नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उच्च कार्यक्षमतेच्या सौर पीव्ही प्रणालीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी भारत वचनबद्ध : भगवंत खुबा


इंटरसोलर युरोप 2022 मध्ये “भारताची सौरऊर्जा बाजारपेठ ” या विषयावर नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांचे मुख्य भाषण

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी भारताकडून उत्तम संधी ; भारतात 196.98 अब्ज डॉलर्स मूल्याचे प्रकल्प सुरू

Posted On: 13 MAY 2022 3:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2022

 

जर्मनीतील म्युनिच येथे आयोजित इंटरसोलर युरोप 2022 मध्ये ,केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री भगवंत खुबा उपस्थित होते. गुंतवणूक प्रोत्साहन कार्यक्रमात त्यांनी  'भारताची सौरऊर्जा बाजारपेठ या विषयावर मुख्य भाषण केले.

कॉप -26 दरम्यान पंतप्रधान मोदीजींनी मांडलेल्या महत्त्वाकांक्षी पंचामृत उद्दिष्टांनुसार, भारत 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्यासाठी आणि 2030 पर्यंत 500 गिगावॅट गैर -जीवाश्म स्रोतांपासून ऊर्जा  निर्मिती क्षमता  स्थापित करण्यासाठी सज्ज आहे असे भगवंत खुबा यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, भारतातील अपार नवीकरणीय ऊर्जा संसाधन क्षमता आणि बळकट धोरणात्मक पाठबळ हे भक्कम पाया प्रदान करतात, असे खुबा म्हणाले.

भारताने गेल्या 7 वर्षात नवीकरणीय ऊर्जा क्षमतेची आश्चर्यकारक वाढ पाहिली आहे आणि 2030 च्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा 9 पूर्ण वर्षे अगोदरच , 2021 मध्ये भारताने गैर -जीवाश्म इंधनातून 40% एकत्रित विद्युत क्षमतेचे लक्ष्य गाठले आहे.महत्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने, भारत सरकार सौर पीव्ही प्रणाली क्षेत्रात देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. देशांतर्गत पीव्ही उत्पादन क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

भारत उच्च कार्यक्षमतेच्या सौर पीव्ही प्रणालीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे यासाठी एकूण 24,000 कोटी रुपये खर्च आहे.

हरित हायड्रोजन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताकडून अंदाजे 25,425 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हरित हायड्रोजन अभियानाच्या माध्यमातून वार्षिक 4.1 दशलक्ष टन हरित हायड्रोजन उत्पादन अपेक्षित आहे, यावर त्यांनी बोलताना भर दिला.

 भारत गुंतवणुकीसाठी उत्तम संधी देत आहे, सध्या भारतात सुमारे 196.98 अब्ज डॉलर्स मूल्याचे प्रकल्प सुरू आहेत. भारत जगाला देत असलेल्या संधीचा उपयोग करण्यासाठी ,मी पुन्हा एकदा सर्व विकसित देशांना आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना आमंत्रित करतो’, सेही  खुबा  यांनी  सांगितले.

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1825067) Visitor Counter : 240