पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन

Posted On: 22 APR 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2022

 

महामहीम, पंतप्रधान बोरिस जॉन्सन,

उपस्थित प्रतिनिधी,

माध्यमामधले आमचे स्नेही,

नमस्कार,

सर्वप्रथम,पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे मी भारतात स्वागत करतो.

पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिला भारत दौरा असला तरी भारताचा जुना मित्र म्हणून ते भारताला अतिशय उत्तम जाणतात.गेली अनेक वर्षे भारत आणि ब्रिटन यांच्यातले संबंध दृढ करण्यात पंतप्रधान जॉन्सन यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे.

भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची  ही भेट म्हणजे ऐतिहासिक क्षण आहे. साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करून आपण आपल्या भारत दौऱ्याचा प्रारंभ केला हे काल संपूर्ण भारताने पाहिले.

मित्रहो,

गेल्या वर्षी आपण उभय राष्ट्रांत सर्वंकष धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित केली आणि सध्याच्या दशकात आपल्या संबंधाना दिशा देण्यासाठी महत्वाकांक्षी ‘पथदर्शी आराखडा 2030’ जारी केला. आजच्या आमच्या चर्चेदरम्यान आम्ही या आराखड्यासंदर्भातल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि भविष्यासाठी उद्दिष्टही निश्चित केली.

मुक्त व्यापार करारा संदर्भात दोन्ही देशांची पथके काम करत आहेत. या  वाटाघाटीमध्ये उत्तम प्रगती होत आहे. या वर्ष अखेरपर्यंत एफटीए, मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गेल्या काही महिन्यात भारताने युएई आणि ऑस्ट्रेलिया या  देशांसमवेत मुक्त व्यापार कराराला  मूर्त रूप दिले आहे. तोच वेग आणि कटीबद्धता जारी राखत ब्रिटन समवेतच्या एफटीए बाबत वाटचाल सुरु ठेवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वृद्धिंगत करण्याला आम्ही सहमती व्यक्त केली आहे. उत्पादन, तंत्रज्ञान,आरेखनातली सर्व क्षेत्रे आणि संरक्षण क्षेत्र विकासात ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला ब्रिटनने  दिलेल्या समर्थनाचे आम्ही स्वागत करतो. 

मित्रहो,

भारतात सुरु असलेल्या व्यापक सुधारणा,पायाभूत सुविधा आधुनिकीकरण आराखडा आणि राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन यावरही आम्ही चर्चा केली. ब्रिटीश कंपन्यांकडून भारतातल्या वाढत्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो. गुजरातमधल्या हलोल इथे याचे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळाले.

ब्रिटन मध्ये भारतीय वंशाचे 1.6 दशलक्ष लोक राहत असून समाजात तसेच अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव  योगदान देत आहेत. या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. हा सचेत सेतू अधिक बळकट करण्याचा आमचा उद्देश आहे. या दिशेने पंतप्रधान जॉन्सन यांचे मोठे वैयक्तिक योगदान राहिले आहे. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

ग्लासगो इथे झालेल्या कॉप-26 मधल्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमची कटीबद्धता व्यक्त केली आहे. हवामान आणि उर्जा भागीदारी अधिक बळकट करण्याचा निर्णय आम्ही आज घेतला आहे. भारताच्या राष्ट्रीय हायड्रोजन अभियानात सहभागी होण्यासाठी आम्ही ब्रिटनला आमंत्रित करत आहोत. उभय देशात धोरणात्मक तंत्र संवाद स्थापन करण्याचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.

मित्रहो,

आज आपल्यामधल्या जागतिक नवोन्मेष भागीदारी अंमलबजावणी व्यवस्थेला देण्यात आलेले पूर्णत्व  अतिशय महत्वाचा पैलू ठरणार आहे. यामुळे इतर देशांसमवेत आपली विकास भागीदारी अधिक दृढ करण्याला बळ मिळणार आहे. या अंतर्गत  तिसऱ्या देशांना मेड इन इंडिया नवोन्मेष हस्तांतरित करण्यासाठी आणि व्यापक करण्यासाठी भारत आणि ब्रिटन 100 दशलक्ष डॉलर्सपर्यंत सह वित्तपुरवठा करतील. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि हवामान बदलाची आव्हाने पेलण्यासाठीच्या प्रयत्नात याची मदत होणार आहे.  आपल्या  स्टार्ट अप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला नव्या बाजारपेठांचा शोध घेण्यासाठी आणि आपल्या नवकल्पना जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.

मित्रहो,

प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर होणाऱ्या अनेक घडामोडींवरही आम्ही चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्र मुक्त, खुले, समावेशक आणि कायदाधारित राखण्यावर आम्ही भर दिला. हिंद-प्रशांत महासागर उपक्रमात सहभागी होण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचे भारत स्वागत करतो.

युक्रेन प्रश्नी तातडीने तोडगा काढण्यासाठी आणि युद्धविराम होण्यासाठी संवाद आणि राजनीतीवर आम्ही भर दिला. सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करण्याच्या महत्वाचा आम्ही पुनरुच्चार केला.  शांततामय,स्थैर्य आणि सुरक्षितता नांदणारा अफगाणिस्तान तसेच समावेशक आणि प्रतिनिधी सरकारसाठी आमच्या पाठींब्याचा पुनरुच्चार केला.  इतर देशांमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर होता कामा नये.

महामहीम,

भारत आणि ब्रिटन यांच्यातले संबंध दृढ होण्यासाठी आपण सदैव विशेष प्रयत्नशील राहिले आहात. यासाठी आम्ही आपले अभिनंदन करतो.

आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे पुन्हा एकदा भारतात स्नेहपूर्ण स्वागत.

खूप-खूप धन्यवाद !


* * *

S.Patil/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820130) Visitor Counter : 182