पंतप्रधान कार्यालय

ग्लासगो येथे कॉप  26 शिखर परिषदेत ‘द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 02 NOV 2021 10:34PM by PIB Mumbai

 

महामहिम,

  • 'द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’' - आयआरआयएस चा प्रारंभ एक नवी आशा जागवत आहे, नवा आत्मविश्वास देत आहे. सर्वात असुरक्षित देशांसाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळत आहे.
  • यासाठी मी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीचे (सीडीआरआय ) अभिनंदन करतो.
  • या महत्त्वाच्या मंचावर, मी ऑस्ट्रेलिया आणि यूकेसह सर्व सहयोगी देशांच्या सर्व नेत्यांचे आणि विशेषतः मॉरिशस आणि जमैकासह लहान द्वीप  समूहातील देशांच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो.
  • या उपक्रमाच्या प्रारंभासाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मी संयुक्त राष्ट्रांच्या  सरचिटणीसांचे आभार मानतो.

 

महामहिम,

  • हवामान बदलाच्या प्रकोपापासून  कोणीही सुरक्षित नाही, हे गेल्या काही दशकांनी सिद्ध केले आहे. विकसित देश असोत किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेले देश, प्रत्येकासाठी हा मोठा धोका आहे.
  • पण यातही  हवामान बदलाचा सर्वात मोठा धोका ' विकसनशील लहान द्वीप  राष्ट्रांना - एसआयडीएस ' ला आहे.त्यांच्यासाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे; हे त्यांच्या अस्तित्वासाठी एक आव्हान आहे.हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आपत्ती त्यांच्यासाठी अक्षरश: प्रलयंकारी ठरू शकतात.
  • अशा देशांमध्ये हवामान बदलाचे संकट  हे त्यांच्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठीही मोठे आव्हान आहे.असे देश पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात, पण नैसर्गिक आपत्तींमुळे पर्यटकही तिथे यायला घाबरतात.

 

मित्रांनो,

  • विकसनशील लहान द्वीप राष्ट्रे शतकानुशतके निसर्गाशी समन्वय राखून आपली वाटचाल करत आहेत आणि त्यांना निसर्गाच्या चक्रांशी कसे जुळवून घ्यावे हे  माहित आहे.
  • मात्र गेल्या अनेक दशकांपासून दाखविलेल्या स्वार्थी वृत्तीमुळे  निसर्गाचे अनैसर्गिक रूप समोर आले आहे, ज्याचे परिणाम आज निरपराध विकसनशील लहान द्वीप राष्ट्रांना भोगावे लागत आहेत.
  • आणि, म्हणूनच, माझ्यासाठी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या  आघाडी किंवा  द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा  ही केवळ पायाभूत सुविधांचीच  बाब नाही, तर ती मानवी कल्याणाच्या अत्यंत संवेदनशील जबाबदारीचा भाग आहे.
  • मानवजातीप्रती ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
  • हे एक प्रकारे आपल्या पापांचे  सामाईक प्रायश्चित्त आहे.

 

मित्रांनो,

  • सीडीआरआय -आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची  आघाडी  ही चर्चासत्रातून निर्माण होणारी कल्पना नाही, तर अनेक वर्षांच्या विचारमंथन आणि अनुभवाच्या परिणामातून  सीडीआरआयचा जन्म झाला आहे.
  • विकसनशील लहान द्वीप राष्ट्रांवर घोंघावणारा हवामान बदलाचा  धोका लक्षात घेऊन, भारताने पॅसिफिक द्वीपसमूह  आणि  कॅरीकॉम  (CARICOM) राष्ट्रांसोबत सहकार्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
  • आम्ही त्या देशांमधील  नागरिकांना सौर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आणि तेथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले.
  • हे कायम राखत, आज या व्यासपीठावरून मी भारताच्या वतीने  आणखी एका नवीन उपक्रमाची घोषणा करत आहे.
  • भारताची अंतराळ संस्था, इस्रो विकसनशील लहान द्वीप राष्ट्रांसाठी  एक विशेष डेटा खिडकी  तयार करेल.
  • यामुळे, विकसनशील लहान द्वीप राष्ट्रांना  उपग्रहाद्वारे चक्रीवादळ, समुद्रातील प्रवाळ खडकांचे निरीक्षण , किनारपट्टीवर देखरेख  इत्यादीं संदर्भात  वेळेवर माहिती मिळत राहील.

 

मित्रांनो,

  • सीडीआरआय  आणि एसआयडीएस या दोघांनी आयआरआयएस -' द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा' हा उपक्रम साकार  करण्यासाठी एकत्र काम केले आहे, सह-निर्मिती आणि सह-फायद्यांचे एक उदाहरण आहे.
  • म्हणूनच मी आज आयआरआयएस उपक्रमाचा  प्रारंभ होणे अत्यंत महत्त्वाचे मानतो
  • आयआरआयएसद्वारे, लहान विकसनशील द्वीप राष्ट्रांसाठी   तंत्रज्ञान, वित्त आणि आवश्यक माहिती एकत्रित करणे सोपे आणि जलद होईल.लहान विकसनशील द्वीप राष्ट्रांमध्ये  दर्जेदार पायाभूत सुविधांना चालना दिल्याने तेथील जीवन आणि उपजीविका या दोन्ही गोष्टींना लाभ मिळेल.
  • मी आधी सांगितल्याप्रमाणे, जग या देशांना कमी लोकसंख्येची छोटी बेटे मानते, मात्र  मी या देशांकडे  मोठ्या क्षमतेची महासागरी राष्ट्रे  म्हणून पाहतो.ज्याप्रमाणे समुद्रातील मोत्यांची माळ सर्वांना शोभून दिसते , त्याचप्रमाणे समुद्रात वसलेली  लहान द्वीप राष्ट्रे जगाची शोभा वाढवत आहेत.
  • मी तुम्हाला ग्वाही  देतो की, भारत या नवीन प्रकल्पाला पूर्ण सहकार्य देईल, आणि या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी सीडीआरआय, अन्य भागीदार देश आणि संयुक्त राष्ट्रांसोबत एकत्रितपणे काम करेल.
  • या नवीन उपक्रमासाठी सीडीआरआय  आणि सर्व लहान द्वीप  समूहांचे  अभिनंदन आणि शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद...!

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1769049) Visitor Counter : 364