पंतप्रधान कार्यालय
सेमिकॉन इंडिया 2022 परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
29 APR 2022 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2022
नमस्कार
नमस्कार बेंगळूरू!
नामासाक्र सेमिकॉन इंडिया!
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमिकंडक्टर उद्योगातील महत्त्वाचे नेते, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ञ, राजकीय संघटनांचे सदस्य आणि मित्रांनो,
सेमिकॉन इंडिया परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी तुम्हां सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारतात अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन होत आहे ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत सुखावह आहे. याचे कारण असे की, आपल्या कल्पनेच्या पलीकडील कितीतरी मार्गांनी सेमिकंडक्टर्स जगभरात आज महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारताला जागतिक पातळीवरील सेमिकंडक्टर पुरवठा साखळीतील एक महत्त्वाचा भागीदार म्हणून प्रस्थापित करणे हे आपले सामुदायिक लक्ष्य आहे. उच्चदर्जाचे तंत्रज्ञान, उत्तम दर्जा आणि सर्वोच्च पातळीवरील विश्वासार्हता या तत्वांचा आधार घेऊन या दिशेने वाटचाल करायची आहे.
मित्रांनो,
भारत सेमिकंडक्टर्स तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठीचा आकर्षक पर्याय असण्याची सहा मुख्य कारणे मला दिसतात. पहिले म्हणजे आपण 1.3 अब्ज भारतीयांना जोडण्यासाठी डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारत आहोत. तुम्ही सर्वांनी, भारताची आर्थिक समावेशकता, बँकिंग आणि डिजिटल भरणा प्रणालीतील क्रांतीविषयी ऐकलेच असेल. यूपीआय अर्थात एकात्मिक भरणा प्रणाली ही आजघडीला देय रकमेचा भरणा करण्यासाठीची जगातील सर्वात कार्यक्षम पायाभूत सुविधा आहे. आरोग्य आणि स्वास्थ्यापासून ते समावेशकता आणि सक्षमीकरण अशा प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.
आपण जगातील दरडोई अधिक प्रमाणात डाटा वापरणाऱ्या ग्राहकांपैकी एक आहोत. आणि आपण हे प्रमाण वाढवितच नेणार आहोत. दुसरे कारण म्हणजे, तंत्रज्ञानविषयक आगामी क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे. लवकरच, देशातील सहा लाख गावे ब्रॉडबँडने जोडली जातील. आपण 5जी, आयओटी आणि स्वच्छ उर्जा तंत्रज्ञान यामध्ये अधिक क्षमता विकासित करण्यासाठी गुंतवणूक करीत आहोत. डाटा, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि इतर तंत्रज्ञान यांच्यात नवोन्मेषाची पुढील लाट आणण्याच्या दृष्टीने आपण कार्यरत आहोत. तिसरे कारण म्हणजे, भारत एका मजबूत आर्थिक विकासाच्या दिशेने निघालेला आहे. आपल्याकडे जगातील सर्वात वेगाने विकास पावणारी स्टार्ट-अप परिसंस्था आहे. काही आठवड्यांच्या कालावधीत नवनवे युनिकॉर्न निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत. भारतामध्ये होणाऱ्या सेमिकंडक्टर्सच्या वापराने वर्ष 2026 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठलेला असेल तर 2030 सालापर्यंत 110 अब्ज डॉलर्स मूल्याच्या सेमिकंडक्टर्सचा वापर भारतात होऊ लागेल असा अंदाज आहे.
जगभरातील देशांनी सेमिकंडक्टर्स तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारताची निवड करण्याचे चौथे कारण म्हणजे भारतात व्यवसाय करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपण विस्तृत प्रमाणात सुधारणा हाती घेतल्या आहेत. गेल्या वर्षी आम्ही 25,000 नियम रद्द केले आणि परवान्यांच्या स्वयं-नूतनीकरण प्रक्रियेला चालना दिली. त्याचप्रमाणे, प्रणालींचे डिजिटलीकरण झाल्यामुळे नियामकीय चौकटीला अधिक वेग आणि पारदर्शकता मिळत आहे. आज, आपल्या देशात जगातील सर्वात अनुकूल कररचना अस्तित्वात आहे. पाचवे कारण म्हणजे, आपल्या देशाच्या 21 व्या शतकातील गरजा भागविण्यासाठी आपण आपल्या तरुणांना कुशल आणि प्रशिक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहोत. आपल्याकडे सेमिकंडक्टर्सचे संरेखन करणाऱ्या अत्युत्कृष्ट प्रतिभावंतांचा मोठा वर्ग आहे, जगातील एकूण सेमिकंडक्टर्सचे संरेखन करणाऱ्या अभियंत्यांपैकी 20% अभियंते भारतात आहेत. जगातील 25 सर्वोत्कृष्ट सेमिकंडक्टर्स संरेखक कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्यांच्या संशोधन आणि विकास विषयक प्रयोगशाळा भारतात आहेत. आणि सहावे कारण म्हणजे, भारताच्या उत्पादन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने आपण अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शतकातून एकदा कोसळणाऱ्या अभूतपूर्व महामारीच्या आपत्तीशी संपूर्ण मानवजात लढत असताना, भारत सरकार केवळ देशाच्या जनतेचेच नव्हे तर आपल्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्याच्या कार्यात गुंतले होते.
मित्रांनो,
आपल्या “उत्पादन संलग्न अनुदान” योजनेतून महत्वाच्या 14 क्षेत्रांमध्ये 26 अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची अनुदाने देता येतील. येत्या 5 वर्षांत, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात विक्रमी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. नुकतीच आपण 10 अब्ज डॉलर्सचा सेमि-कॉन इंडिया कार्यक्रमाची घोषणा केली. सेमिकंडक्टर्स, डिस्प्ले उत्पादन आणि डिझाईन परिसंस्था या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत पुरविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सेमिकंडक्टर्स परिसंस्थेची भरभराट होण्यासाठी सरकारकडून पुरेसे पाठबळ मिळण्याची सुनिश्चिती होणे गरजेचे आहे याची आम्हांला जाणीव आहे. सेमिकंडक्टर्सच्याच भाषेत आम्हांला आमचा दृष्टीकोन मांडण्याची परवानगी मी तुमच्याकडून मागतो आहे. पूर्वीच्या काळात, विविध उद्योग त्यांचे काम करण्यास तयार होते पण सरकारची मात्र “नॉट गेट” म्हणजे नकारात्मक भूमिका होती.
जेव्हा कोणताही गुंतवणुकीचा ओघ “नॉट गेट” मध्ये वाहायला लागतो तेव्हा नकारात्मकतेमुळे तो काही परिणाम साधू शकत नसे. अनेक अनावश्यक नियम अस्तित्वात होते आणि व्यवसाय करण्यातील सुलभता तर नव्हतीच. पण आम्हांला हे समजते आहे की सरकारची भूमिका “अँड गेट” म्हणजे सकारात्मक हवी. जेव्हा उद्योगक्षेत्र मेहनतीने काही उभारत असते तेव्हा सरकारने देखील अधिक मेहनत घ्यायला हवी. मी तुम्हांला खात्री देऊ इच्छितो की, आम्ही भविष्यात देखील उद्योग क्षेत्राला पाठबळ पुरवीत राहू. सेमिकॉन इंडिया कार्यक्रम या परिसंस्थेमधील सेमिकंडक्टर्सचे सेमि-कंडक्टर फॅब, डिस्प्ले फॅब, संरेखन, जुळवणी,चाचणी, विपणन आणि पॅकेजिंग या विविध विभागांच्या कार्याच्या परिचालनाला उत्तम प्रकारे न्याय देईल याची काळजी आम्ही घेतली आहे.
मित्रांनो,
नव्या जागतिक व्यवस्थेची उभारणी होत आहे आणि आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण विकासाला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. तंत्रज्ञान आणि जोखीम स्वीकारण्याची भूक भारताकडे आहे. आश्वासक धोरणांच्या वातावरणाच्या माध्यमातून आपण सर्व घटकांना, तुमच्या बाजूने असतील अशा प्रकारे घडविले आहे. आम्ही दाखवून दिले आहे की, भारत म्हणजे व्यापार! आता, तुम्ही पुढाकार घेण्याची गरज आहे.
मित्रांनो,
येत्या काही वर्षांमध्ये भारताला सेमि-कंडक्टर्सचे जागतिक केंद्र म्हणून घडविण्याच्या दृष्टीने आम्ही काय करू शकतो याबद्दल तुम्हां सर्वांकडून व्यवहार्य सूचना येतील अशी अपेक्षा मी करतो आहे.या परिषदेच्या माध्यमातून आम्ही या विषयातील तज्ञांशी संवाद साधू इच्छितो. चैतन्यमय सेमि-कंडक्टर्सची परिसंस्था उभारण्यासाठी आणखी काय करता येईल हे समजून घेण्यासाठी आम्ही सर्व भागधारकांच्या सहकार्याने काम करू. येणाऱ्या नव्या भविष्यकाळात भारताला मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा समृध्द चर्चा या परिषदेत होतील असा विश्वास मला वाटतो आहे.
धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
नमस्कार
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821396)
Visitor Counter : 164
Read this release in:
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada