माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

75 व्या कान चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांची नावे जाहीर


या महोत्सवात रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर होणार

‘गोदावरी’या मराठी चित्रपटासह हिंदी, तमिळ, मल्याळम आणि मिशिंग भाषेतील चित्रपट केंद्रस्थानी असतील

Posted On: 12 MAY 2022 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 12 मे 2022

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 75 व्या कान चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर केली. सुप्रसिध्द अभिनेते आर माधवन यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्यांची भूमिका असणाऱ्या रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट या चित्रपटाचा जागतिक पातळीवरील प्रिमियर हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा चित्रपट पलाइस के या चित्रपटगृहात सदर होणार असून या महोत्सवात सादर होणारे इतर चित्रपट ऑलिम्पिया चित्रपट गृहात प्रदर्शित केले जातील.

रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट हा आर. माधवन निर्मित आणि दिग्दर्शित चित्रपट हिंदी, इंग्लिश आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिध्द सुपरस्टार आणि बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याने एका टी.व्ही. कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीतून नम्बी नारायणन याची जीवन कथा आपल्यासमोर उलगडत जाते. त्याची बुद्धीमत्ता आणि त्याने घेतलेला  ध्यास यांच्यामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण होतात आणि त्या संघर्षातून तो आधुनिक नायक म्हणून कसा घडतो याची कथा या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. आपल्या समाजातील निरागस आणि दुर्बल व्यक्तींसाठी आपण सत्तेच्या वर्चस्वाला विरोध करण्याच्या उद्देशाने एकत्र का येत नाही असा प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांना विचारतो.

या कान महोत्सवात दिग्दर्शक निखील महाजन यांचा गोदावरी हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे

गोदावरी या चित्रपटातील कथा महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठच्या शहरात राहणाऱ्या निशिकांत देशमुख या व्यक्तीची आहे. निशी आणि त्याचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून घरभाडे घेत असतात.जुन्या शहराच्या एका भागात त्यांचा मोठा जमीन जुमला असतो. त्याचे आजोबा नारोपंत यांना स्मृतिभ्रंश झालेला  आहे तर त्याचे वडील नीलकंठ यांना  विस्मृतीचा छंद आहे. जुन्या शहरातील जीवनपद्धती आणि स्वतःच्या जीवनाच्या व्यर्थतेवर तो चिडतो आणि त्याचा राग भाडेकरू आणि शहराची परिस्थिती यावर काढत राहतो. बायको-मुलीला स्वतःच्या पालकांसोबत जुन्या वाड्यात सोडून आलेला निशी भाडे गोळा करतो आणि नदीपासून दूर असलेल्या त्याच्या छोट्या घरात राहून नदीवर आणि त्यासोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चिडत राहतो.

मात्र, जीवन आणि मृत्यू हे नेहमीच योगायोगाने होतात, ते परस्परांशी जोडलेले असतात आणि ज्या शहरात एखाद्याचा मृत्यू हे अनेकांच्या जीवनाचे साधन असते तिथे हे एकत्रीकरण अधिकच स्पष्टपणे जाणवते याचा साक्षात्कार नायकाला होण्याची गोष्ट म्हणजे चित्रपट.

या दोन चित्रपटांसह अल्फा,बीटा,गामा हा शंकर श्रीकुमार दिग्दर्शित हिंदी चित्रपट, विश्वजित बोरा यांचा मिशिंग भाषेतील बुम्बा राईड हा चित्रपट, अचल मिश्रा यांचा धुईन हा हिंदी आणि मराठी भाषेत सादर होणारा चित्रपट तसेच जयराज दिग्दर्शित ट्री फुल ऑफ पॅरेट्स हा मल्याळम भाषेतील चित्रपट याचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे.

 
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1824832) Visitor Counter : 204