पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘‘जगाची परिस्थिती‘‘ विषयावर विशेष भाषण


‘‘कोरोना काळामध्ये भारताने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेचे पालन करीत अत्यावश्यक औषधे आणि लसींचा पुरवठा करून अनेकांचे बहुमूल्य प्राण वाचवले’’

‘‘जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारत विश्वासार्ह भागीदार होण्यासाठी कटिबद्ध’’

‘‘भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ’’

‘‘भारत केवळ आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रक्रियेच्या सुलभतेवर लक्ष केंद्रीत करीत आहे असे नाही, तर त्यामुळे गुंतवणूक आणि उत्पादनाला प्रोत्साहनही देत आहे’’

‘‘आगामी 25 वर्षांसाठी उद्दिष्ट निश्चित करून भारत धोरण तयार करीत आहे; या काळामध्ये देशाची विक्रमी वृद्धी करतानाच लोकांचे कल्याण आणि आरोग्यपूर्ण जीवन असावे, तसेच देशाच्या वाढीचा हा काळ हरित, स्वच्छ, शाश्वत आणि विश्वासार्ह असेल’’

‘‘फेकून देण्याची संस्कृती आणि उपभोगवादामुळे पर्यावरण बदलांचे आव्हान अधिक गहिरे संकट बनले आहे. आजच्या ‘टेक-मेक-यूज-डिस्पोज’ अर्थव्यवस्थेकडून आता चक्राकार अर्थव्यवस्थेकडे वेगाने जाणे अत्यंत गरजेचे आहे.

‘‘जीवन संपूर्णपणे बदलून पी-3 म्हणजेच ‘प्रो प्लॅनेट पीपल’साठी जनचळवळ भक्कम पाया निर्माण केला पाहिजे’’

‘’प्रत्येक लोकशाहीवादी राष्ट्राने बहुपक्षीय संस्थांच्या सुधारणांसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक बनले आहे, त्यामुळे त्यांना वर्तमानातील आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्य करणे शक्य होईल’’

Posted On: 17 JAN 2022 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली - दि. 17 जानेवारी, 2022


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस बैठकीमध्ये ‘‘जगाची सद्यस्थिती‘‘ विषयावर आभासी माध्यमातून विशेष भाषण झाले.

जागतिक महामारी कोरोनाची आणखी एक लाट आली असून तिचा भारत अतिशय दक्षतेने आणि आत्मविश्वासाने सामना करीत आहे. त्याचबरोबर आर्थिक आघाडीवर आशादायक परिणाम दिसून येत असून या क्षेत्रात भारत पुढे जात आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, लोकशाहीवर भारतीयांचा असलेला अढळ विश्वास, 21 व्या शतकाला सक्षम बनविणारे तंत्रज्ञान आणि भारतीयांची मानसिकता, त्यांची प्रतिभा आणि स्वभाव यामुळे भारताने सशक्त लोकशाहीच्या माध्यमातून जणू एक आशेचा पुष्पगुच्छ दिला आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘‘कोरोना काळामध्ये भारताने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेचे पालन करीत अनेक देशांना अत्यावश्यक औषधे आणि लसींचा पुरवठा करून अनेकांचे बहुमूल्य प्राण वाचवले’’. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा औषध उत्पादक देश आहे आणि त्याला आता ‘जगाचा औषध निर्माता’ मानले जात आहे, असेही ते म्हणाले.


पंतप्रधान या विशेष भाषणात म्हणाले, ‘‘आज भारत विक्रमी संख्येने सॉफ्टवेअर अभियंते उपलब्ध करून देत आहे. भारतामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त सॉफ्टवेअर डेव्हपर कार्यरत आहेत. देशामध्ये असलेल्या युनिकॉर्नच्या संख्येचा विचार केला तर आज भारत तिस-या क्रमांकावर आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. गेल्या सहा महिन्यांमध्ये देशात 10 हजारांपेक्षा जास्त स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे. भारतामध्ये कार्यरत असलेल्या व्यापक सुरक्षित आणि यशस्वी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मविषयीही माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली. गेल्या महिन्यामध्ये यूपीआयचे  (युनिफाइड पेमेंटस इंटरफेस) 4.4 अब्जांपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. व्यवसायामध्ये सुलभता आणण्यासाठी आणि सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी योजलेल्या विविध उपायांविषयी  पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली. कॉर्पोरेट करांचे सुलभीकरण करतानाच त्यांना जगातल्या स्पर्धात्मक मंचावर अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने काम केल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. भारताने ड्रोन, अंतराळ, भौगोलिक स्थान प्रणाली मापन अशा क्षेत्रांना नियंत्रण मुक्त केले आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, आयटी आणि बीपीओ क्षेत्रांशी संबंधित कालबाह्य ठरलेल्या दूरसंचारच्या नियमनामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 25 हजारांपेक्षा जास्त अनुपालनांचा अडसर दूर केला आहे’’ असेही ते पुढे म्हणाले.


एक भागीदार देश म्हणून भारताच्या वाढत्या आकर्षकतेकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, जागतिक पुरवठा साखळ्यांमधील जगातील सर्वात विश्वासार्ह भागीदार होण्यास भारत वचनबद्ध आहे आणि त्या दृष्टीने विविध देशांशी मुक्त व्यापार करार करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. अभिनव संशोधन, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि उद्योजकता यांच्या संदर्भातील भारताच्या क्षमता भारताला एक आदर्श वैश्विक भागीदार देश म्हणून जगासमोर स्थापित करतात "आणि म्हणून, भारतात गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वात उत्तम काळ आहे,” पंतप्रधान म्हणाले. भारतीय युवक उद्योजकतेच्या क्षेत्रात नवी उंची गाठत आहेत याचा देखील त्यांनी उल्लेख केला. वर्ष 2014 मध्ये देशात असलेल्या केवळ 100 स्टार्ट अप्स च्या तुलनेत आज घडीला 60 हजार स्टार्ट अप्स कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.या स्टार्ट अप्सपैकी 80 स्टार्टअप्स युनिकॉर्न आहेत आणि 40 हून अधिक युनिकॉर्न तर 2021 मध्ये उदयाला आले आहेत असे ते म्हणाले. 

भारताचा आत्मविश्वासपूर्ण दृष्टीकोन अधोरेखित करत, कोरोना काळात जेव्हा संपूर्ण जग परिमाणात्मक शिथिलतेसारख्या हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करत असताना भारत मात्र सुधारणांचे बळकटीकरण करत होता या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. देशातील 6 लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरची सोय, संपर्क सुविधेशी संबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 1.3 ट्रिलीयन डॉलर्सची गुंतवणूक, मालमत्ता चलनीकरणाद्वारे 80 अब्ज डॉलर्सच्या निर्मितीचे उद्दिष्ट आणि वस्तू, नागरिक आणि सेवा यांच्या सुरळीत संपर्क व्यवस्थेमध्ये नवी गती आणण्याच्या दृष्टीने सर्व भागधारकांना एकाच मंचावर आणण्यासाठी गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेची सुरुवात अशा सर्व प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधाविषयक प्रगतीची गणना पंतप्रधानांनी केली. पंतप्रधान मोदींनी या मंचाला सांगितले की आत्मनिर्भर होण्यासाठीच्या मोहिमेत भारत केवळ प्रक्रियांच्या सुलभीकरणावरच लक्ष केंद्रित करत आहे असे नव्हे तर आपला देश गुंतवणूक आणि उत्पादन यांना देखील प्रोत्साहन देत आहे. याचे सर्वात स्पष्ट प्रकटीकरण म्हणजे 14 क्षेत्रांमध्ये 26 अब्ज खर्चाची उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना होय असे त्यांनी सांगितले. पुढील 25 वर्षांतील उद्दिष्टांचा विचार करून भारत भविष्यातील धोरणे आखत आहे यावर त्यांनी भर दिला. या कालखंडात, देशाने उच्च विकास गाठण्याचे आणि कल्याण तसेच स्वास्थ्याचे संपृक्तीकरण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. विकासाचा हा काळ हरित, स्वच्छ, शाश्वत तसेच विश्वसनीय असेल असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

आजची जीवनशैली आणि धोरणे यांच्या पर्यावरणीय मूल्यावर पंतप्रधानांनी अधिक प्रकाश टाकला. आपल्या जीवनशैलीमुळे पर्यावरणासमोर उभ्या राहत असलेल्या आव्हानांकडे त्यांनी निर्देश केला. 'फेकून द्या’ संस्कृती आणि उपभोगवाद यांनी पर्यावरणासमोरची आव्हाने अधिकच तीव्र केली आहेत. आजच्या काळातील ‘घ्या-तयार करा-वापरा-फेकून द्या” प्रकारच्या अर्थव्यवस्थेकडून आपण वेगाने चक्राकार अर्थव्यवस्थेकडे जाणे अत्यावश्यक आहे,” यावर त्यांनी भर दिला. कॉप26 परिषदेत त्यांनी मांडलेल्या ‘लाईफ’ अर्थात पर्यावरणासाठीची जीवनशैली स्वीकारण्याच्या मोहिमेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, ‘लाईफ’ मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप देण्यामुळे पी-3 अर्थात ‘प्रो प्लॅनेट पीपल’ म्हणजेच वसुंधरेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या अभियानाला मजबूत पाया मिळेल. ‘लाईफ’ म्हणजे भविष्यात येऊ शकणाऱ्या वातावरणविषयक संकटांचा आणि इतर अनपेक्षित आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करू शकणाऱ्या लवचिक आणि शाश्वत जीवनशैलीची संकल्पना आहे असे ते म्हणाले. विहित मुदतीपूर्वीच पर्यावरणविषयक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या भारताच्या प्रभावशाली विक्रमाबद्दल देखील मोदी यांनी उपस्थितांना माहिती दिली.

जागतिक पातळीवर सतत बदलत्या तथ्यांनुसार आपणही काही गोष्टींचा स्वीकार करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. बदलत्या जागतिक रचनेमध्ये वैश्विक कुटुंबाला नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे असे सांगून त्यांनी विश्वाला, सद्यस्थितीत प्रत्येक देश आणि संपूर्ण विश्व म्हणून एकत्रित आणि समक्रमित कृती करण्याचे आवाहन केले. पुरवठा साखळीतील व्यत्यय, महागाई आणि हवामान बदल ही अशा काही आव्हानांची महत्त्वाची उदाहरणे आहेत असे त्यांनी सांगितले. त्यांनी क्रिप्टोकरन्सीचे देखील उदाहरण दिले आणि ते म्हणाले की अशा समस्यांमध्ये संबंधित तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने केवळ एखाद्या देशाच्या निर्णयांमुळे निर्माण होत नसतात. यासाठी सर्वांनी एक पातळीवर येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बहुपक्षीय संघटना ज्या काळात अस्तित्वात आल्या तेव्हापासून जागतिक पातळीवर अनेक बदल घडून आले असून बदललेल्या परिस्थितीत, या संस्था जागतिक रचनेतील आव्हानांना तोंड देण्याच्या स्थितीत आहेत का असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. “आणि म्हणून प्रत्येक लोकशाही राष्ट्राने या संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून या संस्था आजच्या काळातील आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देऊ शकतील,” असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषण संपविले.

 


***


ST/SB/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1790673) Visitor Counter : 256