पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या पारौंख गावात जाहीर कार्यक्रमात केलेले भाषण

Posted On: 03 JUN 2022 9:39PM by PIB Mumbai

 

नमस्कार!`

या गावाचे सुपुत्र, पारौंख गावाच्या मातीत जन्मलेले देशाचे राष्ट्रपती आदरणीय रामनाथ कोविंद जी, आदरणीय सविता कोविंद जी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्‍तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी, उत्‍तर प्रदेश मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि विशाल संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

राष्ट्रपतींनी जेव्हा मला सांगितले की मला यायचे आहे, तेव्हापासून मी तुमच्या गावात येऊन सर्वाना भेटण्याची वाट पाहत होतो. आज इथे येऊन मनाला समाधान मिळाले, खूप आनंद झाला. या गावाने राष्ट्रपतींचे बालपण देखील पाहिले आहे आणि मोठे झाल्यावर प्रत्येक भारतीयाचा गौरव बनताना देखील पाहिले आहे.

इथे येण्यापूर्वी राष्ट्रपतींनी मला या गावाशी संबंधित त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. मला समजले की पाचवी नंतर जेव्हा  5-6  मैल दूर असलेल्या गावातील शाळेत त्यांच्यासाठी प्रवेश घेण्यात आला, तेव्हा ते पायात चपला न घालता शाळेपर्यंत धावत जायचे. आणि हे धावणे आरोग्यासाठी नव्हते. तर उन्हामुळे बसणाऱ्या चटक्यांपासून वाचण्यासाठी ते धावायचे.

कल्पना करा, अशा तळपत्या उन्हात, पाचवीत शिकणारा एखादा मुलगा अनवाणी शाळेत धावत जातो. आयुष्यात असा संघर्ष, अशी तपश्चर्या माणसाला माणूस बनण्यात खूप मदत करते. आज राष्ट्रपतींच्या गावाला भेट देण्याचा हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यातील एका  सुखद आठवणीप्रमाणे आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा मी राष्ट्रपतींबरोबर विविध ठिकाणे पाहत होतो, तेव्हा मी पारौंखमध्ये भारतीय गावाच्या अनेक आदर्श प्रतिमा अनुभवल्या. इथे मला सर्वप्रथम पथरी मातेचा आशीर्वाद घेण्याची संधी लाभली. हे मंदिर या गावाची, या क्षेत्राची आध्यात्मिक आभा तर आहेच त्याचबरोबर  एक भारत-श्रेष्ठ भारतचे देखील प्रतीक आहे. आणि मी म्हणू शकतो की असे  मंदिर आहे जिथे देवभक्ती देखील आहे आणि देशभक्ती देखील आहे. आणि मी देशभक्ती यासाठी म्हणत आहे कारण राष्ट्रपतींच्या वडिलांच्या दृष्टिकोनाला मी प्रणाम करतो. त्यांच्या कल्‍पनाशक्तीला वंदन करतो. आपल्या आयुष्यात तीर्थयात्रा करणे, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणे, ईश्‍वराचे आशीर्वाद घेणे यासाठी ते घरातून बाहेर पडायचे. कधी बद्रीनाथला गेले, कधी केदारनाथला गेले, कधी अयोध्‍या, कधी काशी, कधी मथुरा, वेगवेगळ्या ठिकाणी गेले.

त्यावेळची त्यांची आर्थिक स्थिती अशी नव्हती की गावातील सर्व लोकांसाठी तिथून प्रसाद आणला असता, संपूर्ण गावाला वाटला असता. त्यावर त्यांची कल्‍पना अगदी मजेशीर होती, ते त्या तीर्थक्षेत्राहून त्या मंदिर परिसरातला एखादा दगड घेऊन यायचे. आणि तो इथे एका झाडाखाली ठेवायचे. आणि ज्या पवित्र ठिकाणाहून दगड आणला आहे, भारताच्या कानाकोपऱ्यातून दगड आणला आहे, त्याच्याप्रति एक भावना जागृत व्हायची. आणि गावकऱ्यांनी त्याची एखाद्या मंदिराप्रमाणे पूजा केली, हा या ठिकाणचा दगड आहे, हा अमुक ठिकाणचा दगड आहे, त्या मंदिर परिसरातला दगड आहे, हा त्या नदीकाठचा दगड आहे.   म्हणूनच मी म्हणतो की यात देवभक्ती देखील आहे आणि देशभक्ती देखील आहे.

राष्ट्रपतींचे वडील या मंदिरात पूजा करायचे. या पवित्र मंदिराचे दर्शन करताना स्वाभाविकपणे माझ्या मनात अनेक प्रकारचे विचार यायचे. आणि मी स्वतःला धन्य समजतो की मला त्या मंदिराचे दर्शन करण्याची संधी मिळाली आहे.

 

मित्रांनो,

परौंखच्या मातीतून राष्ट्रपतींना जे संस्कार मिळाले आहेत, त्याचे आज संपूर्ण जग साक्षीदार आहे. मी आज पाहत होतो की एकीकडे संविधान, दुसरीकडे संस्‍कार, आणि आज गावात  राष्‍ट्रपतींनी पदामुळे असलेले सर्व शिष्टाचार सोडून मला अचंबित  केले. ते स्वतः हेलिपॅडवर माझे स्वागत करायला आले. मला खूप लाजिरवाणे वाटत होते कारण त्यांच्या  मार्गदर्शनाखाली आम्ही  काम करत आहोत, त्यांच्या पदाची एक प्रतिष्ठा आहे, ते सर्वोच्च पद आहे.

मी म्हटले, राष्‍ट्रपती जी, आज तुम्ही माझ्यावर  अन्‍याय केलात, तर ते सहजपणे म्हणाले की, संविधानाच्या मर्यादांचे तर मी पालन करतो, मात्र कधी-कधी संस्‍कारांची देखील स्वतःची ताकद असते. आज तुम्ही माझ्या गावात आला आहात. मी इथे पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आलो आहे, मी राष्‍ट्रपती म्हणून आलेलो नाही. या गावातला लहान मुलगा म्हणून जिथून माझ्या आयुष्याला सुरुवात झाली, त्या गावाचा नागरिक म्हणून मी आज तुमचे स्‍वागत करत आहे. अतिथि देवो भव: चे संस्‍कार भारतात कशा प्रकारे आपल्या नसानसात भिनले आहेत, त्याचे उत्‍तम उदाहरण आज राष्ट्रपतींनी दाखवून दिले. मी राष्ट्रपतींना  आदरपूर्वक प्रणाम करतो.

राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित निवासस्थान त्यांनी  मिलन केंद्र म्हणून  विकसित करण्यासाठी दिले आहे.  आज ते सल्लामसलत आणि प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने महिला सक्षमीकरणाला नवीन बळ देत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून इथे अंबेडकर भवनच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शांचे प्रेरणा केंद्र देखील उभारण्यात आले आहे. मला विश्वास आहे, भविष्यात सामूहिक प्रयत्नातून पारौंख विकासाच्या मार्गावर आणखी वेगाने पुढे वाटचाल करेल आणि परिपूर्ण ग्रामीण विकासाचे मॉडेल देशासमोर सादर करेल.

 

मित्रांनो,

आपण कुठेही पोहचलो, मोठमोठी शहरे किंवा जगातील कुठल्याही कोपऱ्यात स्थायिक झालो तरीही जर आपण आपले गावातील जीवन जगलो असू, तर आपल्या अंतर्मनातून आपले गाव कधीही पुसले जाऊ शकणार नाही. ते आपल्या नसानसात असते, ते आपल्या विचारात कायम राहते. म्हणूनच आपण म्हणतो की  भारताचा  आत्मा गावात आहे कारण गाव आपल्या आत्म्यात वसलेले आहे.

आज जेव्हा  देश आपल्या स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा ग्रामीण भारतासाठी, आपल्या गावांसाठी आपली स्वप्ने आणखी महत्वपूर्ण ठरतात. आपल्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान  महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्याला भारताच्या गावांशी जोडण्याची कल्पना करायचे. भारतातले  गाव म्हणजे जिथे अध्यात्मही असेल आणि आदर्शही असतील. भारतातील गावात परंपरा असतील आणि  प्रगतिशीलता देखील असेल. भारताचे गाव  म्हणजे जिथे संस्कारही असतील आणि सहकारही असेल.  जिथे  समता देखील असेल आणि  ममता देखील असेल !

आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात अशा गावांची पुनर्रचना, त्यांचे पुनर्जागरण हे आपले कर्तव्य आहे. आज हाच संकल्प घेऊन देश गाव, शेतकरी, गरीब आणि पंचायती लोकशाहीसाठी विविध प्रकारे काम करत आहे.  आज भारतातील गावांमध्ये सर्वात वेगाने रस्ते बांधले जात आहेत. आज भारतातील गावांमध्ये वेगाने ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरले जात आहे. आज भारतातील गावांमध्ये वेगाने घरे उभी राहत आहेत, एलईडी पथदिवे लावण्यात येत आहेत, शहरांबरोबर आपली गावे देखील विकासाच्या प्रत्येक मार्गावर बरोबरीने पाऊल टाकेल हा नवभारताचा विचारही आहे आणि नव्या भारताचा संकल्प देखील आहे.

तुम्ही विचार करा, कधी कुणी  कल्पना केली होती की एक दिवस शेतीशी संबंधित कठीण कामे आता ड्रोनच्या माध्यमातून व्हायला सुरुवात होईल.  मात्र  आज देश या दिशेने पुढे जात आहे. मला सांगण्यात आले आहे की इथे या गावातही 300 पेक्षा अधिक लोकांना  स्वामित्व अंतर्गत मालकी हक्क देण्यात आले आहेत. मालमत्ता दस्तावेज देण्यात आले आहेत.  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि उत्पन्न दोन्ही कसे वाढेल या दिशेने वेगाने काम केले जात आहे.

 

मित्रहो,

आपल्या गावांमध्ये सर्वाधिक क्षमता आहे, सर्वाधिक श्रमशक्ती आहे आणि सर्वोच्च समर्पणदेखिल आहे. म्हणूनच भारतातील गावांचे सक्षमीकरण हे आपल्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांवरील गोष्टींपैकी एक आहे. जनधन योजना असो, गृहनिर्माण योजना असो, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळालेली गॅस जोडणी असो, घरोघरी पाणी मोहीम असो, आयुष्मान भारत योजना असो, या सर्वांचा लाभ करोडो ग्रामस्थांना झाला आहे. देशाने ज्या वेगाने गरिबांच्या कल्याणासाठी काम केले आहे ते अभूतपूर्व आहे.

आता देशाचे एक ध्येय आहे, प्रत्येक योजनेचा 100 टक्के लाभ 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, म्हणजेच शतप्रतिशत सक्षमीकरण. यात कोणताही भेदभाव नाही, अथवा काही फरक नाही! हाच तर आहे बाबासाहेबांचे सामाजिक न्याय. समरसता आणि समतेचे हेच ते स्वप्न होते, ज्याच्या आधारे त्यांनी आपल्याला आपली राज्यघटना दिली. बाबासाहेबांचे ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. त्या दिशेने देशाची पुढे वाटचाल सुरू आहे.

 

मित्रांनो,

आजचा प्रसंग आणखी एका गोष्टीसाठी ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकासाठी लक्षात घेण्याजोगी आहे, कारण ती देशाच्या लोकशाहीची ताकद, देशातील गावांची ताकद यांना एकाचवेळी दर्शवते. आदरणीय राष्ट्रपतीजी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेलजी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी या मंचावर उपस्थित आहेत. तुम्ही, तुम्हा सर्व देशवासियांनी देशसेवेची एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आम्ही चौघेही जण हे कुठल्यातरी एखाद्या छोट्या गावातून किंवा शहरातून बाहेर पडून इथे पोहोचलो.

माझाही जन्म गुजरातमधील एका छोट्या गावात झाला. गावातील संस्कृती, संस्कार आणि आपल्या आय़ुष्यात आलेले संघर्ष यातून आमच्यासारख्या कित्येकांना घडवले, आमच्यावरील संस्कारांना दृढ केले. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. भारतात खेड्यात जन्माला आलेला गरीब माणूसही राष्ट्रपती-पंतप्रधान-राज्यपाल-मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचू शकतो.

 

पण बंधू आणि भगिनींनो,

आज आपण लोकशाहीच्या या सामर्थ्याची चर्चा करत असताना आपल्याला यासमोर उभ्या असलेल्या घराणेशाहीसारख्या आव्हानांपासूनही सावधान राहाण्याची आवश्यकता आहे. केवळ राजकारणातच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात प्रतिभांची गळचेपी करून त्यांना प्रगती करण्यापासून रोखण्यास ही घराणेशाहीच कारणीभूत आहे.

 

मित्रांनो,

मी जेव्हा घराणेशाहीच्या विरोधात बोलतो तेव्हा काही लोकांना वाटते की हे राजकीय वक्तव्य आहे आणि मी कोणत्यातरी एखाद्या राजकीय पक्षाविरुद्ध बोलत आहे, असा प्रचार केला जातो. माझ्या घराणेशाहीच्या व्याख्येत तंतोतंत बसणारे लोक माझ्यावर क्रुद्ध झालेले, रागावलेले दिसतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील हे घराणेशाहीचे पुरस्कर्ते आता माझ्याविरोधात एकवटत आहेत. मोदींच्या घराणेशाहीविरोधातील शब्दांना देशातील तरुण एवढ्या गांभीर्याने का घेत आहेत, याबद्दलही त्यांना राग आहे.

 

मित्रहो,

मी या लोकांना सांगू इच्छितो की माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावू नका. माझी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीविषयी वैयक्तिक नाराजी नाही. किंबहुना देशात मजबूत विरोधी पक्ष असावा, लोकशाहीला वाहिलेले राजकीय पक्ष असावेत, अशीच माझी इच्छा आहे. घराणेशाहीच्या विळख्यात अडकलेल्या पक्षांनी या आजारातून स्वत:ला मुक्त करावे, स्वत:च स्वत:ला बरे करावे असे मला वाटते. तरच भारताची लोकशाही मजबूत होईल आणि देशातील तरुणांना राजकारणात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळेल.

खरंतर, मी घराणेशाहीची पाठराखण करणाऱ्या पक्षांकडून ही अंमळ जास्तच अपेक्षा करतो आहे. म्हणूनच, मी तुमच्यासमोर हेही सांगेन की, देशात घराणेशाहीसारखी दुष्प्रवृत्ती वाढू न देणे ही आपली जबाबदारी आहे. गावातील गरिबांचा मुलगा, गावातील गरिबांची मुलगीही राष्ट्रपती-पंतप्रधान होऊ शकते, यासाठी घराणेशाहीच्या पुरस्कर्त्या पक्षांना आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे.

 

मित्रहो,

आज राष्ट्रपतींच्या या गावात येऊन मी आपल्याकडून भेट म्हणून काहीतरी मागायला आलोय, मला काहीतरी मागायचंय. तुम्हाला वाटेल हा कसला पंतप्रधान आहे, आमच्या गावात आला, काहीही आणला आणि आमच्याकडूनच मागत आहे. मी मागत आहे, तुम्ही द्याल ना...मी गावाकडून मागितले तर मिळेल. ना... ज्या ज्या गावातून लोक आले आहेत तेही देतील ना. पाहा तुम्ही तुमच्या गावात एवढा विकास केला आहे.

आज जेव्हा देश.. आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे, तेव्हा तुम्हाला तुमचे प्रयत्न वाढवावे लागतील. अमृतकालाच्या दरम्यान, देशाने संकल्प सोडला आहे की देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांधले जातील. आणि आत्ताच योगीजी सांगत होते की पारौंख येथेही दोन अमृत सरोवरे बांधली जात आहेत. या अमृत सरोवराच्या उभारणीसाठी तुम्हीही मदत करायची आहे, कारसेवा करायची आहे आणि त्याची भव्यताही राखायची आहे, असे आवाहन मी करतो.

माझी तुमच्याकडे आणखी एक मागणी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही माझी ही मागणीही पूर्ण कराल आणि ती म्हणजे नैसर्गिक शेती, नॅचरल फार्मिंग. पारौंख गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास तो देशासाठी एक उत्तम वस्तुपाठ ठरेल.

 

मित्रहो,

भारताच्या यशाचा एकच मार्ग आहे - सर्वांचे प्रयत्न. स्वावलंबी भारताचे स्वप्नही सामूहिक प्रयत्नांनीच पूर्ण होईल. आणि, आत्मनिर्भर भारताचा अर्थ आहे आत्मनिर्भर गावे, स्वावलंबी तरुण. आपल्या गावांनी वेग घेतला तर देश वेग घेईल. आपल्या गावांनी विकास केला तर देशचाही विकास साधला जाईल.

आदरणीय कोविंदजींच्या रूपाने देशाला राष्ट्रपती देणाऱ्या पारौंख या गावाने हे सिद्ध केले आहे की, खेड्यापाड्याच्या मातीत किती सामर्थ्य असते. या क्षमतेचा, या प्रतिभेचा आपल्याला योग्य तो उपयोग करून घ्यायचा आहे. आपण सर्व मिळून काम करू, आणि देशाची स्वप्ने पूर्ण करू.

याच संकल्पासह, आदरणीय राष्ट्रपतींनी मला आपल्यासोबत येथे येण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. मी  तुम्हा सर्वांचेही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि गावातील प्रत्येक गल्लीत जिथे कुठे मी गेलो, ज्या उत्साहाने आणि उमेदीने आपण माझे स्वागत केले, फुलांचा वर्षाव केला, स्नेहाचा वर्षाव केला, आपल्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. आपले हे प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. आपण केलेले हे स्वागत मी कधी विसरू शकणार नाही. आणि जितका वेळ मला गावात व्यतीत करायला मिळाला, तितका वेळ मी माझ्या स्वतःच्या बालपणाशीही जोडला गेलो. म्हणूनच मी तुम्हा गावकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून माझे भाषण संपवतो.

खूप खूप आभार!

***

S.Thakur/S.Kane/S.Auti/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831336) Visitor Counter : 182