अर्थ मंत्रालय

जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचे 50% पेक्षाही जास्त योगदान


2021-22 च्या पूर्वार्धात सेवाक्षेत्राची 10.8% वाढ

एकंदर सेवाक्षेत्रात 8.2 % वाढ अपेक्षित

Posted On: 31 JAN 2022 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2022

 

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 50% पेक्षा अधिक योगदान सेवाक्षेत्राने दिले आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आजसंसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2021-22 मध्ये ही बाब प्रामुख्याने अधोरेखित झाली दिसते. चालू वित्त वर्षाच्या पूर्वार्धात सेवाक्षेत्रात संथ व सातत्यपूर्ण वाढ होत गेल्याचेही हा अहवाल सांगतो. "2021-22 च्या पहिल्या सहामाहीत सेवाक्षेत्रात वर्षाकाठी 10.8% इतकी वाढ झाली" असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारच्या प्रादुर्भावाच्या प्रसारामुळे नजीकच्या काळात काहीशी अनिश्चितता आली असली तरी, 2021-22 मध्ये सेवाक्षेत्राचे एकूण मूल्यवर्धनाचे (GVA) प्रमाण 8.2 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष स्वरुपात होत असलेल्या व्यवहार क्षेत्रात ही अनिश्चितता विशेषत्वाने जाणवते, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

सेवाक्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक (FDI)

भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीच्या ओघामध्ये सर्वाधिक वाटा सेवाक्षेत्राचा असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत, 16.73 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी थेट परकीय गुंतवणूक सेवाक्षेत्राकडे आली. "वित्तीय, व्यवसाय, आऊटसोर्सिंग, संशोधन आणि विकास, कुरिअर, तंत्रज्ञान-चाचण्या आणि विश्लेषण तसेच शिक्षण उपक्षेत्र यांमध्ये थेट परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते", असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

  

सेवा क्षेत्रातील व्यापार

जागतिक स्तरावर सेवांची निर्यात करण्यात भारताचा सिंहाचा वाटा असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात अधोरेखित केले आहे. 2020 मध्ये पहिल्या दहा सेवा-निर्यातदार देशांमध्ये भारताचा समावेश होता. जगाच्या वाणिज्यिक सेवा निर्यातीत 2020 मध्ये भारताचा वाटा वाढून 4.1% पर्यंत पोहोचला. 2019 मध्ये तोच आकडा 3.4% इतका होता. "कोविड-19 मुळे जगभर झालेल्या लॉकडाउनचा परिणाम, भारताच्या उत्पादित वस्तूंच्या निर्यातीपेक्षा सेवांच्या निर्यातीवर कमी प्रमाणात झाला", असे आर्थिक सर्वेक्षण सांगते. वाहतूक क्षेत्राकडून होणाऱ्या निर्यातीवर कोविड-19 चा परिणाम झाला असला, तरी सॉफ्टवेअर, व्यवसाय, आणि परिवहन सेवांतील निर्यातीमुळे सेवांच्या एकूण निर्यातीत झालेली दोन आकडी (दहा टक्क्यांपेक्षा अधिक) वाढ, या साऱ्यांचा एकत्रित परिणाम होऊन, 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत सेवांच्या निव्वळ निर्यातीत 22.8% टक्क्यांची वाढ नोंदली गेली, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.

* * *

S.Thakur/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793903) Visitor Counter : 614