पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कानपूरच्या पारौंख गावात पंतप्रधानांनी सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले


पारौंख हे राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित गाव

“परौंख हे एक भारत श्रेष्ठ भारताचे उत्तम उदाहरण आहे”

"राष्ट्रपती 'संविधान' आणि 'संस्कार' या दोन्हींना मूर्त रूप देतात"

“खेड्यात जन्मलेला गरीब माणूसही भारतात राष्ट्रपती-पंतप्रधान-राज्यपाल-मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचू शकतो”

"भारतातील गावांचे सक्षमीकरण हे आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे"

" गरीबांच्या कल्याणासाठी अभूतपूर्व वेगाने काम केले आहे"

“माझी इच्छा आहे की घराणेशाहीच्या तावडीत अडकलेल्या पक्षांनी स्वतःला या रोगापासून मुक्त करावे आणि स्वतःला बरे करावे. तसे केले तरच भारताची लोकशाही मजबूत होईल आणि देशातील तरुणांना राजकारणात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळेल

Posted On: 03 JUN 2022 6:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासमवेत कानपूरच्या पारौंख गावातल्या पाथरी माता मंदिरात भेट दिली. त्यानंतर त्यांनी डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला आणि मिलन केंद्राला भेट दिली. मिलन केंद्र हे राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित निवासस्थान आहे. ते सार्वजनिक वापरासाठी दान केले गेल्यानंतर त्याचे रूपांतर सामुदायिक केंद्रात (मिलन केंद्र) झाले. पारौंख गावातील सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

ज्या गावाने राष्ट्रपतींचे बालपण पाहिले आणि त्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर जाताना पाहिले त्या गावाला भेट देऊन मला आनंद होत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.  या भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी आपल्यासोबत शेअर केलेल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. राष्ट्रपतींच्या जीवन प्रवासातील बलस्थानांचे त्यांनी कौतुक केले.

पारौंखमध्ये आदर्श गावांची ताकद जाणवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हे गाव एक भारत श्रेष्ठ भारताचे उत्तम उदाहरण आहे. पाथरी माता मंदिर हे देव भक्ती आणि देश भक्ती या दोन्हींचे प्रतिनिधित्व करते. राष्ट्रपतींच्या वडिलांच्या विचारप्रक्रियेला आणि कल्पनेला तसेच त्यांची तीर्थयात्रेची तळमळ आणि संपूर्ण देशातील श्रद्धास्थानांवरून दगड आणि श्रद्धेचे साहित्य आणण्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम याला पंतप्रधानांनी नमन केले.पारौंख गावच्या मातीतून राष्ट्रपतींना मिळालेले संस्कार आज जग पाहत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘संविधान’ आणि ‘संस्कार’ या दोन्हींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल मोडून आणि हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करून पंतप्रधानांना आश्चर्यचकित केले. पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या 'संस्कारांचे' आपण पालन करत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे आभार मानले.

आज सल्लामसलत आणि प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने ‘मिलन केंद्र’ महिला सक्षमीकरणाला ते नवीन बळ देत आहे. तसेच डॉ.बी.आर.आंबेडकर भवन बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शांचा प्रचार करत आहे. गावातील लोकांच्या सामूहिक प्रयत्नातून पारौंखचा विकास होतच जाईल आणि एक परिपूर्ण गावाचे मॉडेल देशासमोर येईल, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताचे स्वातंत्र्य महात्मा गांधी गावांशी जोडून पाहत असत. भारतातल्या गावात अध्यात्म आहे , जिथे अध्यात्म आहे, तिथे आदर्शही असले पाहिजेत. भारतातील गावात परंपरा आहेत, तिथे प्रगतीही आहे. भारताचे खेडे म्हणजे जिथे संस्कृती आहे, तिथे सहकारही हवा. जिथे प्रेम आहे तिथे समता आहे. अमृतकाळाच्या या काळात अशा गावांना बळ देण्याची गरज आहे. गाव, शेतकरी, गरीब आणि पंचायती लोकशाहीसाठी काम करण्याच्या या संकल्पाने देश पुढे जात आहे, असेही ते म्हणाले. आमच्या गावांमध्ये सर्वात जास्त क्षमता, श्रमशक्ती आणि सर्वोच्च समर्पण आहे. म्हणूनच भारतातील गावांचे सक्षमीकरण हे आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे, असे ते म्हणाले. जन

प्रधानमंत्री जनधन योजना, उज्ज्वला आणि हर घर जल यांसारख्या योजनांचा लाभ कोट्यवधी ग्रामीण लोकांना झाला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 "देशाने गरीबांच्या कल्याणासाठी अभूतपूर्व वेगाने काम केले आहे", असे त्यांनी सांगितले. आता सर्व योजनांचा 100 टक्के लाभ 100 टक्के लोकांपर्यंत पोहोचवण्याचा देशाचा प्रयत्न आहे. योजनांच्या संपृक्ततेला आता उच्च प्राधान्य आहे. यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्वांचे सक्षमीकरण होईल, असे ते म्हणाले.

भारतीय लोकशाहीच्या ताकदीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी मंचावरील चारही मान्यवर, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि यूपीचे मुख्यमंत्री हे खेड्यापाड्यातून किंवा छोट्या शहरांमधून उदयास आले आहेत, याकडे लक्ष वेधले. आमचा संघर्ष आणि गरिबी आणि ग्रामजीवनाशी थेट संपर्क यामुळे आमच्या संस्कारांना बळ मिळाले आहे, हीच आमच्या लोकशाहीची ताकद आहे, "भारतात खेड्यात जन्मलेला गरीब माणूसही राष्ट्रपती-पंतप्रधान-राज्यपाल-मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचू शकतो" असे मत त्यांनी मांडले.

लोकशाहीच्या बळाच्या संदर्भात पंतप्रधानांनी घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध इशारा दिला. ते म्हणाले की, घराणेशाहीचे राजकारण हे केवळ राजकारणातच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभांचा गळा घोटून टाकते आणि नवीन प्रतिभेला वाढण्यापासून रोखते.  कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही व्यक्तीविषयी आपल्याला वैयक्तिक द्वेष नाही. देशात मजबूत विरोधी पक्ष असावा आणि लोकशाहीला वाहिलेले राजकीय पक्ष असावेत, अशी माझी इच्छा आहे,

 ते पुढे म्हणाले, घराणेशाहीच्या तावडीत अडकलेल्या पक्षांनी या आजारातून स्वत:ची सुटका करून स्वत:ला सावरावे असे मला वाटते. तरच भारताची लोकशाही मजबूत होईल, देशातील तरुणांना राजकारणात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळेल.

पंतप्रधानांनी गावकऱ्यांना गावात अमृत सरोवर बांधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासही सांगितले. सबका प्रयास हा भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग आहे आणि आत्मनिर्भर गाव ही आत्मनिर्भर भारताची गुरुकिल्ली आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

 

G.Chippalkatti/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830923)