पंतप्रधान कार्यालय

पंडित जसराज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या उद्‌घाटन समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित


"संगीत हे असे एक माध्यम आहे जे आपल्याला आपल्या सांसारिक कर्तव्यांची जाणीव करून देते आणि ते आपल्याला सांसारिक सीमा ओलांडण्यास मदत करते"

"योग दिनाच्या अनुभवाने सूचित केले आहे की जगासाठी हा भारतीय वारसा लाभदायक ठरला आहे आणि भारतीय संगीतामध्येही मानवी अंतर्मनाला स्पर्श करण्याची क्षमता आहे"

“जगातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संगीताबद्दल जाणून घेण्याचा, शिकण्याचा आणि लाभ घेण्याचा अधिकार आहे. हे पवित्र कार्य पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे”

“आजच्या युगात तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वव्यापी असताना संगीत क्षेत्रातही तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्रांती व्हायला हवी”

"आज आपण काशीसारखी कला आणि संस्कृती केंद्रे पुनरुज्जीवित करत आहोत"

Posted On: 28 JAN 2022 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील आदरणीय व्यक्तिमत्व पंडित जसराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी पंडित जसराज यांच्या संगीतातील अमर उर्जेबद्दल सांगितले आणि त्यांचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवल्याबद्दल दुर्गा जसराज आणि पंडित शारंग देव यांची प्रशंसा केली. पंडित जसराज सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या उद्‌घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान बोलत होते.

भारतीय संगीत परंपरेतील ऋषीमुनींनी दिलेल्या अगाध ज्ञानाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. मोदी म्हणाले की ब्रह्मांड संचालित करणारी शक्ती नाद रूप असून हा  ऊर्जेचा प्रवाह जाणून घेण्याचे सामर्थ्यच भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला  असाधारण बनवते.

"संगीत हे असे एक माध्यम आहे जे आपल्याला आपल्या सांसारिक कर्तव्यांची जाणीव करून देते आणि ते आपल्याला सांसारिक सीमा ओलांडण्यास मदत करते" असे पंतप्रधान म्हणाले.

भारतातील कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या  ध्येयाबद्दल पंतप्रधानांनी पंडित जसराज सांस्कृतिक  प्रतिष्ठानची  प्रशंसा केली. त्यांनी प्रतिष्ठानला तंत्रज्ञानाच्या या युगातील दोन प्रमुख बाबींवर  लक्ष केंद्रित करायला  सांगितले.  ते म्हणाले की, जागतिकीकरणाच्या या युगात भारतीय संगीताने आपली ओळख निर्माण केली पाहिजे. ते म्हणाले की, योग दिनाच्या अनुभवाने  सूचित केले आहे की जगासाठी हा भारतीय वारसा लाभदायक ठरला आहे आणि भारतीय संगीतामध्येही  मानवी अंतर्मनाला स्पर्श करण्याची  क्षमता आहे . जगातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संगीताबद्दल जाणून घेण्याचा, शिकण्याचा आणि लाभ घेण्याचा अधिकार आहे. हे पवित्र कार्य पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

दुसरे म्हणजे, आजच्या युगात जेंव्हा तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वव्यापी असताना संगीत क्षेत्रातही तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान  क्रांती व्हायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी भारतीय वाद्ये आणि परंपरांवर आधारित केवळ संगीताला समर्पित स्टार्टअप्स निर्माण करण्याचे आवाहन केले.

काशीसारख्या संस्कृती आणि कला केंद्रांच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित अलिकडच्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, पर्यावरण संरक्षण आणि निसर्गावरील प्रेमाच्या माध्यमातून भारताने जगाला सुरक्षित भविष्याचा मार्ग दाखवला आहे. वारसा आणि विकासाच्या भारताच्या या प्रवासात ‘सर्वांच्या प्रयत्नांची जोड मिळायला हवी असे आवाहन त्यांनी केले.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793348) Visitor Counter : 201