पंतप्रधान कार्यालय

श्री श्री हरिश्चंद्र ठाकूर जी यांच्या 211 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधील श्रीधाम ठाकूरनगर, ठाकूरबारी, येथे पंतप्रधानांनी मतुआ धर्म महामेळावा 2022 ला केले संबोधित


“जेंव्हा आपण समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या भगिनी आणि मुलींना मुलांसह राष्ट्र उभारणीत योगदान देताना पाहतो, तेव्हा श्री श्री हरिश्चंद्र ठाकूर जी सारख्या महान व्यक्तिमत्वांना खरी श्रद्धांजली ठरते”

सरकार जेंव्हा 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या तत्त्वावर सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवते आणि जेंव्हा, सबका प्रयास हे तत्व देशाच्या विकासाला चालना देते तेंव्हा आपण सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करतो”

“आपल्या संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. जेंव्हा आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडतो तेंव्हाच आपण त्या अधिकारांचे संरक्षण करू शकतो''

“कुठेही कोणाचा छळ होत असेल तर तिथे नक्कीच आवाज उठवा. हे समाजाप्रती आणि देशाप्रतीही आपले कर्तव्य आहे”

“केवळ राजकीय विरोधामुळे जर कोणी एखाद्याला हिंसाचाराने धाक दाखवत असेल तर ते इतरांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. त्यामुळे समाजात कुठेही हिंसाचार, अराजकतेची मानसिकता असेल तर त्याला विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे”

Posted On: 29 MAR 2022 10:01PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून श्री श्री हरिश्चंद्र ठाकूर जी यांच्या 211 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधील श्रीधाम ठाकूरनगर, ठाकूरबारी, येथे आयोजित मतुआ धर्म महामेळावा 2022 ला संबोधित केले.

मार्च 2021 मध्ये बांगलादेशातील ओरकंडी ठाकूरबारी येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करता आल्याबद्दल त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2019 मध्ये ठाकूरनगरला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल झालेल्या आनंदाचे पंतप्रधानांनी  स्मरण केले. 

ज्याचा पाया श्री श्री हरिचंद ठाकूर जी यांनी रचला आणि पुढे गुरुचंद ठाकूर जी आणि बोरो मा यांनी जोपासलेल्या मतुआ परंपरेला अभिवादन करण्याचे मतुआ धर्म महामेळावा  हे निमित्त आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ही महान परंपरा पुढे नेण्याचे श्रेय पंतप्रधानांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी शांतनू ठाकूर यांनाही दिले.

हा महामेळावा  एक भारत श्रेष्ठ भारताचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अखंड प्रवाह आणि सातत्यामुळे आपली संस्कृती आणि सभ्यता महान आहे आणि स्वतःला  सक्षम करण्याची तिची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मतुआ समाजातील नेत्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, देशातील मुलींना स्वच्छता, आरोग्य आणि आत्मविश्वास प्रदान करण्याच्या नव्या भारताच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी नमूद केले. "जेंव्हा आपण समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या भगिनी आणि मुलींना मुलांसह राष्ट्र उभारणीत योगदान देताना पाहतो, तेंव्हा श्री श्री हरिचंद ठाकूरजींसारख्या महान व्यक्तिमत्त्वांना खरी श्रद्धांजली ठरते ", असे पंतप्रधान म्हणाले.

"जेंव्हा सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्त्वावर सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवते आणि जेंव्हा, सबका प्रयास हे तत्व देशाच्या विकासाला चालना देते, तेंव्हा आपण सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करतो" असे पंतप्रधानांनी सांगितले. श्री श्री हरिश्चंद्र ठाकूरजींनी दैवी प्रेमासोबत कर्तव्यावर दिलेला भर याचे स्मरण करून, पंतप्रधानांनी नागरी जीवनातील  कर्तव्य बजावण्याच्या  भूमिकेवर जोर दिला. “आपल्याला कर्तव्याच्या जाणीवेला देशाच्या विकासाचा आधार बनवायचे आहे. आपल्या संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. जेंव्हा आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडू तेंव्हाच आपण त्या अधिकारांचे संरक्षण करू शकतो,” असे पंतप्रधान म्हणाले.

समाजातील प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी जागृती करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी मतुआ समाजाला केले. “कुठेही कोणाचाही छळ होत असेल तर तिथे नक्कीच आवाज उठवा. हे समाजाप्रती आणि देशाप्रतीही आपले कर्तव्य आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. “राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होणे हा आपला  लोकशाही अधिकार आहे. मात्र राजकीय विरोधामुळे कोणी हिंसाचाराने कुणाला धाक दाखवत असेल, तर ते इतरांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, त्यामुळे समाजात कुठेही हिंसाचार, अराजकतेची मानसिकता असेल, तर त्याला विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

स्वच्छता, व्होकल फॉर लोकल आणि देश प्रथम - या आवाहनाचा पंतप्रधानांनी  पुनरुच्चार केला.

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1811222) Visitor Counter : 181