पंतप्रधान कार्यालय
कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मृती भवनात बिप्लवी भारत कलादालनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
23 MAR 2022 9:14PM by PIB Mumbai
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ जी, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डी जी, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलशी संबंधित सर्व मान्यवर, विद्यापीठांचे कुलगुरू, कला आणि सांस्कृतिक विश्वातील दिग्गज, स्त्री आणि पुरुषहो,
सर्वप्रथम मी पश्चिम बंगालच्या बीरभूम इथे घडलेल्या हिंसक घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो, माझ्या संवेदना व्यक्त करतो. बंगालच्या महान भूमीवर हा निर्घृण अपराध करणाऱ्या गुन्हेगारांना राज्य सरकार नक्की शिक्षा देईल, अशी मी आशा व्यक्त करतो. मी बंगालच्या जनतेलाही आवाहन करतो, की असे निंदनीय कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना आणि अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांना कधीही क्षमा करु नका. केंद्र सरकारच्या वतीने मी आश्वासन देतो की गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात जी काही मदत लागेल, ती भारत सरकार पुरवेल.
मित्रांनो ,
''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पुन्नो पालौन लॉग्ने। मौहान बिप्लबी- देर औईतिहाशिक, आत्तो-बलिदानेर प्रॉति, शौमॉग्रो भारतबाशिर, पोक्खो थेके आ-भूमि प्रौणाम जन्नाछी'' शहीद दिनानिमित्त मी देशासाठी आपले सर्वस्व बलिदान करणाऱ्या सर्व वीर-वीरांगनाना कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने भावांजली अर्पण करतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे - नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः म्हणजे शस्त्र ज्याचे तुकडे करू शकत नाही, अग्नी जे जाळू शकत नाही. देशासाठी बलिदान देणारे असेच असतात. त्यांना अमरत्व प्राप्त होते. ते प्रेरणादायी पुष्प बनून प्रत्येक पिढीपर्यंत आपल्या सुगंधाची पखरण करत असतात. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतर देखील अमर शहीद भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदानाची गाथा देशातील मुलांना तोंडपाठ आहे. या वीरांच्या गाथा आपणा सर्वांना देशासाठी अहोरात्र मेहनत करण्यासाठी प्रेरित करतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दरम्यान यावर्षी शहीद दिवसाचे महत्व आणखी वाढले आहे.
देश आज स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या नायक-नायिकांना वंदन करत आहे, त्यांच्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देत आहे. बाघा जतिन यांचा तो हुंकार, - आमरा मौरबो, जात जॉगबे, किंवा खुदीराम बोस यांचे आव्हान - एक बार बिदाई दे मा, घुरे आशी। संपूर्ण देश आज पुन्हा स्मरण करत आहे. बंकिम बाबू यांचे वंदे मातरम् तर आज सर्व भारतीयांचा ऊर्जा मंत्र बनले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, कित्तूरची राणी चेनम्मा, मातंगिनी हाजरा, बीना दास, कमला दास गुप्ता, कनकलता बरुआ, अशा कित्येक विरांगनांनी स्वातंत्र्य लढ्याची ज्वाला नारीशक्तीने प्रज्वलित केली. अशा सर्व वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. शाळा-महाविद्यालयांमध्ये आपल्या युवा मित्रांनी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. अमृत महोत्सवाच्या या ऐतिहासिक कालखंडात शहीद दिनी व्हिक्टोरिया मेमोरियल मध्ये 'बिप्लोबी भारत' कलादालनाचे लोकार्पण झाले आहे. आज नेताजी सुभाषचंद्र बोस, अरबिंदो घोष, रास बिहारी बोस, खुदी राम बोस, बाघा जतिन, बिनॉय, बादल, दिनेश, अशा अनेक महान सेनानींच्या आठवणींनी ही जागा पवित्र झाली आहे. निर्भीक सुभाष गॅलरी नंतर आज बिप्लोबी भारत गॅलरीच्या रूपाने पश्चिम बंगालच्या, कोलकाताच्या वारसा स्थळांमध्ये आणखी एक सुंदर मोती गुंफला गेला आहे.
मित्रांनो ,
बिप्लवी भारत गॅलरी, पश्चिम बंगालचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा अधिकाधिक समृद्ध करण्याच्या आमच्या कटीबद्धतेचा पुरावाच आहे. याठिकाणची ऐतिहासिक कलादालने असतील, ओल्ड करन्सी इमारत असेल, बेल्वेडेयर हाउस असेल, व्हिक्टोरिया मेमोरियल असेल किंवा मग, मेटकाफ हाऊस या वारसास्थळांना आणखी भव्य आणि सुंदर बनवण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. जगातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक, कोलकात्याच्याच इंडिअन म्युझियमला नव्या रंगरूपात जगासमोर आणण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे.
मित्रांनो ,
आपल्या भूतकाळाचा वारसा आपल्या वर्तमानाला दिशा देतो, आपल्याला उत्तम भविष्याची उभारणी करण्यासाठी प्रेरणा देतो. म्हणूनच, आज आपला देश आपल्या इतिहासाकडे, आपल्या भूतकाळाकडे ऊर्जेचा एक जिवंत स्त्रोत म्हणून बघत आहे. तुम्हाला पूर्वीचा तो कालखंड देखील आठवत असेल, जेंव्हा भारतातल्या प्राचीन मंदिरांमधील मूर्तींची सर्रास तस्करी करण्यात आल्याच्या बातम्या कानावर पडायच्या. आपल्या कलाकृती सर्रास परदेशात चोरून नेल्या जात असत. जणू काही त्यांना महत्वच नव्हते. मात्र आता भारत या सगळ्या वस्तू, आपला वारसा मायदेशी परत आणत आहे. आताच आपल्या किशन रेड्डी यांनी सविस्तर वर्णन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया अशा डझनभर मूर्ती, चित्रे आणि अन्य कलाकृती भारताकडे सोपवल्या आहेत. यापैकी अनेक पश्चिम बंगालशी संबंधित आहेत. गेल्या वर्षी भारताला अमेरिकेने देखील सुमारे दीडशे कलाकृती परत केल्या होत्या. जेंव्हा देशाचे सामर्थ्य वाढते, जेंव्हा दोन देशांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते तेंव्हा अशा प्रकारची अनेक उदाहरणे समोर येतात. तुम्हाला याचा यावरून अंदाज येईल की 2014 पूर्वीच्या अनेक दशकांमध्ये केवळ डझनभर मूर्तीच भारतात परत आणण्यात यश मिळाले होते. मात्र गेल्या 7 वर्षांमध्ये ही संख्या सव्वा दोनशेपेक्षा अधिक झाली आहे. आपल्या संस्कृतीची, नागरी सभ्यतेची ही प्रतीके, आजच्या आणि भावी पिढ्यांनाही निरंतर प्रेरणा देत राहोत, या दिशेने हा एक खूप मोठा प्रयत्न आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज देश ज्याप्रमाणे आपली राष्ट्रीय आणि अध्यात्मिक वारसा स्थळे एका नव्या आत्मविश्वासाने विकसित करत आहे, त्याची आणखी एक बाजू आहे. ती आहे- 'वारसा स्थळ पर्यटन'. वारसा स्थळ पर्यटनामध्ये आर्थिक दृष्ट्या तर अपार संधी आहेतच, त्याचबरोबर विकासाचे नवे मार्ग देखील खुले होतात. दांडी येथे मिठाच्या सत्याग्रहाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले स्मारक असेल किंवा मग जालियनवाला बाग स्मारकाचा पुनर्विकास असेल, एकता नगर केवड़िया मधील स्टॅच्यू ऑफ यूनिटी असेल किंवा मग पंडित दीन दयाल उपाध्याय जी यांच्या स्मारकाचे बांधकाम, दिल्लीमध्ये बाबासाहेब स्मारक असेल किंवा मग रांचीमधील भगवान बिरसा मुंडा मेमोरियल पार्क आणि संग्रहालय, अयोध्या- बनारस येथील घाटांचे सुशोभीकरण असेल, किंवा मग देशभरातील ऐतिहासिक मंदिरे आणि आस्था स्थळांचा जीर्णोद्धार, 'वारसा स्थळ पर्यटनाला' चालना देण्यासाठी भारतात एक राष्ट्रव्यापी अभियान सुरु आहे. स्वदेश दर्शन सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून वारसास्थळांच्या पर्यटनाला चालना दिली जात आहे आणि संपूर्ण जगाचा हाच अनुभव आहे की, 'वारसा स्थळ’ पर्यटन कशा प्रकारे लोकांचे उत्पन्न वाढवण्यात, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावते. 21 व्या शतकातील भारत आपली ही क्षमता ओळखून पुढे मार्गक्रमण करत आहे.
मित्रांनो,
शतकानुशतकांच्या गुलामगिरीच्या काळात त्रिधारांच्या संयुक्त प्रयत्नांनी स्वातंत्र्य मिळवून दिले होते. यातील एक धारा होती क्रांतीची, दुसरी धारा होती सत्याग्रहाची आणि तिसरी धारा होती जनजागृती आणि रचनात्मक कामांची. माझ्या मनात या त्रिधारा तिरंग्याच्या तीन रंगांमधून प्रकट होतात. माझ्या मनात पुन्हापुन्हा ही भावना निर्माण होते. आपल्या तिरंग्याचा केशरी रंग क्रांतीच्या धारेचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्याग्रह आणि अहिंसेच्या धारेचे प्रतीक आहे. हिरवा रंग देशाच्या सर्जनशीलतेचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणाचा प्रचार-प्रसार, देशभक्तीशी संबंधित साहित्यिक रचना, भक्ती आंदोलन या सर्व गोष्टी त्यात निहित आहेत. तिरंग्यातील निळे चक्र मला देशाच्या सांस्कृतिक जाणीवेचे प्रतीक वाटते. वेदापासून विवेकानंद यांच्यापर्यंत, बुद्ध ते गांधीजीपर्यंत हे चक्र सुरूच राहिले. मथुरेचे वृंदावन, कुरुक्षेत्रचा मोहन, त्यांचे सुदर्शन चक्र आणि पोरबंदरच्या मोहनचे चरखाधारी चक्र, हे चक्र कधी थांबले नाही.
मित्रांनो ,
आज जेंव्हा मी बिप्लव भारत गॅलरीचे उद्घाटन करत आहे, तेंव्हा राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांमध्ये मला नव्या भारताचे भविष्य दिसत आहे. केशरी रंग आपल्याला कर्तव्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रेरणा देतो, पांढरा रंग म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' ला पर्याय आहे. हिरवा रंग पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, नवीकरणीय ऊर्जेसाठी भारताच्या मोठ्या उद्दिष्टांचे प्रतीक आहे. हरित ऊर्जेपासून ग्रीन हायड्रोजन पर्यंत, जैव-इंधनापासून इथेनॉल मिश्रणापर्यंत, नैसर्गिक शेतीपासून गोबरधन योजनेपर्यंत, सगळे त्याचे प्रतिबिंब बनत आहेत. तिरंग्यातील निळे चक्र आज नील अर्थव्यवस्थेचा पर्याय आहे. भारताकडील अथांग सागरी संसाधन, विशाल सागरी किनारा, आपली जलशक्ती, भारताच्या विकासाला निरंतर गती देत आहे.
आणि मित्रांनो,
तिरंग्याचा हा अभिमान आणि गौरव वाढवण्याचे सत्कार्य देशातील तरुणांनी हाती घेतले आहे, याचा, मला आनंद आहे. देशातील याच तरुणाईने त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची मशाल आपल्या हातात घट्ट धरून तेवत ठेवली होती. जरा स्मरण करून पहा, या दिवशी जेंव्हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली तेंव्हा ते अवघे 23-24 वर्षांचे नवतरुण होते. खुदीराम बोस यांचे वय फाशी दिली गेली त्यावेळी यांच्यापेक्षाही खूप कमी होते. भगवान बिरसा मुंडा 25-26 वर्षांचे होते, चंद्रशेखर आझाद 24-25 वर्षांचे होते, आणि त्यांनी ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडले होते. भारतातील तरुणांचे सामर्थ्य ना तेंव्हा कमी पडले होते ना आज कमी पडत आहे. मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो- कधीही आपल्या शक्तींना, आपल्या स्वप्नांना कमी लेखू नका. असे कोणतेही काम नाही, जे भारतातील तरुण करू शकणार नाही. असे कोणतेही ध्येय नाही जे भारतातील तरुण साध्य करू शकत नाही. स्वातंत्र्याच्या 100 वर्षात भारत ज्या उंचीवर पोहोचला असेल, 2047 मध्ये जी उंची भारताने गाठली असेल, ती आजच्या तरुणांच्या बळावरच होईल. त्यामुळे आज जे तरुण आहेत त्यांच्या जीवनाचे सर्वात मोठे लक्ष्य असायला हवे ते म्हणजे नवीन भारत घडवण्यातील त्यांचे योगदान. येत्या 25 वर्षात भारतातील तरुणांचे परीश्रमच भारताचे भाग्यविधाता होईल, भारताचे भविष्य घडवेल.
मित्रांनो,
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने आपल्याला नेहमीच एक भारत-श्रेष्ठ भारत यासाठी काम करण्याची प्रेरणा दिली आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे प्रांत वेगवेगळे होते, भाषा आणि बोली भिन्न भिन्न होत्या. इतकेच नव्हे तर साधनसंपत्तीही वैविध्यपूर्ण होती; पण देशसेवेची भावना आणि देशभक्ती एकनिष्ठ होती. 'भारतभक्ती' या धारणेने ते जोडले गेले होते, एकाच संकल्पासाठी लढत होते, उभे राहिले होते. भारतभक्तीचा हा ध्यास, भारताची एकता, अखंडता या शाश्वत भावनेला आजही आपले सर्वोच्च प्राधान्य असायला पाहिजे. तुमची राजकीय विचारसरणी कोणतीही असो, तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असाल, पण भारताच्या एकात्मतेशी आणि अखंडतेशी कोणत्याही प्रकारचा खेळ करणे, हा भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचा सर्वात मोठा विश्वासघात ठरेल. ऐक्याशिवाय आपण ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना बळकट करू शकणार नाही. देशाच्या घटनात्मक संस्थांचा आदर, घटनात्मक पदांचा आदर, सर्व नागरिकांप्रती समान भावना, त्यांच्याप्रती सहानुभूती, देशाच्या एकात्मतेला बलशाली करते. आजच्या काळात देशाच्या एकात्मतेच्या विरोधात काम करणाऱ्या प्रत्येक घटकावर लक्ष ठेवून आपण त्यांच्याशी कठोरपणे लढले पाहिजे. आज जेंव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, तेंव्हा या एकात्मतेचे रक्षण करणे ही आपलीही मोठी जबाबदारी आहे.
बंधु आणि भगिनींनो,
नव्या भारतात नवीन दृष्टी घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. ही नवी दृष्टी भारताचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, प्राचीन अस्मिता, भविष्यातील उन्नती ही आहे. यामध्ये कर्तव्याच्या भावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण आपले कर्तव्य जेवढे निष्ठेने पार पाडू, आपल्या प्रयत्नांची जितकी पराकाष्ठा करू, तितकेच देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल असेल. त्यामुळे आज 'कर्तव्य निष्ठा' हीच आपली राष्ट्रीय भावना असायला पाहिजे. 'कर्तव्य पालन' ही आपली राष्ट्रीय प्रेरणा असली पाहिजे. कर्तव्य हे भारताचे राष्ट्रीय चरित्र असले पाहिजे. हे कर्तव्य काय आहे? आपण आपल्या सभोवतालच्या कर्तव्यांबद्दलचे निर्णय देखील सहजपणे घेऊ शकतो, आपण प्रयत्न करू शकतो, बदल देखील घडवून आणू शकतो. आपण रस्त्यावर, रेल्वेमध्ये, बसस्थानकावर, रस्त्यावर, बाजारात, अस्वच्छता पसरू देत नाही, स्वच्छतेची काळजी घेतो तेंव्हा आपण आपले कर्तव्य बजावतो. वेळेवर लसीकरण करून घेणे, जलसंधारणासाठी हातभार लावणे, पर्यावरण वाचविण्यास मदत करणे हेही कर्तव्यपालनाचे उदाहरण आहे. जेंव्हा आपण डिजिटल पेमेंट करतो, इतरांना त्याची जाणीव करून देतो, त्यांना प्रशिक्षण देतो, तेंव्हाही आपण आपले कर्तव्य पाळतो. जेंव्हा आपण स्थानिक उत्पादने विकत घेतो, व्होकल फॉर लोकल हा आवाज बुलंद करत असतो, तेंव्हाही आपण आपले कर्तव्यच बजावत असतो. जेंव्हा आपण आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देतो, तेंव्हाही आपण आपले कर्तव्य पाळतो. आज भारताने $400 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 30 लाख कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे याचा मला आनंद आहे. भारताची वाढती निर्यात ही आपल्या उद्योगाची, आपल्या एमएसएमईची, आपल्या उत्पादन क्षमतेची, आपल्या कृषी क्षेत्राची ताकद यांचे प्रतीक आहे.
मित्रांनो,
जेंव्हा प्रत्येक भारतीय आपल्या कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य देईल, पूर्ण निष्ठेने त्यांचे पालन करेल, तेंव्हा भारताला अग्रस्थानी पोहचण्यात कोणतीही अडचण येणार नाही, पुढे जाण्यापासून कोणीही रोखून शकणार नाही. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर लाख लाख तरुण, लाख लाख स्त्रिया, आपली मुले, आपली कुटुंबे याच कर्तव्याच्या भावनेने जीवन व्यतीत करत आहेत. ही भावना जसजशी प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा भाग बनेल तेंव्हा भारताचे भविष्य उज्वल होईल. कवी मुकुंद दासजींच्या शब्दात सांगायचे झाले तर, "की आनंदोध्वनी उठलो बौंगो,
बोंगो-भूमे बोंगो-भूमे,
बोंगो-भूमे, बोंगो-भूमे,
भरौतभूमे जेगेच्छे,
आज भारौतबाशी
आर की माना शोने
लेगेच्छे आपोन काजे,
जार जा नीछे मोने"
"कोट्यवधी भारतीय नागरिकांमधे हीच भावना प्रबळ होत राहो, क्रांतिकारकांच्या प्रेरणेने आपल्याला सदैव प्रोत्साहन मिळू दे, या सदिच्छासह मी बिप्लोबी भारत दालनासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो!
वंदे मातरम्!
धन्यवाद !
***
S.Thakur/S.Kane/S.Patgaonkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809058)
Visitor Counter : 216
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam