पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अफगाणिस्तानातून परतलेल्या शीख-हिंदू शिष्टमंडळाची भेट


संकटाच्या काळात पाठिंबा देऊन अफगाणिस्तानातून त्यांना सुखरूप भारतात आणल्याबद्दल प्रतिनिधींनी मानले पंतप्रधानांचे आभार

तुम्ही काही पाहुणे नाही तर तुमच्याच घरामध्ये आहात, भारत हे तुमचे घर आहे: पंतप्रधान

सीएएसाठी प्रतिनिधींनी मानले पंतप्रधानांचे आभार; ते ‘जगाचे पंतप्रधान’ आहेत, असे म्हणावे लागेल!

गुरू ग्रंथसाहिबचे स्वरूप अफगाणिस्तानातून योग्य सन्मानाने भारतामध्ये परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याविषयी त्यांचे बोलणे ऐकल्यावर, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, असे प्रतिनिधींनी केले नमूद

सर्व समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी भविष्यातही समुदायाला सातत्याने पाठिंबा देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

Posted On: 19 FEB 2022 5:05PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी- 7 लोककल्याण मार्ग येथे अफगाणिस्तानमधील शीख- हिंदू शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानांचा सन्मान केला आणि अफगाणिस्तानातून शीख आणि हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

पंतप्रधानांनी शिष्टमंडळांचे स्वागत केले. तुम्ही काही पाहुणे नसून स्वतःच्याच घरामध्ये आले आहात, भारत म्हणजे, तुमचे घर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.  अफगाणिस्तानमध्ये भेडसावणा-या अडचणी, समस्या यांची माहिती मिळाल्याचे सांगून त्यांना सुखरूपपणे मायदेशी आणण्यासाठी सरकारने केलेल्या मदतीविषयी माहिती दिली. अशा घटनांमुळे सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचे महत्व आणि समुदायासाठी त्याचे असलेले फायदे याविषयीही पंतप्रधान बोलले. या समाजाला येत असलेल्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी भविष्यामध्ये सातत्याने सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले.

गुरूग्रंथ साहिबचा गौरव, सन्मान राखण्याच्या परंपरेचे महत्व पंतप्रधानांनी सांगितले. तसेच त्या अनुषंगाने अफगाणिस्तानातून गुरूग्रंथ साहिबचे स्वरूप परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अफगाण लोकांकडून त्यांना काही वर्षांपासून मिळत असलेल्या प्रेमाविषयी त्यांनी सांगितले तसेच आपल्या काबूल भेटीविषयी आठवणी सांगितल्या.

सर्व शीख- हिंदू समुदायाला अफगाणिस्तानातून सुखरूप परत आणण्यासाठी भारताने जी मदत केली, त्याबद्दल मनजिंदर सिंग सिरसा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, ज्यावेळी आम्हा सर्वांच्या पाठीशी कोणीही उभे नव्हते, अशा संकटकाळी पंतप्रधानांनी सतत पाठिंबा दिला आणि वेळेवर मदत मिळेल, असा विश्वासही दिला. शिष्टमंडळातल्या इतर सदस्यांनीही पंतप्रधानांनी अतिशय अवघड काळात केलेल्या मदतीबद्दल, समुदायाच्या पाठीशी ठाम उभे राहिल्याबद्दल आभार मानले. अफगाणिस्तानातून गुरूग्रंथ साहिबचे स्वरूप श्रद्धापूर्वक भारतामध्ये परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत बोलताना ऐकून, त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सीएए आणल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्याचा आपल्या समुदायाला खूप उपयोग होणार असल्याचेही सदस्यांनी नमूद केले. शिष्टमंडळातले सदस्य म्हणाले, नरेंद्र मोदी केवळ भारताचे पंतप्रधान आहेत असे नाही, तर अवघ्या जगाचे पंतप्रधान आहेत, कारण  त्यांना जगभरातल्या हिंदू आणि शीखांना भेडसावणा-या अडचणी, समस्या समजतातआणि अशा सर्व प्रकरणांमध्ये आपल्या लोकांना ते त्वरित मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यावेळी उपस्थित होते.

***

S.Patil/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799620) Visitor Counter : 214