पंतप्रधान कार्यालय

ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे 18 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण


मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार

सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या अतिरिक्त रेल्वे मार्गांमुळे उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल.

या मार्गामुळे 36 नवीन उपनगरीय गाड्या सुरू होतील

Posted On: 17 FEB 2022 12:42PM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 4:30 वाजता व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ठाणे आणि दिवा या स्थानकांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करणार आहेत.  मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही ते हिरवा  झेंडा  दाखवतील आणि त्यानंतर ते उपस्थिताना  संबोधितही  करतील

ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्रित  येवून पुढे मुंबईतील  सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने रवाना होते. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार मार्गांपैकी दोन मार्ग  धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग  जलद  लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. उपनगरीय  आणि लांब  पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे  करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन  करण्यात आले.

ठाणे आणि दिवा यांना जोडणारे  दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले  आहेत आणि त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल आहेत. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या  वाहतुकीतील  लांब  पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल. तसेच या मार्गांमुळे शहरात 36  नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येतील.

***

Jatsevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799008) Visitor Counter : 348