍यात आली. याशिवाय 310 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 3000 घरांच्‍या कामाचा मुहूर्त करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी, पंतप्रधानांनी खेडाआणंद, वडोदरा, छोटा उदेपूर आणि पंचमहाल इथल्या 680 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण केले तसेच पायाभरणी केली.  या प्रदेशातील राहणीमान सुलभ करण्याचे उद्दिष्ट ही कामे करण्‍यामागे आहे.

 

गुजरातमधील दभोई तालुक्यातील कुंधेला गावात गुजरात केंद्रीय विद्यापीठाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. वडोदरा  शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेले हे विद्यापीठ सुमारे 425 कोटी रुपये खर्चून बांधले जाईल आणि यामुळे  2500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या गरजा पूर्ण करेल.

माता आणि बाल आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी मुख्यमंत्री मातृशक्ती योजनासुरू केली.  या योजनेसाठी 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत गरोदर आणि  स्तनदा मातांना दर महिन्याला अंगणवाडी केंद्रातून 2 किलो काबुली चणे, 1 किलो तूर डाळ आणि 1 किलो खाद्यतेल मोफत दिले जाणार आहे. पंतप्रधानांनी पोषण सुधा योजनेसाठी सुमारे 120 कोटी रुपये वितरित केले, त्याचा लाभ आता राज्यातील सर्व आदिवासी लाभार्थींना  मिळू शकणार आहे. यासाठीच  या  योजनेचा विस्‍तार केला आहे.  आदिवासी जिल्ह्यातील गरोदर आणि स्तनदा मातांना लोह  आणि कॅल्शियमच्या गोळ्या आणि पोषणाबाबतचे शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे पाऊल उचलण्‍यात आले आहे.

***

S.Kakade/S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835099) Visitor Counter : 243