पंतप्रधान कार्यालय
आसामच्या दिफु इथं शांतता आणि विकास सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
28 APR 2022 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2022
भारत माता की जय, भारत माता की जय!
कार्बी आंग-लोंग कोरटे इंगजिर, के-डो अं-अपहान्ता, नेली कारडोम पजीर इग्लो।
आसामचे राज्यपाल श्री जगदीश मुखी जी, आसामचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री हिमंत बिस्वा सरमा जी, कार्बी नरेश श्री रामसिंग रोंगहांग जी, कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेचे श्री तुलीराम रोंगहांग जी, आसाम सरकारचे मंत्री, श्री पियुष हजारिका जी, जोगेन मोहन जी, संसदेतले माझे सहकारी श्री होरेण सिंग बे जी, आमदार श्री भावेश कलिता जी, इतर सर्व लोकप्रतिनिधी गण आणि कार्बी आंगलोंगच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
मला जेव्हा जेव्हा आपल्यात येण्याची संधी मिळाली, आपलं भरपूर प्रेम, आपण दाखवलेला आपलेपणा, असं वाटतं की देव आशीर्वाद देतो आहे. आज देखील इतक्या मोठ्या संख्येने आपण इथं आलात, दूर - दुरून आम्हाला आशीवाद द्यायला आलात आणि ते देखील आनंद, उत्साह आणि उत्सव असल्याप्रमाणे आपल्या रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषा करून आलात आणि ज्या प्रकारे इथं प्रवेशव्दारावर इथल्या सर्व जाती जमातींनी आपल्या परंपरेनुसार आम्हा सर्वांना जे आशीर्वाद दिले आहेत, मी मनापासून आपल्याला अनेक अनेक धन्यवाद देतो.
बंधू आणि भगिनींनो,
हा एक सुखद योगायोग आहे की आज जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे, तेव्हा आपण मातृभूमीचे महान सुपुत्र लचित बडफुकन जी यांची 400 वी जयंती देखील साजरी करत आहोत. त्याचं आयुष्य राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राशक्तीची प्रेरणा आहे. कार्बी आंगलोंग इथून देशाच्या या महान नायकाला मी आदरपूर्वक नमन करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रांनो,
भाजपाचं डबल इंजिनचं सरकार, जिथे असेल तिथे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याच भावनेनं काम करत असतं. हा संकल्प आज कार्बी आंगलोंगच्या धरतीवर पुन्हा एकदा सशक्त झाला आहे. आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता नांदावी आणि वेगाने विकास व्हावा, यासाठी जो करार झाला होता, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगानं काम होत आहे. त्या करारानुसार 1000 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आज इथं करण्यात आली आहे. पदवी महाविद्यालय असो, पशुवैद्यकीय महाविद्यालय असो, कृषी महाविद्यालय असो, या सगळ्या संस्था इथल्या युवकांना नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आहेत.
मित्रांनो, आज जो पायाभरणी कार्यक्रम झाला आहे तो केवळ या इमारतीच्या पायाभरणीचा नाही. हा केवळ कुठल्या महाविद्यालयाचा, कुठल्या संस्थेच्या पायाभरणीचा नाही. ही इथल्या माझ्या तरुणाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. उच्च शिक्षणाची आता इथेच योग्य व्यवस्था झाल्यानं गरीबातले गरीब कुटुंब देखील आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकेल. तसंच शेतकरी आणि पशुपालकांसाठी देखील या संस्थांमधून उत्तम सुविधा उपलब्ध होऊ शकतील. या प्रकल्पांशिवाय कराराचे जे इतर पैलू आहेत त्यांच्यावर देखील आसाम सरकार सातत्यानं काम करत आहे. हत्यारं खाली ठेऊन जे राष्ट्रनिर्माणासाठी परत येत आहेत, त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील सातत्यानं काम केलं जात आहे.
बंधू आणि भगिनींनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाने जे संकल्प केले आहीत, त्यात एक अतिशय महत्वपूर्ण संकल्प आहे - अमृत सरोवराच्या निर्मितीशी संबंधित. प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर निर्मितीचं लक्ष्य, इतकं मोठं ध्येय घेऊन आज देश पुढे जातो आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीर इथून मी याची सुरवात केली होती. मला आनंद वाटतो की आज आसाममध्ये देखील 2600 पेक्षा जास्त अमृत सरोवरे तयार करण्याचं काम सुरु होत आहे. या सरोवरांची निर्मिती संपूर्णपणे लोकसहभागावर अवलंबून आहे. अशा सरोवरांची तर आदिवासी समाजात एक समृद्ध परंपरा देखील आहे. यामुळे खेड्यांत पाण्याचे साठे तर तयार होतीलच, सोबतच हे उत्पन्नाचे स्रोत देखील बनतील. आसाममध्ये तर मासे, भोजन आणि उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. या अमृत सरोवरांत मत्स्योत्पादन केलं तर खूप फायदा होणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आपण सर्वांनी गेल्या दशकांत एक फार मोठा काळ फार खडतर परिस्थितीत काढला आहे. मात्र 2014 नंतर ईशान्य भारतातील समस्या सातत्याने कमी होत आहेत, लोकांचा विकास होत आहे. आज जेव्हा कुणीही आसामच्या अधिवासी क्षेत्रात येतो, ईशान्य भारतातल्या इतर राज्यांत जातो, तेव्हा बदलती परिस्थिती बघून त्यांना सुद्धा चांगलं वाटतं. कार्बी आंगलोंग असो की इतर आदिवासी क्षेत्र, आम्ही विकास आणि विश्वास याच धोरणावर काम करत आहोत.
मित्रांनो,
तुम्हाला चांगलंच माहित आहे, मी आपल्या समस्या, या क्षेत्राच्या अडचणी आपल्याच कुटुंबाचा एक सदस्य म्हणून, आपलाच एक भाऊ म्हणून, आपलाच एक मुलगा म्हणून, मी प्रत्येक संकट समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण मला बुद्धी पेक्षा जास्त मनानं समजावलं आहे. आपण प्रत्येक वेळी माझ्या मनाला स्पर्श केला आहे. माझं मन जिंकून घेतलं आहे. जेव्हा कुटुंबाचा सदस्य म्हणून आपण एक कुटुंब म्हणून उपाय शोधत असतो, तेव्हा त्यात एक संवेदनशीलता असते, दुःख आणि त्रास जाणण्याची एक भावना असते, तेव्हा आपण स्वप्न समजून घेऊ शकतो, आपले संकल्प समजून घेऊ शकतो. आपल्या शुद्ध हेतूंचा मान राखण्यासाठी आयुष्य वेचण्याची इच्छा होते.
मित्रांनो,
प्रत्येक माणसाला, आसामच्या या सुदूर भागातल्या लोकांना देखील जंगलात आयुष्य घालवणाऱ्या माझ्या तरुणांना देखील पुढे जाण्याची आकांक्षा असते, इच्छा होत असते आणि याच भावनेचा आदर करत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, आपली स्वप्ने आमचे सर्वांचे संकल्प बनावेत आणि तुम्ही आणि आम्ही मिळून प्रत्येक संकल्प सिद्ध व्हावा यासाठी आम्ही देखील कामाला लागलो आहोत, तुम्ही देखील लागले आहात, आपण सर्व मिळून लागले आहोत आणि एकत्र मिळून आपण जिंकणार देखील आहोत.
बंधू आणि भगिनींनो,
आज संपूर्ण देश बघतो आहे, की गेल्या काही वर्षांत हिंसा, अराजकता आणि अविश्वास याची अनेक दशकांपासून असलेली जुनी समस्या कशी सोडवली जात आहे, कसे मार्ग शोधले जात आहेत. कधी काळी या क्षेत्राची चर्चा होत असे, तर कधी बॉम्बचा आवाज ऐकू येत असे, कधी गोळीबाराचा आवाज ऐकू येत असे. आज टाळ्यांचा गजर आहे, जयजयकार होत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कार्बी आंगलोंगच्या अनेक संघटना शांती आणि विकासाच्या मार्गवर पुढे जाण्याच्या संकल्प करून एकत्र आल्या आहेत. बोडो करार 2020 मध्ये झाला आणि कायमस्वरूपी शांततेसाठी नवे दरवाजे उघडले आहेत. आसाम व्यतिरिक्त त्रिपुरामध्ये देखील NLFT ने शांततेच्या मार्गावर पाऊल टाकले आहे. जवळपास अडीच दशकांपासून जी ब्रू-रियांग संबंधित समस्या होती, ती देखील सोडवण्यात आली आहे. इतर ठिकाणी देखील कायमस्वरूपी शांतता नांदावी म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत, गांभीर्यानं हे प्रयत्न सुरु आहेत.
मित्रांनो,
हिंसा आणि अशांतीमुळे जे सर्वाधिक प्रभावित होत आले आहेत, ज्यांना सर्वात जास्त दुःख सहन करावं लागलं आहे, ज्यांचे अश्रू देखील अजून सुकले नाहीत. त्या आमच्या माता आहेत, आमच्या भगिनी आहेत, आमची मुलं आहेत. आज जेव्हा हत्यारं खाली ठेवून जंगलातून परतणाऱ्या युवकांना आपल्या कुटुंबात परतताना मी बघतो आणि जेव्हा त्यांच्या आईचे डोळे बघतो, त्या मातांच्या डोळ्यात जो आनंद दिसतो, आनंदाश्रू वाहू लागतात. आईच्या आयुष्यात संतोष मिळतो, तेव्हा मला आशीर्वाद मिळाल्याची अनुभूती होते. आज इथं सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने माता - भगिनी आल्या आहेत, या माता - भगिनींचं इथं येणं, आशीर्वाद देणं हे देखील शांतीच्या प्रयत्नांना नवं बळ देतं, नवी उर्जा देतं. या क्षेत्रातल्या लोकांचं आयुष्य, इथल्या मुली - मुलाचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी केंद्र आणि राज्याचं डबल इंजिनचं सरकार पूर्ण ताकदीनं काम करत आहे. समर्पण भावानं काम करत आहे, सेवाभावानं काम करत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आसाममध्ये, ईशान्य प्रदेशात सरकार आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे जसजशी शांतता पुनर्स्थापित होत आहे, तसेतसे जुन्या नियमांमध्ये देखील बदल केले जात आहेत. दीर्घकाळ सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये लागू होता. मात्र मागील 8 वर्षांमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि उत्तम कायदा व्यवस्था लागू असल्यामुळे आम्ही AFSPA कायदा ईशान्य प्रदेशच्या अनेक क्षेत्रांमधून हटवला आहे. मागील 8 वर्षांमध्ये ईशान्य भागात हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुमारे 75 टक्के घट झाली आहे. याच कारणामुळे आधी त्रिपुरा आणि मग मेघालय मधून AFSPA रद्द करण्यात आला . आसाममध्ये तर मागील 3 दशकांपासून हा कायदा लागू होता. परिस्थिती न सुधारल्यामुळे यापूर्वीच्या सरकारांनी तो दीर्घकाळ सुरूच ठेवला, मात्र गेल्या काही वर्षात परिस्थिती उत्तमरीत्या हाताळण्यात आल्यामुळे आज आसामच्या 23 जिल्ह्यांमधून AFSPA हटवण्यात आला आहे. अन्य क्षेत्रांमध्येही आम्ही वेगाने परिस्थिती सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहोत जेणेकरून तिथेही AFSPA रद्द करता येईल. नागालँड आणि मणिपुर मध्येही या दिशेने वेगाने काम सुरु आहे.
मित्रांनो ,
ईशान्येकडील राज्यांमधील समस्या सोडवल्या जात आहेतच त्याचबरोबर राज्यांमध्येही अनेक दशकांपासून जे सीमा वाद होते, ते देखील सौहार्दाने सोडवले जात आहेत. मी हिमंता जी आणि ईशान्य प्रदेशाच्या अन्य मुख्यमंत्र्यांचेही आज विशेष अभिनंदन करतो, कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे ईशान्य प्रदेश आता देशातील एक सशक्त आर्थिक प्रदेश बनण्याच्या मार्गावर अग्रेसर आहे. सबका साथ, सबका विकास या भावनेने आज सीमा प्रश्नांवर तोडगा काढला जात आहे. आसाम आणि मेघालय दरम्यान झालेले एकमत अन्य समस्या सोडवण्याला प्रोत्साहित करेल. यामुळे या संपूर्ण क्षेत्राच्या विकासाच्या आकांक्षांना बळ मिळेल.
बोडो करार असो किंवा मग कार्बी आंगलोंग करार, स्थानिक स्वयं प्रशासनावर आम्ही भर दिला आहे. केंद्र सरकारचा मागील 7-8 वर्षांपासून निरंतर प्रयत्न राहिला आहे की स्थानिक प्रशासन संस्थांना सशक्त केले जावे, त्यांना अधिक पारदर्शक बनवले जावे. कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषद असेल किंवा मग अन्य स्थानिक संस्था यांच्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे. केंद्र आणि राज्याच्या योजना वेगाने गावागावांपर्यंत पोहचवण्याची मोठी जबाबदारी देखील या संस्थांच्या सहकार्याने पार पाडली जाईल. जनसुविधा, जनकल्याण आणि जनभागीदारी, याला आपणा सर्वांचे प्राधान्य आहे.
बंधू आणि भगिनींनो,
राष्ट्राच्या विकासासाठी राज्याचा विकास आणि राज्याच्या विकासासाठी गावांचा विकास , शहरांचा विकास खूप आवश्यक आहे. गावांचा योग्य विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्थानिक गरजांनुसार , स्थानिक परिस्थितींनुसार विकास योजना आखून त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाईल. म्हणूनच गेल्या काही वर्षात केंद्र सरकारच्या योजनांमध्ये आम्ही स्थानिक गरजा लक्षात घेतल्या आहेत. आता जसे गरीबांच्या घरांसंबंधी योजना असतील, ज्या आधी सुरु होत्या, त्यांच्या नकाशापासून सामुग्रीपर्यंत सर्वकाही दिल्लीत ठरवले जायचे. मात्र कार्बी आंगलोंग सारख्या आदिवासी क्षेत्रांची परंपरा वेगळी आहे, घरांच्या बांधकामाशी निगडित संस्कृती वेगळी आहे, सामुग्रीची उपलब्धता वेगळी आहे. म्हणूनच एक मोठा बदल प्रधानमंत्री आवास योजनेत इथे करण्यात आला आहे, जेणेकरून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे थेट जमा होतील. त्यानंतर तो लाभार्थी, आपल्या पसंती नुसार, आपल्या इच्छेनुसार स्वतःचे घर बांधेल आणि अभिमानाने जगाला सांगेल की माझे घर आहे, मी बांधले आहे. आमच्यासाठी ही प्रधानमंत्री आवास योजना हा काही सरकारी कृपेचा कार्यक्रम नाही. आमच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना गरीबांच्या स्वप्नातील महाल बांधण्याचे स्वप्न आहे, गरीबाच्या इच्छेनुसार बांधण्याचे स्वप्न आहे. गावाच्या विकासात गावातील लोकांचा अधिक सहभाग ही भावना हर घर जल योजनेत देखील आहे. घरोघरी जे पाईपद्वारेपाणी पोहचवले जात आहे, त्याचे व्यवस्थापन गावातील पाणी समित्याच करतील आणि त्यातही समित्यांमध्ये बहुतांश माता-भगिनी असतील. कारण पाण्याचे महत्व काय असते हे त्या माता-भगिनी जितके समजतात , तेवढे पुरुषांना समजत नाही आणि म्हणूनच आम्ही माता-भगिनींना केंद्रस्थानी ठेवून पाणी संबंधी योजनांवर भर दिला आहे. मला सांगण्यात आले आहे की ही योजना सुरु होण्याच्या आधीपासून 2 टक्क्यांहून कमी गावातील घरांमध्ये पाईपद्वारे पाणी पुरवठा होत होता. आता सुमारे 40 टक्के कुटुंबांपर्यंत पाईपद्वारे पाणी पुरवठा होत आहे.मला विश्वास आहे, लवकरच,आसामच्या प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणी पुरवठा होईल.
बंधू आणि भगिंनीनो,
आदिवासी समाजाची संस्कृती, इथली भाषा, इथला आहार-विहार , इथली कला, इथली हस्तशिल्प, हे केवळ इथले नाही तर माझ्या भारताचा वारसा आहे. या वारश्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे आणि आसामचा प्रत्येक जिल्हा , प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक जमात खूप समृद्ध आहे. हा सांस्कृतिक वारसा भारताला जोडतो, एक भारत श्रेष्ठ भारत भावना मजबूत करतो. म्हणूनच केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे की आदिवासी कला-संस्कृती, कला-हस्तकला यांचे जतन व्हावे, ते भावी पिढ्यांपर्यंत पोहचेल याची व्यवस्था करावी.आज देशभरात जी आदिवासी संग्रहालये बांधली जात आहेत , आदिवासी स्वातंत्र सैनिकांच्या नावाने जी संग्रहालये विकसित केली जात आहेत , त्यामागे हाच विचार आहे. केंद्र सरकार द्वारा, आदिवासी प्रतिभेला , आदिवासी समाजातील स्थानिक उत्पादनांना देखील प्रोत्साहित केले जात आहे. कार्बी आंगलोंग सह संपूर्ण आसाममध्ये हातमागापासून बनलेले सूती कपड़े, बांबू, लाकूड आणि धातूंची भांडी, अन्य कलाकृतींची मोठी अद्भुत प्रथा आहे. या स्थानिक उत्पादनांसाठी व्होकल होणे खूप आवश्यक आहे. ही उत्पादने देश-विदेशातील बाजारांमध्ये पोहचावी , प्रत्येक घरात पोहचावी यासाठी सरकार आवश्यक मंच तयार करत आहे आणि दुर्गम जंगलांमध्ये राहणारे माझे बंधू-भगिनी, कलेशी निगडीत माझे बांधव , हस्तशिल्पाशी निगडित बंधू-भगिनी , मी प्रत्येक ठिकाणी जाऊन तुमच्या कलेबाबत बोलतो. प्रत्येक ठिकाणी वोकल फॉर लोकल वर भर देतो. कारण तुम्ही जे करता, त्याला भारतातील प्रत्येक घरात स्थान मिळावे , जगात त्याचा मान वाढावा.
मित्रांनो ,
स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात कार्बी आंगलोंग देखील शांतता आणि विकासासाठी नव्या भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आता इथून आपण मागे वळून पाहायचे नाही. येत्या काही वर्षांत आपण सर्वानी मिळून त्या विकासाची भरपाई करायची आहे, जी मागील काही दशकांपासून आपण करू शकलो नव्हतो. आसामच्या विकासाच्या प्रयत्नांमध्ये , आम्ही तुमच्याबरोबर आहोत. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आर्शीवाद देण्यासाठी आलात. मी तुम्हाला आश्वस्त करतो , मी यापूर्वीही म्हटले होते , तुमचे हे जे प्रेम आहे ना, या प्रेमाची मी सव्याज परतफेड करेन. विकास करून परतफेड करेन , तुम्हाला खूप शुभेच्छा.
कारडोम! धन्यवाद !
भारत माता की- जय
भारत माता की- जय
भारत माता की- जय
खूप - खूप धन्यवाद! कारडोम!
* * *
N.Chitale/R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821275)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam