पंतप्रधान कार्यालय

हलद्वानी येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि कोनशिला बसविण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 30 DEC 2021 11:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2021 

 

भारत माता की जय, भारत माता की जय. उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह जी, तरुण आणि कर्मठ इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंग धामी जी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री मदन कौशिक जी, केंद्रीय मंत्री श्री अजय भट्ट जी, माझे सहकारी रमेश पोख्रीयाल निशंक जी, श्री देवेंद्र सिंग जी रावत, तीरथ सिंग रावत जी, श्री विजय बहुगुणा  जी,उत्तराखंड सरकारचे मंत्री श्री सतपाल महाराज जी, श्री हरक सिंग रावत जी, श्री सुबोध उनियाल जी, श्री वंशीधर भगत जी, संसदेत आमचे सहकारी माला राज्यलक्ष्मी जी, श्री अजय तामता जी, इतर खासदार आणि आमदार आणि कुमाऊंच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! या सगळ्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे.

तिथे वर जे आहेत, ते सगळे सुरक्षित आहेत ना. आपल्याला ऐकू येत असेल. तुम्ही इतके सगळे तिथे कधी भीती वाटते तुम्ही पुढे येऊ नका. चारही बाजूंना इमारतींवर .... तुमचं हे प्रेम, तुमचा आशीर्वाद. गोलज्यूकि यो पवित्र धर्ती कुमाऊं में, ऑपू सबै, भाई बैणिन को म्यार नमस्कार, व सबै नानातिनाकैं म्योर प्यार व आशीष! जागेश्वर - बागेश्वर - सोमेश्वर - रामेश्वर या तीर्थक्षेत्रांच्या या शिवस्थळाला माझे शत शत प्रणाम! देशाच्या स्वातंत्र्यात देखील कुमाऊँचे मोठे योगदान आहे. इथे पंडित बद्रीदत्त पांडे जी, त्यांच्या नेतृत्वात, उत्तरायणी यात्रेत वेठबिगार हमालीची प्रथा संपुष्टात आली होती.

मित्रांनो,

आज कुमाऊंला येण्याचं सौभाग्य मिळालं तर स्वाभाविकच आपल्याशी जे जुनं नातं आहे, जे खोल नातं आहे, त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि ही जी इतक्या आत्मीयतेने आपण उत्तराखंडची टोपी दिली आहे, माझ्यासाठी याहून मोठी अभिमानाची गोष्ट काय असू शकते. मी हा लहान सन्मान समजत नाही. उत्तराखंडच्या मान सन्मानाशी माझ्या भावना जोडल्या जातात. आज इथे 17 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास कामांचे लोकार्पण आणि शिलान्यास झाला आहे. हे प्रकल्प कुमाऊंच्या सर्व सहकाऱ्यांना उत्तम दळणवळण सुविधा, उत्तम आरोग्य सुविधा देणार आहेत. आणि मी तुम्हाला आणखी एक चांगली बातमी देऊ इच्छितो. हलद्वानीच्या लोकांसाठी मी नव्या वर्षाची आणखी एक भेट घेऊन आलो आहे. हलद्वानी शहराच्या एकूणच पायाभूत सुविधांसाठी आम्ही जवळजवळ दोन हजार कोटी रुपयांच्या योजना घेऊन येत आहोत. आता हलद्वानीमध्ये पाणी, सांडपाणी, रस्ते, पार्किंग, पथदिवे या सगळ्यात अभूतपूर्व सुधारणा होणार आहेत.

मित्रांनो,

हे दशक उत्तराखंडचं दशक बनविण्यासाठी अशी विकास कामं वेगाने करण्यावर आम्ही जोर  दिला आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की हे उत्तराखंडचं दशक आहे, तर ते फक्त बोलायचं म्हणून नाही. हे जे मी बोलतो आहे, त्याची अनेक कारणं आहेत. उत्तराखंडच्या लोकांचं सामर्थ्य, हे दशक उत्तराखंडचं दशक बनवेल, असा माझा पक्का विश्वास आहे. मला या मातीची ताकद माहित आहे. उत्तराखंडमध्ये विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा, चार धाम महाप्रकल्प, नवे बनत असलेले रेल्वेचे सगळे मार्ग, हे दशक उत्तराखंडचे दशक बनवतील. उत्तराखंडमध्ये बनत असलेले नवे जलविद्युत प्रकल्प, उत्तराखंडची वाढती औद्योगिक क्षमता, हे दशक उत्तराखंडचे दशक बनवतील. उत्तराखंडमध्ये होत असलेला पर्यटन क्षेत्राचा विकास, संपूर्ण जगात योगा विषयी वाढत असलेले आकर्षण ते उत्तराखंडच्या धरतीकडेच खेचून आणणार आहे. पर्यटकांसाठी वाढत असलेल्या सुविधा, होम स्टे मोहीम, हे दशक उत्तराखंडचे दशक बनवतील. उत्तराखंडात वाढत असलेली नैसर्गिक शेती, इथले हर्बल उत्पादने, कृषी क्षेत्र देखील हे दशक उत्तराखंडचे दशक बनवूनच राहतील, उत्तराखंडचे दशक सन्मानजनक होणार आहे. आजचे प्रकल्प या सगळ्यांशी निगडीत आहेत.  मी उत्तराखंडच्या लोकांना हलद्वानीच्या धरतीवरून खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

हिमालयाची ताकद आपल्याला माहितीच आहे. आपल्याला हे ही माहिती आहे की उत्तराखंड मधून किती नद्या वाहतात. स्वातंत्र्यानंतर इथल्या लोकांनी या नद्यांव्यतिरिक्त आणखी दोन प्रवाह पाहिले आहेत. एक प्रवाह आहे - या पर्वतीय भागाला विकासापासून वंचित ठेवा. तर दुसरा प्रवाह आज - पर्वतीय क्षेत्रातल्या लोकांसाठी अहोरात्र कष्ट करा. पहिल्या प्रवाहातले लोक तुम्हाला कायमच विकासापासून वंचित ठेवू इच्छितात. पर्वतीय क्षेत्रात रस्ते, वीज आणि पाणी पोहचवण्यासाठी जी मेहनत करावी लागणार होती, त्यापासून हे लोक कायमच दूर पळत असत. इथल्या शेकडो गावातल्या कित्येक पिढ्या उत्तम रस्ते, चांगल्या सुविधांच्या अभावामुळे आपले प्रिय उत्तराखंड सोडून इतर कुठेतरी स्थलांतरीत झाली. मात्र, आज मला याचा आनंद आहे की उत्तराखंडच्या लोकांना, देशातल्या लोकांना हे सत्य समजले आहे. आज आमचे सरकार, सबका साथ - सबका विकास या मंत्रासह जलद गतीने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी अविरत कष्ट करत आहे. आज उधम सिंह नगर जिल्ह्यात एम्स ऋषिकेशचे उपग्रह केंद्र आणि पिथौरागढ़ इथे जगजीवन राम सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली आहे. या दोन रुग्णालयांमुळे कुमाऊं आणि तराई क्षेत्राच्या लोकांना देखील खूप मदत मिळणार आहे. अल्मोडा वैद्यकीय महाविद्यालय देखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद गतीने काम सुरु आहे. उत्तराखंडमध्ये दळणवळण व्यवस्था निर्माण करणे हे मोठे आव्हान होते. मात्र त्या आव्हानावर मात करण्याचा देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत. आज याच कार्यक्रमात देखील सुमारे 9 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प रस्ते निर्माणाशी संबंधित आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 1200 किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागात बांधण्याचे काम देखील सुरू झाले आहे. या रस्त्यांव्यतिरिक्त 151 पुलांच्या बांधणीचे कामही सुरु केले जाणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

तुम्हाला सुख - सुविधांपासून वंचित ठेवण्याची मनोवृत्ती असलेल्या लोकांमुळेच मानस खंड, जे मानसरोवराचे प्रवेश द्वार होते, त्या भागातही उत्तम रस्ते निर्माण होऊ शकले नाहीत. आम्ही टनकपूर- पिठौरगढ़ हा बारमाही रस्ता तर बांधलाच, शिवाय लिपुलेख पर्यंत रस्ता बनवला आणि त्या पलीकडे देखील रस्ते विस्ताराचे काम सुरु आहे. आता तर जनतेलाही या लोकांचे सत्य कळले आहे, तर आता या लोकांनी नवे दुकान उघडले आहे. हे दुकान आहे, अफवा पसरवण्याचे. अफवा तयार करा, आणि मग त्यांचा प्रसार करा. आणि त्याच अफवा खऱ्या मानून दिवस रात्र त्यांचा घोष करत रहा. मला असे सांगण्यात आले आहे, की इथे टनकपूर - बागेश्वर रेल्वे मार्गाबद्दल इथले उत्तराखंड विरोधी लोक नवा भ्रम पसरवत आहेत.

मित्रांनो,

टनकपुर - बागेश्वर रेल्वे मार्गाचा अंतिम स्थळ सर्वेक्षण अहवाल, या प्रकल्पाचा मोठा आधार आहे. आणि हे सर्वेक्षण यासाठी सुरु आहे की या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे. आणि आज मी इथे तुम्हा सर्वांना ही खात्री द्यायला आलो आहे, की आज  ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे मार्ग बनतो आहे, उद्या टनकपुर बागेश्वर मार्ग देखील अशाच प्रकारे बनेल. माझ्या उत्तराखंडच्या बंधू आणि भगिनींनो, ही कोनशिला केवळ एक दगड नाही, तर ही अशी संकल्प शिळा आहे, जी हे दुहेरी इंजिनाचे सरकार  पूर्ण करुन दाखवणार आहे.

मित्रांनो,

उत्तराखंडने आपल्या स्थापनेची दोन दशके, म्हणजे 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या वर्षात आपण  सरकार चालवणारी अशी माणसे देखील पहिली आहेत, जी म्हणत असत - हवे तर उत्तराखंडला लुटा, पण माझे सरकार वाचवा. या लोकांनी दोन्ही हातांनी उत्तराखंडला लुटले. ज्याचे उत्तराखंड वर प्रेम आहे, ते कधीही असा विचार करु शकत नाहीत. ज्यांचे कुमाऊं वर प्रेम आहे, ते कुमाऊं सोडून जात नाहीत. ही तर देवभूमी आहे. इथल्या लोकांची सेवा करणे, उत्तराखंडची सेवा करणे देवी - देवतांची सेवा करण्यासारखे आहे. आणि याच भावनेने आमचे सरकार काम करत आहे. मी स्वतः अविरत कष्ट करतो आहे. आधीच्या असुविधा आणि अभावांना आता सुविधा आणि सद्भावात रूपांतरित केले जात आहे. त्यांनी तुम्हाला सुविधांचा अभाव दिला, आम्ही प्रत्येक वर्ग, प्रत्येक क्षेत्रात शंभर टक्के पायाभूत सुविधा पोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहोत.

बंधू आणि भगिनींनो,

लोकांना सुविधांपासून वंचित ठेवण्याच्या राजकरणाची सर्वात मोठी किंमत कोणाला चुकवावी लागत असेल तर त्या आपल्या माता, भगिनी, आपल्या मुली आहेत. स्वयंपाकघरात धूर, तर त्याचा त्रास माता - भगिनींना, शौचालय नाही, तर सगळ्यात जास्त कोंडी होते  मुली-भगिनींची, कच्च्या छतामुळे घरात पाणी गळले, तर सर्वात जास्त त्रास होतो  आईला. मुलं आजारी पडली, उपचारासाठी पैसे नाहीत, सोयी नाहीत - सर्वात जास्त वाईट वाटतं आईला. पाणी आणण्यासाठी सर्वात जास्त परिश्रम करतात आणि वेळ देतात आपल्या आया बहिणी. गेल्या 7 वर्षात मातृशाक्तीच्या या  समस्या आम्ही मुळापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. जल जीवन मिशन – प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी हा असाच एक प्रयत्न आहे. 2 वर्षांत या मिशनच्या अंतर्गत देशाच्या 5 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना पाईपद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे. आज देखील ज्या 70 पेक्षा अधिक प्रकल्पांच्या कोनशिला ठेवल्या गेल्या आहेत त्यामुळे  13 जिल्ह्यांतील बहिणींचे जीवन सुखकर होणार आहे. इतकंच नाही, हलद्वानी आणि जगजीतपूरच्या आसपासच्या क्षेत्रांना देखील पुरेशा पाण्याची आता ती व्यवस्था देखील पिण्याचं पाणी मिळेल. 

मित्रांनो,

आपण कोणत्याही ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी गेलो की तिथे आपल्याला सांगितले जाते,की ही जागा इतक्या वर्षांपूर्वी बांधली गेली, ही वास्तू इतकी जुनी आहे.  पण गेल्या अनेक दशकांपासून देशाची अशी स्थिती आहे की मोठ्या योजनांचा विचार केला तर आपल्या इथे काय सांगितले जाते, आपल्याला  असे सांगितले जाते– ही योजना इतकी वर्षे रखडली आहे, हा प्रकल्प इतक्या दशकांपासून  अपूर्ण आहे. यापूर्वी सरकारमध्ये जे होते त्यांचा तो कायमचा शिक्का आहे.  आज उत्तराखंड येथे जो लखवार प्रकल्प सुरू झालेला आहे त्याचाही हाच इतिहास आहे.  तुम्हाला वाटतं मित्रांनो, जरा तुम्ही विचार करा,आज उत्तराखंडमध्ये जे लोक इथे बसले आहेत त्यांना गेली चार-चार दशकं इथे  झाली असतील.  तुम्ही याच गोष्टी ऐकत आला  असाल, आता तुम्ही विसरूनही गेला असाल की मुद्दा काय आहे?  या प्रकल्पाचा विचार पहिल्यांदा 1976 मध्ये झाला होता. आता जवळ जवळ 50 वर्षे होतील या गोष्टीला. आज 46 वर्षांनंतर आमच्या सरकारने या कामाची कोनशिला बसवली आहे.  मला जरा उत्तराखंडच्या बंधू-भगिनींना विचारायचे आहे की, 1974 मध्ये ज्या कामाचा विचार झाला होता त्याला 46 वर्षे लागली, हा गुन्हा आहे की नाही?  गुन्हेगारांना गुन्हा केलाय असं वाटायला हवं की नाही? हा गुन्हा आहे की नाही, गुन्हा आहे, तर गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी की नाही. अशा प्रकारे उशीर केल्याने तुमचे नुकसान झाले आहे की नाही. उत्तराखंडचे नुकसान झाले आहे की नाही? दोन-दोन पिढ्यांचे नुकसान झाले की नाही? अशी पापे करणाऱ्यांना तुम्ही विसराल का, अशी पापे करणाऱ्यांना विसराल, की त्यांच्या मोठमोठ्या गप्पांमुळे संभ्रमात पडाल?  अशा योजना कमीत कमी पाच दशकांपासून फायलींमध्ये लटकत असतील याची कल्पना कोणताही देश करू शकणार नाही. प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली जात. बंधू आणि भगिनींनो, माझा सात वर्षांचा रेकॉर्ड बघा, अशा जुन्या कामांची दुरुस्ती करण्यातच माझा वेळ जात आहे. आता मी कामं ठिकाणावर आणतो  आहे, आणि तुम्ही त्यांना ठिकाणावर आणा. जे लोक आधी सरकारमध्ये होते, त्यांना तुमची काळजी असती, तर हा प्रकल्प 4 दशके लटकला असता का?  त्यांचे तुमच्यावर प्रेम असते तर या कामाची अशी दुर्दशा झाली असती काय?  सत्य हे आहे की जे पूर्वी सरकारमध्ये होते त्यांनी उत्तराखंडच्या सामर्थ्याची कधीच पर्वा केली नाही.  त्याचा परिणाम असा झाला की, ना आपल्याला पुरेशी वीज मिळाली, ना शेतकऱ्यांच्या शेतावर सिंचनाची सोय झाली आणि देशातील बहुतांश ग्रामीण जनतेला नळाच्या शुद्ध पाण्याविना जगावे लागले.

मित्रांनो,

गेल्या सात वर्षांपासून भारत आपल्या पर्यावरणाचेही  रक्षण करत आहे आणि आपल्या नैसर्गिक क्षमतांचा योग्य वापर करण्यातही गुंतलेला आहे. आज सुरू झालेल्या प्रकल्पांमुळे उत्तराखंडची अतिरिक्त उर्जा असलेले राज्य म्हणून ओळख तर मजबूत होईलच, शिवाय इथल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या पुरेशा सुविधाही उपलब्ध होतील. ही वीज आमच्या उद्योगांना मिळणार, ही वीज आमच्या शाळा-महाविद्यालयांना मिळणार, ही वीज आमच्या रुग्णालयांना मिळणार, ही वीज आमच्या प्रत्येक कुटुंबाला मिळणार.

मित्रांनो,

उत्तराखंडमधील गंगा-यमुना नद्यांच्या आरोग्याचा परिणाम येथील लोकांच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर तसेच देशातील मोठ्या लोकसंख्येवर होतो.  म्हणून आम्ही गंगोत्री ते गंगासागर या एका  मोहिमेत गुंतलो आहोत.  शौचालये बांधणे, उत्तम मलनिस्सारण व्यवस्था आणि आधुनिक जलशुद्धीकरण सुविधा यामुळे गंगेत पडणाऱ्या अशुद्ध नाल्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.  आजच 'नमामि गंगे' योजनेअंतर्गत उधम सिंह नगर, रामनगर, नैनिताल, सीवर लाइन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे.  नैनितालच्या सुंदर तलावाच्या संवर्धनासाठीही काम केले जाईल, ज्याची यापूर्वी कोणीही काळजी घेतली नव्हती.

मित्रांनो,

जगात कुठेही असले तरी पर्यटकांसाठी सुविधा असल्याशिवाय पर्यटन वाढू शकत नाही.  यापूर्वी जे सरकारमध्ये होते, त्यांनी या दिशेने विचारही केला नाही.  आज उत्तराखंडमध्ये जे नवे रस्ते बांधले जात आहेत,  रस्त्यांचे जे रुंदीकरण होत आहे, नवे रेल्वे मार्ग बनवले जात आहेत, ते नवीन पर्यटकांनाही आपल्यासोबत आणतील.  आज उत्तराखंडच्या प्रमुख ठिकाणी जाणारे रोपवे बांधले जात आहेत ते आपल्यासोबत नवीन पर्यटकांनाही आणतील.  आज उत्तराखंडमध्ये जी मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढत आहे, सर्वत्र नवीन टॉवर उभारले जात आहेत, ते ही  पर्यटकांना आपल्यासोबत इथे आणतील.  आज उत्तराखंडमध्ये विकसित होत असलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा आत्मविश्वास वाढेल.  आणि या सगळ्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? त्याचा सर्वात मोठा फायदा उत्तराखंडच्या तरुणांना,डोंगरात रहाणाऱ्या तरुणांना होणार आहे.

जेंव्हा केदारनाथच्या दर्शनासाठी सुविधा वाढल्या तेव्हा तिथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली, याला उत्तराखंडचे लोक साक्षी आहेत. पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. त्याचप्रमाणे आज देश पाहत आहे की, काशी विश्वनाथ धाम बांधल्यानंतर तेथील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  इथे कुमाऊमध्येही जागेश्वर धाम, बागेश्वर अशी पवित्र ठिकाणे आहेत. त्यांच्या विकासामुळे या भागात विकासाच्या नव्या शक्यता निर्माण होणार आहेत. केंद्र सरकारने नैनिताल येथील देवस्थळ येथे भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल टेलिस्कोपही उभारली आहे.  यामुळे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना नवी सुविधा तर मिळालीच, पण या क्षेत्रालाही नवी ओळख मिळाली आहे.

मित्रांनो,

आज दुहेरी इंजिन असलेले सरकार जेवढा पैसा विकास योजनांवर खर्च करत आहे, तेवढा यापूर्वी कधीच झाला नव्हता.  जेव्हा हे रस्ते बांधले जात आहेत, नवीन इमारती बांधल्या जात आहेत, पीएम आवासची घरे बांधली जात आहेत, नवीन रेल्वे मार्ग बांधले जात आहेत, तेव्हा स्थानिक उद्योगांसाठी, आपल्या उत्तराखंडच्या उद्योजकांसाठी नवीन शक्यता निर्माण होतात.  त्यांच्यासाठी उत्तराखंडमधलाच  एखादा व्यापारी सिमेंटचा पुरवठा करतो.  कोणी उत्तराखंडचा व्यापारी लोखंडी कांबी याचा पुरवठा करतो. उत्तराखंडमधला एक अभियंता त्यांच्या डिझाइनशी (रचनेचे)संबंधित काम पुढे नेतो.  या विकास योजनांमुळे आज येथे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.  दुहेरी इंजिनचे सरकार उत्तराखंडच्या अशा तरुणांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे, ज्यांना स्वतःच्या बळावर  कार्य सुरू करायचे आहे.  मुद्रा योजनेंतर्गत तरुणांना बँक हमीशिवाय स्वस्त कर्ज दिले जात आहे.  जे युवक शेतीच्या कामात व्यस्त आहेत, त्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मदत केली जात आहे.  येथे छोटी दुकाने थाटणाऱ्या बंधू-भगिनींना स्वानिधी योजनेतून मदत मिळत आहे.  उत्तराखंडच्या गरिबांसाठी, मध्यमवर्गीय तरुणांसाठी आमच्या सरकारने बँकांचे दरवाजे उघडले आहेत.  त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता यावीत, त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत.  उत्तराखंडमध्ये आयुष आणि सुगंधी उत्पादनांशी संबंधित उद्योगांसाठीही अनेक संधी आहेत.  देशात आणि जगात त्याची मोठी बाजारपेठ आहे.  काशीपुराचे अरोमा पार्क उत्तराखंडची ही शक्ती मजबूत करेल, शेतकऱ्यांना बळ देईल, शेकडो तरुणांना रोजगार देईल.  त्याचप्रमाणे प्लास्टिक इंडस्ट्रियल पार्कमुळे रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत.

बंधू आणि भगिनिंनो,

आज दिल्ली आणि डेहराडूनमध्ये सत्तेच्या भावनेने नव्हे तर सेवेच्या भावनेने सरकार चालते, सीमावर्ती राज्य असूनही या भागाकडे पूर्वीच्या सरकारांनी कसे दुर्लक्ष केले, हे कुमाऊॅंच्या या शूर मातांना ज्यांनी आपल्या मुलांना राष्ट्ररक्षणासाठी समर्पित केले, ते विसरणार नाहीत.  कनेक्टिव्हिटीसोबतच राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रत्येक बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले.  आमच्या सैन्याला आणि सैनिकांना फक्त आणि फक्त वाट पहायला लावले.  वन रँक, वन पेन्शनसाठी प्रतिक्षा  आधुनिक शस्त्रास्त्रांची प्रतीक्षा, बुलेट प्रूफ जॅकेटसारख्या आवश्यक सुरक्षा कवचाची प्रतीक्षा, दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची प्रतीक्षा. पण हे लोक सैन्याचा आणि आपल्या शूर सैनिकांचा अपमान करायला सदैव पुढे होते,तत्पर होते.  कुमाऊॅं रेजिमेंट सैन्याला देणारे उत्तराखंडचे शूर लोक हे कधीच विसरू शकत नाहीत.

मित्रांनो,

उत्तराखंडला विकासाचा वेग वाढवायचा आहे.  तुमची स्वप्ने, हाच आमचा संकल्प;  तुमची इच्छा हीच आमची प्रेरणा आहे आणि तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे.  डबल इंजिनच्या सरकारवर तुमचे असेच आशीर्वाद,या  दशकाला उत्तराखंडचे दशक बनवेल.  पुन्हा एकदा, विकास प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे, संपूर्ण उत्तराखंडचे अभिनंदन करतो. मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. पोरूं बटी साल 2022 उनेर छू, आपू सब उत्तराखण्डीन के, नई सालैकि बधै, तथा दगाड़ में उणी घुघुति त्यारेकि लै बधै !!

भारत माता की जय ! भारत माता की जय ! भारत माता की जय !

खूप खूप धन्यवाद.


* * *

JPS/S.Thakur/Radhika/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786545) Visitor Counter : 207