पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयसीआरआयएसएटी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ; दोन संशोधन सुविधांचेही उद्घाटन
‘तुमचे संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे कृषिक्षेत्र अधिक सुलभ आणि शाश्वत होण्यास मोठी मदत’ पंतप्रधान
“वसुंधरा रक्षणाची लोकचळवळ केवळ शाब्दिक नाही, तर केंद्र सरकारच्या अनेक कृतींमधूनही ती प्रतिबिंबित होते.”
शेतकऱ्यांचे हवामान बदलाच्या आव्हानांपासून संरक्षण करण्यासाठी ‘मुळांशी जोडलेले रहात, भविष्याकडे वाटचाल’ करण्यावर भारताचा भर’ – पंतप्रधान
“डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरूच”
“अमृत काळात, उच्च कृषी विकासासह, सर्वसमावेशक विकासावर भारताचा भर”
“हजारो शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून अल्पउत्पादक शेतकऱ्यांची बाजारात एक सजग आणि सक्षम शक्ती निर्माण करण्याची आमची इच्छा”
“अन्नसुरक्षेसोबतच, पोषक आहार सुरक्षेवरही आमचा भर. याच दृष्टिकोनातून आम्ही गेल्या सात वर्षात अन्नधान्याची जैव-पोषक आहार युक्त वाणे विकसित केली.”
Posted On:
05 FEB 2022 4:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, हैदराबाद जवळच्या पतंचेरूमधील, आयसीआरआयएसएटी-म्हणजेच, निम-शुष्क उष्णकाटिबंधीय प्रदेशातील कृषिपीकविषयक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेला भेट देत, या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष समारंभाचा शुभारंभ केला. तसेच, आयसीआरआयएसएटी संस्थेमधील, हवामान बदलाच्या संकटात रोपांचे संरक्षण करण्यासंदर्भातील संशोधन सुविधा आणि रॅपिड जनरेशन एडव्हॅन्समेंट- म्हणजेच, जलदगतीने होणाऱ्या पिढी संक्रमण संशोधन सुविधेचेही त्यांनी उद्घाटन केले. या दोन्ही सुविधा, आशिया आणि आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आल्या आहेत. तसेच, आयसीआरआयएसएटी च्या विशेष लोगोचे आणि या प्रसंगानिमित्त जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाचेही त्यांनी अनावरण केले. तेलंगणाच्या राज्यपाल, तामिळीसाई सौंदरराजन, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि जी किशन रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज वसंतपंचमीचा पवित्र सण असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयसीआरआयएसएटीला शुभेच्छा दिल्या. आयसीआरआयएसएटी संस्था आणि देशासाठी देखील पुढची 25 वर्षे किती महत्वाची आहेत, ही अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की आपल्याला या 25 वर्षांसाठी नवी उद्दिष्टे निश्चित करत ती पूर्ण करण्यासाठी काम करायला हवे. भारतासह, जगभरात कृषी क्षेत्राला मदत करण्यात आयसीआरआयएसएटीने दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतूक केले. विशेषतः, जल आणि भूव्यवस्थापन, पिकांच्या वाणात विविधता आणणे, पशुधनाचा सर्वांगीण विकास, या सगळ्यात या संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे, पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांच्या बाजारपेठेशी जोडण्याच्या सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवत केलेल्या कार्याचे, तसेच, आंध्रप्रदेश आणि तेलंगणात डाळी आणि चणे उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी या संस्थेची प्रशंसा केली. “तुमचे संशोधन आणि तंत्रज्ञान यामुळे कृषिक्षेत्र अधिक सुलभ आणि शाश्वत होण्यास मदत झाली आहे.”, असे मोदी यावेळी म्हणाले.
हवामान बदलाचा सर्वाधिक फटका, समाजातील सर्वात खालच्या आणि अत्यंत अल्प संसाधने असलेल्या लोकांना बसतो, असे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच, संपूर्ण जगाने हवामान बदलाच्या समस्येकडे अतिशय गांभीर्याने बघायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरणस्नेही जीवनशैली, पी-थ्री, म्हणजे लोककेंद्री वसुंधरा पूरक चळवळ आणि 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन यावरही त्यांनी भाष्य केले. लोकप्रणित, पर्यावरण स्नेही चळवळ प्रत्येक समुदायाला जोडणारी असते, हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीची प्रत्येक व्यक्तिची जबाबदारी असून, ही चळवळ त्यांना जोडणारी आहे. ही चळवळ केवळ शब्दांपुरती मर्यादित नाही, तर सरकारच्या अनेक कृतीतून ती प्रतिबिंबित होते, असेही पंतप्रधान म्हणाले.
देशातील 15 कृषी-हवामान क्षेत्र आणि 6 ऋतूंचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी भारतीय शेतीतील प्राचीन अनुभवाची सखोलता नमूद केली. हवामान बदलाच्या आव्हानांपासून आपल्या शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी 'बॅक टू बेसिक'(मुळाकडे परत) आणि 'मार्च टू फ्युचर'(भविष्याकडे आगेकूच ) यांच्यात मेळ साधण्यावर भारताने लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले. "आमचे लक्ष आमच्या 80 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांवर आहे जे लहान आहेत आणि ज्यांना आमची सर्वाधिक गरज आहे", असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी, बदलत्या भारताचा आणखी एक पैलू नमूद केला. तो म्हणजे डिजिटल शेती. डिजिटल शेतीला त्यांनी भारताचे भविष्य संबोधले आणि प्रतिभावान भारतीय युवा यामध्ये मोठे योगदान देऊ शकतात, हे अधोरेखित केले. पीक मूल्यांकन, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन, ड्रोनद्वारे कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांची फवारणी, अशी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढलेली क्षेत्रे त्यांनी नमूद केली. "डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारत आपल्या प्रयत्नांमध्ये निरंतर वाढ करत आहे,'' असे ते म्हणाले.
अमृत काळात भारत उच्च कृषी विकासासह सर्वसमावेशक विकासावर भर देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. कृषी क्षेत्रातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून साहाय्य दिले जात आहे. “लोकसंख्येच्या मोठ्या समूहाला गरिबीतून बाहेर काढण्याची ताकद आणि त्यांना अधिक चांगल्या जीवनशैलीकडे नेण्याची क्षमता शेतीत आहे. हा अमृत काळ भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना नवीन साधनेही उपलब्ध करून देईल,” असे म्हणाले.
भारत दुहेरी धोरणावर काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एकीकडे जलसंधारण आणि नद्यांच्या जोडणीतून जमिनीचे मोठे क्षेत्र सिंचनाखाली आणले जात आहे. तर दुसरीकडे, मर्यादित सिंचन असलेल्या क्षेत्रात सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याच्या कार्यक्षम वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.
खाद्यतेलांबाबत स्वावलंबनाचे राष्ट्रीय अभियान भारताच्या नव्या दृष्टिकोनाचे सूचक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पाम तेलाचे क्षेत्र 6 लाख हेक्टर विस्तारण्याचे उद्दिष्ट या अभियानात आहे. " भारतीय शेतकऱ्यांना हे प्रत्येक स्तरावर मदत करेल आणि आंध्र प्रदेश व तेलंगणाच्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल", याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 35 दशलक्ष टन शीत साखळी साठवण क्षमता निर्माण करणे आणि 1 लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी, यासारख्या कापणीनंतरच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांबाबतही त्यांनी विस्ताराने सांगितले.
शेतकरी उत्पादक संघटना (FPO )आणि कृषी मूल्य साखळी स्थापन करण्यावरही भारत भर देत आहे. “आम्ही लहान शेतकर्यांना हजारो एफपीओमध्ये संघटित करून त्यांच्यामधून एक सजग आणि सक्षम बाजारपेठ निर्माण करू इच्छितो'', असे पंतप्रधान म्हणाले.
केवळ अन्नधान्य उत्पादन वाढवणे, एवढ्यापुरताच भारताचे उद्दिष्ट मर्यादित नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जगातील एक सर्वात मोठा अन्न सुरक्षा कार्यक्रम चालविण्यासाठी भारताकडे पुरेसे अतिरिक्त अन्नधान्य आहे. “आम्ही अन्न सुरक्षा तसेच पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत आहोत. हा दृष्टिकोन ठेवून आम्ही गेल्या 7 वर्षांत अनेक जैव-फोर्टिफाइड(खाद्यपदार्थांची पोषणमूल्ये वाढवणारी) वाण विकसित केली आहेत.”
इक्रीसॅट (ICRISAT) ही आंतरराष्ट्रीय संस्था असून आशिया आणि सब-सहारन आफ्रिकेतील विकासासाठी कृषी संशोधन करते. ही संस्था शेतकऱ्यांना सुधारित व संकरित पीक वाण पुरवून मदत करते आणि कोरडवाहू भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यास मदत करते.
***
N.Chitale/R.Aghor/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795804)
Visitor Counter : 269
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam