पंतप्रधान कार्यालय

संसदेतील संविधान दिन सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती


डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.राजेंद्र प्रसाद यांना केले नमन

बापु आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी त्याग करणाऱ्या सर्वांना वाहिली श्रद्धांजली

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहिली आदरांजली

आपला मार्ग योग्य आहे की नाही हे ठरविण्याच्या दृष्टीने सतत मूल्यमापन करण्याच्या हेतूने संविधान दिन साजरा केला पाहिजे

कुटुंबाधारित राजकीय पक्षांच्या रुपात भारत एक प्रकारच्या संकटाकडे वाटचाल करत आहे आणि संविधानाप्रती एकनिष्ठ असलेल्या लोकांसाठी ही चिंतेची बाब आहे

ज्या राजकीय पक्षांनी त्यांचे लोकशाही स्वरूप गमावले आहे ते पक्ष लोकशाहीचे रक्षण कसे करु शकतील ?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कर्तव्यांना अधिक महत्त्व दिले गेले असते तर उत्तम झाले असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या अधिकारांचे रक्षण व्हावे म्हणून आपण कर्तव्याच्या मार्गावर वाटचाल करणे आवश्यक आहे

Posted On: 26 NOV 2021 3:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसद भवनात झालेल्या संविधान दिन सोळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमात माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेच्या सभापतींनी उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रपतींचे भाषण झाल्यानंतर, संपूर्ण देश थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संविधानाच्या उद्देशिका वाचनात सहभागी झाला. यावेळी संविधान सभेत झालेल्या चर्चांची डिजिटल आवृत्ती, भारतीय राज्यघटनेच्या सुलेखन प्रतीची डिजिटल आवृत्ती तसेच भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व सुधारणांचा समावेश असलेली घटनेची अद्ययावत आवृत्ती यांचे राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘घटनात्मक लोकशाही या विषयावरील प्रश्नमंजुषे’चे देखील त्यांनी द्‌घाटन केले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समुदायाला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.राजेंद्र प्रसाद, बापुजी यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या महान व्यक्तिमत्त्वांना आणि स्वातंत्र्य चळवळीत अनेक प्रकारचे त्याग करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. आजचा दिवस या संसद भवनाला सलाम करण्याचा दिवस आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या नेतृत्वाखाली, बरेच विचार मंथन आणि चर्चा झाल्यानंतर, आपल्या राज्यघटनेचे अमृत प्राप्त झाले आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की आजचा दिवस लोकशाहीच्या या मंदिरासमोर नतमस्तक होण्याचा देखील आहे. याप्रसंगी, पंतप्रधानांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली देखील वाहिली. 26/11 हा आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच एक दुःखद दिवस आहे कारण याच दिवशी देशाच्या शत्रूंनी आपल्या देशात शिरून मुंबईमध्ये दहशतवादी हल्ले केले. या दहशतवाद्यांशी लढताना आपल्या देशाच्या शूर जवानांनी प्राणार्पण केले. त्यांच्या समर्पणाला आज मी नमन करतो, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

आपले संविधान म्हणजे केवळ काही लेखांचा संग्रह नाही याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, आपल्या संविधानाला हजारो वर्षांची परंपरा आहे. फार पूर्वीपासून सुरु असलेल्या त्या अखंडित प्रवाहाचे हे आधुनिक स्वरूप आहे. आपण ज्या मार्गावरून पुढे जात आहोत तो मार्ग योग्य आहे की नाही याचे सतत मूल्यमापन व्हावे यासाठी देखील संविधान दिन साजरा करायला हवा.

‘संविधान दिन’ साजरा करण्यामागच्या प्रेरणेला अधिक सविस्तरपणे मांडत पंतप्रधान म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीला ही संकल्पना प्रत्यक्षात आली. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या रुपात देशाला दिलेल्या या अनमोल भेटीपेक्षा दुसरा मोठा प्रसंग काय असू शकेल, आपण सर्वांनी ‘स्मृती ग्रंथा’च्या रुपात त्यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 26 जानेवारीला ज्याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली त्याच प्रकारे 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ साजरा करण्याची परंपरा त्याच वेळेला सुरु झाली असती तर उत्तम झाले असते असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, कुटुंबाधारित राजकीय पक्षांच्या रुपात भारत एका प्रकारच्या संकटाकडे वाटचाल करत आहे, आणि संविधानाप्रती एकनिष्ठ असणाऱ्या लोकांसाठी तसेच लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या लोकांसाठी ही चिंतेची बाब आहे. ते म्हणाले, एकाच कुटुंबातील एकाहून अधिक व्यक्ती गुणवत्तेच्या आधारावर एकाच पक्षात कार्यरत असल्या म्हणजे तो पक्ष घराणेशाही असलेला पक्ष नसतो. मात्र, पिढ्यानपिढ्या एकाच कुटुंबातील व्यक्तींद्वारे राजकीय पक्ष चालविला जात असेल तर समस्या निर्माण होतात. जेव्हा राजकीय पक्ष त्यांचे लोकशाही स्वरूप गमावून बसतात तेव्हा संविधानाच्या मूळ उर्जेला देखील धक्का पोहोचतो, घटनेतील प्रत्येक कलमाचा अनादर देखील होतो याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. ज्या पक्षांनी त्यांचे लोकशाही स्वरूप गमावले आहे ते पक्ष लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दोषी, भ्रष्टाचारी लोकांचे गुन्हे विसरून त्यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध पंतप्रधानांनी सावधानतेचा इशारा दिला. ते म्हणाले की, अशा लोकांना सुधारण्याची संधी देतानाच, सार्वजनिक जीवनात त्यांना मान सन्मान देणे आपण टाळायला हवे.

पंतप्रधान म्हणाले स्वातंत्र्य चळवळीत अधिकारांसाठी लढा देत असताना देखील महात्मा गांधींनी देशाला कर्तव्यांसाठी सज्ज राहण्याचा प्रयत्न केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कर्तव्यांना अधिक महत्त्व दिले गेले असते तर उत्तम झाले असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या अधिकारांचे रक्षण व्हावे यासाठी आपण कर्तव्याच्या मार्गावर वाटचाल करणे आवश्यक आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775299) Visitor Counter : 315