पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीणच्या (पीएमएवाय-जी)त्रिपुरा येथील लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 14 NOV 2021 5:00PM by PIB Mumbai

नमस्कार! खुलमाखा! त्रिपुरसुंदरी मातेचा विजय असो!! 

कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी झालेले  त्रिपुराचे मुख्यमंत्री श्री बिप्लव देव जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री गिरीराज सिंग जी, श्रीमती प्रतिभा भौमिक जी, त्रिपूराचे उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्माजी, सर्व खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह, पंचायत सदस्य आणि त्रिपुराच्या माझ्या उत्साही, मेहनती, माझ्या सर्व प्रिय, बंधू आणि भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, 

त्रिपुराच्या सहकाऱ्यांशी बोलून माझा विश्वास आणखी वाढला आहे. आज त्यांच्याशी मला बोलण्याची संधी मिळाली,आनंद वाटला.  विकासाचे हे तेज, आपले घर आणि सन्मानाच्या जीवनाचा आत्मविश्वास त्रिपुरा आणि संपूर्ण ईशान्य भारताला नवीन उंचीवर घेऊन जाईल. नव्या विचारांसोबत पुढे जाणारा त्रिपुरा आगामी काळात कसा असेल, याचा आपण अंदाज देखील बांधू शकतो. 

मित्रांनो,

आपल्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला, कुठलं मोठं यश मिळालं, तर आपण स्वाभाविकपणे उत्साहित होतो, आनंदी होतो, आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते. मात्र हे यश, आशेचा नवा किरण जर प्रदीर्घ वेळ वाट बघितल्यानंतर मिळत असेल, आयुष्यभर अंधारच अंधार, अंधारच अंधार आणि त्यात एक किरण दृष्टीस पडला तर त्याची चमक अनेक पटींनी जास्त असते. जेव्हापासून बिप्लव देवजींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चमक सातत्याने वाढत जात आहे. आज आपला त्रिपुरा आणि संपूर्ण ईशान्य भारत अशाच बदलाचा साक्षीदार बनत आहे. 

आज पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरांच्या पहिल्या हप्त्याने त्रिपुराच्या स्वप्नांना नवी उभारी दिली आहे. पहिल्या हप्त्याच्या जवळजवळ दीड लाख लाभार्थी कुटुंबाचं, सर्व त्रिपुरावासियांचं मी अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री बिप्लव देब जी आणि त्यांच्या सरकारचं देखील अभिनंदन करतो. त्यांनी इतक्या कमी वेळात सरकारी कार्यसंस्कृती, काम करण्याची जुनी पद्धत, जुनी मानसिकता बदलली आहे. ज्या तरुणाईच्या जोशात बिप्लब देवजीचं सरकार काम करत आहे, तोच जोश, तीच ऊर्जा संपूर्ण त्रिपुरामध्ये दिसते आहे. 

मित्रांनो, 

मला आठवतं, चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत लोक म्हणत की दशकानुदाशके त्रिपुरात ही पद्धत सुरू आहे, ती बदलणं अशक्य आहे. मात्र जेव्हा त्रिपुराने बदलायचं ठरवलं, तेव्हा त्रिपुराच्या विकासात झारीतल्या शुक्राचार्यांसारखी अडचण ठरलेली जुनी पद्धत पूर्णपणे बदलून टाकली. आता त्रिपुराला गरीबीत अडकवून ठेवणारी, त्रिपुराच्या लोकांना सुख -सुविधांपासून वंचित ठेवणारी ती विचारसरणी त्रिपुरामधून हद्दपार झाली आहे. आता इथे डबल इंजिनचे सरकार पूर्ण ताकदीने, पूर्ण प्रामाणिकमाणे राज्याच्या विकासाच्या कामाला लागले आहे. आता आगरतला आणि दिल्ली, दोन्ही एकत्र येऊन त्रिपुराच्या विकासासाठी धोरण आखतात, मेहनत करतात, आणि त्याचे परिणाम आज दिसू लागले आहेत. आपण बघा, गेल्या चार वर्षांत, त्रिपुराच्या खेड्यांत जवळपास 50 हजार कुटुंबांना पंतप्रधान घरकुल योजनेत पक्की घरं बांधून देण्यात आली आहेत. आता जवळपास 1 लाख 60 हजार नवीन घरांच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. एकाच वेळी, एकत्रितपणे ज्या घरांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी जवळजवळ दीड लाख कुटुंबांना आज पहिला हप्ता देखील वितरित करण्यात आला आहे. आणि ते देखील, एकाच वेळी, एक बटन दाबून!

त्रिपुराची ही मानसिकता आणि त्रिपुराचा हा वेग, कोरोना विरुद्धच्या लढाईत देखील बघायला मिळाला होता. 45 वर्षांवरील वयाच्या लोकांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचा विक्रम सर्वात पहिले त्रिपुरानेच केला होता. आणि आता त्रिपुरा 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्याच्या अगदी जवळ आला आहे. 

मित्रांनो, 

आधी देशाच्या उत्तर आणि पश्चिमेकडच्या भागांतून आमच्या नद्या पूर्वेला येत तर होत्या, पण विकासाची गंगा येथे येण्यापूर्वी आकुंचन पावत असे. देशाच्या सर्वंकष विकासाचा विचार तुकड्या तुकड्यात केला जात असे. यामुळे, आमचा ईशान्य भाग स्वतःला उपेक्षित समजत होता. मात्र आज देशाचा विकास 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या दृष्टीकोनातून बघितला जातो. विकास आता देशाची एकता- अखंडता याचा पर्याय म्हणून बघितला जातो. पूर्वी दिल्लीत बंद खोलीत धोरणं बनवली जात, आणि ईशान्य भारताला त्यात बसविण्याचे अयशस्वी प्रयत्न केले जात. जमिनीवरील वास्तवतेपासून दूर गेल्याने, स्थानिक पातळीवर फुटीरतेला खतपाणी घातले जात होते. मात्र, गेल्या सात वर्षांत देशात एकनवा विचार, नवा दृष्टिकोन निश्चित केला आहे. आता दिल्लीच्या मर्जीने नाही तर येथल्या गरजांनुसार धोरणं बनवली जातात. पंतप्रधान घरकुल योजनेचंच बघा ना! पक्क्या घरांसाठी काही नियम, त्रिपुराच्या लाखो कुटुंबांसमोर अडथळा बनून उभे होते. पण सरकारने त्रिपुराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार अभ्यास करून, त्यानुसार नियमांत बदल केले, आवश्यक धोरणे आखली. आणि त्यामुळे आज हजारो नवीन कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकला आहे. विकासासाठी अशी संवेदनशीलता अतिशय गरजेची आहे. इतकंच नाही, आम्ही याकडेही लक्ष दिलं आहे, की बांधली जाणारी घरे, इथले वातावरण आणि राहणीमानाला अनुरूप असावीत. आम्ही घरांचा आकार वाढवला आणि नव्या सुविधा देखील दिल्या. 

मित्रांनो,

पंतप्रधान घरकुल योजनेची सर्वात मोठी शक्ती आहे, त्याबद्दल मी देशाला वारंवार सांगत असतो. आणि ज्या स्थानाला त्रिपुरा सुंदरीचा खास आशीर्वाद प्राप्त झाला आहे, त्या ठिकाणी मी याचा उल्लेख जरूर करीन. शतकानुशतके आपल्याकडे जी विचारसरणी होती, त्यात महिलांच्या नावावर घर नसायचं, महिलांच्या नावावर संपत्ती नसायची. पंतप्रधान घरकुल योजनेमुळे ही विचारसरणी बदलण्याचे देखील काम झाले आहे. 

 

या योजनेअंतर्गत जी घरे बांधली जातात , त्यांचे बहुतांश मालकी हक्क आपल्या भगिनी-मुलींना मिळत आहेत. आता त्या घराच्या कागदपत्रांवरही घराची मालकीण बनत आहेत. एवढेच नाही, पीएम आवास योजनेतून मिळालेल्या घरांमध्ये जी गॅस जोडणी मिळत आहे, वीज जोडणी मिळत आहे, पाण्याची जोडणी मिळत आहे, त्या सर्वांचा लाभ देखील आपल्या भगिनी-मुलींना सर्वात जास्त होत आहे.

मित्रांनो ,

 

भारताच्या विकासात, आत्मविश्वास भरलेल्या भारताच्या महिला शक्तीचे भारताला पुढे नेण्यात खूप मोठे योगदान  आहे. या  महिला शक्तीचे खूप मोठे  प्रतीक, आपले  महिला स्वयं सहाय्यता बचत गट देखील आहेत. आम्ही बचत गटात काम करणाऱ्या भगिनींना जनधन खात्यांच्या माध्यमातून बँकिंग व्यवस्थेशी देखील जोडले आहे. त्यांच्या  विना हमी कर्जात देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.  प्रत्येक बचत गटाला पूर्वी 10 लाख रुपयांपर्यंत विना हमी कर्ज मिळत होते , आता ही रक्कम वाढवून दुप्पट म्हणजेच 20 लाख रुपये करण्यात  आली आहे.

मला आनंद आहे की त्रिपुरा सरकारचे देखील महिलांना सशक्त करण्यात पूर्ण ताकदीनिशी  काम करण्याचे धोरण आहे. इथे यापूर्वी जे सरकार होते. बिप्लव देव येण्यापूर्वी जे सरकार होते त्यांच्याविषयी मी बोलत आहे. त्यांच्या पाच वर्षाच्या काळात  त्रिपुरामध्ये केवळ 4 हजार महिला बचत गट होते. तर 2018  मध्ये इथे डबल इंजिनचे  सरकार बनल्यानंतर ,  26 हजारपेक्षा अधिक नवीन महिला बचत गट तयार झाले आहेत. यात ज्या महिला सहभागी झाल्या आहेत , कृषी उत्पादने तयार करत आहेत, बांबूशी संबंधित वस्तू तयार करत आहेत, हातमागाशी  संबंधित काम करत आहेत.  त्रिपुरा सरकार त्यांना  आर्थिक मदत देत आहे, त्यांना  निरंतर सशक्त करत आहे.

 मित्रांनो ,

कमी वेळेत कशा प्रकारे मोठे बदल होऊ शकतात , मर्यादित काळात नवी व्यवस्था उभारली जाऊ शकते , हे त्रिपुराने दाखवून दिले आहे, आज मी त्रिपुराचे अभिनंदन करतो.पूर्वी इथे कमीशन आणि भ्रष्टाचाराशिवाय काम ही होत नसे, मात्र आज सरकारी योजनांचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यात पोहचत आहे. पूर्वी आपल्या एकेक कामासाठी सामान्य माणसाला सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत होत्या, मात्र आज अनेक सेवा आणि  सुविधा देण्यासाठी  सरकार स्वतः तुमच्याकडे येत आहे.

पूर्वी  सरकारी कर्मचारी, वेळेवर पगार मिळावा यासाठी काळजीत असायचे, आता त्यांना सातव्या वेतन आयोगाचा  लाभ मिळत आहे. पूर्वी इथे शेतकऱ्यांना आपले उत्पादन विकण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता, मात्र आता  त्रिपुरामध्ये प्रथमच शेतकऱ्यांकडून किमान हमी भावाने धान्य खरेदी करण्यात आली आहे.  हीच  त्रिपुरा, हेच  लोक, हेच सामर्थ्य, मात्र पूर्वी संपाच्या संस्कृतीमुळे इथे उद्योग यायला घाबरत होते, त्या त्रिपुरात आता निर्यात सुमारे पाच पटीने वाढली आहे.

मित्रांनो ,

त्रिपुरामध्ये डबल इंजिनच्या सरकारचा ज्यांना  लाभ होत आहे, त्यापैकी बहुतांश  गरीब, दलित, मागास आणि विशेषतः आपले आदिवासी समाजाचे बंधू-भगिनी आहेत. आपला ईशान्य प्रदेश तर देशाची सर्वात प्राचीन आणि  समृद्ध आदिवासी संस्कृतींचे देखील केंद्र आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात आपल्या ईशान्य प्रदेशच्या आदिवासी सैनिकांनी आणि देशभरातील आदिवासी सैनिकांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. या परंपरेला  सन्मान  देण्यासाठी, हा वारसा पुढे नेण्यासाठी देश निरंतर काम करत आहे.

याच अनुषंगाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान देशाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.  देश आता दरवर्षी  15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जन्मजयंती  आदिवासी  गौरव दिवस म्हणून साजरी करेल. म्हणजेच उद्या जो 15 नोव्हेंबर येत आहे, उद्याचा दिवस संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात आदिवासी  गौरव दिवस म्हणून साजरा केला जाईल आणि यापुढेही हा दिवस आदिवासी  गौरव दिवस असेल. हा दिवस केवळ आपल्या आदिवासी वारशाला वंदन करण्याचा दिवस नसेल, तर एका समरस समाजासाठी देशाच्या संकल्पाचे प्रतीक देखील बनेल. आणि मी जेव्हा आदिवासी  गौरव दिवस बाबत बोलतो, जसे स्वातंत्र्याच्या संपूर्ण आंदोलनात  15 ऑगस्टचे एक विशेष मोल  आहे ,  जसे लोकशाही मूल्यांच्या आपल्या प्रथेत 26 जानेवारीचे एक विशेष मूल्य  आहे, जसे आपल्या  सांस्‍कृतिक परंपरांमध्ये रामनवमीचे  महत्त्व  आहे,  जसे आपल्या आयुष्यात कृष्‍ण अष्‍टमीचे  महत्‍व आहे, तसेच  2 ऑक्टोबर  महात्‍मा गांधी यांची जयंती अहिंसा दिन म्हणून पाळली जाते , जसे  31 ऑक्टोबर - सरदार वल्‍लभ भाई पटेल, त्यांची  जन्‍म-जयंती देशाच्या एकतेच्या संदेशाशी जोडली आहे, तसेच आता  15 नोव्हेंबर हा दिवस आपला देश आदिवासी  गौरव दिवस म्हणून साजरा करेल. आणि देशाच्या जमातींनी देशाच्या विकासासाठी, देशाच्या समृद्धीसाठी जे काही केले आहे  , जे काही करायची इच्छा आहे  , ते सगळे उत्साहाने पुढे  नेले जाईल.

मित्रांनो ,

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, देशाचा हा  महोत्सव, ईशान्य प्रदेशचे रंग आणि इथल्या  संस्कृतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच,  2047 मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील,त्यावेळी  देश जी नवनवी शिखरे सर करेल , त्याचे नेतृत्व, त्यात खूप मोठे योगदान या माझ्या ईशान्य प्रदेशने  करायचे आहे.

आज ईशान्य प्रदेशाच्या विकासाला प्रत्येक दिशेने, प्रत्येक आयामासह गती दिली जात आहे.  इथे निसर्ग आणि  पर्यटनाशी संबंधित एवढी अपार क्षमता आहे, दक्षिण आशियाशी भारताला जोडण्याचे मार्ग आहेत,  व्यापाराच्या अमाप संधी आहेत , या सर्व शक्यता साकार होतील जेव्हा इथे आधुनिक पायाभूत सुविधा असतील, उत्तम संपर्क व्यवस्था असेल.

मागील दशकांमध्ये याबाबतीत ज्या त्रुटी राहिल्या आहेत, त्या आज वेगाने पूर्ण केल्या जात आहेत.  आज ईशान्य प्रदेशाला  रेल्वेने जोडले जात आहे, नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहेत.  त्याचप्रमाणे, ज्या भागांना पूर्वी दुर्गम समजून वगळले जायचे तिथे आता नवनवीन महामार्ग तयार होत आहेत, रुंद रस्ते तयार होत आहेत, पूल बांधले जात आहेत. इथे  त्रिपुरामध्येही नवीन रेल्वे मार्गांचे,  नवीन राष्ट्रीय महामार्गांचे बरेच काम झाले आहे. या  आधुनिक पायाभूत सुविधा आगामी वर्षात ईशान्य प्रदेशला, इथल्या प्रगतीला नवी ओळख मिळवून देईल.

 मला पूर्ण विश्वास आहे की आपले हे  संकल्प, ईशान्य प्रदेशात होत असलेले हे बदल नजीकच्या भविष्यात देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जातील.

पुन्हा एकदा एवढी मोठी महत्‍वपूर्ण कामे , छोटयाशा राज्यात एवढी मोठी  महत्‍वपूर्ण भरारी याचा मला अभिमान वाटतो, आनंद मिळतो. तुम्हा सर्व लाभार्थ्यांना , त्रिपुराच्या नागरिकांना , ईशान्य प्रदेशच्या माझ्या सर्व प्रिय बंधू-भगिनींना अनेक-अनेक शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. 

 

खूप-खूप  धन्‍यवाद !

***

RadhikaA/SushmaK/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771828) Visitor Counter : 225