गृह मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी

Posted On: 05 JAN 2022 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भटिंडा इथे पोहचले आणि त्यानंतर ते हुसैनीवाला इथे असलेल्या राष्ट्रीय शहीद स्मारकस्थळी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे नियोजित वेळी हेलिकॉप्टरचे उड्डाण झाले नाही.आकाश निरभ्र होण्यासाठी  सुमारे 20 मिनिटे पंतप्रधानांनी  वाट पाहिली. 

मात्र, त्यानंतरही आकाश स्वच्छ झाले नाही, त्यामुळे पंतप्रधान राष्ट्रीय शहीद स्मारकापर्यंत रस्त्याने जातील, असा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागणार होता. पंजाब पोलीस महासंचालकांकडून आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचा संदेश आल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने या प्रवासाला निघाले.

पंतप्रधान हुसैनीवाला इथल्या राष्ट्रीय शहीद स्मारकापासून  साधारण 30 किलोमीटर दूर अंतरावर असतांना, ज्यावेळी त्यांचा ताफा एका उड्डाणपूलावर पोहोचला, त्यावेळी असे लक्षात आले की तो रस्ता काही आंदोलकांनी अडवून धरला होता.

पंतप्रधान या उड्डाणपूलावर 15 ते 20 मिनिटे अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेली ही मोठी त्रुटी होती.

पंतप्रधानांचा कार्यक्रम आणि दौऱ्याचे नियोजित वेळापत्रक पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आले होते. सामान्य प्रक्रियेनुसार, पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठीची आवश्यक तयारी आणि सुरक्षा व्यवस्था तसेच आकस्मिक अडचणी आल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे अपेक्षित होते. तसेच, नियोजित कार्यक्रमात अकस्मात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर, रस्त्यावरची वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करणे अपेक्षित होते. मात्र, तशी व्यवस्था तैनात करण्यात आलेली नव्हती, हे स्पष्टपणे आढळले.

सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी लक्षात घेता, पंतप्रधानांचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळावर परत नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या गंभीर त्रुटीची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, राज्य सरकारकडून त्याचा सविस्तर अहवाल मागवला आहे. पंजाब सरकारनेही या गंभीर चुकीसाठीची जबाबदारी निश्चित करुन, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना देण्यात आली आहे.


* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787723) Visitor Counter : 293