इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल भारत अभियानाने देशवासीयांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यात, डिजिटल अर्थव्यवस्थेची उभारणी करण्यात तसेच देशासाठी धोरणात्मक लाभ मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले आहे : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर


केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते आठवडाभर चालणाऱ्या स्वातंत्र्याच्या डिजिटल महोत्सवाची सुरुवात

Posted On: 29 NOV 2021 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021 

 

केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आठवडाभर चालणाऱ्या स्वातंत्र्याच्या डिजिटल महोत्सवाचे उद्घाटन झाले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अजय सोहोनी, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ.राजेंद्र कुमार, नॅसकॉमचे अध्यक्ष देवजानी घोष आणि मायगव्ह.तसेच एनईजीडी चे प्रमुख  अभिषेक सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर त्यांच्या भाषणात म्हणाले की, 2021 हे अत्यंत उल्लेखनीय वर्ष आहे. डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवांची लवचिकता डिजिटल भारत अभियानाने सिध्द केली आहे आणि महामारीनंतर विश्वात भारत अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि अधिक सकारात्मकता असलेला देश म्हणून उदयाला आला आहे. देशवासीयांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यात, डिजिटल अर्थव्यवस्थेची उभारणी करण्यात तसेच देशासाठी धोरणात्मक लाभ मिळवून देण्यात डिजिटल भारत अभियानाने दिलेल्या महत्वाच्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले.

तंत्रज्ञान समावेशाची वाढती तीव्रता आणि लोकांच्या भविष्यासाठीच्या आकांक्षा पाहता, सर्वांसाठी संपर्क सेवा, सरकारी सेवा आणि उत्पादनांचे हुशार स्थापत्य शास्त्राद्वारे डिजीटलीकरण, ट्रिलीयन डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्था, जागतिक प्रमाणीकरण कायदा, आधुनिक तंत्रज्ञानात विशेषतः कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात आघाडी आणि 5 जीतसेच ब्रॉडबँड आधारित कौशल्य आणि प्रतिभा यांचा साठा अशा सहा आघाड्यांवर आवश्यक असलेल्या कृतींची त्यांनी समग्र माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास आणि सबका प्रयास’ आवश्यक आहे असे ते म्हणाले. 

अजय सोहोनी म्हणाले की आपण मिळविलेली सफलता साजरी करण्याचा आणि भविष्यासाठी तसेच नव्या भारताच्या उभारणीसाठी कृती योजना निश्चित करण्याचा हा क्षण आहे. भारतात, विशेषकरून उदयोन्मुख तंत्रज्ञान वापरून डिजिटल उत्पादनांच्या निर्मितीबद्दल देखील त्यांनी चर्चा केली.

मायगव्ह.तसेच एनईजीडीचे प्रमुख अभिषेक सिंग यांनी उपस्थितांना संबोधित करताना परिवर्तनीय डिजिटल उपक्रमांच्या माहितीवर भर दिला. त्यांनी डिजिटल भारत अभियान शक्य करण्यासाठी योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली   आणि ते म्हणाले की डिजिटल भारत अभियानाची दूरदृष्टी ही सध्याच्या आणि भविष्यातील डिजिटल उपक्रमांची प्रेरक शक्ती आहे आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

भारत जगाच्या डिजिटल नकाशावर ठळक अस्तित्व दाखवत असून आता भारत हा जगातील सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश झाला आहे अशी टिप्पणी डॉ. राजेंद्र कुमार यांनी केली. डिजीटल साधनांपासून मंचांपर्यंत प्रगती करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 5 जी सारख्या उभरत्या तंत्रज्ञानावर पकड मिळविण्यासाठी, सायबर सुरक्षा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तसेच डिजीटल विश्वात, विशेषतः माहिती संरक्षणाच्या क्षेत्रात मजबूत कायदेशीर चौकट निर्माण करण्यासाठी केल्या जात असलेल्या अखंडित प्रयत्नांवर देखील त्यांनी भर दिला.

समावेशक विकासासाठी,तंत्रज्ञानाच्या विश्वातील भारताच्या योगदानाबद्दल देवजानी घोष यांनी प्रशंसा केली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात डिजिटल भारत अंतर्गत 75 यशोगाथा, डिजिटल भारताच्या सफलतेची माहिती देणारा चित्रपट आणि 75@75 भारताचा कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील प्रवास यांची सुरुवात  करण्यात आली.  उमंग सुविधेतील मदत प्रक्रियेच्या वितरणाची नीती देखील जाहीर करण्यात आली. उद्घाटन समारंभानंतर  भारत सरकार तसेच विविध स्टार्ट-अप्स उपक्रमांचे सुमारे 50 स्टॉल असलेल्या प्रदर्शनाची सुरुवात देखील करण्यात आले.


* * *

G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776208) Visitor Counter : 326