पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा द्रुतगती मार्गाची केली पायाभरणी
मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बुदौन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराजमधून हा गंगा द्रुतगती मार्ग जाणार
पंडित राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाह खान, ठाकूर रोशन सिंह यांना उद्याच्या हुतात्मा दिवसनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
"गंगा द्रुतगती मार्ग उत्तर प्रदेशासाठी प्रगतीची नवी दारे खुली करेल "
“जेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेशचा एकत्र विकास होतो, तेव्हा देशाची प्रगती होते. त्यामुळे दुहेरी इंजिन सरकारचे लक्ष उत्तर प्रदेशच्या विकासावर''
.
“समाजात मागे राहिलेल्या आणि मागासलेल्यांना विकासाचे फायदे मिळवून देणे हे सरकारचे प्राधान्य. हीच भावना आपल्या कृषी धोरणात आणि शेतकऱ्यांशी संबंधित धोरणात प्रतिबिंबित''
"उत्तर प्रदेशचे लोक म्हणत आहेत - यूपी प्लस योगी, बहुत है उपयोगी- U.P.Y.O.G.I."
Posted On:
18 DEC 2021 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे गंगा द्रुतगती मार्गाची (एक्सप्रेस वे)ची पायाभरणी केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री बी. एल वर्मा. यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना, काकोरी घटनेतील क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाह खान आणि रोशन सिंह यांना आदरांजली अर्पण करून पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. स्थानिक बोली भाषेत बोलताना पंतप्रधानांनी, दामोदर स्वरूप ‘विद्रोही’, राज बहादूर विकल आणि अग्निवेश शुक्ल या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या कवींना आदरांजली वाहिली."उद्या पंडित राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाह खान, ठाकूर रोशन सिंहा यांचा हुतात्मा दिवस आहे.ब्रिटिश राजवटीला आव्हान देणाऱ्या शाहजहानपूरच्या या तीन सुपुत्रांना १९ डिसेंबरला फाशी देण्यात आली होती .भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अशा वीरांचे आपण ऋणी आहोत”, असे पंतप्रधान म्हणाले.
माता गंगा ही मांगल्याचे आणि सर्व प्रगतीचे उगमस्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. माता गंगा ज्याप्रमाणे सर्व सुख देते, सर्व दुःख हरण करते. त्याचप्रमाणे गंगा द्रुतगती मार्गही उत्तरप्रदेशाच्या प्रगतीची नवी दारे उघडेल. द्रुतगती मार्ग , नवीन विमानतळ आणि रेल्वे मार्गांच्या जाळ्याच्या संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, पाच गोष्टी राज्यासाठी वरदान ठरणार आहेत.त्या म्हणजे, पहिले वरदान - लोकांच्या वेळेची बचत. दुसरे वरदान- लोकांच्या सोयी आणि सुलभतेत वाढ. तिसरे वरदान- उत्तरप्रदेशच्या संसाधनांचा योग्य वापर. चौथे वरदान- उत्तर प्रदेशच्या क्षमतांमध्ये वाढ. पाचवे वरदान - उत्तर प्रदेशात सर्वांगीण समृद्धी.
संसाधनांचा योग्य वापर कसा केला जातो हे आज उत्तर प्रदेशात उभारण्यात येत असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांवरून दिसून येते, असे पंतप्रधान म्हणाले. “यापूर्वी सार्वजनिक पैशांचा कशाप्रकारे वापर केला जात होता, हे तुम्ही स्पष्टपणे पाहिले आहे. पण आज उत्तर प्रदेशचा पैसा उत्तर प्रदेशच्या विकासात गुंतवला जात आहे” यावर पंतप्रधानांनी भर दिला.जेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेशची एकत्रित प्रगती होते तेव्हा देशाची प्रगती होते, त्यामुळे दुहेरी इंजिन सरकारचे लक्ष उत्तर प्रदेशच्या विकासावर आहे.असे पंतप्रधान म्हणाले. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र घेऊ आम्ही उत्तर प्रदेशच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत', असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी पाच वर्षांपूर्वीच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले.“राज्यातील काही भाग वगळता इतर शहरे आणि गावांमध्ये वीज उपलब्ध नव्हती.दुहेरी इंजिन असलेल्या सरकारने उत्तरप्रदेशात केवळ सुमारे 80 लाख मोफत वीज जोडण्याच दिल्या नाहीत तर प्रत्येक जिल्ह्याला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त वीज दिली जात आहे,” असे ते म्हणाले. 30 लाखांहून अधिक गरीबांना पक्की घरे मिळाली आहेत आणि उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे मिळावी यासाठी ही मोहीम सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. शाहजहानपूरमध्येही 50 हजार पक्की घरे बांधण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पहिल्यांदाच दलित, वंचित आणि मागासलेल्या घटकांच्या विकासाला त्यांच्या पातळीवर प्राधान्यक्रम देण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, “समाजात जे वंचित राहिलेले आहेत तसेच मागासलेले आहेत त्यांच्यापर्यंत विकासाचे फायदे पोहोचविण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. आपले कृषिविषयक धोरण आणि शेतकऱ्यांशी संबंधित इतर धोरणांमध्ये हीच भावना प्रतिबिंबित झालेली दिसून येते.”
पंतप्रधानांनी देशाचा वारसा आणि तसेच देशाच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामांवर नाखूष असणाऱ्यांच्या मानसिकतेवर देखील टीका केली. ते म्हणाले की अशा घटकांना देशातील गरीब तसेच सामान्य वर्ग त्यांच्यावर अवलंबून राहिलेला हवा असतो. “या लोकांना काशीतील भव्य बाबा विश्वनाथ धामच्या उभारणीबाबत आक्षेप असतो. तसेच या लोकांना अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधल्याबद्दल तक्रार असते. लष्कराने दहशतवाद्यांच्या प्रमुखांविरुद्ध केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करतात. असे लोक भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या, स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.” पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेशात काही काळापूर्वी असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या अत्यंत वाईट परिस्थितीची आणि नजीकच्या काळात त्यात झालेल्या उत्तम बदलाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. त्यांनी या प्रसंगी यू.पी.वाय.ओ.जी.आय. अर्थात उत्तर प्रदेश आणि मुख्यमंत्री योगी यांची जोडी, आहे अत्यंत उपयोगी असा मंत्र दिला.
देशातील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी सुविधा पुरविण्याची पंतप्रधानांची संकल्पना ही द्रुतगती महामार्गाच्या उभारणीमागची प्रेरणा आहे. हा सहा पदरी 594 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यासाठी 36,200 कोटी रुपये खर्च येणार आहे. मीरत मधील बीजौली गावाजवळ सुरु होत असलेला हा द्रुतगती महामार्ग, प्रयागराज मधील जुनापुर दांडू या गावापर्यंत पोहोचेल. हा मार्ग, मीरत, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभाल, बुदाऊन, शहाजहानपूर, हरडोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराज असा मार्गक्रमण करेल. या द्रुतगती महामार्गाचे काम संपल्यानंतर, उत्तर प्रदेशातील पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा हा सर्वात अधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग असेल. हवाई दलाच्या विमानांचे आपत्कालीन आवागमन करण्यासाठी मदत व्हावी म्हणून या द्रुतगती महामार्गावर, शहाजहानपूरमध्ये 3.5 किलोमीटर लांबीची धावपट्टी देखील उभारली जाणार आहे. या द्रुतगती महामार्गाच्या लगत औद्योगिक मार्गिका उभारण्याचा देखील प्रस्ताव आहे.
हा महामार्ग, औद्योगिक विकास, व्यापार,कृषी, पर्यटन, इत्यादी विविध क्षेत्रांना देखील प्रोत्साहन देईल. हा महामार्ग या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना देणारा ठरेल.
R.Aghor/S.Chavan/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783042)
Visitor Counter : 253
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada